.
Travel-पर्यटन

इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 2


(मागील भागावरून पुढे)

वातानुकूलित बसेसचा एक ताफाच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला या कॅम्पच्या व्यवस्थापनाने कॅम्प रहिवाशांच्या सोईसाठी म्हणून नेहमी तयार ठेवलेला असतो. त्यापैकी पुढे असलेल्या एका बसमध्ये मी चढतो आणि पुढच्या काही मिनिटातच बस संपूर्ण भरल्यामुळे निघते सुद्धा! आम्ही परत एकदा भिरंडीयारनी गावाकडे जाणार्‍या चिंचोळ्या रस्त्याने निघालो आहोत. या गावाजवळ आमची बस आता हायवे 45 वर डावीकडे म्हणजे सकाळी आलो त्याच्या विरूद्ध दिशेला वळते आहे.

दुपारचे ऊन आता चांगलेच रणरणते आहे. वर सूर्य सुद्धा तळपतो आहे आणि अंग भाजून काढतो आहे. काही क्षणातच आम्ही गोल आकाराच्या 3 किंवा 4 भुंगा झोपड्यांच्या मधे असलेल्या एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचतो.

खाली उतरल्यावर एका दृष्टीक्षेपातच माझ्या लक्षात येते की हे काही खरे भिरंडीयारनी गाव नाही. ते बहुदा या रस्त्याने आणखी थोडे पुढे गेल्यावर असावे. या भुंगा झोपड्या, कच्छ्च्या हस्तकला आणि भरतकाम केलेले कपडे, यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी गुजरात सरकारने स्थापन केलेले एक विक्री केंद्र आहे. पण समोर जे काही विक्रीसाठी दिसते आहे ते इतके सुंदर आणि अप्रतिम आहे की आम्ही खर्‍या गावात न आल्याबद्दल मला तक्रार करण्यासारखे काहीच नाहीये. कपडे, चादरी या सारख्या वस्त्रांवर या इथल्या कारागीरांनी रंगांची जी बहारदार उधळण केलेली दिसते आहे त्याला खरोखरच तोड नसेल. या रंगांबरोबरच या वस्त्रांवर भरतकाम करून ज्या आकृत्या विणलेल्या आहेत त्या ही अजोड आहेत. अनेक प्राणी, पक्षी, भूमितीय आकृत्या, या वस्त्रांवर, कच्छी टाका म्हणून परिचित असलेल्या एका टाक्याने, विणलेल्या दिसत आहेत. सभोवती टाके विणून छोटे छोटे आरसे या आकृत्यांत बसवलेले आहेत त्यामुळे आसमंतावर तळपणार्‍या सूर्याचे किरण त्यावरून परावर्तीत होऊन ही वस्त्रे चमचम करत झगमगत आहेत. विक्री करणार्‍या स्त्री पुरुष खेडूतांनी याच प्रकारची वस्त्रे अंगावर व डोक्यावर घेतलेली आहेत. खरे तर हे रंग अतिशय गडद आणि उठावदार आहेत तरीही ते वापरून बनवलेली वस्त्रे भगभगीत किंवा बेगडी असल्यासारखी वाटत नाहीत. परंपरागत चालत आलेल्या या हस्तकलांचे हेच वैशिष्ट्य असते. ही वस्त्रे म्हणजे माझ्या डोळ्यांना एक मेजवानी असल्यासारखीच मला वाटते आहे. भिरंडीयारनी गावातील हे भुंगा विक्री केंद्र, जरी खरा भुंगा नसले तरीही डोळ्यांना अतिशय आल्हाद्कारक मात्र नक्कीच वाटते आहे.

एका भुंग्यामध्ये मला भिंतीपाशी एक विचित्र दिसणारे एक उपकरण ठेवलेले दिसते आहे. मुळात हे एक लाकडी कपाट आहे. त्यावर शाडूच्या मातीचा लेप देऊन त्यावर पांढरा रंग दिलेला आहे. कपाटाच्या समोरील बाजूस एक छोटा दरवाजा दिसतो आहे. या कपाटाच्या वरच्या बाजूवर 3 मडक्यांच्या प्रत्येकी केलेल्या 2 उतरंडी ठेवलेल्या आहेत. त्यांनाही पांढरा रंग दिलेला आहे. या सर्वच उपकरणाच्या बाह्य पृष्ठभागावर छोटे आरसे शाडूच्या मातीत रोवून पक्के बसवून टाकलेले आहेत. हे येथील खेडूतांचे विद्युत किंवा दुसरी कोणतीही शक्ती आवश्यक नसलेले असे शीतकपाट आहे. कपाटावर असलेली मडकी पाण्याने भरून ठेवली की अन्नपदार्थ किंवा दूध यासारखे पदार्थ कपाटातील छोट्या कप्प्यामध्ये खराब न होता व्यवस्थित राहू शकतात. कच्छ मध्ये उन्हाळा अतिशय कडक असतो व तपमान 50 अंश सेल्सस पर्यंत सहजपणे जाते. अशा परिस्थितीत हे ग्रामीण शीतकपाट खेडूतांना एक वरदानच ठरते.

आता आम्ही होडकोनावाच्या दुसर्‍या एका खेड्यापाशी पोचलो आहोत. या खेड्याच्या थोड्या बाजूला, एक आदर्श खेडेगाव सरकारने उभारले आहे. या आदर्श गावाकडे जाण्याच्या रस्त्याच्या अखेरीचा 100 मीटर लांबीचा भाग हा दाट भरलेल्या बाभळींच्या वनामधून जातो आहे. मात्र ही बाभूळ आपल्याकडे दिसते तशी काटेरी बाभूळ (Gum Arabic) नसून आपण ज्याला विलायती बाभूळ (Prosopis juliflora) म्हणतो त्या प्रकारची चांगली उंच वाढलेली झाडे असल्याने त्यांच्या खालून सहजपणे जाता येते आहे. समोर दिसणार्‍या रंगवलेल्या भुंगा झोपड्या, स्वच्छ सारवलेली अंगणे, सगळीकडे आणि मुख्यत्वे भिंतींवर केलेले कलात्मक नक्षीकाम आणि चित्रे, पॉलिश केलेली घरांची दारे, यामुळे हे आदर्श गाव एखादा बॉलीवूड चित्रपटाचा सेट लावावा त्याप्रमाणे दिसते आहे.

असे असूनही हा चित्रपटाचा सेट मात्र नाही. या भुंगा झोपड्यांमध्ये लोक प्रत्यक्षात रहात आहेत. मला काही अतिशय गोंडस दिसणारी मुले या भुंगा झोपड्यांभोवती खेळताना दिसत आहेत. मी एका झोपडीत डोकावून बघतो. आतले घर अगदी स्वच्छ आणि टापटिपीने आवरलेले आहे. भिंतीवर लाकडी शेल्फ अडकवलेली आहेत व त्यांच्यावर घरातली भांडीकुंडी व इतर सामान नीट लावून ठेवलेले दिसते आहे. समोरच्या भिंतीवर एका सपाट पाटीवर, शाडूच्या मातीचा थर देऊन त्यात बारके आरसे खोचून तयार केलेल्या डिझाइनचे एक पॅनेल लावलेले आहे. त्यातली कारागिरी दाद देण्यासारखीच आहे. या प्रकारच्या पॅनेल्सवरची डिझाइन्स, बहुधा भूमितीय आहेत व ती भिंतीवर बसवलेली आहेत. त्याच प्रमाणे स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या अनेक कलावस्तू आणि इतर गोष्टी आम्हाला बघता याव्यात म्हणून नीट मांडून ठेवलेल्या आहेत. कला गुण बहुदा या कच्छी खेडूतांच्या जनुकांमधेच असले पाहिजेत. नाहीतर त्यांनी बनवलेली अगदी साधी साधी डिझाइन्स सुद्धा दाद द्यावी अशीच आहेत. या लोकांच्या अंगात असलेल्या सृजनशीलतेचे किती कौतुक करावे तरी ते कमीच पडेल असाच कलाविष्कार येथे प्रदर्शनासाठी मांडून ठेवलेला आहे.

या कच्छी खेडेगावांची ही कलासफर करताना संध्याकाळ कधी झाली ते मला कळतही नाही. आम्ही परत बसमध्ये चढतो पण कॅम्पकडे परत न जाता साधारण ईशान्य दिशेला असलेल्या एक गेस्ट हाऊसकडे आमची बस वळते. तेथे संध्याकाळचा चहा व बिस्किटे यांचा मी समाचार घेतो आणि जरा फ्रेश होऊन आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अतिशय भव्यदिव्य मानल्या जाणार्‍या अशा एका निसर्ग करामतीचे दर्शन घेण्यासाठी तयार होतो. या निसर्ग करामतीला, धवल मरुभूमी (the white desert) या नावाने ओळखले जाते.

मी वर ज्या बन्नी या नावाने ओळखल्या जाणार्‍या चराऊ रानांचा उल्लेख केला आहे ती राने कच्छ्च्या सर्वात उत्तरेला असलेला व ज्यात मानवी वस्ती आहे अशा एका प्रदेशाभोवती पसरलेली आहेत. या प्रदेशाच्या उत्तरेला, एक अफाट मोठी अशी एक मरूभूमी सुरू होते. या मरूभूमीमध्ये कोणतीही खेडी किंवा वस्त्या नाहीत व येथे कोणी रहात सुद्धा नाही. ही मरूभूमी उत्तरदक्षिण दिशेला 50 ते 125 किमी एवढी पसरलेली आहे तर भारताच्या पश्चिम किनार्‍यापासून ते पूर्वेला जवळजवळ 300 किमी पर्यंत या मरूभूमीचा आवाका आहे. मात्र ही मरूभूमी म्हणजे नुसत्या रेतीच्या टेकड्यांनी भरलेले एक वाळवंट नाही. मॉन्सूनचे वारे सुटले की रणया नावाने ओळखल्या जाणार्‍या या मरूभूमीमध्ये, अरबी समुद्राचे पाणी घुसते व या मरूभूमीच्या आसमंतात असलेल्या पर्जन्यपोषित नद्या सुद्धा तुडुंब वहात येऊन या पाण्यात भर टाकतात. या कारणांमुळे ही सर्व मरूभूमी दर वर्षी, या सर्व मॉन्सून कालात, काही फूट खोल पाण्याखाली असते. मात्र मॉन्सूनचे वारे ओसरले की हे सर्व पाणी परत समुद्राकडे धाव घेते आणि पाणी गळून गेल्यावरचे हे रण, प्रथम दलदलीच्या स्वरूपात बदलते व शेवटी त्याला एका कोरड्या वाळवंटाचे स्वरूप येते. हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये येथील जमीन कोरडी व पापुद्रे सुटलेली अशी दिसते. मात्र या मरूभूमीच्या काही भागावर मात्र गळून जाणारे समुद्राचे पाणी, मिठाचा (Sodium Chloride) एक थर सोडून जाते. जमिनीवर पसरलेला हा पांढर्‍या शुभ्र मिठाचा थर आसमंतात एक जादूमय वातावरण निर्माण करतो. रणाच्या या भागांना धवल मरूभूमी म्हणून यासाठीच ओळखले जाते व निसर्गाची अतिशय दुर्मीळ व अद्भुत अशी ही करामत डोळे भरून बघण्यासाठी मी आता निघालो आहे.

बस थांबते आणि मी खाली उतरतो. समोर काही अंतरावर एक बांबूचे कुंपण किंवा बॅरिकेड उभारलेले दिसते आहे. या कुंपणाच्या पलीकडच्या बाजूस कोणत्याही वाहनांनी जाऊ नये यासाठी ही तजवीज आहे. या कुंपणापलीकडे फक्त उंटाने ओढलेल्या गाड्या जाऊ शकतात. मात्र पलीकडे मला एक मोठा जनसमुदाय जमलेला दिसतो आहे. हिवाळ्याच्या दिवसातील संध्याकाळी, येथे पर्यटक शेकड्यांनी जमा होतात व पांढर्‍या शुभ्र क्षितिजामागे होणारा सूर्यास्ताचा भव्य खेळ, डोळे भरभरून बघत राहतात. या बॅरिकेडच्या मागे बर्‍याच अंतरावर, अगदी क्षितिजाजवळ मला एक पांढरा स्वच्छ पट्टा दिसतो आहे. तो शुभ्र पट्टा अर्थातच या धवल मरूभूमीचा आहे आणि तेथेच मी आता जाणार आहे.

मी बॅरिकेडमधून पुढे जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, डबे तुम्हाला याच्या पुढे नेता येत नाहीत. मी खाली बघतो. पायाखालची जमीन जरा भुरकटमातकट रंगाची वाटते आहे. मधून मधून पाणी साचलेली छोटी छोटी डबकी पण दिसत आहेत.

जमीन संपून ही धवल मरूभूमी जेथे सुरू होते आहे तेथे स्थानिक कलाकारांनी एक छोटेसे स्टेज उभारले आहे. त्यावर 5 किंवा 6 कलाकारांचा एक संच वाद्यांच्या साथीवर लोकगीते प्रस्तुत करतो आहे. साधारण लोकसंगीताच्या चाली असतात तसेच हे संगीत कानाला थोडे गूढ वाटत असले तरी कर्णमधुर आहे. अर्थात शब्द कच्छी भाषेतील असल्याने समजणे शक्यच नाही. मात्र या लोकसंगीताने या धवल मरूभूमीवर जो एक माहौल उभा केला आहे तसा परत आयुष्यात अनुभवणे कठीण आहे. मी माझे 1/2 फोटो या संगीत संचाबरोबर काढून घेतो आणि पुढे निघतो.

आता पायाखालची जमीन हळूहळू मळकट पांढरी होत जाते आहे आणि थोड्या अंतरावर अचानकपणेच ती शुभ्र धवल बनली आहे. वेड लागल्यासारखा मी तरातरा चालतच राहतो. पुढे आणखी एखादा किलोमीटर अंतर गेल्यावर मी स्तब्ध उभा राहतो. आता माझ्या चहूदिशांना फक्त एकच रंग उरला आहे. पार क्षितिजापर्यंत जाणवते आहे ती फक्त अपार आणि अफाट अशी धवलता. गेल्या काही मिनिटात येथे जादूने जोरदार हिमवर्षाव तर झाला नाहीये ना? अशी शंका माझ्या मनाला चाटून जावी इतका आसमंत आता पांढरा शुभ्र झाला आहे. बरोबरचे कोणीतरी मला विचारते की आपण असेच चालत राहिलो तर कोठे पोचू? मला खरे तर क्षितिजावर! असे उत्तर द्यावे असे मनापासून वाटते आहे पण मी ते उत्तर न देता रूक्षपणे सिंधमध्ये पोचू असे सांगून टाकतो.

मगाशी डोक्यावर तळपणारा सूर्य, आता पश्चिम क्षितिजावर 10 ते 15 अंशावर आला आहे. आणि माझ्या पश्चिमेला, जमिनीवर पाणी साचून तयार झालेल्या शेकडो खळग्यांच्या पुंजक्यांनी अचानकपणे सुवर्णकांती प्राप्त केली आहे. सूर्यकिरणांमुळे हे साचलेले पाणी, मोजता येणार नाही अशा अनंत ठिकाणीं, नुसते झळाळून उठले आहे व सह्स्त्रावधी सुवर्णतारका एकदम चमकाव्यात तसे चमचमते आहे. समोरचे हे अवर्णनीय दृष्य मला या अवनीतलावरचे वाटतच नाहीये. या प्रकारचे स्वर्गीय दृष्य माझ्या उर्वरित आयुष्यात परत बघता येईल असे काही मला वाटत नाही.

वेळ तर पुढे सरकतोच आहे. मी आसमंताची अक्षरश: शेकडोंनी छायाचित्रे घेतो आहे. पश्चिम क्षितिजावर पोचलेल्या सूर्याने आता थोडी नारिंगी छटा असलेला सुवर्णमय अवतार धारण केला आहे. सूर्याला हिरण्यगर्भ हे नाव पूर्वी ऋषींनी देण्यामागचे कारणच मला समोर दिसते आहे. सूर्याचा इतका शुद्ध आणि स्वर्गीय अवतार मी या पूर्वी कधीच बघितलेला नाही. मी सहाज पूर्वेकडे वळून बघतो. क्षितिजापासून साधारण 40 अंशावर दुधाच्या रंगाचा सफेद चंद्र आकाशात मला सहजपणे दिसतो आहे.

आणखी काही क्षण जातात. सूर्याची एक कड आता क्षितिजाला टेकते आहे. क्षणार्धात पश्चिमेला असलेले पाण्याचे सर्व सुवर्णमय पुंजके एकमेकाचा हात हातात घेतात व मला समोर दिसू लागतो नारिंगी सुवर्ण रंगाचा परंतु सबंध क्षितिजाच्या लांबीचा एक चिंचोळा पट्टा!हा पट्टा तर आता सूर्याचा एक भागच असल्यासारखा झळाळतो आहे. आणखी काही क्षण जातात.सूर्याची वरची कडही क्षितिजाआड लपते. त्याचबरोबर मगाशी झळाळणारे पाण्याचे ते पुंजकेही हरपतात.

मी एक उसासा टाकतो व परत फिरण्यासाठी मागे वळतो. चालत असतानाच माझ्या अचानक लक्षात येते की आजूबाजूच्या जमिनीने आता अचानक रुपेरी रंग प्राप्त केला आहे. सूर्य क्षितिजाआड गेल्याने आणि नारिंगी रंगाचा मागमूस न राहिल्याने चंद्राने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. मगाशी सुवर्णकांती धारण केलेली ही शुभ्र धवल मरूभूमी आता रुपेरी बनली आहे. अगदी रूक्षपणे सांगायचे म्हटले तरी ही सभोवार दिसणारी अवनी आता अचानक जादूमय बनली आहे.

अगदी नाईलाजाने पाय निघत नसतानाही मी परत बसकडे वळतो व आमच्या कॅम्पकडे येण्यास निघतो. रात्री गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर माझे पाय जवळच असलेल्या अ‍ॅम्फीथिएटर कडे वळतात. आजा अहमदाबाद येथील एका नृत्य शाळेच्या विद्यार्थिनींचा कुचिपुडीपद्धतीच्या नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. आता परत चांगलीच थंडी जाणवायला लागली आहे. मी अंगावर भरपूर कपडे चढवतो व डोळ्यावर पेंग येत असूनही हा प्रेक्षणीय कार्यक्रम पूर्ण बघतो.

नंतर झोपेची आराधना करत असताना माझे विचार उद्याच्या विशेष कार्यक्रमाच्या भोवतालीच केंद्रित झाले आहेत. उद्या सकाळी, जवळचे हे विराण आणि विशाल रण ओलांडून आम्ही, जेथे परत एकदा मानवी वस्ती शक्य आहे अशा पलीकडच्या म्हणजेच उत्तरेच्या बाजूच्या काठावर जाणार आहोत. परंतु या काठाच्या पलीकडे असलेला भूभाग मात्र आता भारताच्या स्वामित्वाखालील नाही.

(क्रमश)

4 एप्रिल 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 2

  1. masta likhan…kaka, tumache saglech lekh aavrjun vachate…likhanachi shailee ashi aahe ki chtra dolyasamor ubhe rahate, sagale photo khupach chaan….asech bhataka aani aamhala mejvani det raha…

    Posted by meghana | एप्रिल 5, 2013, 8:28 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: