.
Travel-पर्यटन

इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 1


मंगळवार

मुंबईहून भुजला जाणारे माझे विमान, निदान अर्धा तास तरी उशीरा सुटणार आहे. म्हणजेच मुंबईच्या आंतर्देशीय विमानतळावरचा माझा मुक्काम आता निदान 4 तासाचा तरी नक्कीच होणार आहे. आज सकाळी मी पुण्याहून मुंबईला येण्यासाठी म्हणून एस.टीच्या शिवनेरी सेवेने 8.30 वाजताच पुणे सोडले होते. ही शिवनेरी बस सेवा मात्र आहे अगदी वक्तशीर आणि अतिशय आरामदायी. मी या सेवेची तरफदारी मनापासून करायला तयार आहे. बसने मला विमानतळाच्या शेजारून जाणार्‍या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विमानतळाच्या अगदी समोरच सोडले होते व तेथून विमानतळावरील निर्गमन कक्षात मी अगदी सहज पोचू शकलो होतो. 1बी टर्मिनल मधील हा निर्गमन कक्ष आहे मात्र अगदी ऐसपैस! याच्या एका बाजूला प्रवाशांच्या सोईसाठी म्हणून बरीच दुकाने व एक कॅफेटेरिया दिसत आहेत. शो केसमध्ये मांडलेल्या वस्तू, पुस्तके यांचे विंडो शॉपिंग करत मी माझा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आहे. अखेरीस आमच्या उड्डाणाची घोषणा होते. नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लगबग, व गोंधळ थोड्याफार प्रमाणात अनुभवल्यानंतर मी विमानापर्यंत पोचण्यात यशस्वी होतो. विमान पूर्ण भरलेलेच दिसते आहे आणि स्वस्त विमानसेवा या वर्गाखाली हे उड्डाण मोडत असल्याने पिण्याच्या पाण्याखेरीज दुसरी कोणतीच सुविधा विमानात उपलब्ध नाहीये.

कच्छ आणि काठेवाडचा प्रवास हा इतिहासाची सोबत घेतल्याशिवाय करताच येत नाही असे मला वाटते. पावला पावलावर पर्यटकाला येथे, पार इ..पूर्व 2500 ते अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा काळ, यांमधील इतिहासाच्या पाऊलखुणा दिसत राहतात आणि या शिवाय गेल्या 50 वर्षात, औद्योगिक क्रांतीमुळे या भागात जो आमुलाग्र बदल होतो आहे तोही क्षणाक्षणाला सतत जाणवत राहतो. निसर्गाने येथे दिसणार्‍या अथांग आणि असीम अशा आसमंतात, इतक्या अद्भुत आणि रौद्र सौंदर्याची लयलूट केली आहे की आपले मन आश्चर्याने आणि कौतुकाने पुरेपूर भरून जाते.

आमचे विमान भुज विमानतळावर उतरते आहे तेंव्हा संध्याकाळचे 5 वाजून गेले आहेत. समोर दिसणारा विमानतळ खूपच मोठा वाटतो आहे परंतु समोर टरमॅक वर उभे असलेले विमानदलाचे एक MI17 हेलिकॉप्टर सोडले तर बाकी काहीच विमाने दिसत नाहीत. भुज विमानतळावर दिवसाला फक्त 2 किंवा 3 उड्डाणे उतरतात ही गोष्ट लक्षात घेतली तर इथला आगमन कक्ष त्या मानाने खूपच प्रशस्त वाटतो आहे. मी मुंबईला चेकइन खूपच लवकर केले होते त्यामुळे अपेक्षेनुसार माझे सामान सर्वात उशीरा बेल्ट्वर येते. मी टर्मिनलच्या बाहेर येतो तोपर्यंत बहुतेक मंडळी निघून गेलेली आहेत. आहेत.अगदी थोडी वाहने वाहनतळावर उभी आहेत. मात्र नशिबाने मला एक टॅक्सी मिळते. पण ती ज्या पद्धतीने मला लगेच मिळते ते काही चांगले चिन्ह नाही आणि आपल्या खिशाला जबरदस्त चाट बसणार आहे हे ही माझ्या लक्षात येते. पण तरी सुद्धा मी ती टॅक्सी घेतो कारण या निर्जन विमातळावर टॅक्सीची वाट एकाकीपणे बघत बसण्याची माझ्या मनाची काही तयारी नाही. हा विमानतळ शहरापासून फक्त 3 किमी लांब आहे आणि शहराच्या भरवस्तीमध्ये असलेल्या हॉटेलवर पोचल्यावर जेंव्हा टॅक्सी चालक माझ्याकडे 500 रुपयांची मागणी करतो तेंव्हा माझा होरा बरोबर असल्याची मला खात्रीच पटते. नाईलाजाने मी पैसे काढून देतो आणि हॉटेलमधल्या माझ्या रूमकडे वळतो. संध्याकाळी नंतर मी जरा पावले मोकळी करायला म्हणून बाहेर पडायचे ठरवतो व शहराच्या बाजारपेठेतून सरळ हमिसरतलावाकडे जाणारा रस्ता पकडतो. हा तलाव म्हणजे भुज शहराचा मध्यवर्ती बिंदू आहे आणि माझ्या हॉटेलपासून या तलावापर्यंतचे अंतर जेमतेम 15 मिनिटात चालत जाता येते आहे. मी तलावापाशी पोचतो तेंव्हा सूर्यास्त होतो आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोर तलावात पाणीच नाहीये. या वर्षी म्हणे पाऊस फारच तुरळक पडला आणि तलावाला पाणी आलेच नाही. बाजारपेठेतील रस्ता गर्दीने नुसता फुलला आहे. वेडीवाकडी कशीही उभी केलेली वाहने, बेशिस्तपणे चाललेली वाहतूक, मोकाट सोडलेल्या गाई यामधून चालणे मुश्किल वाटते आहे. रस्त्याला पदपथ वगैरे नाहीतच आणि सगळीकडे कचर्‍याचे ढीग साठलेले दिसत आहेत. भुजचे प्रथम दर्शन तरी माझ्या मनाला फारसे पटलेले किंवा आवडलेले नाहीये. मी जरा कंटाळूनच हॉटेलवर परततो.

बुधवार

पुढचे 2 दिवस माझा मुक्काम कच्छच्या रणाजवळ असलेल्या ज्या कॅम्पमधे होणार आहे, त्या कॅम्पच्या व्यवस्थापनाने मला भुज रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या स्वागत कक्षात सकाळी बोलवले आहे. तेथे लवकर पोचता यावे म्हणून हॉटेलमधून 7.30 पर्यंत चेक आऊट करायचे असा माझा बेत होता. पण या हॉटेलची सेवा जरा मंद गतीनेच दिली जाते आहे असे दिसते. सकाळी 6 वाजता जो चहा येणार होता तो मिळालाच नाही व हॉटेलमधील रेस्टॉरन्ट मधे जाऊन प्यावा म्हणावे तर ते 7.30 शिवाय उघडत नाही. शेवटी सकाळी 8 च्या सुमारास चेक आऊट करण्यात मी यशस्वी होतो होतो आणि भुज स्टेशन जवळच्या स्वागत कक्षात पोचायला मला 8.15 होतात. मी गरम कपड्यात मला गुंडाळून घेतले आहे कारण येथे थंडी जबरदस्त आहे आणि झोंबणारे गार वारेही आहेत.

स्टेशन जवळच्या या स्वागत कक्षासमोर दिसणारे एकूण चित्र मला जरा निरुत्साही करणारेच वाटते आहे. समोर बर्‍याच बसेस कशाही वेड्यावाकड्या पार्क केलेल्या आहेत आणि जिकडे तिकडे सामानाचे ढीग आणि या कॅम्पमधे भाग घेण्यासाठी आलेले लोक घोळक्या घोळक्यांनी उभे आहेत. मी स्वागत कक्ष अशी पाटी लावलेल्या शामियान्यात शिरतो आणि एका काऊंटरपाशी जातो. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी आहे. आतले काम भलतेच शिस्तशीर आणि पद्धतशीर रितीने होताना दिसते आहे. समोरचा स्टाफ अतिशय अदबीने वागतो आहे आणि प्रवाशांच्या अडचणींचे निवारण करण्यास तत्पर दिसतो आहे. माझी कागदपत्रे बघितल्याबरोबर मला एक तंबू अलॉट केला जातो व बरोबर आणलेल्या सर्व सामानावर त्या तंबूचा नंबर लिहिलेले टॅग्ज दिले जातात. ते मी सामानाला लावायचे आणि कोणत्याही बसमधे चढायचे एवढे सोपे काम आहे. फक्त माझे सामान मी प्रवास करतो आहे त्याच बसमध्ये ठेवले जाईल हे माझे मलाच बघायचे आहे. मी बाहेर येतो व समोरच असलेल्या एका बसच्या सेवकाकडे माझे सामान देतो. ते त्याने बसमध्ये ठेवले आहे याची खात्री झाल्यावर बसमध्ये चढतो.

पुढच्या 10 मिनिटात, भुजच्या वायव्येला 80 किमी अंतरावर असलेल्या धोर्डो या गावाकडे जाण्यासाठी बस निघते. भुजच्या उत्तरेकडे असलेला हायवे 45 वरून आम्ही निघालो आहोत. परत एकदा भुज विमानतळाचे दर्शन होते. विमानतळाच्या कडांना असलेल्या हॅन्गर्समध्ये ताडपत्र्यांचे आच्छादन घातलेली बरीच लढाऊ विमाने दिसत आहेत. आजूबाजूचे दृष्य काही आगळेच, सहसा बाकी कोठे न दिसणारे असे आहे. मधे मधे हिरवट काळसर रंगाची उभी पिके असलेली शेते व त्याच्या मधे मधे ओसाड जमीनीचे मोठाले पॅचेस दिसत आहेत. मधून मधून साठलेल्या पाण्याची डबकी पण दिसत आहेत. 2 दिवसांपूर्वी भुजमधे जोरदार वर्षा वृष्टी झाली होती त्यामुळे बहुदा हे पाणी साठलेले असावे. शेतात जी पिके उभी आहेत ती बहुतांशी एरंडीची आहेत. एरंडी (Ricinus communis, or Euphorbiaceae) हे पीक त्याच्या बियांपासून मिळणार्‍या एरंडेल तेलासाठी घेतले जाते. शेतकर्‍यांना नगदी रक्कम मिळवून देणारे हे पीक येथे खूपच घेतले जाते कारण येथली अतिशय खराब जमीन आणि वाळवंटी हवामान! हे तेल म्हणजे आपल्या रोजच्या उपयोगातील अनेक उत्पादनांसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा उत्पादन घटक आहे. या उत्पादनांत, सौंदर्य प्रसाधने आणि मोटरगाड्यांच्या आणि इतर डिझेल, पेट्रोल इंजिनांसाठी जे वंगण लागते ते तेल, अशी दोन महत्त्वाची उत्पादने मोडत असल्याने एरंडी तेलाला खूपच मागणी असते.

आता शेतांच्या मधे मधे लागणार्‍या ओसाड पॅचेस मधली जमीन पांढरट दिसायला लागली आहे. हा पांढरा रंग, जमिनीत क्षारांचे प्रमाणे अवाजवी असल्याने दिसतो आहे. या ओसाड खारवट जमिनीत, फक्त बाभळीची झुडुपे उगवतात व टिकू शकतात. आम्ही जसजसे उत्तरेकडे जातो आहोत तसतसे या ओसाड जमिनींचे प्रमाण वाढते आहे व शेती अगदी थोड्या प्रमाणात, फक्त खेडेगावांजवळ, दिसते आहे. खेडेगावांतली घरे गोल आकाराची बांधलेली आहेत आणि त्यावरची छते शंकाकृती आकाराची दिसत आहेत. येथील पूर्वापार चालत आलेल्या घरांमध्ये, पूर्वी या शंकूच्या आकाराच्या छतावर गवत पसरण्याची पद्धत होती व त्यांना भुंगा असे नाव होते. आता सर्रास पणे मंगलोरी कौले छतावर घातलेली दिसत आहेत. मात्र छताचा आकार तसाच शंकू सारखाच आहे. घरांचा हा आकार असा बनवला जातो कारण, अशी घरे भूकंप झाला किंवा वादळ आले तरी त्यांना चांगले तोंड देतात व सहसा पडत नाहीत.

1 तासभर प्रवास केल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभी रहाते. आजूबाजूला दिसणारे दृष्य अगदी कॉमन आहे. दोन्ही बाजूंना छोटी छोटी दुकाने, चहाच्या टपर्‍या आणि भाज्या वगैरे विकणारे स्टॉल्स. या गावाचे नाव आहे भिरंडीयारनी आणि हे गाव तसे प्रसिद्ध आहे. या गावात चप्पल, सॅन्डल या सारख्या चामड्याच्या वस्तू आणि खवा, किंवा त्यापेक्षा हुबळी, बेळगाव कडे जसा कुंदा मिळतो तसाच दिसणारा आणि चवीला लागणारा, मावा मिळतो. या गावाबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथून पुढे उत्तरेला जायचे असले तर इनर लाइन परमिट घ्यावे लागते असे म्हणतात. खरे खोटे मला माहीत नाही.

हे गाव सोडून आमची बस आता डावीकडे असलेल्या एका छोट्या फाट्याला वळली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी आहे. येथून पुढे कच्छ्ची प्रसिद्ध चराऊ राने ज्यांना येथे बन्नीअसे नाव आहे ती सुरू होतात. मात्र मला दिसत आहेत ती बाभळीची झुडपे व त्या खाली वाळलेले गवत. कच्छ मध्ये गाई आणि म्हशी यांच्या दुधाचे प्रचंड उत्पादन होते याला प्रामुख्याने ही बन्नी चराऊ राने कारण आहेत. इथल्या गवतावर पोसलेल्या बलदंड दुभत्या जनावरांचे कळप किंवा ताफे मला दोन्ही बाजूंना बाभळीच्या झुडपांमागे दिसत आहेत. आणखी अर्धा तास प्रवास केल्यानंतर बस एकदम थांबते. आम्ही रणाजवळच्या कॅम्पपाशी पोचलो आहोत.

शेकडो तंबू ठोकून उभा केलेला हा कॅम्प म्हणजे एक प्रचंड वसाहतच आहे. प्रत्येक तंबूमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. जवळच वातानुकूलित भोजनगृह, खरेदीसाठी अनेक स्टॉल्स असलेली एक बाजारपेठ व एक सभागृह आहे. तंबूमध्ये वायफायची सुविधा देखील आहे. प्रथम मी आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण करतो व त्या नंतर मला एक कॅम्पचे ओळखपत्र आणि भोजनासाठीची कुपॉन्स देण्यात येतात. ती सगळी घेऊन मी आरामात माझ्या तंबूकडे जातो. आशचर्याची गोष्ट म्हणजे माझे सामान, तंबू समोर आणून ठेवलेलेच आहे. तेथील सेवक वर्ग मला प्रथम न्याहरी घ्यावी अशी अशी सूचना करतो कारण न्याहरीची वेळ थोड्याच वेळात संपणार असते. मोठ्या थोरल्या भोजन गृहात अगदी गरम गरम जेवण तुम्हाला सर्व्ह केले जाते. संपूर्ण गुजराथी पद्धतीची पोहे, जिलबी आणि गाठिया यांची न्याहरी व त्यानंतर मसाला चहा याची लज्जत येथे काही औरच येते आहे.

आता दुपारच्या भोजनापर्यंत तसा मला मोकळा वेळ आहे. त्या नंतर आम्हाला जवळपास असलेल्या कच्छी खेड्यांच्यात तेथील कारागिरांनी केलेले भरतकाम आणि इतर कलाकुसर बघण्यासाठी नेण्यात येणार आहे. मी जवळच असलेल्या बाजारपेठेतील स्टॉल्समध्ये भटकण्यात वेळ घालवून आणि थोडीफार खरेदी करून माझ्या तंबूमध्ये परतण्याचे ठरवतो.

प्रत्यक्षात मात्र मी शेवटी अंदाजे 2 तास तरी तिथल्या दुकानांच्यात घालवतो. भरतकाम किंवा बांधणी प्रकारची वस्त्रे, त्यांचे रंग हे सगळे मनाला फारच लुभावणारे वाटते आहे. कलाकुसरीच्या इतर वस्तूंची कारागिरी सुद्धा फारच अप्रतिम वाटते आहे.

12.30च्या सुमारास मी माझ्या तंबूकडे परत येतो. प्रत्येक तंबूमध्ये, 2 शयनमंच, 2 टेबले, खुर्च्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे एक रूम हीटर, पाणी गरम करण्यासाठी एक इलेक्ट्रिक किटली आणि चहाचे किट टेबलावर ठेवलेले आहे. तंबूच्या मागच्या बाजूस आधुनिक सुविधा असलेले स्वच्छता गृह आहे.

मी जरावेळ आराम करतो व परत एकदा भोजन गृहात जाऊन संपूर्ण गुजराथी भोजनाचा आस्वाद घेतो व नंतर या कॅम्पच्या स्वागत कक्षाजवळ असलेल्या वाहनतळाकडे वळतो.

(क्रमश)

28 मार्च 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: