.
Uncategorized

सिर खाडीचे महत्त्व


भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 3000 किमी लांबीची आणि बहुतांशी जमिनीवरून जाणारी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही सीमा काश्मिरात काही भाग व ही सीमा अरबी समुद्राला जेथे मिळते तेथील थोडा भाग वगळला तर इतर सर्व ठिकाणी विवाद विरहित रितीने रेखलेली आहे. या रेषेचा अरबी समुद्राजवळचा 96 किमी लांबीचा भाग मात्र प्रथमपासूनच विवादास्पद आहे. मात्र या 96 किमी लांबीच्या विवादास्पद रेषेचे हे वैशिष्ट्य मानले पाहिजे की ही रेखा सध्या जशी दाखवली जाते ती कोणत्याही आंतर्राष्ट्रीय लवादाने किंवा स्वातंत्र्यपूर्व कालातील ब्रिटिश सरकारने मनास येईल त्याप्रमाणे आखलेली नसून ती एका भौगोलिक वैशिष्ट्याच्या (feature) सलग आखलेली आहे. हे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे अरबी समुद्राला जोडलेली लहान अशी व सिर खाडी या नावाने ओळखली जाणारी एक खाडी आहे. या खाडीने गुजरात राज्यातील कच्छ हा विभाग आणि पाकिस्तानातील सिंध प्रांत हे विभागले जातात. या खाडीचे अक्षांशरेखांश साधारणपणे 23°58′N 68°48′E. हे येतात. विकिपिडीया मधील वर्णनाप्रमाणे या खाडीला बाणगंगा असे नाव आहे. परंतु मला तरी इतर कोठे हे नाव आढळले नाही.

सन 1924 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने राव महाराज यांच्या अधिपत्याखाली असलेले भूज संस्थान आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील सिंध विभाग यांच्यामधील सीमेची आखणी करण्यासाठी या सिर क्रीकच्या प्रवाहाच्या साधारण मध्यावर खाडीमध्ये सीमा रेखा आरेखन करणारे स्तंभ उभारले होते. पाकिस्तानने प्रथमपासूनच या स्तंभांचे अस्तित्व व त्यावरून रेखीत केली जाणारी रेषा ही आंतर्राष्ट्रीय सीमा आहे हे अमान्य केलेले आहे. पाकिस्तानच्या मताने ही सीमा रेखा भारताच्या बाजूस पडणार्‍या या खाडीच्या पूर्व किंवा पश्चिम किनार्‍यालगत असणे आवश्यक आहे. (म्हणजेच या खाडीतील जलप्रवाह हा संपूर्णपणे पाकिस्तानच्या सीमा अंतर्गत असला पाहिजे.) भारताची भूमिका ही सीमा रेखा मूळ 1924 मध्ये उभारलेल्या स्तंभांच्या सलग असली पाहिजे अशी आहे.

बर्‍याच लोकांचे असे म्हणणे आहे की या एका छोट्याशा जलमार्गाला एवढे महत्त्व विनाकारण दिले गेले आहे आणि पाकिस्तान व भारत आपल्या भूमिकेवरून मागे हटण्यास तयार नसल्याबद्दल आश्चर्यही अनेकांना वाटते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडे मागे गेले पाहिजे व मुळात सिर क्रीक मधील ही सीमा रेखा रेखीत करण्याचीच गरज का निर्माण झाली होती याची कारणे शोधली पाहिजेत. यासाठी कच्छ आणि सिंध यांच्या मधील सीमारेषेच्या पूर्वेकडील भागाकडे आपण प्रथम वळूया. प्राकृतिक नकाशा बघितल्यास लगेच लक्षात येऊ शकेल की पूर्वेकडील ही सीमारेखा, रण या नावाने ओळखल्या जाणार्‍या व खारवट पाण्याने आणि दलदलीने भरलेल्या अशा एका विस्तृत जलाशयाच्या उत्तर किनार्‍याच्या बाजूबाजूने पश्चिमेकडे जाते. 1878 साली काढल्या गेलेल्या एका नकाशात सुद्धा ही सीमारेखा अगदी स्पष्टपणे आणि विवाद विरहित रित्या दर्शवलेली आहे.

या रेषेच्या पश्चिम भागाच्या थोड्या दक्षिणेला म्हणजेच कच्छ मध्ये, ‘लखपतहे गाव वसलेले आहे. या गावाच्या उत्तरेला कोरीया नावाने ओळखली जाणारी एक नदी 1875 या वर्षापर्यंत वहात असे. मात्र मानव निर्मित व निसर्ग निर्मित अशा दोन्ही कारणांमुळे या नदीतून वाहणारे पाणी कमीजास्त अशा चक्रामधून या वर्षाच्या आधीच्या 100 वर्षांच्या कालखंडात जात राहिल्याने ही नदी कधी भरपूर पाण्याने भरलेली तर कधी एक दलदलीने भरलेला एक पाणथळ प्रदेश अशी स्वरूपे घेत राहिली. ‘लखपतच्याईशान्येकडे असलेले व सध्या पाकिस्तान मध्ये असलेले अली बंदरहे गाव या कोरीनदीच्या किनार्‍यावर वसलेले होते व तेथूनच ही नदी लखपतकडेवहात येत असे. पाकिस्तानमध्ये या नदीला पूरनअसे नाव आहे.

या कोरीनदीला ऐतिहासिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलेक्झांडर (.पूर्व 325) ते टॉलेमी (..150) यांच्या कालात ही नदी लोनीबेरेया नावाने परिचित होती आणि ही नदी सिंधू नदीचे पूर्वेकडील एक महत्त्वाचे मुख असल्याचे मानले जात असे. या नदीचे पाणी वळवण्यासाठी अली बंदर जवळ रहात असलेल्या सिंधी लोकांचे उद्योग 1764 पासूनच सुरू होते. या वर्षी या नदीवर एक मोठा बंधारा बांधण्यात सिंधी लोकांना यश आले. यामुळे लखपतजवळची शेती संपूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला व कच्छी आणि सिंधी सेनांमध्ये युद्ध झाले या युद्धात कच्छी सेनेचा दारूण पराभव झाला झाला आणि लखपतजवळील सुपीक जमीन पाण्याअभावी नापीक बनली. परंतु पुढील काही वर्षातच कोरीनदीला महाभयंकर पूर आला व अली बंदर जवळील बंधारा नष्ट होऊन परत एकदा कोरी नदीला भरपूर पाणी येऊ लागले. 1802 मध्ये अली बंदर जवळ नवा बंधारा बांधला गेला व कोरीनदीचे पाणी परत गायब झाले. परिणामी लखपतजवळील शेती नष्ट होऊन त्या जमिनीचा फक्त चराऊ जमीन म्हणून उपयोग होऊ लागला.

1819 साली झालेल्या एका भयानक भूकंपामध्ये कोरी नदीच्या पात्रात मोठे उंचवटे निर्माण झाले आणि सिंधू नदीचे पूर्वेकडील मुख मानल्या जाणार्‍या कोरीनदीच्या पात्राचे पाणथळ व दलदलीच्या प्रदेशात कायमस्वरूपी रूपांतर झाले. या भूकंपाच्या पाठोपाठ एका महाभयानक सुनामी लाटेने या कोरी नदीच्या पात्रावर आक्रमण केले आणि हा सर्व भाग जलमय झाला.

1846 मध्ये जिऑऑजिकल सोसायटी च्या त्रिमासिक मुखपत्रात (Quarterly journal of Geological society 2, 103, (1846) मिसेस डेरिन्झी या एका ब्रिटिश महिलेने कोणा एका कॅप्टन नेल्सनला लिहिलेले एक पत्र उदृत केले गेले होते. या पत्रात या महिलेले या सुनामी लाटेने हा सर्व भाग जलमय होऊन कसा हाहाकार उडाला होता याचे वर्णन केलेले आहे. थोडे विषयांतर होण्याचा धोका पत्करूनही हे वर्णन मूळातून वाचण्यासारखे असल्याने मी खाली देत आहे.

कॅप्टन मॅकमर्डो यांचा एक गाइड त्यांना भेटण्यासाठी भूजकडे निघाला होता. तो ज्या दिवशी लखपतला पोचला त्याच दिवशी भूकंपाचे धक्के बसले. या धक्यांनी राजमहालाच्या भिंती हादरून त्यांचा थोडा भाग कोसळला व काही जिवीतहानी झाली. याचा परिणाम म्हणून सिंधू नदीचे पूर्वेकडील मुख असलेल्या कोरी नदीत समुद्राकडून मोठी लाट आली. या लाटेने पश्चिमेकडे सुमारे 20 मैलावर असलेल्या गुंगरा नदीपर्यंत, उत्तरेकडे कोरी नदीच्या मुखापासून 40 मैल अंतरावर असलेल्या वेयरीगावाच्या थोड्या उत्तरेपर्यंत तर पूर्वेला सिंदडीजलाशयापर्यंतचा सर्व प्रदेश जलमय झाला. हा गाइड लखपतमध्ये 6 दिवस( 19 ते 25 जून) अडकून पडला होता. या कालात भूकंपाचे एकूण 66 धक्के त्याने अनुभवले. त्या नंतर तो कोटडी गावापर्यंत पोचू शकला. या गावात उंच जमीनीवर बांधलेली काही लहान घरे फक्त अस्तित्वात राहिली होती. या जिल्ह्यातील रहिवाशांपैकी बहुतेकांचा ते समुद्रात वाहून गेल्याने या महाभयंकर लाटेने घास घेटला होता. सिंध मधील अगदी उत्तम मानली जाणारी बहुतेक घरे ही सूर्यप्रकाशात वाळवलेल्या मातीच्या विटांनी बांधलेली असतात तर बहुतेक खेडेगांवातील झोपड्या या वेड्यावाकड्या लाकडी खांबांच्या आधारावर वेळूच्या विणलेल्या चटयांचे आच्छादन टाकून बनवलेल्या असतात. कॅप्टन मॅकमर्डो यांच्या गाइडने यानंतरचे अंदाजे 20 मैल अंतर उंटावर बसून पार केले. या वेळी पाणी उंटाच्या शरीरापर्यंत पोचत होते. लखपत गाव तर संपूर्ण पाण्याखालीच होते. एका फकिराच्या मशिदीजवळचा एक खांब फक्त पाण्याच्यावर दिसत होता. ‘वेयरीगाव (या गावाचा आता ठावठिकाणा लागत नाही.) व इतर खेडेगावे यामधील काही घरांचे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. असे म्हटले जाते की लखपत गावात दरवर्षी किमान 2 तरी भूकंप होतातहोतात. सिंदडी जलाशयाचे आता खारवट पाण्याने भरलेल्या एका दलदल प्रदेशात रूपांतर झाले आहे.”

याच भूकंपामुळे कच्छच्या रणाच्या उत्तर किनार्‍यासलग असलेल्या सिंधच्या भूभागाची एक पट्टीच्या पट्टी, एखादा बंधारा बांधावा तशी वर उचलली गेली. या निसर्गनिर्मित बंधार्‍याला अल्लाह बंधारा‘ (God’s Bund) असे लोक म्हणू लागले. या बंधार्‍यामुळे सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख मानले जाणार्‍या कोरी नदीच्या जलप्रवाहाने आपली दिशा कायम स्वरूपी बदलली.

यापुढील कालात, कोरी नदीच्या खोर्‍यात जर सिंधू नदीला भयानक पूर आला तर गोडे पाणी व इतर वेळी समुद्राचे पाणी किंवा ते नसेल तर दलदल किंवा खारवट जमीन असे कच्छच्या रणाच्या इतर भागासारखेच स्वरूप प्राप्त झाले व त्यामुळे हा सर्व भाग अनिश्चित स्वरूप असलेला व कोणत्याही पद्धतीने मोजमाप करणे शक्य नसलेला असा बनला.

कोरी नदीचा 1819 मधील भूकंपानंतरच्या कालातील इतिहासही तितकाच रोचक आहे. इंपिरियल गॅझेटियर मधे हा इतिहास असा वर्णिलेला आहे.

” 1819 सालानंतर लखपत गावाजवळील, आधी सहज रित्या जहाजे जाऊ शकणारे कोरी नदीचे पात्र 18 फूट एवढेच खोल राहिले. येथून 16 मैल पुढे, 2 ते 6 मैल लांबीचे नदीपात्र जमीन पातळीच्या वर उचलले गेले तर त्यापुढील भागात नदी पात्राच्या दोन्ही बाजूंना असणार्‍या रणाचा भाग खाली गेल्याने 12 फूट खोलीचे एक नदी खोरे निर्माण झाले. याच्या पुढचा नदीचा भाग अल्लाह बंधारा निर्माण झाल्याने 25 ते 40 फूट वर उचलला गेला. त्याचवेळी सुनामीमुळे एक भयंकर लाट नदी पात्रात समुद्राकडून आली आणि सर्व नदी खोरे खार्‍या पाण्याने भरून गेले. यानंतरच्या 8 वर्षांत नदीला पूर आलेला असतानाच्या वेळा सोडल्या तर नदी पात्र संपूर्णपणे कोरडे राहिले होते. होते.1826 मध्ये अप्पर सिंधू नदीने काठांवर आक्रमण केले आजूबाजूचा सर्व वाळवंटी भाग पाण्याने भरून टाकला. या नंतर जवळ जवळ सर्व बंधार्‍यांना नदीच्या पाण्याने फोडून टाकले आणि अली बंदर जवळून वाहत येत हे पाणी शकूर लेक मध्ये घुसले. या वाहणार्‍या पाण्याने कोरी नदीच्या पात्रातील साठलेला सर्व गाळ एवढ्या प्रमाणात वाहून नेला की लखपत गावापर्यंत 100 टन माल वाहतुक करणारी जहाजे पोचू लागली. पुढची 3 वर्षे कोरी नदीला एवढे पाणी होते की अमिरकोट गावापर्यंत माल वाहतुक नदी मार्गाने शक्य होती.

मध्यंतरीच्या काळात सिंध मधील रहिवाशांनी नदीवरील सर्व बंधारे परत बांधले व 1834 मध्ये कोरी नदी परत कोरडी पडले. 1838 मध्ये पावसाळा सोडला तर इतर वेळी नदी कोरडीच होती. पुढची 36 वर्षे ( 1839-1874) अली बंदर पासून पुढचा नदीचा भाग गाळाने भरून गेला होता. होता.1856 मध्ये परत एकदा कोरी नदीला एवढे पाणी आले की नदीच्या मुखापासून शकूर जलाशयापर्यंत बोटी जाऊ शकत होत्या. 1868 नंतर लखपतच्या पुढे बोटी जाण्याचे बंद झाले. 1874 मध्ये परत एकदा मोठा पूर नदीला आला व नदीचे पाणी परत एकदा शकूर जलाशयात भरले.”

बर्‍याच वाचकांना असा प्रश्न पडणे साहजिक आहे की लेखाचा विषय सिर क्रीक असताना मी कोरी नदी बद्दलचे हे लांबलचक चर्‍हाट का सुरू ठेवले आहे? याच्या कारणांसाठी आपण 1908 मध्ये इंपिरियल गॅझेटियर मध्ये प्रसिद्ध झालेला एक नकाशा बघूया. या नकाशात कच्छ संस्थान व सिंध प्रांत यांच्यामधील सीमा स्पष्टपणे रेखीत केलेल्या आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना ही सीमारेखा पारंपारिक सीमारेषेनुसार रणाच्या किनार्‍याने जाते. मात्र पश्चिम भागात 1819 च्या भूकंपामुळे निर्माण झालेली भौगोलिक परिस्थिती या नकाशात विचारात घेतलेली नसल्याने ही सीमारेखा कोरी नदीच्या पश्चिम किनार्‍यासलग जाताना दर्शवलेली आहे. 1819 मध्ये ही भौगोलिक परिस्थिती संपूर्ण बदलली व कोरी नदीच्या पश्चिमेकडच्या भागाचे रूपांतर मानवी वस्ती किंवा कोणतेही भौगोलिक वैशिष्ट्य नसलेल्या एका खारवट पाणथळ दलदलीच्या प्रदेशात झाले. मॉन्सूनच्या काळात हा भाग पाण्याने भरून जाई तर इतर वेळी वैराण खारवट जमीन व दलदलीने हा भाग भरलेला दिसून येई. या प्रकारच्या भू प्रदेशात सीमा रेखन करणे अशक्यप्राय असल्याने प्रथा 1914 मध्ये व नंतर 1924-25 मध्ये कच्छ संस्थान व सिंध सरकार यांच्यात नवीन सीमा ठरवण्यासंबंधी वाटाघाटी झाल्या व नवीन सीमा रेखित केली गेली.

वाचकांच्या हे सहज लक्षात येईल की 1819 च्या भूकंपानंतर सतत बदलत राहणारी जी भौगोलिक किंवा प्राकृतिक परिस्थिती कोरी नदीच्या खोर्‍याच्या पश्चिम भागात निर्माण झाली होती ती बघता कच्छ संस्थान व सिंध यांच्या मधील या भागातून जाणार्‍या सीमेचे रेखन करणे अशक्यच होते. त्यामुळे कोरी नदी खोर्‍याच्या पश्चिमेला व तेथून सर्वात जवळ असलेल्या कोणत्यातरी भौगोलिक वैशिष्ट्याजवळ ही सीमारेखा आखणे गरजेचे बनले होते. सर्वात जवळचे व ज्याच्यालगत सीमेचे आरेखन स्पष्टपणे करता येईल असे भौगोलिक वैशिष्ट्य, सिर खाडी किंवा क्रीक हेच होते.

भरतीच्या वेळेस या खाडीत जहाजे येऊ शकत होती त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या बोटी येथून खुल्या समुद्रात जाऊ शकत होत्या. त्यामुळे समुद्री सीमांचे आरेखन करण्याच्या कनव्हेन्शन प्रमाणे, या खाडीच्या मध्यावर कच्छ संस्थान आणि ब्रिटिश ताब्यात असलेला सिंध प्रांत या मधील सीमा रेषेचे आरेखन करणारे स्तंभ ब्रिटिश सरकारने 1924 मध्ये उभारले. हे स्तंभ उभारण्याचा निर्णय विचार करून घेतलेला आणि आंतर्राष्ट्रीय कनव्हेन्शन प्रमाणे होता याबद्दल मला तरी काही शंका दिसत नाही.

पाकिस्तानचा या सीमारेषेला विरोध असण्याची कारणे स्पष्ट होत नाहीत. कदाचित या सीमेमुळे पुढे अरबी समुद्रात 200 मैलापर्यंत त्यांना प्राप्त होणार्‍या व्यापारी पट्ट्यात तेल विहिरी सापडण्याची शक्यता असल्याने या पट्ट्यातील काही भाग भारतात गेला तर या भागाचा व्यापारी उपयोग करून घेता येणार नाही अशी भीति पाकिस्तानला वाटत असावी. एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. स्थिर आणि कोणताही विवाद ज्यामुळे निर्माण होणार नाही असे या भागात असलेले एकुलते एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे सिर खाडी हेच आहे आणि या प्रवाहाच्या मध्यभागी उभारलेल्या सीमारेखा स्तंभांमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना या खाडीच्या प्रवाहाचा समप्रमाणात फायदा होत असल्याने ब्रिटिश सरकारने आखलेली ही सीमारेखा कायम करण्यातच दोन्ही देशांचे हित आहे.

11 मार्च 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “सिर खाडीचे महत्त्व

  1. एक बाणगंगा नदी कृष्णावतारात येते, ती बहुधा आसाम मधे असणार. नक्की माहीत नाही. उषा-अनिरुद्ध कथेमधे बाणासुर आहे, ज्याला हजार हात होते आणि त्याने आपल्या हजार हातांनी बाणगंगेचे पाणी अदवले असा काहीसा संदर्भ आठवतो आहे.

    Posted by aruna | मार्च 11, 2013, 8:23 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: