.
ताज्या घडामोडी Current Affairs

बड्या जादूगाराची फालतू हातचलाखी


पश्चिमेला असलेला भारत आणि पूर्वेला असलेला फिलिपाइन्स यांच्यासह आपल्या अनेक शेजार्‍यांना एक फटक्यात भडकवण्याचा उद्योग चीनने परत एकदा मोठ्या लीलयेने करून दाखवला आहे. 15 मे 2012 या तारखेपासून, चीनमधील पोलिसांनी इपासपोर्ट या नावाने ओळखला जाणारा एक नवा पासपोर्ट चिनी नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे. या पासपोर्ट्मध्ये एक मायक्रोचिप घालण्यात आलेली आहे. या चिपवर पासपोर्ट धारकाच्या आंगठ्याचा ठसा, सही वगैरे सारखी माहिती डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवली जात आहे. अर्थात इपासपोर्ट देण्याच्या प्रक्रियेत नावे ठवण्यासारखे काहीच नसून पासपोर्टधारकाची सुरक्षा व त्या पासपोर्ट्ची बनावट नक्कल करणे खूपच अवघड बनेल याबद्दल काहीच शंका वाटत नाही.

चीनचे भारत, व्हिएटनाम आणि फिलिपाइन्स सारखे काही शेजारी मात्र या पासपोर्ट बाबत खूपच नाराज झाले आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे या पासपोर्टच्या पानांमध्ये चीनच्या नकाशाचे जे चित्र वॉटरमार्क म्हणून घालण्यात आलेले आहे त्यात भारताचा अरुणाचल प्रदेश, लडाख मधील अक्साइचिन भाग, तसेच साउथ चायना समुद्रातील पॅरॅसेल्स आणि स्पार्टली यासह अनेक बेटे चीनचा भाग म्हणूनच दाखवून टाकलेली आहेत.

चीनने ही खेळी मोठ्या विचारपूर्वक आणि आपल्या काही विविक्षित शेजार्‍यांना चिमटे काढण्यासाठीच खेळली आहे हे ईस्ट चायना समुद्रातील, चीन विवादास्पद मानत असलेल्या सेनकाकु बेटांचा मात्र या चीनच्या नकाशात समावेश करण्यात आलेला नाही यावरून अगदी स्पष्ट होते आहे. ही बेटे सध्या जपानच्या अधिकाराखाली असून जपान त्यांना सेन्काकु तर चीन दिआओयु बेटे म्हणून ओळखतो. या बाबतीत एका जपानी प्रवक्त्याने चीनच्या नवीन पासपोर्ट्वरील नकाशात,साउथ चायना समुद्रातील इतर विवादास्पद बेटे नकाशात चीनचा भाग म्हणून दाखवलेली असली तरी सेन्काकु बेटे तशी दाखवलेली नाहीत त्यामुळे आम्हाला त्या बाबतीत काही टिप्पणी किंवा तक्रार करणे शक्य होणार नाही.” असे स्पष्टपणे सांगितले आहे.

हा छापलेला वॉटरमार्क नकाशा, फक्त सर्वसाधारण नागरिकांना देण्यात येणार्‍या पासपोर्ट्सवर चीनने छापलेला असून अधिकार्‍यांना किंवा दूतावासातील कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या पासपोर्ट्सवर हा नकाशा दिसत नाही या वरून चीनने ही खेळी हेतुपूर्वक चिमटे काढण्यासाठीच केली असून ती नजरचूक नाही हे स्पष्ट होते आहे.

फिलिपाइन्स हा देश स्पार्टली बेटे स्वत:च्या सार्वभौमत्वाखाली असल्याचे मानत असल्याने चीनच्या या चिमट्याला प्रतिसाद म्हणून फिलिपाइन्सचे परराष्ट्र सचिव अल्बर्ट डेल रोझारिओ यांनी लगेचच चीनला निषेध खलिता पाठवला आहे. या खलित्यात त्यांनी या नकाशाची आंतरराष्ट्रीय समुद्र तट कायद्याचे उल्लंघन करण्याच्या मनसुब्याचे अतिरेकी प्रगटीकरणअशी टीका केली आहे. ते पुढे म्हणतात:

चीनच्या नवीन इपासपोर्टमध्ये छापलेल्या चीनच्या नकाशात, 9 तुकड्यांच्या तुटक रेषेच्या आत, साउथ चायना समुद्राचा जो भाग चीनच्या मालकीचा भाग म्हणून दाखवला गेला आहे तो भूभाग आणि समुद्री तटाखालील भाग स्पष्टपणे फिलिपाइन्सच्या सार्वभौमत्वाखाली असल्यामुळे फिलिपाइन्स, चीनच्या या कृत्याचा तीव्र निषेध करतो आहे.” याबाबत स्पष्टीकरण देताना फिलिपाइन्सच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रॉल हर्नांडेझ यांनी सांगितले की चीनचे हे कृत्य आम्ही खपवून घेतले तर त्याचा असा अर्थ लावला जाईल की संपूर्ण साउथ चायना समुद्रावरील सार्वभौमत्त्वाचा चीनचा दावा आम्हाला मान्य आहे.”

व्हिएटनामच्या परराष्ट्रखात्याचे प्रवक्ते लुऑन्ग थान निघि यांनी पत्रकारांना सांगितले की चीनचा हा पासपोर्ट व्हिएटनामच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन असल्याने चीन कडे आम्ही निषेध केला आहे. व्हिएटनाम अधिकार्‍यांनी चिनी वकिलाकडे या बाबतीत एक राजकीय खलिता पाठवलेला असून त्यात चीनच्या या खेळीला विरोध केलेला असून त्यांनी या इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट्सवर छापलेली चुकीची माहिती त्वरेने खोडून टाकावी अशी मागणी केलेली आहे.

या नवीन वॉटरमार्क नकाशात तैवान आणि संपूर्ण साउथ चायना समुद्र हेही चीनचा भाग म्हणूनच दाखवलेले असल्याने तैवान, ब्रुनेई आणि मलेशिया या सारखी, साउथ चायना समुद्र तटावरील राष्ट्रे सुद्धा चीनवर भडकलेली असून त्यांनीही आपले निषेध खलिते चीनकडे पाठवले आहेत.

या प्रकारची हातचलाखी किंवा उद्योग चीन भारताबरोबर बराच काळ करतो आहे. काही काळापूर्वी चीनने जम्मूकश्मिरचे रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांना दिला जाणारा चिनी व्हिसा, त्यांच्या पासपोर्टला स्टेपल करून देण्यास सुरुवात केली. या साठी त्यांनी हा प्रदेश विवादास्पद आहे असे कारण दिल्यानंतर भारत व चीन यामधील हा आणखी एक तणावाचा मुद्दा बनला. या नंतर चीनने अरुणाचल प्रदेशाचे रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांना व्हिसा देण्याचेच नाकारले.

भारतातील इमिग्रेशन अधिकार्‍यांनी काही आठवड्यापूर्वी चिनी ईपासपोर्ट्सवर छापलेला हा नवा वॉटरमार्क नकाशा बघितला. यावर अतिशय तीव्र प्रतिसाद देत भारताने चीनची ही नवीन कृती आपल्याला मान्य नसल्याचे चीनला कळवले. अपेक्षेप्रमाणे चीनने यावर कोणतीच कृती केली नाही व सर्व देशांना उद्देशून एक फतवा काढला. या फतव्यात या मुद्यावर सर्व राष्ट्रांनी तारतम्य भावाने व अतिरेकीपणा न करता वागावे असे आवाहन केले. एका चिनी प्रवक्त्याने सांगितले: ” अशी आशा आहे की सर्व राष्ट्रे डोके शांत ठेवून वागतील. चीन या संबंधात चिनी व इतर देशांतील प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही या साठी इतर राष्ट्रांबरोबर संपर्कात राहील.”

भारताने या बाबतीत लगेच पावले उचलली आणि भारतात येऊ इच्छिणार्‍या प्रत्येक चिनी ईपासपोर्टधारकाच्या पासपोर्टवर, अक्साइचिन आणि अरुणाचल प्रदेश भारताचे भाग आहेत असे दाखवणारा नकाशा छापण्याचे त्याने ठरवले. भारतीय दूतावासांकडे आता भारतीय व्हिसा साठी येणार्‍या प्रत्येक ईपासपोर्टवर असा नकाशा आता भारतीय व्हिसाबरोबर छापला जात आहे. चीनच्या या फालतू हातचलाखीला जशास तसे उत्तर भारताने खचितच दिले आहे

भारत सरकारने नुकतेच परत एकदा लोकसभेमध्ये, भारताच्या जम्मूकश्मिर राज्यातील सुमारे 38000 चौरस किमी भूभाग चीनने बळकावलेला असून तो अवैध रित्या आपल्या ताब्यात ठेवला आहे असे निवेदन केले आहे. या शिवाय पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कश्मिरमधील, भारताच्या मालकीचा सुमारे 5180 चौरस किमी आकाराचा भू प्रदेश चीनने चीनपाकिस्तान सीमा करार 1963″ याच्या अन्वये पाकिस्तानकडून मिळवला आहे.

चीन आपल्या शेजार्‍यांना काढत असलेल्या या चिमट्यांचे विश्लेषण किंवा त्या बद्दल कोणतीही भविष्यवाणी करणे कठीण आहे. परंतु इतर छोट्या राष्ट्रांनी भारताचे अनुकरण करून करून त्यांच्या मताप्रमाणे योग्य असलेले नकाशे व्हिसासाठी आलेल्या पासपोर्ट्सवर छापणे हे जास्त योग्य ठरेल. नुसते निषेध खलिते पाठवून काहीच उपयोग होणार नाही.

एखाद्या बड्या जादूगाराने एखादी अत्यंत फालतू हातचलाखी करून दाखवावी तसेच चीनचे हे इतर शेजार्‍यांना काढलेले चिमटे आहेत. या असल्या चिमट्यांनी चीनच्या शेजार्‍यांची मने आणखी कलुषित होण्याशिवाय दुसरे काहीच बहुधा साध्य होणार नाही.

16 जानेवारी 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: