.
Travel-पर्यटन, Uncategorized

इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 4


(मागील भागावरून पुढे)

शुक्रवार

मी आज सकाळी जरा लवकरच तयार झालो आहे. भोजन कक्षात जाऊन मी चटकन न्याहरी उरकतो व भारताच्या एका दुर्लक्षित कोपर्‍यामधे स्थापन केलेल्या या विस्मयकारक कॅम्पला अलविदा म्हणतो. अतिशय आरामदायी व्यवस्था आणि कॅम्प व्यवस्थापनाने दाखवलेले उत्तम आतिथ्य यामुळे गेले 3 दिवस इतक्या पटकन संपले आहेत की विश्वास बसणेही कठीण होते आहे. बिनचूक प्लॅनिंग आणि त्याच बरोबर कमालीची कार्यक्षमता यामुळे कॅम्प व्यवस्थापनाला मला मनापासून दाद द्याविशी वाटते आहे. आमची बस कॅम्प सोडते व काही वेळातच परत एकदा भिरंडीयारनी गावात थांबते. या गावातला थांबा हा पूर्वीच्या मुंबईपुणे रस्त्याला जसा खोपोलीचा थांबा अनिवार्य असे तसाच बहुधा इथल्या वाहन चालकांना वाटत असावा. परंतु या खेपेस मात्र मी बसमधून खाली उतरतो व दुधापासून बनवलेला इथला प्रसिद्ध मावा खरेदी करतो. भूजमध्ये मी पोचतो तेंव्हा सकाळचे 11 वाजले आहेत आणि हॉटेलमध्ये चेक इन करायला मला काहीच अडचण नाही. आजचा दिवस मी या पुरातन शहरामध्ये साइट सीइंग करण्यात घालवायचा असे ठरवले आहे. या शहराचे भूज हे नाव येथे जवळच असलेल्या 160 मीटर उंचीच्या भुजियो डुंगर किंवा Serpant Hill या नावाने ओळखल्या जाणार्‍या पर्वतामुळे पडले आहे. सर्पांचा राजा भुजंग याचे हे वसतीस्थान होते अशी एक आख्यायिका आहे व त्यामुळे या पर्वतावर भुजंगाचे एक मंदीर सुद्धा आहे.

8व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत कच्छ्वर सिंध मधील सामा या राजपूत घराण्याची सत्ता होती. हा काळ सिंधच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी ज्याबद्दल लिहून ठेवावे असा सुवर्णकाल होता असा समज आहे. या नंतर या राजांची सत्ता कमजोर पडत गेली. राजघराण्याच्या अंतर्गत अनेक कट कारस्थाने व हत्या घडवल्या गेल्या आणि अखेरीस या सामा राजपुतांचे वंशज असलेलेच लाखो जडेजा घराणे सत्तेवर आले. तेंव्हापासून हे घराणे जडेजा राजपूत या नावाने ओळखले जाते. या राजांनी सिंधमधून कच्छ्चा राज्यकारभार न चालवता तो कच्छ मधील अंजर गावातून चालवण्यास सुरुवात केली. कच्छच्या भौगोलिक मध्यावर भूज गाव येत असल्याने त्याचे महत्त्व ओळखून इ..1549 मध्ये खेंगराज 1 या राजाने आपली राजधानी भूजला हलवली आणि कच्छची भूज ही राजधानी अस्तित्वात आली.

प्रथम मोगल काळात व नंतर ब्रिटिश राजवटीत, जडेजा राजे बर्‍याच प्रमाणात आपले स्वतंत्र सार्वभौमत्त्व राखण्यात यशस्वी ठरल्याने भूज शहराला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व राखून ठेवता आले आहे. 18 व्या शतकात गादीवर आलेल्या लखपतजी 1 यांच्यापासून पुढे गादीवर आलेल्या सर्व जडेजा राजांनी भूजमध्ये नवे नवे महाल बांधले आणि शहर शोभिवंत करण्याकडे लक्ष बरेच केंद्रित केले. परंतु दर काही दशकांनंतर होत गेलेल्या महाभयंकर भूकंपांमुळे कच्छ्मध्ये बांधल्या गेलेल्या जवळपास सर्व इमारती जमीनदोस्त होत राहिल्या व जडेजा राजांनी बांधलेले महाल सुद्धा याला अपवाद ठरू शकले नाहीत. या भूकंप मालिकेपैकी सर्वात भयावह भूकंप 16 जून 1819 या दिवशी झाला. यानंतर 1844-45, 1864 आणि शेवटी 2001 मध्ये असेच जबरदस्त भूकंपाचे झटके भूजला बसले. या भूकंपांमध्ये कच्छ मधील जवळपास सर्वच जुन्या इमारती जमीन सपाट झालेल्या आहेत.

ऐना महल

भूजच्या साधारण मध्यभागात असलेल्या हमिसर तलावाच्या चहूबाजूंना भूजमधील बहुतेक प्रेक्षणीय स्थळे बांधलेली/ बनवली गेलेली असल्याने भूज मधील पर्यटन हे फारशा प्रयासांविना पर्यटकांना करता येते. मागच्या वर्षी हा तलाव तुडूंब भरून वहात होता म्हणे! परंतु या वर्षी पाऊसच न पडल्याने तलावात पाणीच नाहीये. तलावाभोवतीची प्रेक्षणीय स्थळे बघण्याआधी मी प्रथम पेटपूजा करण्याचे ठरवतो व बस स्टॅन्ड जवळील एका बर्‍या दिसणार्‍या हॉटेलात जाऊन कच्छी पावभाजीची ऑर्डर देतो. चमचमीत पावभाजीच्या भोजनानंतर भूजमधील साइट सीइंग, हमिसर तलावाच्या काठावर असलेल्या ऐना महालापासून सुरू करावे असे ठरवून एक रिक्षा ठरवतो. भूजमधील रिक्षा मात्र अत्यंत त्रासदायक वाटतात. एकतर बसण्यासाठी असलेल्या सीट्स आरामदायक अजिबातच नाहीत व पळताना त्या आवाजही प्रचंड प्रमाणात करत राहतात. ऐना महालाच्या प्रवेशद्वाराशी पोचल्यानंतर मात्र माझी मोठी निराशा होते. ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने ऐना महालाचे दरवाजे बंद असल्याचे मला दिसते आहे.

1750 मध्ये राव लखपतजी यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या साठी त्यांनी आधीच्या वर्षांत रामसिंघ मालम या कारागिराला आरसे बनवणे आणि धातू काम यांचे विशेष शिक्षण घेण्यासाठी युरोपला पाठवले होते. होते. तो परत आल्यावर त्याने या महालाचे काम व्हेनिसहून काचा मागवून पूर्ण केले होते. या दुमजली इमारतीत दरबार हॉल, आरसे महाल आणि राजपरिवारासाठी कक्ष बनवण्यात आले होते. संगमरवरी फरशांनी आच्छादलेल्या भिंती व त्यावर सोन्याचे पाणी चढवलेल्या पत्र्याच्या कोंदणांत बसवलेले आरसे हे या महालाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्याचप्रमाणे तळाच्या थोड्या वर असलेल्या एका प्लॅटफॉर्मवर बसवलेली कारंजी हे ही या महालाची एक खासियत आहे. हा महाल रामसिंघ मालम याच्या कारागिरीची कमाल मानली जाते. 18व्या शतकाच्या मध्यावर बांधलेला व युरोपियन छाप असलेल्या भारतीय स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या महालाचे नेहमीच नाव घेतले जाते.

ऐना महालाच्या बाह्य भिंतीवरील कोरीव काम

 

प्रागजी महाल

ऐना महालाच्या अगदी बाजूलाच हा महाल आहे. 1838-76 या कालात कच्छच्या गादीवर असलेले राव प्रागमलजी दुसरे यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या महालाचे डिझाइन एक सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद कर्नल हेनरी सेंट विल्किन्स यांनी केलेले होते. याच काळात बांधल्या गेलेल्या पुण्यातील डेक्कन कॉलेज, ससून हॉस्पिटल आणि ओहेल डेव्हिड सिनेगॉग (लाल देऊळ) या सारख्या इमारतींचे आराखडे याच वास्तुविशारदांनी केलेले असल्याने हा महाल मला अगदी सुपरिचित असल्या सारखाच भासतो आहे. हा महाल बांधण्यासाठी 10 वर्षे लागली व अंदाजे 20 लाख रुपये एवढा खर्च आला होता. मला मात्र हा महाल, मुंबईच्या फोर्ट विभागात असलेला राजाभाई टॉवर व त्या शेजारील मुंबई विद्यापीठाची मुख्य इमारत, या दोन्ही सारखाच हुबेहुब वाटतो आहे व त्यामुळे त्याची खास अशी छाप माझ्यावर पडू शकत नाहीये. या महालाच्या व्हरांड्यातील आधार स्तंभ आणि त्यावरील कॉर्निस हे भाग सुद्धा मला ओळखीचेच भासत आहेत. हा महाल सुदैवाने प्रवेश करण्यास आज खुला आहे. मी प्रवेश पत्रिका विकत घेतो व आत पाऊल टाकतो.


ब्रिटिश काळात भारतात असलेल्या अनेक छोट्या छोट्या संस्थानिकांचे जसे महाल होते साधारण त्याच धर्तीवर असलेल्या या महालामधे आता एक संग्रहालय बनवण्यात आलेले आहे. त्या कालातील फर्निचर, राजपरिवारातील व्यक्तींच्या वापरातील वस्तू, तैलचित्रे, भांडीकुंडी, शिकारीत मारलेल्या प्राण्यांची पेंढा भरलेली डोकी, बंदुका आणि राजपुत्र व राजकन्या यांची खेळणी या सारख्या गोष्टी येथे मांडून ठेवलेल्या दिसत आहेत. राव प्रागमलजी यांच्या दरबार हॉलचे नूतनीकरण चालू असल्यामुळे तो हॉल बंदच आहे. या संग्रहालयातील स्तूंपैकी मला सर्वात काय आवडले असेल तर राजा रविवर्मा यांनी चित्रित केलेल्या चित्रांच्या छापील प्रतींची एक फ्रेम करून ठेवलेली मालिका. या फ्रेम्समध्ये या चित्रांमधील व्यक्तींच्या, विशेषेकरून स्त्रियांच्या अंगावरील वस्त्रांचे पदर किंवा काठ यावर बारीक चमचम कणारे खडे चिकटवले आहेत व त्यामुळे या चित्रांचे मूळ सौंदर्य मोठे खुलून दिसते आहे.

या प्रासादाच्या गच्चीवरून मला जवळचा असलेला पण संपूर्णपणे आटलेला हमिसर तलाव दिसतो आहे. त्याच प्रमाणे पलीकडेच असलेला रामकुंड हा पाणी तलाव ही कोरडा ठणठणीत दिसतो आहे. महालाच्या पुढच्या पोर्चपाशी एक चाकांवर बसवलेली तोफ ठेवलेली आहे. तिचा वापर कधी झाला असेल असे वाटत नाही. ही तोफ़ बहुधा एक शो पीस म्हणूनच ठेवलेली असावी. या महालाच्या समोर असलेल्या राणी महालाची 2001 मधील भूकंपात अपरिमित हानी झालेली असल्याने प्रागजी महालाचा संपूर्ण परिसर हा पडझड झालेल्या अवस्थेत दिसतो आहे. समोर दिसणारी तोफ या पडझडीची एकुलती एक मूक साक्षीदार असावी असे माझ्या मनाला वाटत राहिले आहे.

रामकुंड

या राणी महालाची एवढी हानी भूकंपामध्ये झालेली आहे की यात प्रवेश करणेही धोकादायक समजले जाते आहे. या राणी महालाचे स्थापत्य मात्र अप्रतिम आहे यात शंकाच नाही. गवाक्षे आणि द्वारे यांच्या बाहेर असलेल्या षटकोनी आकाराच्या बाल्कनी व त्यावर बसवलेल्या आणि कोरीव काम करून तयार केलेल्या जाळ्या, दरवाज्यांबाहेरील चौकटी या अतिशय सुंदर रितीने बनवल्या गेलेल्या आहेत. राणी महालाच्या स्थापत्याचे बाहेरून कौतुक करण्याशिवाय बाकी काहीच करणे शक्य नसल्याने मी तेथे काही मिनिटे घालवतो व कच्छ संग्रहालयाकडे जाण्यास निघतो.

महाराव खेंगरजी तिसरे यांनी सन 1877 मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली होती. जुन्या काळातील स्थापत्याची वैशिष्ट्ये दाखवणारे नमुने, कच्छमधील हस्तकलांचे नमुने याचा मोठा संग्रह येथे आहे. परंतु ईदची सुट्टी असल्याने हे संग्रहालयही बंदच आहे. मला संग्रहालयाची बंद दारे बघूनच समाधान मानणे आवश्यक आहे.

राणी महाल

हातात भरपूर वेळ असल्याने जवळच असलेल्या स्वामी नारायण मंदीराला भेट देण्याचे मी ठरवतो. हे देऊळ म्हणजे झगमग करणार्‍या भव्य आधुनिक स्थापत्याचा एक नमुना आहे. या भव्य देवळाच्या वास्तूमधील स्तंभ आणि भिंती यावर संपूर्णपणे संगमरवर पाषाणाच्या फरशा बसवलेल्या असल्याने देऊळ संगमरवरातून बनवले असल्याचा भास होतो आहे. स्तंभ आणि बाहेरील भिंती यावर फुल रिलिफ प्रकारच्या अक्षरशः हजारोंच्या संख्येने मूर्तीशिल्पे बसवलेली आहेत. ही शिल्पे मला छापलेल्या चित्रांप्रमाणे असावी अशी किंवा अगदी एकसारखी दिसणारी, वाटतात. शिल्पातील मूर्तींचे ओठ व कपाळावरील टिळा हा लाल रंगात रंगवलेला पाहून मात्र मला गंमत वाटते आहे. या देवळात भाविकांची नुसती झुंबड उडालेली आहे.

स्वामीनारायण मंदीराला भेट देऊन मी जवळच असलेल्या छटर्डी या ठिकाणाजवळ रिक्षा उभी करण्यास सांगतो. छटर्डी म्हणजे छत्र्या. पुण्याला शिंद्याची छत्री या नावाने प्रसिद्ध असलेली महादजी शिंद्यांची समाधी आहे. त्याच धर्तीवर कच्छ्च्या राजांच्या येथे छत्र्या किंवा समाध्या आहेत. यापैकी बहुतेक छत्र्या 2001 च्या भूकंपात पूर्णपणे कोसळल्या व आता त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती सुरू आहे. या छत्र्यांभोवती एक संरक्षक भिंत उभारून आत जाण्यास बहुधा मज्जाव केलेला आहे. मी दुरूनच या छत्र्या बघतो व काही छायाचित्रे काढतो. या छत्र्यांवर मूळ स्वरूपात अतिशय उत्तम शिल्पे कोरलेली होती याच्या खुणा अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत.

छटर्डी

हॉटेलवर परतण्याच्या आधी भूजमधील मुख्य बाजारपेठेमध्ये मी थोडा वेळ घालवतो व काही खरेदी करतो. नंतर हॉटेलवर व्यवस्थित भोजन घेऊन मी निद्रेची आराधना जरा लवकरच करण्याचे ठरवतो. भूजपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या एका स्थानी मला उद्या जायचे आहे. हे ठिकाण, सुमारे 4000 वर्षांपूर्वी 20000 रहिवासी रहात असलेले व अत्यंत भरभराटीस आलेले व श्रीमंत असे बंदर व शहर होते. अर्थात आता तेथे फक्त भग्नावशेष उरलेले आहेत.

(क्रमश)

17 एप्रिल 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: