.
Travel-पर्यटन

इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 3


(मागील भागावरून पुढे)

गुरूवार

आम्हाला कॅम्पच्या ऑफिसकडून सूचना मिळाल्या आहेत की रण ओलांडून पैलतीरी जाण्यासाठीच्या बसेस सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून निघतील. मी जरा लवकरच उठतो, भोजन गृहात जाऊन न्याहरी घेतो व मुख्य प्रवेशद्वारापाशी बरोबर 8 वाजता पोहोचतो. समोर पहिली निघणारी बस जवळ जवळ भरतच आली आहे. तरी पण काही मंडळी त्यांचे साथीदार न आल्याने उतरून जातात व मला बसच्या पुढच्या भागात खिडकीजवळची जागा मिळते. पुढच्या काही मिनिटातच बस भरते आणि आम्ही निघतो सुद्धा. या प्रवासासाठी असलेला आमचा गाईड सैन्यदलातून निवृत्त झालेला आहे आणि बर्‍यापैकी विनोदी स्वभावाचा असल्याने त्याच्या सूचनांची आम्हाला सगळ्यांनाच गंमत वाटते आहे. परत एकदा आम्ही भिरंडीयारनी गाव गाठतो व परत एकदा डावीकडे वळून हायवे 45 वरून उत्तर दिशेला प्रवास सुरू करतो. आसमंत साधारण तसेच आहे. बन्नी चराऊ राने, मधून मधून धष्टपुष्ट गाई म्हशींचे कळप आणि मधूनच एरंडीची शेते. या रस्त्यावरच असलेल्या खावडागावामध्ये आम्ही पहिला हॉल्ट घेतो. रणाच्या वैराण आणि विशाल मरूभूमीमध्ये प्रवेश करण्याआधी लागणारे हे शेवटचे मोठे गाव आहे. येथे चहाचा कप घेणे अनिवार्य आहे असे आमच्या गाडचे म्हणणे पडते व आम्ही त्याच्या इच्छेला मान देऊन गरमगरम चहाचा थोडा आस्वाद घेतो. या गावाचे सुद्धा एक हस्तकला वैशिष्ट्य आहे. येथे कलात्मक रित्या बनवलेल्या चामड्याच्या वस्तू उत्तम मिळतात. चपला व पर्सेसची डिझाइन अतिशय सुरेख आहेत. पण मला पुढच्या प्रवासाची इतकी उत्कंठा आहे की सध्या खरेदीकडे माझे फारसे लक्ष नाहीये.

खावडा गावातील रहिवासी मात्र इतर कच्छी लोकांपेक्षा खूपच भिन्न दिसत आहेत. चेहर्‍याची लांब ठेवण, धारदार आणि टोकदार नाके, सुरमा घातलेले डोळे यामुळे या लोकांचे बलुची किंवा पख्तुन लोकांशी असलेले साम्य लक्षात येण्याजोगे आहे. त्यांच्या डोकयावरील पगड्या, अंगावरील पठाणी पोषाख व गळ्याभोवती घेतलेले उपरण्यासारखे वस्त्र यामुळे हे लोक इथले मूळ स्थानिक नसावेत असा अंदाज मी बांधतो. आमचा गाईड खुलासा करत मला सांगतो की ही मंडळी काही पिढ्यांपूर्वी वायव्येकडून येथे येऊन स्थायिक झालेली आहेत आणि त्यांनी हे गाव आता आपले केलेले आहे. या लोकांचे मूळ स्थानिक कच्छी लोकांबरोबर फारसे संबंध नसल्याने आता गुजरात सरकार त्यांना इतर समाजाबरोबरच सामावून घेण्यासाठी खास प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे खावडा गावाजवळ मूळ कच्छी लोकांची वस्ती वाढावी म्हणून येथे नव्या उद्योगधंद्याना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. नवीन उद्योगधंदे आले की नोकरीसाठी मूळ कच्छी मंडळी येथे येतील व सध्या या स्थलांतरितांचे जे इथे प्राबल्य आहे ते कमी होईल अशी कल्पना या मागे आहे.

आमच्या गाईडचा बरोबर आणलेल्या कागदपत्रांचा आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या नावांचा व संख्येचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न चालू आहे. याचे कारण म्हणजे खावडा गावानंतर येथील स्थानिक सोडले बाकी असैनिक किंवा सिव्हिलियन लोकांना खास परवाना असल्याशिवाय पुढे प्रवास करता येत नाही. अखेरीस बसचा ड्रायव्हर, कंडक्टर स्वत: गाईड आणि आम्ही सर्व, यांचा ताळमेळ जमतो व आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. कुरन नावाचे एक छोटेसे खेडे रस्त्यात लागते. यानंतर आसमंत हळूहळू बदलू लागला आहे हे माझ्या लक्षात येते. आता एरंडीची शेते जवळजवळ दिसतच नाहीयेत. टाकाऊ आणि वरकड जमिनीचे मोठमोठे तुकडे आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागले आहेत. बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झाडे आणि खाली वाळके गवत हे मात्र विपुल प्रमाणात सगळीकडे आहेत. थोडे अंतर पार केल्यावर आता आम्ही रणाच्या तीरावर असलेल्या जमिनीच्या शेवटच्या कडेवर येऊन पोचतो आहोत. बस काही क्षण स्तब्ध उभी आहे. मी त्याचा फायदा घेऊन समोरचे दृष्य मनात साठवण्याचा प्रयत्न करतो आहे.

माझ्या अगदी डोळ्यासमोर दिसतो आहे एक पूल. या पुलाखाली आता जरी कोरडीच जमीन असली तरी वर्षातील बराच काळ येथे समुद्राचे पाणी असते. माझ्या डाव्या हाताला दिसते आहे ती काल मी अनुभवलेली व मिठाचे थरावर थर असलेली धवल मरूभूमी. ही धवल मरूभूमी पार पश्चिम क्षितिजापर्यंत विस्तारली आहे. मात्र प्रत्यक्षात या धवल मरूभूमीच्या पुढे दलदलीचा प्रदेश व नंतर अरबी समुद्राकडे नेणारी कोरी खाडी लागते असे माझ्या जवळचा नकाशा सांगतो आहे. माझ्या उजव्या हाताला दिसते आहे कोणत्याही प्रकारच्या झाडाझुडपांचा लवलेश सुद्धा दिसत नसलेली, किरमिजी, मळकट रंगाच्या जमिनीची, एक अफाट पसरलेली वैराण मरूभूमी. मात्र अगदी पूर्व क्षितिजाजवळ, याच मरुभूमीने आपला रंग बदलला आहे. या ठिकाणी ही मरुभूमी थोडीशी निळसर ग्रे दिसते आहे. हा रंग बघणार्‍याला सहजपणे फसवतो आहे. असे बघितल्यावर येथे समुद्रकिनारा असला पाहिजे असे वाटते आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही.

मात्र रणाचा हा देखावा बघताना निसर्गाची ही अद्भुत आणि दुर्मीळ करामत बघून माझे मन इतके आश्चर्यचकित झाले आहे की निस्तब्धपणे समोरचा देखावा बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. समोर दिसणार्‍या वैराण रणाचा वायव्येकडचा भाग, येथे गोड्या पाण्याची विपुलता असल्याने 200 वर्षांपूर्वी अतिशय सुपीक होता व येथे वर्षभर पिके डोलत असत असे मी वाचले आहे. परंतु समोर सध्याची परिस्थिती बघितल्यावर हे जवळपास अशक्यप्रायच वाटते आहे.

एखाद्या खोल पाण्याने भरलेल्या समुद्रात असावीत तशी अनेक बेटे या रणामध्ये आढळतात. ही बेटे मॉन्सून कालात पाण्याने वेष्टिलेली असली तरी बाकीच्या काळात या बेटांवर जमिनीवरच्या वाटांनी पोचता येते. अगदी ऐतिहासिक कालांपासून असे अनेक मार्ग येथील स्थानिक लोकांना ज्ञात होते व आहेत आणि या मार्गांनी उन्हाळ्यात रण सहजपणे ओलांडता येते. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या काळात, रणाचा उत्तर किनारा हा त्यांच्या अधिपत्याखाली असलेला सिंध प्रांत व कच्छ संस्थान यामधील सीमारेखा म्हणून मानली जात असे. त्या काळात रण ओलांडण्यासाठी 4 मार्ग सर्वसाधारणपणे वापरात होते. यापैकी पहिला मार्ग हा कच्छ मधील लुना गाव आणि सध्याच्या पाकिस्तानातील रहिम की बझारहे गाव यांना विगाकोट आणि कांजरकोट या मार्गे जोडत होता तर पाकिस्तानातील नगरपरकर हे गाव आणि कच्छ मधील बेला आणि लोदरानी यांना जोडणारे 2 स्वतंत्र मार्ग अस्तित्वात होते. मोरी बेटावरून जाणारा व कच्छ मधील खावडा आणि पाकिस्तानातील डिप्लो या गावांना जोडणारा 4था मार्ग त्या वेळी वापरात होता. आता यापैकी कोणतेच मार्ग आता उपलब्ध नाहीत व सीमा सुरक्षा दलाने बनवलेले 2 किंवा 3 पक्के रस्ते आता रण ओलांडण्यासाठी वापरले जातात. या रस्त्यापैकी, खावडा गावापासून निघून रणाच्या उत्तर काठावर असलेल्या विगाकोट या एका जुन्या किल्याच्या भग्नावशेषांपर्यंत, अनेक बेटे जोडत गेलेल्या एका रस्त्याने, आम्ही रण ओलांडणार आहोत.

आमची बस आता परत पुढे निघाली आहे. रणाचा दक्षिण काठ आणि उत्तरेकडे, सर्वात जवळ असलेले कुवर बेट, या मध्ये वाहणारा रणातील जलप्रवाह इतका अरूंद आहे की एका पुलाच्या सहाय्याने तो सहज ओलांडता येतो. इंडिया ब्रिज किंवा भारत सेतू या नावाने ओळखला जाणारा हा पूल आमची बस आता ओलांडते आहे. या पुलाला लागून धर्मशाळा या नावाने ओळखले जाणारे पहिले सीमा चेक पोस्ट समोरच आहे. पाकिस्तानची सीमा जवळच असल्याने या चेक पोस्ट्पासूनच पुढे सुरक्षा नियम पालन अतिशय कडकपणे केले जाते. बस चेक पोस्टवर थांबते. आम्हाला आमच्या जवळचे मोबाइल फोन, कॅमेरे वगैरे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षा दलाच्या हवाली करावी लागतात. मोबाइल मधले सिम कार्ड सुद्धा चालत नाही. या नंतर आमची बस सुरक्षा दल कर्मचार्‍यांकडून व या साठी मुद्दाम तरबेज असलेल्या नीलम या श्वानाकडून संपूर्णपणे तपासली जाते. अखेरीस आम्हाला हिरवा सिग्नल मिळतो व आम्ही पुढे निघतो. कुवर बेट, येथे तैनात असलेले सैनिक वगळले तर, बाकी तसे निर्मनुष्य आहे. आजूबाजूच्या जमिनीवर पिवळे पडलेले वाळके गवत व त्यातून मधून मधून वर डोकावणारी बाभळीची झुडुपे या शिवाय काहीच दिसत नाही. मधून मधून दिसणारे उघडे वाकडे खडक मला सह्याद्रीची आठवण करून देतात. मात्र रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंना एका पाठोपाठ एक, सैनिकांचे बंकर्स मात्र दिसत राहतात. एक वळण घेतल्यावर रस्ता बर्‍यापैकी सरळ होतो व थोड्याच वेळात आम्ही कुवर बेट ओलांडून रणावर असलेला आणखी एक पूल पार करतो व पुढच्या बेटावर प्रवेश करतो. या बेटाला सीमा सुरक्षा दलाने चिडियामोरअसे नाव, येथे पक्षी खूप दिसत असल्याने, बहुधा दिलेले असावे. परत एक चेक पोस्ट समोर येते व बस थांबते. येथे बस चालकाने खाली उतरून काही औपचारिकता पूर्ण करणे अपेक्षित असते. बस मधील आमचा गाईड आमचे लक्ष उजव्या बाजूला लांबवर वेधतो व तेथे उभा असलेला चिंकारा किंवा इंडियन गॅझेल आम्हाला दाखवतो. भारतीय वन विभागाने संरक्षित म्हणून ही प्रजाती घोषित केलेली आहे व यांची एकूण संख्या आता मर्यादित असली तरी वृद्धिंगत होते आहे. हे चिंकारा या बेटांवर सुखाने रहातात, कारण त्यांना त्रासदायक ठरतील अशी हिंस्र श्वापदे किंवा माणसे ही दोन्हीही या बेटांवर रहात नाहीत व स्वत:ला परमेश्वराचा आधुनिक अवतार मानणारे चित्रपट नट त्यांची शिकार करण्यासाठी अवैध रित्या येथे फिरकू शकत नाहीत. मॉन्सूनचा काल सोडला तर हे चिंकारा एका बेटावरून दुसर्‍या बेटावर आरामात रणामधून फिरत असतात.

चिडियामोर बेट पार केल्यावर आता आमची बस खर्‍या रण प्रदेशातून प्रवास करते आहे. आम्ही प्रवास करत असलेला रस्ता भराव घालून जमीन पातळीपासून सुमारे 3 ते 4 फूट उंच केलेला आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चौरस आकाराचे चिरे ( दगड) कॉन्क्रीटमध्ये बसवून पेव्हमेंट केलेले आहे. हे पेव्हमेंट बहुधा रण पाण्याने भरले की रस्त्याच्या भरावाची हानी होऊ नये म्हणून केलेले असावे. रस्त्याचे डांबरीकरण केलेले असले तरी तो जेमतेम एक प्रवासी वाहन जाऊ शकेल एवढाच रुंद असल्याने दर 100 मीटर्सवर समोरून येणार्‍या वाहनांना एकमेकाला क्रॉस करणे सुलभ जावे म्हणून रस्त्याच्या बाहेरील बाजूस कॉन्क्रीट्मध्ये चिरे बसवून शोल्डर्स बांधलेले आहेत. बाजूला दिसत असलेला रणाचा पृष्ठभाग मात्र अजून ओलसरच दिसतो आहे. बर्‍याच ठिकाणी जमिनीमधे असलेल्या खळग्यांमध्ये पाणी साचलेले अजूनही दिसते आहे. आणखी एखाद्या महिन्याभरात रण वाळून पूर्णपणे शुष्क होईल व मग त्याला पापुद्रे सुटत जातील. मधेच रणामधून आरामात चालताना काही चिंकारा आम्हाला दिसतात. ते बहुधा एका बेटावरून दुसर्‍या बेटाकडे निघालेले असावेत. सुमारे 4 किमी अंतर रणामधून गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एका बेटावर पोचतो आहोत. या बेटाचे नाव सीमा सुरक्षा दलाने बॉप्स BOPS बेट असे ठेवलेले दिसते आहे. येथे हेलिकॉप्टर उतरू शकतील असा तळ बांधलेला असावा कारण तशी पाटी समोर दिसते आहे. बेटावर पोचल्यावर परत एकदा आसमंत खूपसा बन्नी चराऊ जमिनींसारखा वाटतो आहे. वाळलेले गवत, त्यात मधून मधून काटेरी झुडपे असे दृष्य दिसते आहे. येथे थोडी मोठी विलायती बाभळीची झाडेही बरीच दिसत आहेत. रणातील या बेटांवर आतापर्यंत न बघितलेले एक झुडूप मला दिसते आहे. एखाद्या पुंजक्याप्रमाणे असलेल्या या झुडपातून, सूर्याच्या चित्रात लहान मुले किरण फाकलेले जसे दाखवतात तसे गवताचे दांडे फाकलेले आहेत व त्याला बारीक काटे किंवा पाने असावीत असे दिसते आहे. सेंन्च्रस Cenchrus प्रजाती पैकी ही झुडपे बहुधा असावीत. आम्हाला आणखी काही चिंकारा चरताना दिसतात.

बॉप्स बेट पार केल्यावर आमची बस आता परत एकदा रणामध्ये प्रवेश करते आहे. रस्ता नाकासमोर काढावा तसा सरळसोट दिसतो आहे. हा रस्त्याचा भाग अंदाजे 10 ते 12 किमी तरी असावा व तो सरळ रण ओलांडतो आहे. दोन्ही बाजूंना रणाची वैराण मरूभूमी शिवाय दुसरे काहीही दिसत नाहीये. परत एकदा डाव्या हाताला किंवा पश्चिमेला मला धवल मरूभूमीचे काही पॅचेस तळपणार्‍या सूर्याच्या उन्हात झगमगून उठताना दिसतात व बसच्या समोरच्या काचेतून पार उत्तरेला, झाडे झुडपे असलेला हिरवा पट्टा असल्याचा भास मधून मधून होत राहतो. बहुधा ते मृगजळ असावे किंवा बेटेही असण्याची शक्यता संपूर्ण नाकारता येत नाही. बाजूला दिसणार्‍या रणाच्या मरूभूमी मध्ये पाण्याचे ओढे व ओहोळ तेथे काही महिन्यांपूर्वी वहात होते याच्या स्पष्ट झिगझॅग आकृत्यांच्या खुणा खालील मातीमध्ये दिसत आहेत. रस्ता थोडा पश्चिमेकडे वळतो व पुढे पुढे जात राहतो. सुमारे 30 ते 40 किमी अंतर असेच पार केल्यावर दूर उत्तर क्षितिजावर, मला वर उचललेली जमीन high ground दिसू लागले आहे आणि त्यावर 3 आधुनिक इमारतीही दिसत आहेत. प्रथम हे मृगजळ असावे असे मला वाटते पण त्या इमारती तशाच दिसत राहतात व त्या प्रत्यक्ष असल्याची खात्री पटते आहे. आमच्या गाईडच्या माहितीप्रमाणे या इमारतींना विगाकोट अतिथी गृह Vigokot guest house या नावाने ओळखतात. विगाकोट ही जागा आता आम्हाला हे स्पष्टपणे दर्शवते आहे की आम्ही रण ओलांडले आहे. भौगोलिक दृष्ट्या आम्ही आता सिंधमध्ये आहोत.

विगाकोट या स्थानावर 200 वर्षे पूर्वीपर्यंत एक भुईकोट किल्ला होता व या किल्याचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत असे म्हटले जाते. मला तर कोठे काही अवशेष दिसले नाहीत, परंतु तो भाग अलाहिदा. येथे एका स्थानिक राजाचे संस्थान 1819 मधील भयानक भूकंपापर्यंत होते. परंतु या भूकंपात हा किल्ला व गाव हे सर्व संपूर्णपणे नष्ट झाले आणि या गावाचा एकुलता एक जलस्रोत असलेली व गावाजवळून वाहणारी एक छोटेखानी नदीही आटली. त्यामुळे येथील वस्ती 1819 नंतर बहुधा उत्तरेकडे सरकली असावी.

विगाकोट अतिथी गृहापाशी आमची बस अजूनही थांबलेलीच आहे कारण अजूनही समोर दिसणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवरून आम्हाला स्पष्ट असा कोणताच संदेश मिळालेला नाही. कदाचित आणखी काही औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक असावे. अखेरीस आम्हाला हिरवा दिवा मिळतो व आमची बस तेथून साधारण 200 मीटर अंतरावर असलेल्या एका तारेच्या कुंपणापाशी जाऊन थांबते. मी खाली उतरतो व चालत जाऊन या तारेच्या कुंपणापाशी उभा राहतो. मी आता भारताच्या आंतर्राष्ट्रीय सीमेपाशी पोचलो आहे. या कुंपणापासून साधारण 150 मीटरवर ही आंतराष्ट्रीय सीमा आहे व त्या पलीकडे पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वाखालील भूभाग सुरू होतो आहे. प्रत्यक्ष सीमा रेषेवर दर 40 मीटर अंतरावर साडेचार फूट उंचीचे व पांढर्‍या रंगाने रंगवलेले खांब दिसत आहेत. या खांबांवर आमच्या बाजूला इंडिया व विरुद्ध बाजूस पाकिस्तान अशी अक्षरे कोरलेली आहेत. मात्र पाकिस्तानच्या बाजूला पुढे कोणतेही काटेरी कुंपण घातलेले नाही. भारताच्या बाजूने तिकडे कोणी घुसखोरी करण्याची शक्यता नसल्याने पाकिस्तानला बहुधा अशा कुंपणाची गरज भासत नसावी. आमच्या बरोबर सीमा सुरक्षा दलाचे हवालदार राणा आहेत. ते आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतात. पलीकडे पाकिस्तानने उभारलेले निरीक्षण मनोरे ते आम्हाला दाखवतात. या क्षणाला पाकिस्तानमधील कोणीतरी आमच्या कडे बघतो आहे आणि आम्ही कशासाठी येथे आलो आहोत? असे आश्चर्य मनात व्यक्त करतो आहे ही कल्पनाच मला मोठी थ्रिलिंग वाटते आहे. आमच्या बसमध्ये भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेले स्त्री पुरुष आहेत परंतु या क्षणी सीमेवर उभे असताना ते एकच आहेत आणि फक्त भारतीय आहेत हे सर्वांच्या चेहर्‍यावरून मला स्पष्ट दिसते आहे.

या स्थानाच्या साधारण 5 किमी उत्तरेला कांजरकोट नावाच्या किल्ल्याचे भग्नावशेष आहेत. हा किल्ला विगाकोट येथील संस्थानिकाच्या भावाच्या मालकीचा होता व तेथे सन 1819 पर्यंत त्याचे संस्थान होते. कांजरकोट किल्ला व गाव हे दोन्ही विगाकोट प्रमाणेच भूकंपात संपूर्णपणे नष्ट झाले होते. कांजरकोटच्या आणखी काही किमी उत्तरेला, रहिमकी बझार हे गाव लागते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, हा सर्व भाग आणि रहिमकी बझार गाव हे कच्छ्च्या राजाच्या अधिपत्याखालील भाग होता. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याने कच्छच्या या अधिपत्याबद्दल आपत्ती उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि हा भाग सिंधमध्ये मोडत असल्याने आपल्या सार्वभौमत्त्वाखालील आहे असा दावा भारताकडे केला.

आम्ही उभे असलेल्या स्थानी 1965 या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले होते अशी माहिती हवालदार राणा आम्हाला देतात. येथे पाकिस्तानने हल्ला करून सीमा सुरक्षा दलाच्या 6 जवानांना शहीद केले होते. या जवानांच्या रक्ताने पुनीत झालेल्या भूमीवर मला काही क्षण का होईना स्तब्ध उभे राहण्याचे भाग्य लाभते आहे यासाठी मी मनोमन सीमा सुरक्षा दलाचा ऋणी आहे. त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान यांच्या मध्यस्तीने नंतर येथे युद्धबंदी झाली व एक आंतर्राष्ट्रीय लवाद नेमला गेला. या लवादाच्या निर्णयाप्रमाणे कांजरकोट आणि रहिमकी बझार पाकिस्तानला देण्यात आले व विगाकोट भारतात राहिले. पण या सगळ्या घटनांना 47/48 वर्षे लोटली आहेत. आता ही सीमा पूर्णपणे शांत व सुरक्षित आहे. घुसखोरी होऊ नये म्हणून येथे आता काटेरी तारेचे तिहेरी कुंपण घातलेले आहे. माझ्या बायनॉक्युलर मधून पाकिस्तानमधील प्रदेशाचे निरीक्षण करण्यात मी आणखी काही मिनिटे घालवतो. परंतु आता परत जाण्याची वेळ आली आहे व थोड्या जड पावलांनीच आम्ही बसमध्ये चढतो व बस परत एकदा विगाकोट अतिथी गृहाशी पोचते. येथे आमच्यासाठी एका शामियान्यात उत्तम भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या नंतर मी गेस्ट हाऊसच्या गच्चीवरून परत एकदा बायनॉक्युलर्सच्या सहाय्याने पाकिस्तानचा भूप्रदेश न्याहाळतो. मी उंचीवर असल्याने मला आता दिसते आहे की सीमेपार असलेल्या भूभागावर एक छोटीशी टेकडी सीमेच्या समांतर पश्चिमेकडे पसरलेली दिसते आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला मी या टेकडी बद्दल विचारतो व तेथे टेकडी आहे हे पक्के होते. माझ्या मनात ही टेकडी म्हणजे 1819 च्या भूकंपात तयार झालेली अल्ला बंड ही टेकडी असली पाहिजे असा विचार येतो आहे. या अल्ला बंडमुळेच ज्या नदीला सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख असे नाव मिळालेले होते त्या कोरी नदीच्या पात्रात अडथळा निर्माण होऊन तिच्या नदीपात्राचे, दलदलीच्या प्रदेशात रूपांतर झालेले होते. मात्र खरे खोटे सांगणे खूप कठीण असल्याने मी जास्त विचार करणे सोडून देतो. परंतु येथे दिसत असलेली टेकडी अल्ला बंड असण्याची शक्यता माझ्या मनाला वाटते आहे हे नक्की.

दुपारच्या भोजनानंतर आमची बस परत एकदा रण ओलांडून खावडा गावाकडे जाण्यास निघते. वर तळपणार्‍या सूर्याच्या प्रखर उन्हात आता प्रवास करावयाचा आहे ही कल्पनाही मला नकोशी वाटते. परंतु बस चालक वातानुकूलन यंत्र चालू करतो आणि त्या सुखद गारव्यात सर्वांचेच डोळे मिटतात. धर्मशाळा चेक पोस्ट पाशी गरम गरम चहाची व्यवस्था आहे. तो घेऊन खावडा मध्ये आम्ही पोचतो आहोत तोपर्यंत दुपारचे 4 वाजून गेले आहेत. रणाला दिलेली भेट जरी संपली असली तरी एक प्रमुख आकर्षण अजून बघायचे राहिले आहे. आमचा गाईड जेंव्हा आता आपण कालो डुंगर किंवा Black hillकडे आता जाणार आहोत याची घोषणा करतो तेंव्हा मी जरा साशंकतेनेच त्याला तिथे काय आहे असे विचारतो. परंतु तिथे एक मंदिर आहे एवढीच माहिती मला मिळते. बस साधारण पूर्वेकडे जाणार्‍या एका रस्त्याकडे वळते. पुढचे 10 ते 15 किमी रस्ता असंख्य चढउतारांचा आहे. मात्र बाहेर दिसणारा आसमंत मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिसतो आहे. बाजूला दिसणार्‍या टेकड्या व दर्‍या या एकावर एक फरशा रचून तयार केल्या आहेत की काय असे दृष्य बाहेर दिसते आहे. 2001 च्या भूकंपात या दर्‍याखोर्‍यांमधे प्रचंड पडझड झालेली आहे व ती अजूनही अर्थात तशीच आहे. वाटेत एक टेकडी चुंबकीय टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे. बसमध्ये मला तरी फारसे काही विशेष जाणवत नाही. बस वर पोचते व मुद्दाम तयार केलेल्या वाहन तळावर उभी राहते. आता येथून पुढे निदान अर्ध्या ते पाऊण किलोमीटर लांबीचा अगदी खड्या चढाचा रस्ता समोर दिसतो आहे. बसमधले बरेच जण गाठतात. मी नेटाने पुढे जाण्याचे ठरवतो. पहिल्या लागणार्‍या शिखरावर एक देऊळ आहे त्याच्याकडे मी फक्त एक दृष्टीक्षेप टाकतो व पुढे आणखी उंचावरील शिखराकडे चालू लागतो. या शिखरावर आसमंताचे निरीक्षण करण्यासाठी एक निरीक्षण चौथरा उभारलेला आहे.

या निरीक्षण चौथर्‍यावरून दिसणारे दृष्य मात्र इतके अप्रतिम आहे की वर येण्यासाठी घेतलेले कष्ट मी केंव्हाच विसरलो आहे. माझ्या अगदी डावीकडे अगदी पार क्षितिजापर्यंत धवल मरूभूमी पसरलेली मला दिसते आहे. त्याच्या एका कडेला थोडी मिठागरे आहेत. समोरच खावडा व कुवर बेट मार्गे पाकिस्तानातील सिंध प्रांत यांना जोडणारा इंडिया ब्रिज व त्याच्या मागे कुवर बेट दिसते आहे. इंडिया ब्रिजच्या उजवीकडे दिसते आहे अथांग रण. मात्र या उंचीवरून रणाचा हा भाग वैराण मरूभूमी दिसत नसून निळसर ग्रे रंगाचा एक अथांग सागर वाटतो आहे. या सागराच्या किनार्‍यावरील कडा खर्‍या समुद्रकाठी लाटांच्या फेसामुळे दिसतात तशा पांढर्‍याशुभ्र दिसत आहेत. मात्र येथे त्या तशा साचलेल्या मिठामुळे दिसत आहेत. या जागेवरून रण हे एखाद्या समुद्राच्या खाडीसारखे दिसते आहे. कोण्या जादूगाराने करावा तसा हा प्राकृतिक दृष्टी विभ्रम निसर्ग मला दाखवतो आहे.

नंतर तिन्हीसांजाच्या सुमारास मी कॅम्पवर परत पोचतो, गुजराथी जेवणाचा आस्वाद घेऊन आणखी एक सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम डोळे मिटू लागेपर्यंत बघतो. परंतु अंथरुणावर पडल्यावर मला निद्राधीन होण्यासाठी बरीच वाट बघावी लागते. रण, भारतीय सीमा आणि कालो डुंगरच्या माथ्यावरून दिसणारे अशक्यप्राय दृष्य हे सर्व माझ्या नजरेसमोरून बाजूला व्हायलाच तयार नाहीत.

उद्या मी परत भूजकडे जाण्यासाठी निघणार.

(क्रमश)

11 एप्रिल 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक marathi blogs List | Marathi Search Results - एप्रिल 13, 2013

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: