.
History इतिहास

सुरकोटला अश्व भाग 3


(मागील भागावरून पुढे)

भारतीय उपखंडावर, इतिहासपूर्व कालामध्ये झालेल्या आर्यांच्या तथाकथित आक्रमणाचा सिद्धांत अशा रितीने मोडीत निघाल्याने, 2 सहस्त्रके अस्तित्वात असलेली सिंधूसरस्वती संस्कृती यानंतर अचानक विलयास कशी गेली? या कोड्याचे उत्तर आता आतापर्यंत पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि इतिहासकार यांना मिळत नव्हते. Woods Hole Oceanographic Institution (WHOI) या संस्थेच्या विद्यमाने व लिव्हिउ जिओसान (Liviu Giosan) या भूगर्भशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली 5 वर्षे कालावधीसाठी चाललेला एक विस्तृत अभ्यास या आंतर्राष्ट्रीय अभ्यासगटाने नुकताच पूर्ण केला. या अभ्यासाच्या अहवालात, या कोड्याचे उत्तर आता मिळाले असल्याचा दावा केला गेलेला आहे. या अभ्यासगटाची निरीक्षणे व निष्कर्ष याबद्दल माहिती एका निराळ्या लेखात मी दिली आहे व रुची असणारे वाचक हा लेख बघू शकतील. परंतु आपल्या सध्याच्या विषयाची सुसूत्रता रहावी म्हणून या अहवालातील काही मुख्य निरीक्षणे मी येथे परत देत आहे.

सिंधूसरस्वती नद्यांच्या खोर्‍यात ही विशाल मानव संस्कृती स्थिर होण्याच्या सुमारे 10000 आधीच्या वर्षांत, बेफाम व अफाट रितीने वाहणारी सिंधू व तिच्या उपनद्या, यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात, सुपीक मातीचा गाळ, नदीकाठ व या नद्यांमधल्या प्रदेशात आणून भरला होता. लिव्हिउ जिओसान यांच्या पथकाला या सपाट प्रदेशात 10-20 मीटर उंच, 100 किमी रूंद आणि सिंधू नदीच्या प्रवाहाला समांतर अशा रितीने 1000 किमी लांबवर पसरलेल्या एका महाटेकडीचा शोध लागला. या टेकडीला सिंधू महाटेकडी (Indus mega-ridge) असे नाव या पथकाने दिले. हे नाव देण्याचे कारण म्हणजे ही टेकडी, सिंधू नदीने वरून वाहत आणलेला सुपीक गाळ खालच्या संपूर्ण नदीकाठच्या प्रदेशात आणून पसरवून निर्माण केली होती. आतापर्यंत सिंधू खोर्‍यात सापडलेल्या सर्व हडप्पा कालीन वसाहती या महाटेकडीच्या खाली गाडल्या गेलेल्या नसून ही टेकडी प्रत्यक्षात या उत्खनन केलेल्या वसाहतींच्या खाली सापडते आहे. यावरून असे म्हणता येते की सिंधू खोर्‍यातील मानव संस्कृती ही या गाळाच्या महाटेकडीच्या खाली नसून पृष्ठभागावर वसली होती.

सिंधूसरस्वती खोर्‍यातील नद्यांना महापूर आणणारा मॉन्सूनचा पाऊस याच काळात हळू हळू कमी होऊ लागला. हा कमी होणारा पाऊस आणि त्यामुळे हिमालय आणि इतर पर्वतांच्या उतारावरून वाहत येणार्‍या पाण्याचे कमी प्रमाण यामुळे या नद्यांच्या काठांवर शेती करणे शक्य झाले. शेतीच्या या शक्यतेमुळे या भागात मानवी वसाहती हळू हळू वाढू लागल्या. कमी होत राहिलेल्या पावसाच्या प्रमाणाने सुमारे 2 सहस्त्र वर्षांचे एक कालगवाक्ष (window of opportunity) हडप्पा संस्कृतीवासियांना एखाद्या सुवर्ण संधीसारखे उपलब्ध झाले.( a window of about 2000 years in which Harappans took advantage of the opportunity) व त्याचा भरपूर फायदा या संस्कृतीने घेतला व ही विशाल संस्कृती सिंधूसरस्वती आणि त्यांच्या उपनद्या या नदी खोर्‍यांच्यात विकसित झाली. ही संस्कृती भरपूर पाणी व उत्तम हवामान यांच्यामुळे दरवर्षी हातात येणार्‍या अमाप अन्नधान्याच्या उत्पन्नावर अवलंबून होती. शेती व नंतर धान्याचा व्यापार यासाठी खूप मोठ्या संख्येने श्रमिकांची आवश्यकता असल्याने जेथे असे श्रमिक मोठ्या संख्येने एकाच स्थानी उपलब्ध होऊ शकतील अशी मोहेंजोदाडो किंवा हडप्पा सारखी महानगरे या संस्कृतीमध्ये विकसित झाली.

पुढे हा मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण आणखी आणखी कमी होऊ लागले व 2000 वर्षाचे हे कालगवाक्ष हळूहळू बंद होण्याच्या मार्गाला लागले. पूर्वी जेथे उदंड पाणी उपलब्ध होते तेथे आता फक्त मरूभूमी दिसू लागल्या. पावसाच्या कमी प्रमाणाने पूर्वी अमाप येणारी पिके आता रोडावू लागली व महानगरातील श्रमिकांना कामधंदा मिळणे दुरापास्त होऊ लागले. या सर्व कारणांमुळे उत्तरेकडे विकसित झालेल्या सिंधू खोर्‍यातील रहिवासी इ..पूर्व 1500 च्या आसपास, जेथे मॉन्सूनचा पाऊस अजूनही स्थिर प्रमाणात पडत होता अशा गंगा खोर्‍याकडे सरकू लागले. या भागातील मॉन्सूनचा पाऊस जरी स्थिर स्वरूपाचा असला तरी पावसावर अवलंबून असलेली शेती व नद्यानाल्यातील उपलब्ध पाणी हे फक्त छोट्या स्वरूपातील शेतीसाठीच उपयुक्त होते. या कारणामुळे सिंधू खोर्‍यातील मोठ्या शहरांसारखी शहरे गंगा खोर्‍यात निर्माण न होता, मर्यादित स्वरूपाच्या शेतीच्या आधारावर टिकू शकतील अशा लहान नगर राज्यांची अर्थव्यवस्था (City States) येथे स्थापली गेली. मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या. आणि स्थलांतरित जनसंख्या लहान लहान गावात विखुरली गेली.

या अभ्यासात आणखी एका गूढाचा उलगडा करता आला आहे असे हा अहवाल म्हणतो. ते गूढ म्हणजे सरस्वती नदी अदृष्य होण्यामागचे कारण. सरस्वती नदी म्हणजे सध्याची घग्गर नदी असेही हा अहवाल म्हणतो. घग्गरहाकरा नदीच्या खोर्‍यात, हडप्पा कालात अतिशय दाट स्वरूपात वस्ती असल्याचे पुरावे या भागात केलेल्या उत्खननात आढळून आलेले आहेत. नदीच्या काठावर असलेले गाळाचे थर व नदी खोर्‍यातील भूपृष्ठभाग रचना या स्वरूपाच्या व या अभ्यासातून प्राप्त झालेल्या भूशास्त्रीय पुराव्याप्रमाणे या नदीचे पात्र खरोखरच विशाल व मुबलक पाणी असलेले होते असे दिसते. परंतु या कालात सुद्धा या नदीला असलेले मुबलक पाणी हे सध्याप्रमाणेच पण केवळ त्या काळात पडणार्‍या सशक्त मॉन्सूनच्या पावसामुळेच होते. या नदीला हडप्पा कालात सुद्धा हिमालयातून पाणी उपलब्ध होत नव्हते. त्याचप्रमाणे या नदीच्या जवळून वाहणार्‍या सतलज किंवा यमुना नद्यांमध्ये जे पाणी हिमालयातून येत होते ते या नदीच्या पात्रात वहात आल्याचा काहीच पुरावा मिळत नाही. या नदीला बारमाही पाणी असले तरी ते त्या काळातील सशक्त मॉन्सूनचेच होते.

मात्र काही भारतीय शास्त्रज्ञ हा दृष्टीकोन अमान्य करतात त्यांच्या मताने सरस्वती नदीला मॉन्सूनच्या पावसाशिवाय, यमुना व सतलज या नद्यांचे पाणीही येऊन या काळात मिळत असे. मात्र पुढे भूगर्भातील हालचालींमुळे हे पाणी सरस्वती नदीत येऊन मिळणे बंद झाले झाले. वार्‍यामुळे सतत उडणार्‍या धुळीने हे कोरडे पात्र हळूहळू भरत गेले व सरस्वती नदी अदृष्य झाली. (शंकरन ए व्ही, 1999; रॉय व जाखर, 2001) अर्थात यापैकी कोणतीही कारण मीमांसा मान्य केली तरी अमाप पाणी कच्छ्च्या रणात वाहून नेणारी ही विशाल नदी याच सुमारास मृत झाली याच निष्कर्षाप्रत आपण शेवटी येतो.

सिंधू सरस्वती संस्कृतीमधील दक्षिणेला असलेल्या धोलाविरा सारख्या महानगरांवर मॉन्सूनच्या पावसाच्या कमी होत चाललेल्या प्रमाणाचा थोडाफार परिणाम झाला असला तरी त्यांच्यावर मुख्य आघात सरस्वती नदी लुप्त होण्याचा झाला असे मला वाटते. कच्छ्च्या रणात भरले जाणारे सरस्वती नदीचे पाणी कमी होत गेल्याने तेथून होणारी जहाजांची ये जा बंद झाली व येथून मेसापोटेमिया आणि उत्तरेला असलेल्या कालीबंगा यासारख्या शहरांकडे सरस्वती नदीमधून होणारी मालवाहतूक संपुष्टातच आली. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या शोधाप्रमाणे याच सुमारास एक जबरदस्त भूकंप कच्छ मध्ये झाला व रणाचा सर्व भूगोलच बदलून गेला. एकेकाळी अत्यंत सुपीक असलेला हा भाग आता वाळवंटाचा आणि दलदलीचा प्रदेश बनला. जिओसान यांच्या अहवालाप्रमाणे या भागातील रहिवासी हळूहळू, जेथे वास्तव्य करण्यास जास्त अनुकूल परिस्थिती होती त्या दक्षिणेकडे (गुजरात व महाराष्ट्र) आणि पूर्वेला (राजस्थान) कडे सरकू लागले.

काही शास्त्रज्ञांच्या मताने, सरस्वती नदी, कच्छच्या रणात सध्याच्या पाकिस्तान मधील बादिन शहराजवळ आपले पाणी आणून टाकत असे. हे पाणी व या नदीच्या थोड्या पश्चिमेला असलेल्या सिंधू नदीच्या प्रवाहाचे पाणी हे कोरीनदीच्या खाडीमधून अरबी समुद्राला मिळत असावे. हे असे जर असले तर कच्छच्या रणाच्या जागी त्या वेळेस केवढा मोठा जलाशय अस्तित्वात असला पाहिजे व त्याच्या काठावर असलेल्या धोलाविरा किंवा सुरकोटला सारख्या वसाहती केवढ्या समृद्ध असल्या पाहिजेत याची सहज कल्पना करता येते.

2 वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथे असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्याचा मला योग आला होता. या संग्रहालयात सिंधूसरस्वती संस्कृतीमधील शहरे व वसाहती जेथे होती, त्या स्थांनावर उत्खनन केल्यानंतर मिळालेल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. यापैकी बैलगाडीचा आराखडा, स्वैपाकघरातील भांडी, पाटावरवंटा, मुलांची खेळणी या सारख्या अनेक वस्तूंचे साम्य अगदी 50 वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय समाजात नित्य वापरात असलेल्या वस्तूंशी कमालीच्या प्रमाणात जुळते आहे हे बघून मला सिंधूसरस्वती संस्कृतीचे नाते भारतीय समाजाशी अजूनही जुळलेले आहे याची खात्री पटली होती.

भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संचालक, श्री. ब्रज बासी लाल यांनी 2002या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात NCERT या संस्थेच्या विद्यमाने भोपाळ येथे दिलेल्या एका भाषणात हडप्पा संस्कृतीबद्दल आणि ही संस्कृती व सध्याची भारतीय संस्कृती यातील साम्यस्थळे या बद्दल मोठे मार्मिक विवेचन केले होते. त्या भाषणातील काही भाग मी खाली देत आहे.

भारतीय संस्कृतीच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी त्यावर उमटलेला हडप्पा संस्कृतीचा प्रभाव अजूनही स्पष्टपणे दिसून येतो. या प्रभावाची काही उदाहरणे म्हणून शेती, स्वैपाक, वैयक्तिक प्रसाधन, अलंकार, मुलांची खेळणी, मोठ्यांचे बैठे खेळ, नदी किंवा रस्ता मार्गे होणारे दळणवळण, लोककथा, धार्मिक विचार आणि आचार यांचा उल्लेख करता येईल. या प्रभावाची काही प्रत्यक्ष उदाहरणे मी (श्री.लाल) खाली देत आहे.

सध्याच्या उत्तर राजस्थान मध्ये शेतांची नांगरणी करताना उभ्या आडव्या रेषांमधील घळी जशा शेतकरी तयार करतात बरोबर तशाच घळी असलेले इ..पूर्व 2800 मधील एक शेत कालीबंगा येथील उत्खननात सापडले आहे.

हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश यात मोहरीचे पीक घेताना या नांगरलेल्या घळी दूर अंतरावर पाडण्यात येतात तर हरबर्‍याचे (छोले) पीक घेताना या घळी जवळ जवळ पाडल्या जातात. हडप्पा कालात हीच पद्धत अवलंबली जात होती याचा स्पष्ट पुरावा आम्हाला मिळाला आहे.

सध्या पूजले जाणारे शिवलिंग व त्याच्या खाली असलेला योनीचा भाग यांसारखेच बरोबर दिसणारे लिंग कालीबंगा येथे मिलाले आहे.

बाणावली, राखीगंगा व लोथल येथे अग्निकुंडा सारखी दिसणारी बांधकामे सापडली आहेत.

भाजलेल्या मातीतून बनवलेल्या प्रतिकृतींमध्ये, योगासने करणार्‍या व्यक्ती, कपाळावर लाल टिळा, काळ्या रंगाच्या केसात पाडलेल्या भांगात लाल शेंदूर व अंगावर पिवळ्या रंगात सोन्याचे दागिने रंगवलेल्या स्त्रिया आणि हात जोडून नमस्ते पद्धतीचे अभिवादन करणार्‍या प्रतिकृती आश्चर्यजनक आहेत. ”

श्री लाल यांच्या भाषणातील इतर भाग आतापर्यंतच्या आपल्या सर्वसाधारण समजुतींना मोठ्या प्रमाणात धक्का देणारा असल्याने त्याचा विचार तज्ञांनीच करणे जास्त योग्य ठरेल. मात्र आपण यातून एवढेच तात्पर्य उचलायचे की हडप्पा संस्कृती ही नष्ट झाली किंवा विलयास गेली हा तर्क योग्य नसून कदाचित या संस्कृतीतूनच नवी वैदिक संस्कृती उदयास आली असे म्हणणे जास्त योग्य ठरावे.

inamgaon excavations

सिंधू संस्कृतीमधील दक्षिणेकडच्या वसाहतीतील मानव, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र याकडे सरकू लागले असा उल्लेख मी वर केला आहे. परंतु याला काही पुरावा आहे का असा प्रश्न साहजिकपणे समोर येतो. मात्र मात्र असा पुरावा पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या श्री. सांकलिया, श्री ढवळीकर वगैरे शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रातील, प्रवरा आणि घोड नद्यांच्या खोर्‍यात केलेल्या उत्खननात निर्विवाद्पणे आढळून आला आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या परिभाषेत इ..पूर्व 1700 ते 1400 या कालखंडातील ब्रॉन्झ युगातील संस्कृतीला मालवा संस्कृती असे म्हटले जाते. ही मालवा संस्कृती आणि धोलाविरा किंवा सुरकोटला येथील संस्कृती, यात कमालीची साम्यस्थळे आढळून येतात. प्रवरा खोर्‍याच्या दक्षिणेकडे घोड नदीच्या काठावर असलेल्या इनामगाव येथील उत्खननात इ..पूर्व 1700 ते 800 या प्रदीर्घ कालखंडातील मानवी वसाहती सापडल्या आहेत. या कालखंडात येथे स्वत:ची खास वैशिष्ट्ये असणार्‍या तीन (मालवा, पूर्वकालीन जोरवे-1 आणि जोरवे-2) मानवी संस्कृती होऊन गेल्या असे हे शास्त्रज्ञ सांगतात. या निष्कर्षांमुळे सिंधू संस्कृतीचा अस्त झाला या म्हणण्यात फारसे हंशील नसून ही संस्कृती भारतात इतरत्र पसरत गेली असेच मान्य करावे लागते. इनामगाव उत्खननातील एक महत्त्वाची बाब म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृतीतील फलधारकत्व किंवा मातृत्व यांची प्रतिमा म्हणून स्त्री मूर्तीचे केले जाणारे पूजन तसेच पुढे चालू राहिलेले दिसते. या शास्त्रज्ञांच्या मताने ही स्त्री मूर्ती बहुदा या कालात जगन्माता म्हणून पूजली जाऊ लागली असावी. याशिवाय दाइमाबाद येथे सापडलेला ब्रॉन्झ रथ व इतर प्राणी अप्रतिम आहेत.

mother goddes from inamgaon

यानंतर शेवटी आपण इ..पूर्व दुसर्‍या सहस्त्रकात वैदिक धर्माच्या भारतात झालेल्या प्रसाराकडे वळूया. वैदिक धर्म कोठे उदयास आला याबाबत तज्ञात बरेच मतभेद आहेत. यापैकी प्रसिद्ध इतिहास तज्ञ श्रीमती रोमिला थापर व इतर काही तज्ञांच्या मते हा धर्म उत्तर अफगाणिस्तान मधील मार्जिनिया / बॅक्ट्रिया या भागात प्रथम उदयास आला तर वर मी उल्लेख केलेले बी.बी.लाल व इतर यांच्या मताने हा धर्म भारतामध्येच सरस्वती नदीच्या खोर्‍यातच उदयास आला. हा धर्म कोठेही उदयास आलेला असला तरी हडप्पा संस्कृतीतील लिंग व फलधारकत्व किंवा मातृत्व पूजन, प्रतिमांच्या माध्यमातून करण्याची परंपरा खंडित करून ती जागा या वैदिक धर्माने इ..पूर्व दुसर्‍या सहस्त्रकात कशी घेतली हे आपल्यासमोरचे मूळ कोडे आहे.

bronze chariot from Daimabad

या कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी इ..पूर्व पहिल्या सहस्त्रकाच्या अखेरीस, चीन, कोरिया, जपान, थायलंड आणि कंबोडिया या सारख्या भारतापासून अतिशय दूर असलेल्या एशिया खंडातील अनेक राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार कसा झाला याचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते. ..पूर्व 300 नंतर, सम्राट अशोकाने या ठिकाणी पाठवलेल्या बौद्ध भिख्खूंच्या माध्यमातून, या देशांनी हा धर्म स्वीकारला होता. या भिख्खूंनी कोणावरही सक्ती किंवा कसलीही लालूच न दाखवता धर्मप्रसाराचे हे कार्य पार पाडले होते. माझ्या मताने याच पद्धतीने भारतीय उपखंडात ही संपूर्ण नवीन विचारधारा असलेला वैदिक धर्म, प्रथम त्या काळात सगळीकडे पसरलेल्या छोट्या छोट्या नगरराज्यांच्या राजांनी स्वीकारला असावा व यथा राजा तथा प्रजा या न्यायाने त्याचा प्रसार झाला असावा.

परंतु हा नवीन धर्म स्वीकारल्यावरही सिंधू संस्कृतीतील लिंग पूजा व फलधारकत्व पूजन या दोन्ही गोष्टी समाजात चालूच राहिल्या. वैदिक धर्मातील रुद्र या पंचमहाभूतांशी संबंधित नसलेल्या देवाबरोबर लिंगपूजन जोडले गेले तर फललधारकत्व किंवा मातृत्व पूजन हे जगन्माता किंवा दुर्गा पूजन या नावाने ओळखले जाऊ लागले. वर उल्लेख केलेल्या इनामगाव उत्खननात सापडलेल्या जगन्मातेच्या प्रतिमा या तर्काला पुष्टी देतात असे मला वाटते.

2011/ 12 या वर्षी भारतातील कौन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेने भारतीय उपखंडामध्ये झालेले आधुनिक मानवांचे स्थलांतर या विषयामध्ये केलेल्या जनुकांच्या अभ्यासावर आधारित असलेल्या एका संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाप्रमाणे भारतात झालेली स्थलांतरे मध्य एशिया, मलेशिया आणि अंदमान बेटे या 3 स्थानांवरून झालेली असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे अशी पूर्ण शक्यता वाटते की सिंधूसरस्वती संस्कृतीमधील मानव हे मुळात मध्य एशिया मधून येथे आले असावेत. सिंधूसरस्वती खोर्‍यांत ते 2 ते 3 सहस्त्रके राहिले असावेत व नंतर तेथे राहणे कठीण बनल्यावर पूर्वेकडे व दक्षिणेकडे त्यांनी प्रयाण केले असावे. इनामगाव उत्खननामुळे या तर्काला चांगलीच पुष्टी मिळते असे मला तरी वाटते.

थोडक्यात सांगायचे तर सिंधूसरस्वती संस्कृतीवर कधीच आर्यांचे आक्रमण झाले नाही आणि ती कधीच लयास गेली नाही. भारतीय संस्कृती या नात्याने ती अजूनही जोमाने टिकून आहे नव्हे तर वृद्धिंगतही होते आहे.

(समाप्त)

24 मार्च 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “सुरकोटला अश्व भाग 3

 1. But what about the entree of the indo europeen languages in indian subcontinent?As harappn civilazation did not use IE languages…

  Posted by Datta | मार्च 28, 2013, 12:54 सकाळी
  • Datta

   Some say that Harappa script was based on the Mesopotamian script. That I do not know, but my answer to your question is that after the Indus people spread inland in Ganga basin, they formed small city states, where writing skills were lost for long long time. Much later Indians felt need for a script, when writing materials became available. So Prakrit language and Brahmi script were developed based on a script in central Asia. That is why the similarities between Indian and European languages. You can read some discussion about this here.http://mr.upakram.org/node/3954

   Posted by chandrashekhara | मार्च 28, 2013, 9:15 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: