.
Uncategorized

एका विद्वान तत्त्वज्ञाचे स्मारक


माझ्या चांगलेच स्मरणात आहे की 1956 या साली मी माझी शाळा बदलली होती. ही माझी नवी शाळा माझ्या घरापासून त्या मानाने जवळ होती व शाळेची बिल्डिंग अगदी चकचकीत नवी अशी होती. आमच्या शाळेच्या इमारतीच्या डोक्यावर एक घुमट बांधलेला होता व त्याच्या अंर्तभागात Zeiss या जर्मन कंपनीने बनवलेले एक तारांगण (planetarium ) प्रस्थापित करण्यात आलेले होते. त्याच शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस आमच्या शाळेच्या नवीन इमारतीचे औपचारिक उद्घाटन भारताच्या तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाले होते. त्या उद्घाटन समारंभाच्या पुसटशा आठवणी मला अजूनही आहेत. त्या समारंभाला प्रचंड जनसमुदाय जमला होता व शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या समारंभाचे आमंत्रण होते व ते आवर्जून उपस्थितही राहिले होते. मी त्या वेळी अगदी पोरवयातच होतो, इंग्रजीचा मला गंधही नव्हता आणि आम्हा विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था इतक्या मागे व एका कोपर्‍यात केलेली होती की त्यामुळे मुख्य पाहुणे किंवा दुसरे कोणतेच वक्ते आपल्या भाषणात काय म्हणाले होते, त्यातले अवाक्षरही मला किंवा इतर विद्यार्थ्यांना समजले नव्हते. परंतु माझे आईवडील आणि इतर ज्येष्ठ मंडळी यांच्या प्रतिसादावरून, मुख्य पाहुण्यांचे भाषण हे शिक्षण, धर्म आणि तत्त्वज्ञान या विषयांमधील विचारांना एका समान धाग्यात एकत्र गुंफणारे असे एक अत्यंत उद्बोधक व्याख्यान होते. या भाषणाचा सारांश नंतर आमच्या शिक्षकांनी शाळेतील वर्गात मुद्दाम आम्हाला सांगितला होता. त्या सारांशाप्रमाणे, भारतातील विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण हे धर्म (कर्मकांड नव्हे) आणि तत्त्वज्ञाचे यांच्या बैठकीवर अधिष्ठित असले पाहिजे असे आग्रहाचे प्रतिपादन त्यांनी या भाषणात केले होते. त्या वेळेस शिक्षणाचा प्रसार आजच्या इतका झालेला नव्हता तरीही ते भाषण आजही तितकेच ग्राह्य आहे असे मला अजूनही वाटते.

माझ्या शिक्षकांनी व वडिलधारे व्यक्तींनी ज्या भाषणाची अतिशय विचारप्रवर्तक म्हणून स्तुती केली होती ते भाषण देणारी व्यक्ती होती, भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, एक थोर विद्वान, तत्त्वज्ञानी आणि राजकारणी (स्टेट्समन) असे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. विकिपिडीया वर या व्यक्तीची मोठी सुंदर व्यक्तिरेखा दिलेली आहे व ती येथे देण्याचा मोह मला आवरत नाही.

भारताचे पहिले उपराष्ट्रपती (1952-1962) आणि दुसरे राष्ट्रपती (1962-1967) असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक मोठे भारतीय तत्त्वज्ञानी व राजकारणी होते. तत्त्वज्ञान आणि धर्मांचा तौलनिक अभ्यास या विषयांतील अत्यंत प्रकांड पंडित अशी त्यांची भारतात ख्याती होती. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भूषविलेल्या स्थानामध्ये, कलकत्ता विश्वविद्यालयामधील मेंटल आणि मॉरल सायन्स या विषयाचे पंचम किंग जॉर्ज आसन (1921-1932), इस्टर्न रिलिजन आणि एथिक्स या विषयाचे ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील स्पाल्डिंग प्राध्यापकपद ( 1936-1952) ही प्रमुख आहेत. भारतातील सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा नागरिक बहुमान, भारत रत्न, हा त्यांना 1954 मध्ये देण्यात आला होता. त्यांना मिळालेल्या इतर बहुमानांत1931 मधील ब्रिटिश नाईट बॅचलर आणि कॉमनवेल्थ ऑर्डर ऑफ मेरिट(1963) हे महत्त्वाचे आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर ही उपाधी वापरणे त्यांनी बंद केले होते.”

मद्रास प्रांतातील तिरुत्तनी या खेड्यात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला होता. त्यांचा जन्मदिन हा भारतात शिक्षक दिनम्हणून पाळला जातो. मद्रास खिश्चियन कॉलेजमधून 1906 साली ते तत्त्वज्ञान या विषयातील मास्टर्स पदवी प्राप्त करून पदवीधर झाले होते व या संस्थेचे अत्यंत उल्लेखनीय माजी विद्यार्थी म्हणून ते मानले जात असत. या पदवीसाठी, वयाला फक्त 20 वर्षे झालेली असताना, त्यांनी लिहिलेला “The Ethics of the Vedanta and its Metaphysical Presuppositions” हा प्रबंध त्यांच्या सर्व प्राध्यापकांनी विशेष गौरवला होता.

भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याआधी, शैक्षणिक जगतातील डॉ. राधाकृष्णन यांची कारकिर्द अत्यंत उल्लेखनीय व गौरवास्पद अशीच मानली जाते. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजच्या तत्त्वज्ञान विभागात 1909च्या एप्रिल महिन्यात त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर 1918 मध्ये मैसूर विश्वविद्यालयाने त्यांना तत्त्वज्ञान विषयाचे प्रोफेसर म्हणून नेमले. या नंतर 1921 मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयाने त्यांना मेंटल आणि मॉरल सायन्स या विषयाचे पंचम किंग जॉर्ज आसन दिले व त्यांची प्रोफेसर म्हणून नेमणूक केली. 1929 मध्ये इंग्लंडमधील हॅरिस मॅन्चेस्टर कॉलेजाने त्यांना मुख्याध्यापक हे पद सांभाळण्यासाठी आमंत्रित केले. 1931 ते 1936 या वर्षात ते आंध्र विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू होते. 1936 मध्ये ते परत इंग्लंडला ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात शिकवण्यासाठी म्हणून गेले. 1939 मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे ते उपकुलगुरू नेमले गेले व 1948 पर्यंत या पदावर राहिले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉ. राधाकृष्णन यांनी युनेस्को मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून 1947 ते 1952 काम बघितले. 1949 ते 1952 या कालात ते रशिया मध्ये भारताचे राजदूत होते. 1952 मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले व त्यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. 1962 ते 1967 या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. 1975 मध्ये या विद्वान तत्त्वज्ञाचे निधन झाले.

धर्म आणि तत्त्वज्ञान या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांच्या काही पुस्तकांची नावे अशी आहेत, Indian Philosophy (1923), The Hindu View of Life (1926), An Idealist View of Life (1929), Eastern Religions and Western Thought (1939), Religion and Society (1947), The Bhagavadgītā: with an introductory essay, Sanskrit text, English translation and notes (1948), The Dhammapada (1950), The Principal Upanishads (1953), Recovery of Faith (1956), A Source Book in Indian Philosophy (1957), Religion, Science & Culture (1968).

डॉ. राधाकृष्णन यांच्या बद्दल एवढ्या विस्ताराने मी लिहिण्याचे कारण म्हणजे या विद्वान व्यक्तीच्या व्यासंगाची आणि कारकिर्दीची नीट कल्पना वाचकांना यावी. या प्रगाढ पंडिताचे व तत्त्वज्ञाचे स्मारक करण्याची कल्पना पुढे आली तेंव्हा या स्मारकाचे स्वरूप काय असावे हे ठरवणेच खूप कठीण गेले. त्यांचे कार्य व विचार यांची पुढील पिढ्यांना थोडीफार तरी कल्पना यावी म्हणून एखादे संग्रहालय असावे अशी कल्पना पुढे आली परंतु हे संग्रहालय त्यांच्या कारकिर्दीतील कोणत्या तरी टप्प्याशी निगडित असले तर हे संग्रहालय जास्त प्रभावी ठरू शकेल असे त्यांच्या चाहत्यांना वाटले व ते योग्यच होते.

कर्मधर्मसंयोगाने अशी एक वास्तू कर्नाटक राज्यातील मैसूर शहरात होती. या वास्तूला मैसूर शहरवासीय राधाकृष्णन बंगलाया नावानेच ओळखतात. मैसूरच्या सरस्वतीपुरम भागात उभी असलेली ही वास्तू एक शतकापेक्षाही जास्त जुनी आहे आणि मैसूर विद्यापीठ अस्तित्वात येण्याच्या आधीच्या काळात ती बांधली गेली होती. डॉ. राधाकृष्णन या बंगल्यात ते मैसूर विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर म्हणून शिकवत असताना रहात होते.

मैसूर मधील या वास्तूत राधाकृष्णन रहात असण्याला आता 90 पेक्षा जास्त वर्षे उलटून गेली असल्याने, ही वास्तू बरीच मोडकळीस आली होती. पुढचा पोर्टिकोचा भाग व बंगल्याचे आऊटहाऊस हे दोन्ही पडल्यासारखेच झाले होते त्याचप्रमाणे मुख्य बंगल्याचे छत पडायलाच आले होते. मुख्य बंगल्यात आधार देणारे स्तंभही अतिशय वाईट अवस्थेत होते. मैसूर विश्वविद्यालयाची इच्छा ही वास्तू परत पूर्व स्थितीला आणावी अशी होती परंतु त्याला येणारा खर्च हे विद्यापीठ करू शकत नव्हते. मैसूर मधील एक आमदार आणि पीईएस शैक्षणिक संस्थांचे स्थापक संचालक श्री. एम.आर. डोरेस्वामी विद्यापीठाच्या मदतीला आले व त्यांनी विद्यापीठाला ही वास्तू पूर्व स्थितीत आणण्यासाठी 78 लक्ष रुपयाची देणगी देण्याचे मान्य केले. मैसूर विद्यापीठाने, प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्व विभागाचे डॉ. एन. एस. रंगराजू यांच्यावर या प्रकल्पाची जबाबदारी टाकली व हा पुनर्बांधणी प्रकल्पाचे कार्य उत्साहाने सुरू झाले.

डॉ. रंगराजू म्हणतात की या वास्तू मधील जे भाग मोडकळीस आले होते त्यात मूळ वापरलेल्या टाइल्स किंवा कौले आता मिळत नसल्याने ती मुद्दाम बनवून घ्यावी लागली.”

पूर्वस्थितीला आणलेल्या या वास्तूची बांधणी आता पूर्ण झाली आहे व लवकरच या वास्तूचे उद्घाटन केले जाणार आहे. मैसूर विश्वविद्यालय या वास्तूमध्ये एक संग्रहालय व डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्य व विचार या संबंधी संशोधन करणारा विभाग सुरू करणार आहेत.

डॉ. राधाकृष्णन यांच्यासारख्या विद्वान तत्वज्ञाचे अत्यंत उचित आणि योग्य असे स्मारक ही वास्तू होईल असे मला वाटते आणि भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्मविचार यांच्या अभ्यासकांसाठी तसेच मैसूरला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी ही वास्तू, भेट दिलीच पाहिजे, असे स्थान असणार आहे.

26 फेब्रुवारी 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: