.
Musings-विचार, People व्यक्ती

परदेश आणि नियमपालन


काही दिवसांपूर्वी माझ्या ओळखीचा एक मध्यमवयीन परिचित व त्याची पत्नी यांची बर्‍याच वर्षांच्या काळानंतर पुन्हा एकदा भेट झाली. या मधल्या काळात या परिचिताने मध्यपूर्वेत म्हणजे सौदी अरेबिया या देशात एक चांगली नोकरी पटकावली होती आणि तिथेच रहात असल्याने आलेली एकंदर आर्थिक सुबत्ता आता ते दोघेही अनुभवत होते. परंतु या परिचिताची पत्नी काही मला तितकीशी खुष किंवा तिथल्या आयुष्याबाबत फारशी उत्साही वाटली नाही. मी तिला स्पष्टपणे हे बोलून दाखवले व या मागचे कारण विचारले. तिच्या म्हणण्याप्रमाणे सौदी अरेबिया या देशात रहाणार्‍या सर्व स्त्रियांना, त्या मुस्लिम असोत वा नसोत, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर संपूर्ण बुरखाधारी स्वरुपातच वावरावे लागते. तिच्या मताने, बुरख्याच्या या सक्तीमुळे तिला सतत गुदमरल्यासारखे वाटत रहाते. या शिवाय तिचे स्वत:च्या करियरचे पुढे काय होणार? हा तिच्या दृष्टीने तिला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न तिच्या डोळ्यासमोर सतत होता कारण त्या देशात स्त्रियांनी कोणती कामे करायची व कोणती करायची नाहीत या बद्दलचे शासकीय आदेश मोठे जाचक असल्याने तिला सध्या काहीच काम करता येत नव्हते. मी तिची समजूत घालण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करून बघितला. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही हे मला स्पष्टपणे लक्षात येत होते.

माझ्या एका अमेरिकन मित्राने काही काळापूर्वी मला अमेरिकन सरकार परदेशी प्रवास करण्यास किंवा परदेशात वास्तव्य करण्यास इच्छुक असलेल्या अमेरिकन नागरिकांना प्रवासासंबंधी ज्या सूचना (travel advisories) देत असते त्या संबंधी सांगितले होते. या सूचनांमध्ये, जे नागरिक भारतात प्रवास करण्यास इच्छुक आहेत अशा आणि त्यामधील विशेषत: तरूण नागरिकांना, सार्वजनिक जागांमध्ये स्त्रीपुरुषांमधील शारिरीक जवळीक, भारतामध्ये शिष्ट्संमत नसते व ती भारतीय परंपरांच्या विरोधी असते हे स्पष्ट केले जाते व तेथील प्रथांनुसार अमेरिकन नागरिकांनी वागावे अशी सूचनाही केली जाते.

अमेरिकन सरकार देत असलेल्या प्रवाशांसाठीच्या सूचनांचा मी या कारणासाठी येथे उल्लेख करतो आहे की आपण जेंव्हा परदेशात प्रवास किंवा वास्तव्य करत असतो तेंव्हा त्या देशातील प्रथा व परंपरा यांचा दुसर्‍या देशातील प्रवाशांनी आदर व पालन करणे किती महत्त्वाचे असते हे लक्षात यावे. एखादी रूढी, प्रथा किंवा परंपरा आपल्या स्वत:च्या देशात रूढ असते किंवा चालवून घेतली जाते याचा अर्थ ती दुसर्‍या देशात चालेल किंवा चालवून घेतली जाईल असा होत नाही. दुर्दैवाने परदेशात प्रवास करणारे किंवा वास्तव्य करणारे अनेक भारतीय या अतिशय मुलभूत सूचनेचे पालन करत नाहीत व अखेरीस अतिशय गंभीर स्वरूपाच्या अडचणीत निष्कारण सापडलेले दिसतात. नॉर्वे या देशात वास्तव्य असलेल्या एका भारतीय जोडप्याच्या आयुष्यात, नुकत्याच घडलेल्या अशाच एका गंभीर घटनेबद्दलची वृत्तपत्रांतील बातमी, बहुतेक सर्व वाचकांनी वाचलेली असेलच.

आंध्र प्रदेश मधील एक सुविद्य सॉफ्ट्वेअर व्यावसायिक श्री. चंद्रसेखर वल्लभनेणी व त्यांच्या पत्नी अनुपमा यांचे सध्या नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे वास्तव्य असते. श्रीमती अनुपमा या ऑस्लो मधील भारतीय वकिलातीमध्ये एक अधिकारी म्हणून काम करतात. त्यांना 7 वर्षाचा वर्षाचा एक मुलगा आहे व ऑस्लो मधील एका शाळेत तो शिकत असतो. काही महिन्यांपूर्वी श्रीमती निरुपमा व त्यांचे पती यांना, त्यांचा मुलगा ज्या बसमधून शाळेत जात असतो त्या बसमध्ये तैनात केलेल्या कर्मचार्‍याने अशी तक्रार केली की हा मुलगा बसमध्ये काही कारणामुळे आपल्या कपड्यांत लघवी करत असतो. त्याच प्रमाणे हा मुलगा शाळेच्या नियमांचे उल्लंघन करून स्वत:ची खेळणी शाळेत नेत असतो. आपला मुलगा शाळेच्या नियमांचे पालन करत नाही आणि बसमध्ये अशी लाजिरवाणी गोष्ट त्याच्याकडून घडते आहे हे कळल्यावर श्री चंद्रसेखर हे बहुदा अतिशय क्रोधित झालेले असावेत कारण आपल्या मुलाला या बाबत ते बरेच रागावले व वर्तन न सुधारल्यास त्याला आपण भारतातील हैद्राबाद शहरात रहात असलेल्या त्याच्या काकाकडे पाठवून देऊ अशी धमकीही त्यांनी आपल्या मुलाला दिली.

कोणत्याही एखाद्या 7 वर्षाच्या बालकाप्रमाणे, या मुलाने आपल्या शाळेतील शिक्षिकेला ही घटना लगेच सांगितली व आपले आईवडील आपल्याला भारतात पाठवण्याची धमकी देत आहेत हेही सांगितले. अर्थात या सांगण्याचे केवढे गंभीर प्रतिसाद ऑस्लोमध्ये रहाणार्‍या या भारतीय कुटुंबाच्या कौटुंबिक विश्वात उमटणार आहेत आणि या कुटुंबाला केवढ्या गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागणार आहे याची पुसट सुद्धा कल्पना या मुलाला असणे शक्यच नव्हते. नॉर्वे मधील नियमांप्रमाणे मुलांना धमकी देणे हे मुलांशी केलेल्या गैरवर्तनाच्या व्याख्येत मोडते. त्यामुळे ऑस्लो पोलिसांनी तत्परतेने श्री चंद्रसेखर व श्रीमती अनुपमा यांना अटक केली व त्यांच्यावर नॉर्वे दंडसंहितेच्या 219 या कलमाप्रमाणे मुलाला धमक्या देणे आणि त्याला मारपीट करणे या पद्धतीचे गैरवर्तन केल्याचे आरोप ठेवले. हा आरोप सिद्ध झाल्यास नॉर्वे मध्ये आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

हे जोडपे तुरूंगवासाची शिक्षा चुकवण्यासाठी कदाचित भारतात विमानाने निघून जाईल या भीतीने पोलिसांनी त्यांना जामीन देऊ नये अशी विनंती न्यायालयाला केली व ती मान्य झाली. फिर्यादी पक्षाने श्री. चंद्रसेखर यांना दीड वर्षे व आईला 1 वर्ष 3 महिन्याची शिक्षा आरोपींना व्हावी अशी मागणी केली. नंतर लागलेल्या निकालात न्यायाधीशांनी थोड्याफार फरकाने फिर्यादी पक्षाची ही मागणी मान्य केली व वल्लभनेणी पतीपत्नी आता सरकारी पाहुणचार उपभोगत आहेत.

भारतात वास्तव्य करणार्‍या बहुतेक सर्व पालकवर्गाला, ते आपल्या पाल्याला मूर्खासारखे वागल्याबद्दल एखाददुसरा फटका ठेवून देण्यास अजिबात मागे पुढे बघत नसल्याने, नॉर्वे मधील पोलिसांनी केलेली कृती अत्यंत विचित्र आणि अमानुष वाटल्याशिवाय रहाणार नाही. काही महिन्यापूर्वी नॉर्वे येथील बाल कल्याण विभागाने 3 वर्षाचा अभिज्ञान व त्याची 4 वर्षाची बहिण ऐश्वर्या या दोघांना त्यांचे आईवडील अनुरुप व सागरिका भट्टाचार्य या दोघांपासून, त्यांच्यात भावनिक एकता नसल्याचे कारण देऊन दूर केले होते होते व त्यामुळे भारतीय दूतावास व नॉर्वे पोलिस यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली होती. आता मात्र भारतीय दूतावासाने ही बाब म्हणजे वैयक्तिक पातळीवर नियमपालन न करण्याची घटना असल्याने आपण त्यात पडणार नाही असे आधीच घोषित करून टाकले असल्याने, तसे काही या बाबतीत घडण्याची शक्यता वाटत नाही.

मला असे वाटते की आपण भारतीयांनी, नॉर्वे पोलिसांची कृती हे त्यांच्या देशातील नियमांतर्गत त्यांनी उचललेले एक पाऊल आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. नॉर्वे देशाच्या सीमांच्या आत राहणारा प्रत्येक जण हा नॉर्वे कायद्यापुढे समसमान असल्याने या भारतीय जोडप्याला नॉर्वे मधील कायद्यांनुसार मुलांना धमकी देणे हे नियमबाह्य वर्तन असून याबद्दल आपल्याला शिक्षा होऊ शकते हे माहीत करून घेणे आवश्यक होते. आपण आता भारतात रहात नसून दुसर्‍या देशात रहात आहोत व भारतात सर्वमान्य असलेली पालकवर्गाची वागणूक दुसर्‍या देशात चालवून घेतली जाणार नाही व मुलाला धमकी देण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील हे त्यांनी माहीत करून घेणे गरजेचे होते असे मला वाटते.

भारतातील नवीन पिढी आता जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या अनेक देशांमध्ये नोकरीव्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक होत आहे. साहजिकच या परक्या देशांतच ते आपल्या मुलांचे संगोपन आता ते करणार आहेत. आहेत. अशा परिस्थितीत आपण वास्तव्य करत असलेल्या देशाचे कायदेकानू काय प्रकारचे आहेत याची माहिती करून घेऊन आपल्या आईवडीलांनी आपल्याला जसे वाढवले तसेच आपल्या मुलांना वाढवण्याचा अट्टाहास या तरूण पालकवर्गाने सोडून देऊन त्या देशात प्रचलित असलेल्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

श्री व सौ वल्लभनेणी यांच्यावर गुदरलेला हा लाजिरवाणा प्रसंग, परदेशी स्थायिक झालेल्या नवीन पिढीच्या तरूण पालकांसाठी एक धोक्याची घंटाच आहे असे मी मानतो.

16 फेब्रुवारी 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: