.
History इतिहास

इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 5


(मागील भागावरून पुढे)

शनिवार

कच्छ्च्या रणाच्या साधारण मध्यभागी 313 चौरस किमी क्षेत्रफळाचे एक बेट आहे. या बेटाला खादिर बेट या नावाने ओळखले जाते. मी गुरुवारी भेट दिलेला व रणाच्या दक्षिण किनार्‍यालगत खड्या असलेल्या कालो डुंगर किंवा Black hill या नावाने परिचित असलेल्या पर्वतरांगांच्या साधारण पूर्वेला हे बेट येते. कालो डुंगर नजिकचा किनारा व खादिर बेट यामधील सरळ रेषेचे अंतर 25 किमी पेक्षा कमीच भरेल. परंतु या दोन्हींना जोडणारा कोणताच रस्ता अस्तित्वात नाही. गुजरात सरकारने काही काळापूर्वी या दोन्हींना जोडणारा रस्ता व पूल बांधण्याची तयारी केली होती. परंतु मध्यवर्ती सरकारने नेमलेल्या एका तज्ञांच्या समितीने असा रस्ता व पूल बांधण्याची कल्पना रणाच्या पर्यावरणास अत्यंत घातक ठरेल असे मत व्यक्त केल्याने हा प्रकल्प गुजरात सरकारला बासनात गुंडाळून ठेवणे भाग पडले.

मी आज भेट देऊ इच्छित असलेले स्थान, धोलाविरा, हे या खादिर बेटाच्या पश्चिम टोकावर असलेली एक छोटी वस्ती आहे. परंतु सरळ रस्ता नसल्याने मला रणाच्या काठाने जाऊन या बेटाच्या पूर्व टोकाकडून या बेटावर प्रवेश घेणे गरजेचे आहे. या बाजूने खादिर बेटावर येण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्याने भूज आणि धोलाविरा यामधे पडणारे 250 किमी अंतर लक्षात घेऊन सकाळी शक्य तितक्या लवकर भूजहून प्रयाण करण्याचा माझा बेत फारसा यशस्वी होत नाही व मी हायवे 42 वर प्रवेश करतो तेंव्हा घड्याळात सकाळचे पावणेआठ वाजून गेल्याचे माझ्या लक्षात येते आहे. आहे. भूजच्या सीमेच्या बाहेर पडल्याबरोबर उजव्या हाताला मला भुजंगिया डुंगर किंवा Hill of the serpent व त्यावर असलेल्या भारदस्त किल्याची मजबूत तटबंदी दिसते आहे. हायवे 42 मात्र मोठ्या सुस्थितीत राखलेला दिसतो आहे. मात्र इतक्या ठिकाणी या रस्त्यावर पुराचे पाणी येऊ नये म्हणून सांडवे बांधण्याचे काम चालू आहे की त्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डायव्हर्शन्स वरून गाडी न्यावी लागत असल्याने दर काही मिनिटांनी गाडीची गती अगदी हळू होते आहे. या हायवेच्या भूज ते भचाउ या संपूर्ण टप्यावर रस्त्याच्या उजव्या हाताला मोठमोठे उद्योग धंदे उभे राहताना दिसत आहेत. गाडीच्या ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे हा सर्व विकास गेल्या 10 वर्षात झालेला आहे व त्याच्या आधी ही सर्व जमीन वैराण व ओसाड स्वरूपात होती. सकाळचे सव्वादहा वाजलेले असताना आम्ही सामखियाली गावाजवळ पोचतो आहोत व नंतर चित्रोड या गावाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय हमरस्ता 15 वर वळतो आहोत. चित्रोड जवळ हा रस्ता सोडून आम्ही रापर गावावरून पुढे जाणार्‍या हायवे 51 वर वळतो. .वन प्रदेशातून जाणारा हा संपूर्ण रस्ता सुद्धा अतिशय सुस्थितीत आहे. हा वन विभाग सुद्धा कच्छ्मध्ये इतरत्र ठिकाणी दिसणार्‍या वनांसारखाच आहे. कोरडी जमीन, त्यावर वाळलेले गवत आणि बाभूळ व विलायती बाभूळ यांची झाडे झुडपे हेच दृष्य सगळीकडे दिसते आहे. मात्र सर्वत्र दुभत्या जनावरांचे मोठे कळप चरताना दिसत आहेत. रापर नंतर देसालपार, बालासार आणि लोडराणी या खेड्यांमधून हा रस्ता जातो व अखेरीस पश्चिमेकडे वळतो. लोडराणी खेड्यापासून सुमारे 8 किमी अंतरावर मला नाकासमोर जाणारा एक लांब पूल समोर दिसतो आहे. व हा पूल परत जमीन लागेपर्यंत धवल मरुभूमीमधून जाणार आहे हेही लक्षात येते आहे.

आमची गाडी पुलावरून जाऊ लागल्यानंतर दोन्ही बाजूकडील परिसराचे गाडीच्या काचेतून मला दिसणारे दृष्य, थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वप्नातील दृष्याप्रमाणे अवर्णनीय आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसते आहे ती पार क्षितिजाला जाऊन पोचणारी धवलता. माझे दिशा ज्ञान आता हरवल्यासारखेच झाले आहे कारण डोळ्यासमोर दिसणारा डांबरी रस्ता सोडला तर सर्व दिशांना शुभ्र धवलतेशिवाय दुसरे काही दिसतच नाहीये. या धवलतेच्या वर आहे निळे स्वच्छ आकाश आणि तळपणारा सूर्य. अशा भ्रामक वातावरणात आम्ही बरीच मिनिटे घालवतो व अखेरीस पूल संपतो व आमची गाडी खादिर बेटावर पोचते आहे. रणातील इतर बेटांप्रमाणे हे बेट निर्मनुष्य नसून येथे छोटी छोटी बरीच खेडेगावे आहेत. रस्त्याने जाता जाता अमरपूर, गणेशपूर, बांबिनिका व अखेरीस जनान या गावांच्या पाट्या मला दिसतात. जनान मध्ये सीमा सुरक्षा दलाची एक चौकी आहे. येथून आम्ही पुढे जातो आणि मला समोर एक प्रशस्त असा वाहनतळ आणि धोलाविरा पुरातत्त्व संग्रहालय असा मोठा नामफलक दिसू लागतो. मी घड्याळाकडे बघतो. दुपारचे सव्वाबारा झाले आहेत आणि आम्ही गुजरात शासनाने बनवलेल्या प्रशस्त व आरामदायी रस्त्याच्या कृपेने धोलाविराला अगदी वेळेत पोहोचतो आहोत.

बर्‍याच वाचकांना असा प्रश्न पडला असण्याची शक्यता आहे की भारताच्या पश्चिम सीमेजवळच्या एका कोपर्‍यातल्या स्थानावर असलेल्या व कोणत्याही मोठ्या शहर किंवा गावापासून दूरवर असलेल्या या खादिर बेटावर येण्यासाठी एवढी धडपड करून येण्याचा मी का प्रयत्न करतो आहे? अर्थातच यामागे एक कारण आहे. पुरातत्त्व विभागाचे संचालक श्री जगत पती जोशी यांनी 1967-68 मध्ये शोधून काढलेल्या व 1990 ते 2005 एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये दरवर्षी या जागी श्री आर. एस. बिश्त यांच्या नेतृत्त्वाखाली केले गेलेल्या उत्खननामुळे, भारताच्या इतिहासपूर्व कालाबद्दल आपल्या व परकीयांच्या मनात असलेले अनेक गैरसमज आणि भ्रम, निखालस खोटे असल्याचे आढळून आले आहे आणि त्या कालखंडामधील भारतीय द्वीपकल्पामधे सत्य परिस्थिती काय होती याची बर्‍यापैकी कल्पना या उत्खननामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकली आहे. त्यामुळे या जागेला मला भेट द्यायचीच आहे.

धोलाविरा संग्रहालयाजवळ मी थोडी चौकशी करतो व पुढच्या 2 तासासाठी श्री रावजीभाई यांना या पुरातन महानगरामध्ये फेरफटका करताना गाईड म्हणून घेण्याचे ठरवतो व त्यांच्या बरोबर, समोर दिसणार्‍या एका टेकडीवजा उंचवट्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात करतो.

या टेकाडाचा बराचसा भाग उत्खनन करून फोडलेला दिसतो आहे. प्रथम समोर दिसते आहे सध्या पूर्ण कोरडी ठणठणीत असलेली आणि मनहरहे नाव असलेली एक पावसाळी नदी. या नदीवर कधी काळी बांधलेल्या एका पुरातन बंधार्‍याचे दगड पात्रात पडलेले दिसत आहेत. रावजी भाई सांगतात की या टेकाडाच्या वायव्य कोपर्‍यालगत सुद्धा मनसरया नावाची आणखी एक अशीच पावसाळी नदी आहे. या दोन नद्यांतून, पावसाळ्यात वाहणार्‍या पाण्याचा पूर्णत: वापर करता येईल अशी व्यवस्था या नगरीमधील नियोजनकारांनी केली होती. या पुरातन नगरीत एके काळी 15000 ते 20000 नागरिक रहात असत त्यांना पिण्यासाठी व इतर उपयोगासाठी पुरेसे पाणी केवळ या दोन पावसाळी नद्यांमधून उपलब्ध होत होते. परंतु 1 किंवा 2 महिनेच उपलब्ध होत असलेले हे पाणी वर्षभराच्या उपयोगासाठी म्हणून साठवून ठेवण्याची अतिशय विस्मयकारक व्यवस्था धोलाविरामधील नियोजनकारांनी केली होती.

टेकडाच्या पुढे उजव्या हाताला प्रथम मला दिसतो आहे एक मोठा पाणी साठवण्याचा तलाव. या तलावाच्या एका बाजूच्या भिंतीच्या कडेने पायर्‍या खोदलेल्या दिसत आहेत. ‘मनहरनदीचे पाणी प्रथम या तलावात वहात येत असे. या तलावालगत 11 ते 13 मीटर रुंदीची एक भिंत मला दिसते आहे. मातीच्या विटा व मातीचेच प्लॅस्टर वापरून बांधलेल्या या भिंतीला दोन्ही बाजूंनी दगड किंवा चिरे पृष्ठभागांवर बसवून त्यांना मजबूती आणलेली आहे. इजिप्त मधल्या पिरॅमिडच्या भिंतींना जसा ढाळ दिलेला दिसतो तसाच काहीसा ढाळ या भिंतीला आहे. या नगरीतील किल्ल्याला चहूबाजूंना असलेल्या चार भिंतींची मजबूत तटबंदी केलेली होती. रावजीभाई मला सांगतात की हे शहर अस्तित्वात होते त्या 1200 वर्षांच्या कालखंडात ( ..पूर्व 2600 ते इ..पूर्व 1400) या तटांची उंची 3 किंवा 4 वेळा वाढवली गेलेली होती. किल्यामध्ये पिण्याचे पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र हौद व एक विहीर होती. या विहीरीचे पाणी बैलाच्या सहाय्याने मोटेद्वारा उपसले जात असे. पाणी साठवण्याच्या किल्यामधील हौदांच्या तळाला मध्यभागी गाळ साठून रहावा व वरील पाणी स्वच्छ रहावे म्हणून चौरस आकाराची कुंडे तळाशी खोदलेली होती. होती.या कुंडात पाण्यातील गाळ व इतर जड कचरा साठून रहात असे व ठरावीक कालानंतर या कुंडांमधील गाळ साफ केला जात असे.

पूर्वेकडचे महाद्वार

धोलाविरा मधे पर्जन्य वृष्टीचे प्रमाण अतिशय स्वल्प असले तरी पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब साठवला जाईल अशी परिपूर्ण व्यवस्था केलेली होती. या साठी तटाच्या भिंतींना उभे चर ठेवलेले होते व यातून खाली येणारे पाणी भाजलेल्या मातीच्या बनवलेल्या नळांतून आणून एका हौदामध्ये साठवले जात होते.

पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेला चर

उत्तर महाद्वार

 

गुळगुळीत पॉलिश केलेला स्तंभाचा तळातील दगड

स्टेडियमच्या बाजूस प्रेक्षकांना बसण्यासाठी बांधलेल्या पायर्‍या

किल्यामधील विहीर

किल्यावरून पश्चिमेच्या बाजूस दिसणारी धवल मरूभूमी

धोलाविरा किल्यामध्ये पाणी पुरवठा वर्षभर सुरळीतपणे व्हावा या साठी केलेल्या योजनेच्या कांकणभर सरस अशी योजना, किल्यातील सांडपाणी बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी धोलाविराच्या नियोजनकारांनी केली होती. किल्यामध्ये असलेल्या महालांमधील खोल्यांच्या कोपर्‍यांतून, भाजलेल्या मातीतून बनवलेले सांडपाण्याचे नळ भिंतींच्या तळाना बसवलेले होते. या नळांतून वाहत जाणारे पाणी मुख्य सांडपाण्याच्या वाहिनीला जोडलेले होते. जमिनीखालून जाणार्‍या या सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये हवा अडकून पाण्याचा प्रवाह बंद होऊ नये यासाठी जमिनीवर उच्छ्वास बांधलेले होते. सांडपाणी नंतर पश्चिमेला, शहरापासून जवळच असलेल्या समुद्रात ( सध्या तेथे धवल मरूभूमी आहे) सोडले जात असे. प्रत्येक खोलीच्या कोपर्‍यात वापरलेले पाणी फेकून न देता साठवण्यासाठी ते मातीच्या मोठ्या कुंभांत साठवून ठेवण्याची प्रथा होती असे दिसते.

किल्याच्या पश्चिम तटबंदीच्या बाहेर सेवकवर्गाची निवासस्थाने आणि धान्य साठवून ठेवण्यासाठी मोठे हौद बांधलेले होते. त्याच्या पलीकडे आणखी अनेक पाणी साठवण्याचे तलाव बांधलेले होते. किल्याच्या पूर्व, उत्तर आणि पश्चिम तटबंदीमध्ये प्रवेशद्वारे बांधलेली होती. या द्वारांजवळ 1 किंवा 2 देवड्या बर्‍याच उंचीवर बांधलेल्या आढळून आलेल्या आहेत. कदाचित उंटांवर बसण्यासाठी चढ उतार या देवड्यांमधून केली जात असावी. देवडीला 3 बाजूंना भिंती बांधलेल्या होत्या व आता येण्याच्या मार्गाजवळच्या बाजूला दगडी गोलाकार स्तंभ उभारून छताला आधार दिलेला होती. हे गोलाकार स्तंभ एकमेकात अड्कवले जातील अशा छोटे गोलाकार आकाराचे चिरे एकावर एक ठेवून बनवलेले होते व हे गोलाकार तुकडे आजही इतस्ततः पडलेले दिसू शकतात. किल्याच्या मध्यभागी असलेल्या मार्गाचे, पॉलिश केलेल्या सॅन्डस्टोनचे व 4 फूट उंचीचे असे स्तंभ जमिनीवर उभे करून 3 भागात वर्गीकरण केलेले होते. उत्तर द्वाराजवळच्या एका देवडीत, पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना, सिंधू संस्कृतीतील चिन्ह लिपी मध्ये लिहिलेला आणि 15 इंच उंच असलेली चिन्हे असलेला एक मोठा नामफलक सापडला होती. 3 मीटर लांबीचा हा फलक लाकडी होता व त्यावर जिप्सम या खनिजातून कोरलेली 10 चिन्हे बसवून हा नामफलक बहुधा द्वारावर उभा केलेला असावा. हे शहर नष्ट झाल्यावर हा फलक बहुधा तसाच देवडीमध्ये पडून राहिल्यामुळे त्याचे लाकूड कुजून नष्ट झाले व फक्त जिप्समची चिन्हे खालच्या पाषाणावर चिकटून राहिल्याने टिकली. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मताने या नामफलकावर या शहराचे नाव बाहेरगावांहून येणार्‍या प्रवाशांना वाचता यावे म्हणून मोठ्या आकारात लिहिलेले होते.

उत्तर द्वाराबाहेर 10000 प्रेक्षक बसू शकतील असे एक मोठे स्टेडियम बांधलेले होते. हे स्टेडियम सांस्कृतिक किंवा औपचारिक समारंभ आणि आठवड्याचा बाजार या सारख्या प्रसंगी बहुधा वापरले जात असावे, धोलाविरा हे बंदर असल्याने तेथे कोणते जहाज माल घेऊन आले की त्यावरील मालाची खरेदी विक्री सुद्धा या स्टेडियम मध्ये केली जात असल्याची शक्यता वाटते. रावजीभाई मला सांगतात की किल्यातील जिन्यांना 7, 15 आणि 30 पायर्‍या आहेत व त्यावर काही सांकेतीक वस्तू ठेवून ती बहुधा रोजा सकाळी हलवली जात असे. या सोप्या पद्धतीने आठवडा, पंधरवडा व महिना यांची कालगणना केली जात असे. येथे पूर्वी समुद्र होता याच्या स्पष्ट खुणा किल्याच्या भिंती बांधण्यासाठी जे दगड वापरलेले आहेत त्यावर असलेल्या जीवाश्म खुणांवरून कळते. रावजीभाई मला शिंपल्यांच्या खुणा असलेला एक दगड दाखवतात.

पॉलिश केलेला दगडी स्तंभ

दगडी खांबाच्या तळातील खाचा घेतलेला दगड

किल्याची भेट आटोपून मी आता जवळच असलेल्या संग्रहालयाला भेट देतो आहे. येथे सापडलेली भाजलेल्या मातीची पात्रे, हत्यारे, मातीतून बनवलेल्या बाहुल्यांसारख्या वस्तू आणि उत्खननात सापडलेल्या असंख्य वस्तूंची छायाचित्रे येथे मांडलेली आहेत. या वस्तू व चित्रे बघून हे पुरातन शहर आणि येथे वास्तव्य करणारे लोक यांच्या जीवनशैलीबद्दल खूपच माहिती मला मिळते आहे.

भाजलेल्या मातीतून बनवलेली खेळणी

मनाला समाधान देणार्‍या या भेटीनंतर आम्ही बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा समाचार घेतो आणि थोडी विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला निघतो. रापर आणि चित्रोड गावांच्या मध्ये आम्हाला रस्त्यावर एक नीलगाय (Boselaphus tragocamelus the largest Asian antelope, family Bovidae) आडवी येते व आपण खरोखरच वन विभागात अजून आहोत याची खात्री पटते. आम्ही सामखियाली गावाजवळ एका धाब्यावर चहा पितो व उजवीकडे भचाउ मार्गाने परत भूजकडे जाण्याऐवजी हायवे 27 वरून काठेवाड कडे जाण्यास निघतो. आजचा आमचा मुक्काम मोरवी किंवा मोरबी या शहरात आहे. हे शहर छोटया रणापासून फक्त 40 किमी अंतरावर असल्याने मला उद्या छोट्या रणाला धावती भेट देता येईल अशी आशा वाटते आहे. मोरवीला पोचायला आम्हाला तिन्हीसांजा होतात. मोरवी गावात शिरताना प्रथम काय जाणवते आहे ती आसमंतात आणि हवेत सर्वत्र असलेली धूळ. मोरवीमध्ये सिरॅमिक टाईल्स बनवणारे अनेक कारखाने असल्याने ही धूळ बहुधा अनुभवण्यास येते.

(क्रमश)

25 एप्रिल 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: