.
ताज्या घडामोडी Current Affairs

नवउद्योग संकुल


भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्व कालात, भारतातील मध्यमवर्गीयांमध्ये, अतिशय सुरक्षित अशी समजली जाणारी सरकारी नोकरी ही सर्वोत्तम समजली जात असे. या काळात सरकारी नोकरीत 4 श्रेणी असत. पहिल्या श्रेणीचे अधिकारी हे, काही सुप्रसिद्ध एतद्देशीय लोकांचे अपवाद वगळता, बहुतांशी युरोपियन असत. दुसर्‍या श्रेणीचे अधिकारी बहुधा भारतीय असत. यात अ‍ॅन्ग्लो इंडियन समाजाचा भरणा बराच असे. लिपिक आणि तत्सम इतर कर्मचारी हा तिसर्‍या श्रेणीतील नोकरवर्ग असे. पट्टेवाले, हमाल, संदेशवाहक वगैरे मंडळींना चतुर्थ श्रेणीतील सेवकवर्ग मानण्यात येत असे. त्या काळी मध्यम वर्गात जन्मात आलेल्या व ज्याचे किमान शालेय शिक्षण झालेले आहे अशा प्रत्येक भारतीय युवकाचे, आपल्या शिक्षण पातळीप्रमाणे परंतु निदान कनिष्ठ लिपिक पदाची तरी सरकारी नोकरी मिळवणे हे फक्त एकच स्वप्न असे. एकदा का ही नोकरी पटकावली की त्याचे उर्वरीत आयुष्य अत्यंत सुरक्षित आणि स्वस्थपणे जाणार हे नक्की असे. अगदी निवृत्त झाल्यानंतर सुद्धा पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्नाचा सतत ओघ त्याच्याकडे चालू रहात असे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थानिक उद्योगधंदे वाढू लागले व भारतातील टाटांसारख्या एखाद्या अग्रणी उद्योगसमूहात नोकरी पटकाविणे हे मध्यम वर्गीय भारतीय तरूणांचे ध्येय बनले. जरी या नोकरीत निवृत्त झाल्यानंतरची पेन्शनची सुरक्षितता नव्हती तरी सरकारी नोकरीच्या मानाने अतिशय बडे पगार, इतर हप्ते आणि निवृत्त झाल्यानंतर मिळणारी घसघशीत रक्कम यामुळे या नोकर्‍यांचे प्रलोभन तरूणांना पडत असे. अनेक हुशार तरुणांनी भारतीय व्यवस्थापकीय सेवेपेक्षा टाटा व्यवस्थापकीय सेवेला त्या वेळेस जास्त पसंती दिली होती.

भारताच्या औद्योगिक जगतात 2000 साल किंवा Y2K नंतर एक नवीनच तार्‍याचे आगमन झाले व थोड्याच दिवसात याने बाकी सर्व उद्योगांना झाकून टाकले. हा तारा होता माहिती उद्योग किंवा नवीन Information Technology उद्योग. मध्यम वर्गीय तरूणतरुणी या उद्योगाकडे न भूतो न भविष्यही अशा संख्या बळाने आकर्षित होऊ लागले. त्याला कारणेही तशीच जबरदस्त होती. आकाशाला भिडू पाहणारे मासिक वेतन, कामाच्या ठिकाणी असलेले सुखद वातावरण आणि उच्च तंत्रज्ञानाशी जवळीक साधणारे कार्यक्षेत्र या सारख्या गोष्टींची सर्वांनाच इतकी भुरळ पडू लागली की इतर उद्योगात काम करणारे, सरकारी व सैन्यदलातील तरूण, हे सर्व ही क्षेत्रे सोडून देऊन या क्षेत्राकडे वळू लागले. आपण काय करता? या प्रश्नाला मी इन्फोसिस किंवा विप्रो मधे कोड रायटर आहे.” असे उत्तर आपल्याला देता यावे हे भारतीय मध्यमवर्गीय तरूणांचे तात्कालिक ध्येय बनल्या सारखे झाले. माहिती उद्योगात काम न करणारा व इतर उद्योगधंद्यात असलेला तरूण वर्ग हा या माहिती उद्योगातील लोकांचा कोणीतरी गरीब बिचारा नातेवाईक असल्यासारखा झाला.

60 वर्षात, मध्यम वर्गीय तरूणांच्या नोकरी पेशातील पसंती मध्ये सरकारी नोकरी पासून ते माहिती उद्योग असा बदल घडून आला असला तरी या मुळे मध्यम वर्गीय तरूणांच्या उद्योजकतेत (Entrepreneurship)लक्षणीय असा कोणताच बदल दुर्दैवाने घडून आला नाही. जगातील 79 राष्ट्रांमध्ये केलेल्या एका निरीक्षणाप्रमाणे उद्योजकता व प्रगती यांमधील भारताचे तुलनात्मक स्थान (Global Entrepreneurship and Development Index)तळाला म्हणजे 74वेच राहिले आहे. हे निरीक्षण असेच सांगते की भारत या देशातील परिस्थिती नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आत्यंतिक प्रतिकूल अशीच अजूनही आहे. भारतीय तरूणांतील उद्योजकतेच्या अभावाला अर्थातच काही ना काही कारणे असणारच. काही लोकांच्या मते भारतीयांत शोधबुद्धीचा (innovative)अभाव आहे. हे कारण मला तरी पटत नाही. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीचे उदाहरण घेतले तर असे लक्षात येते की भारतातून तेथे जाऊन आपला उद्योग स्थापन करून त्यात प्रचंड यश मिळवणार्‍या उद्योजकांची संख्या तेथे बरीच मोठी आहे. इतर कोणत्याही देशातून आलेल्या नवउद्योजकांपेक्षा भारतातून येऊन स्थायिक झालेल्या गटातील (immigrant group) उद्योजकांची संख्या सर्वात जास्त आहे. या यशाचे एक प्रमुख कारण असे आहे की या नवउद्योजकांना सिलिकॉन व्हॅली सारख्या ठिकाणी समभाग भांडवल मिळवणे खूपच सोपे जाते व जागतिक दर्जाचे इनफ्रास्ट्रक्चर त्यांना सहज उपलब्ध होऊ शकते. तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन असलेले सुमारे 14000 नवउद्योग अमेरिकेत दरवर्षी सुरू केले जातात तर भारतात असे फक्त 700 नवउद्योग सुरू होतात.

माझे स्वत:चे या बाबतीतील अनुभव बरेच काही सांगून जातात. एका मोठ्या उद्योग समूहातील उत्तम नोकरी मी 1970च्या दशकात स्वत:चा व्यवसाय चालू करण्याच्या उद्देशाने सोडली. त्या वेळेस माझ्या समोर उभ्या राहिलेल्या अडचणींचे (आज स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार्‍यापुढे दुर्दैवाने याच अडचणी अजूनही उभ्या राहतात.) वर्गीकरण साधारणपणे 3 प्रकारात करता येते. या पैकी सर्वात मोठी व महत्त्वाची अडचण, सरकारी लाल फितीमुळे नव्या उद्योजकासाठी असलेले असंख्य नियम व कायदेकानून यांच्या जाळ्यात तो उद्योजक जास्त जास्त अडकत गेल्यामुळे त्याच्या समोर उभी राहते. या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी अधिकार्‍यांशी सहकार्य केल्याशिवाय गत्यंतर नसते व उद्योजकाच्या उत्साहाला येथेच विरजण लागण्यास सुरुवात होते. यानंतर अडचण येते ती उद्योगासाठी आवश्यक अशा भांडवलाचा पुरवठा करू शकेल असा स्त्रोत मिळवणे. मला आठवते की मी बॅन्कांकडून घेतलेल्या कर्जावर धंद्याला मारून टाकेल अशा म्हणजे 19 % दराने सुद्धा व्याज दिलेले आहे. इतक्या चढ्या दराने भांडवल मिळाल्यानंतर उत्पादन खर्चच इतका वाढे की उत्पादनांची किंमत जास्त ठेवल्याशिवाय इलाजच नसे. तिसरी अडचण म्हणजे कामगार विषयक कायदे व नियम. समाजवादी विचारांनी, सरकारने बनवलेले हे नियम, अतिशय कडक आहेत आणि यशस्वी रित्या चालणारा एखादा मोठा उद्योग व धडपडत मार्केट मधे येण्याचा प्रयत्न करणारा एखादा छोटा नवउद्योग, यां दोन्हीमध्ये या नियमांच्या दृष्टीने काही फरकच केला जात नाही. या सर्व अडचणींचा विचार केल्यावर उद्योजक बनण्याची तीव्र इच्छा असूनही भारतातील बेकार तरूण वर्गाला नोकरी हे सर्वात मोठे प्रलोभन का वाटते व नोकरीचे जमलेच नाही तरच तो धंदा टाकण्याचा विचार का करतो यातले इंगित ध्यानात येईल.

सबंध देशाचा विचार न करता राज्यांचा विचार केला तर असे लक्षात येते की नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने भारतातील राज्याराज्यांतील परिस्थिती भिन्न आहे. तुलनात्मक रित्या काही राज्यांत उद्योग सुरू करणे सोपे आहे. या मध्ये पंजाब किंवा गुजरात ही राज्ये येतात तर काही राज्यात नवा उद्योग सुरू करणे अतिशय जिकिरीचे असते. दक्षिणेकडील केरळ राज्य हे असेच त्रासदायक राज्य आहे. परिणामी या राज्यात उद्योजक हे फार कमी आहेत. अर्थातच बाकी नवउद्योगधंद्यांची स्थिती आणि माहिती उद्योगामधील नवीन उद्योगांची स्थिती यांच्यात फारसा फरक नाही व केरळमध्ये माहिती उद्योग सुद्धा जवळ जवळ नाहीतच व त्यामुळे यशस्वी सॉफ्ट्वेअर कंपन्या चालू करू शकतील असे उद्योजकही केरळात अभावानेच दिसतात.

या पार्श्वभूमीवर, सरकार आणि खाजगी उद्योग यांच्या सहकार्याने व पैशांनी स्थापन झालेल्या नवउद्योग संकुल या संस्थेची माहिती मी नुकतीच वाचली व ती मला अतिशय रोचक वाटली. या संस्थेने ब्लॅकबेरी मोबाईल फोन बनवणार्‍या रिसर्च इन मोशनआणि आयबीएम या सारख्या कंपन्यांशी सहकार्य करार केलेले आहेत. माहिती उद्योगातील एक अग्रणी कंपनी इन्फोसिसचे एक संस्थापक श्री. क्रिस गोपालकृष्णन हे या संस्थेचे मुख्य प्रवर्तक आहेत. केरळ मधील कोची शहराजवळील एका हिरव्यागार कोपर्‍यात या संस्थेचे 1 लाख चौरस फूट एवढे आवार असून त्यात पोलाद व काच वापरून बनवलेल्या संस्थेच्या इमारती दिमाखाने उभ्या रहात आहेत व 2014 या वर्षांपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेचे कार्य 2012 या वर्षी सुरू झाले आहे. या संस्थेच्या इमारतींमध्ये कोची मध्ये सध्या जो भाडेपट्ट्यांचा भाव चालू आहे त्याच्या फक्त एक दशांश एवढ्याच भाड्याने नवउद्योजकांना त्यांच्या नवउद्योगांसाठी जागा मिळू शकते. या शिवाय संगणक, हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन, कायदे व पेटंट संबंधी माहिती देणारी सेवा आणि बड्या उद्योगांशी संपर्क या सारखी मदतही या नवउद्योजकांना दिली जात आहे. संस्थेच्या 2 इमारतींमध्ये 68 नवउद्योजकांनी आपले बस्तान बसवण्यास प्रारंभ केला आहे. या संस्थेची उद्दिष्टे तर अतिशय उच्च आहेत. पुढच्या 10 वर्षात या संस्थेला येथून 1000 वर इंटरनेट व मोबाईल तंत्रज्ञान विकसित करणार्‍या नवउद्योजकांना मदत करण्याची इच्छा आहे. ही संस्था आपल्या सभासदांना ऑफिससाठी जागा, लागेल ती मदत आणि माहिती उद्योगातील बड्या उद्योगांशी संपर्क या सारख्या महत्त्वाच्या बाबतीत मदत करणार आहे. आहे. केरळ राज्यात ही संस्था स्थापन करण्यामागे येथील स्वस्ताई आणि तंत्रज्ञान अवगत असलेल्या मंडळींची भरपूर संख्या,या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या आहेत.

नवउद्योग संकुल ही एक स्तुत्य संकल्पना आहे असे मला वाटते. परंतु हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल या बद्दल मात्र मी साशंक आहे. कमी खर्चात इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असणे आणि काम करण्यासाठी सुखद जागा उपलब्ध असणे हे जरी नवउद्योजकांसाठी मोठे सहाय्य असले तरी नवउद्योजकांपुढील मुख्य समस्यांचे (सरकारी लाल फीत, खेळत्या भांडवलाचा अभाव किंवा न परवडणारी किंमत, आणि समाजवादी कामगार नियम) निराकरण या सहाय्याने होईल असे मला वाटत नाही. प्रत्यक्षात आपल्या येथे गरज आहे ती म्हणजे मोठ्या संख्येने व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट्स किंवा एन्जल इन्व्हेस्टर्स यांची. भारतात सध्या व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट्स किंवा एन्जल इन्व्हेस्टर्स यांच्या मदतीने जेमतेम 150 नवउद्योग दरवर्षी चालू केले जातात तर अमेरिकेत अशा नवउद्योगांची संख्या दरवर्षी 60000 पेक्षाही अधिक आहे.

हे जो पर्यंत घडत नाही तो पर्यंत भारत देशातील तरूण वर्ग हा नवउद्योजक न बनता कामगार, क्लार्क किंवा माहिती उयोगातील हमाल एवढेच बनू शकतील अशी भीती मला वाटते.

20 फेब्रुवारी 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “नवउद्योग संकुल

 1. माननीय चंद्रशेखर आठवले साहेब,
  आपली अनुदिनी (website) अतिशयच सुंदर आहे. आपण किती विविध विषयांवर लिहिता. आम्ही काहीजणांनी ’मैत्री’ ही साहित्यविषयक अनुदिनी उघडली आहे ती ’अक्षरधूळ’ च्या मानाने खूपच लहान आहे. आपले मी अभिनंदन करतो.
  यशवंत कर्णिक.

  Posted by Yeshwant Karnik | फेब्रुवारी 21, 2013, 11:13 सकाळी
  • यशवंत कर्णिक

   प्रतिसादासठी धन्यवाद. मी आपले काही उत्कृष्ट लेख पाहुणे लेखकांच्या पृष्ठावर प्रसिद्ध केले आहेत त्याचे स्मरण मुद्दाम करून देतो.

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 21, 2013, 12:56 pm
 2. त्याबद्दल दि. १८ फेब्रूवारी, २०१२ रोजी मी आपले आभारही मानले आहेत. माझी वैयक्तिक माहितीही दिली आहे. ’अक्षरधूळ’ मधील माहिती खूपच मौलिक असते. अनेक ज्ञात नसलेल्या गोष्टी कळतात. आनंद होतो.

  Posted by Yeshwant Karnik | फेब्रुवारी 24, 2013, 11:27 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: