.
History इतिहास

‘सुरकोटला’ अश्व: भाग 1


सुरकोटलाहे गुजरात राज्यामधील कच्छ जिल्ह्यामध्ये असलेले, एक अगदी छोटेसे खेडेगाव आहे. विकिमॅपियावरील माहितीप्रमाणे या गावाचे अक्षांशरेखांश, साधारण 23°37’N 70°50’E असे आहेत. त्यामुळे हे खेडे कच्छची राजधानी असलेल्या भूज शहरापासून ईशान्येस साधारण 120 किमी अंतरावर तर रापर गावाच्या ईशान्येस, 22 किमी अंतरावर वसलेले आहे असे म्हणता येते. या खेड्याजवळच 16 ते 26 फूट उंच असलेले एक टेकाड बघण्यास मिळते. या टेकाडाच्या सभोवती असलेली जमीन उंचसखल असून त्यात मधेमधे लाल मातीने माखलेल्या सॅन्डस्टोन दगडाच्या छोट्या छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत. या लाल मातीमुळे या सर्व भागाला लालसर ब्राऊन रंग प्राप्त झाला आहे. हा सर्वच भाग एकूण दुष्काळी व वैराण असल्याने मधून मधून दिसणारी, निवडूंग, बाभूळ आणि पिलू या वनस्पतींची काटेरी, खुरटी झुडपे सोडली तर बाकी झाडोरा किंवा गवत असे दिसतच नाही.

1964 साली, भारतीय पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, श्री. जगत्पती जोशी यांनी इतिहासपूर्व कालातील मानवी वस्तीच्या खाणाखुणा या टेकाडावर दिसत असल्याचे शोधून काढले होते. इतिहासपूर्व कालात या टेकाडाच्या ईशान्य दिशेला एक छोटी नदी

वहात होती. या नदीतील पाणी वहात जाऊन शेवटी कच्छमधील छोट्या रणात (Little Rann) पसरत असे. या नदीचे अस्तित्व हे कदाचित या ठिकाणी इतिहासपूर्व कालातील मानवी वसाहत असल्याचे महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता होती. सध्या मात्र या इतिहासातील नदीला एका पावसाळी छोट्या ओढ्याचे स्वरूप आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी प्रथम 1970-71 मध्ये उत्खनन करण्यास प्रारंभ केला. या उत्खननात, या स्थानावर एक किल्ला व त्याच्या बाजूला वसलेले एक गाव यांचे भग्नावशेष सापडले होते. तदनंतरच्या वर्षात ( 1971-72) येथे परत एकदा उत्खनन सुरू करण्यात आले. दुसर्‍या वर्षीच्या उत्खननात, या ठिकाणी प्रत्यक्षात तीन सलग कालखंडातील मानवी वसाहती किंवा संस्कृत्यांचा राबता होता असे आढळून आले. यापैकी सर्वात जुनी वसाहत इ..पूर्व 2150 ते 1950 या कालखंडात अस्तित्वात होती. या सर्वात जुन्या वसाहतीला 1ए असे नाव देण्यात आले. या नंतरची किंवा 1बी हे नाव दिलेली वसाहत इ..पूर्व 1950 ते 1800 या कालात अस्तित्वात होती तर जमिनीच्या सर्वात वरच्या थरात खाणाखुणा सापडलेली अखेरची किंवा 1सी ही वसाहत इ.पूर्व 1800 ते 1700 या कालखंडात येथे रहात होती. या सर्व उत्खननावरून हे स्पष्ट होत होते की की या ठिकाणी अस्तित्त्वात असलेली सर्वात जुनी वसाहत ही नक्कीच ब्रॉन्झ युगातील हडाप्पा किंवा सिंधूसरस्वती संस्कृतीचा एक भाग होती.

1बी या नावाने ओळखला जाणारा कालखंड समाप्त होण्याच्या सुमारास संपूर्ण सुरकोटला वसाहतीला भयानक आग लागली व ही सर्व वसाहत जळून खाक झाली. या दुर्घटनेचा साक्षीदार असलेला एक कमीजास्त जाडीचा राखेचा थर या संपूर्ण वसाहतीवर पसरलेला आढळून आला. 1बी या कालखंडाच्या खुणा ज्या खोलीवर सापडत होत्या तेथपर्यंत उत्खनन केल्यावर हा राखेचा थर आढळून आल्याने या आगीचा कालखंडही उत्खनन करणार्‍या शास्त्रज्ञाना लगेचच समजू शकला. मात्र आगीमुळे भस्मसात झालेली ही वसाहत परत लगेचच बांधून काढली गेली होती व येथे परत एकदा राबता सुरू झाला होता. मात्र या पुढच्या म्हणजे 1सी या कालखंडात, येथे कोणीतरी भिन्न लोक राबत्यास आले होते व एक नवीनच संस्कृती उदयास आली होती असे सापडलेल्या खाणाखुणा व वस्तू यावरून आढळून येत होते.

या टेकाडावर उत्खनन केल्यावर वर निर्देश केलेल्या ज्या कालखंडातील वसाहतींचे 3 थर आढळून आले होते त्या तिन्ही थरांमध्ये, विपुल प्रमाणात निरनिराळ्या पशुपक्ष्यांची हाडे आढळली होती. यातील पशूवर्गाच्या हाडांचे, पाळीव प्राणी, वसाहतीच्या निकट राहणारे डुकरे, उंदीर या सारखे प्राणी आणि शिकार केले जाणारे हरणासारखे वन्य प्राणी या 3 वर्गात विभाजन करता येत होते.

गेल्या काही दशकांत सिंधूसरस्वती नद्यांच्या खोर्‍यात ज्या अनेक प्राचीन वसाहती सापडल्या आहेत त्या सारखीच सुरकोटलाप्राचीन वसाहत ही एक असल्याने यात फार निराळे किंवा वैशिष्ट्यपूर्ण असे काही सापडेल अशी फारशी अपेक्षा शास्त्रज्ञांना नव्हती. परंतु सिंधूसरस्वती नद्यांच्या खोर्‍यातील कोणत्याही प्राचीन वसाहतीच्या उत्खननात कधीही न सापडलेल्या एका पाळीव प्राण्याची हाडे सुरकोटला उत्खननात पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना सापडली व या शोधामुळे, गेले 1 शतक युरोपियन इतिहास लेखकांनी या सिंधू खोर्‍यातील प्राचीन संस्कृतीबद्दलची जी काही प्रमेये मांडली होती ती पूर्णपणे चुकीची ठरतात की काय असा प्रश्न निर्माण झाला व एका नव्या विवादाला तोंड फुटले.

हा पाळीव प्राणी होता अश्व किंवा घोडा! (Equus caballus Lin or in plain English a Horse.)

उत्खनन करणार्‍या पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांच्या गटामधील, पशुंच्या अस्थी अवशेषांबद्दलचे विशेष तज्ञ मानले जाणारे शास्त्रज्ञ, श्री ए.के.शर्मा यांनी, 1बी या थरात सापडलेल्या हाडांमध्ये, घोड्याचे पुढचे दात व सुळे (incisor and molar teeth) व पायामधील खुराजवळील हाडे (various phalanges and other bones) ही निःशंकपणे घोड्याचीच (Equus caballus Lin (Horse) असल्या बद्दलचे आपले मत अतिशय सुस्पष्टपणे व्यक्त केले होते. या घोड्याच्या हाडांबरोबर, गाढवासारख्या तत्सम प्राण्यांची (Equus asinus and Equs hemionus khur (wild asses) हाडेही आपल्याला मिळाली असल्याचे आणि या शिवाय सर्वात वरच्या म्हणजे 1सी थरात जी हाडे सापडली आहेत जी निःशंकपणे घोड्याचीच आहेत असे म्हणणे शक्य होणार नाही हे सांगून एकूण परिस्थिती स्पष्ट केली होती.

श्री. .बी.शर्मा यांचा हा शोध इतका सनसनाटी होता की जगभरातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ, इंडॉलॉजिस्ट्स आणि इतिहासकार यांच्यात खळबळ उडाली व बहुतेकांनी हा शोध मान्य करण्याचेच नाकारले. 1920 सालामध्ये जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीचा शोध लावल्या नंतरच्या कालखंडात युरोपियन इतिहासकारांनी, भारतावर आर्य टोळ्यांचे आक्रमण झाल्यामुळे भारतीय उपखंडाचा इतिहास कसा बदलला? आर्यअनार्य यांच्यात कशी युद्धे झाली असावीत? आर्यांचा विजय का झाला? वगैरे प्रश्नांवर विसंबून जे एक भव्य दिव्य काल्पनिक चित्र रंगवले होते, त्या चित्रालाच मुळापासूनच सुरूंग या शोधामुळे लागण्याची वेळ आली.

या युरोपियन इतिहासकारांनी रंगवलेला हा इतिहास कोणत्या प्रत्यक्ष शोधांवर आधारित होता? हे बघणे रोचक ठरेल. सिंधू संस्कृतीतील उत्खनन झालेल्या कोणत्याही ठिकाणी पाळलेला घोडा (Equus caballus Lin) या प्राण्याचे अवशेष कधीही सापडलेले नाहीत. सिंधू संस्कृती लयाला गेल्यानंतरच्या (..पूर्व 1700-1500) कालात, भारतीय उपखंडामध्ये जी वैदिक संस्कृती उदयास येऊन सर्वमान्य झाली होती, त्या संस्कृतीमध्ये पाळलेला घोडा या प्राण्याला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान दिलेले होते. या मुळे, नंतरच्या काळात घोड्यांच्या पाठीवरून तुफानी घोडदौड करत आलेल्या चेंगिझखानच्या सैन्याने जसा मध्य एशिया सहज रित्या पादाक्रांत केला होता तशाच पद्धतीने अफगाणिस्थानइराण कडून घोड्याच्या पाठीवरून आलेल्या आर्य टोळ्यांनी आपल्या तुफानी घोडदौडीच्या बळावर सिंधू संस्कृतीतील आणि बैलगाडी हेच ज्यांचे प्रमुख वाहन होते अशा स्थानिक अनार्य वसाहतींचा संपूर्ण विनाश करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले असावे असे काहीसे चित्र या युरोपियन इतिहासकारांनी रंगवले होते. हे चित्र, या युरोपियन इतिहासकारांच्या मताने, इतके परिपूर्ण, कोणतीही शंका घेण्यास वाव नसलेले व परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होते की या इतिहासावर हा अखेरचा शब्द आहे असे मानले जाऊ लागले होते. भारतातील अनेक विद्वान मंडळींनाही हा आर्यअनार्य सिद्धांत पसंत पडला व उत्तर भारतीय म्हणजे आर्य व दक्षिण भारतीय म्हणजे अनार्य असेही काही मंडळी म्हणू लागली.

जगभर सर्वमान्य झालेल्या युरोपियन इतिहासकारांच्या या प्रिय सिद्धांताला भारतातील एक साधा सुधा पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता आव्हान देऊ बघत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, तथाकथित आर्य टोळ्यांचे आक्रमण भारतीय उपखंडावर ज्या काळात झाले असावे असे मानले जात होते त्याच्या 300 ते 500 वर्षे आधीपासूनच किंवा इ..पूर्व 2000 या कालखंडापासूनच पाळीव घोडा हा प्राणी हडाप्पा किंवा सिंधू संस्कृतीतील लोकांना परिचित होता नव्हे तर त्यांच्या वापरात होता.

(क्रमश)

14 मार्च 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “‘सुरकोटला’ अश्व: भाग 1

  1. I follow your writings closely. Keep writing.

    Posted by Mil | मार्च 14, 2013, 2:00 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: