.
अनुभव Experiences, ताज्या घडामोडी Current Affairs

मोठ्ठा विनोद!


मागच्या वर्षी भारतीय बनावटीच्या आकाश या टॅबलेट संगणकाचे प्रथम वितरण करताना, भारत सरकारच्या शिक्षणमंत्र्यांनी मोठ्या गर्वाने हा संगणक म्हणजे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पाआहे असे या टॅबलेटचे वर्णन केले होते. या संगणकाची किंमत फक्त 2100 रुपये (42 अमेरिकन डॉलर्स) असणार आहे असेही आपण सर्वांनी वाचले/ऐकले होते. मात्र गेल्या एका वर्षातील अनुभवानंतर हा संगणक म्हणजे एक मोठ्ठा विनोद असल्याचे लक्षात येऊ लागले आहे.

या संगणकाच्या प्रथम आवृत्तीत अनेक दोष असल्याने तिला केराच्या टोपलीचा रस्ता दाखवल्यावर या आकाश संगणकाची द्वितीय आवृत्ती आता तयार करण्यात आली असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते 11 नोव्हेंबर 2012 रोजी या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. हा दिवस निवडण्यामागे असे औचित्य होते की भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलम आझाद यांचा हा 124 वा जन्म दिवस होता व दर वर्षी या दिवशी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

समारंभाच्या औचित्याचा विषय बाजूला ठेवून संगणकाच्या या द्वितियावृत्तीची तांत्रिक वैशिष्ट्ये काय आहेत ती प्रथम पाहूया. याचा प्रोसेसर 1 गिगाहर्ट्झ वारंवारितेवर कार्य करतो आहे. 512 मेगबाइट्सची क्षमता असलेला रॅन्डम स्मृती कक्ष याच्यात आहे. 7 इंच आकाराचा आणि कपॅसिटेटिव्ह तत्वावर कार्य करणारा स्पर्श संवेदनशील पडदा असलेला हा संगणक अ‍ॅन्ड्रॉइड 4.0 या कार्य प्रणालीवर चालतो. विद्यार्थ्यांना हा संगणक 1130 रुपये किंवा 21 अमेरिकन डॉलर किंमतीला मिळणार आहे आणि प्रथमावृत्तीत असलेले असंख्य दोष व कमीपणा या आवृत्तीमध्ये सुधारण्यात आलेले आहेत. याच्या मूळ किंमतीवर 50% टक्के सब्सिडी भारत सरकार (करदाते) देत असल्याने विद्यार्थ्यांना एवढ्या कमी किंमतीत हा संगणक मिळणार आहे.

या संगणकाच्या प्रथमावृत्तीचे वितरण ऑक्टोबर 2011 मध्ये प्रथम केले गेले होते. काही शेकड्यांच्या संख्येने हे संगणक विद्यार्थ्यांना दिले गेले. या संगणकांची उपयुक्तता जवळपास शून्यच असल्याचे सर्वच जणाना आढळून आले होते. त्याचा पडदा रेझिस्टिव स्पर्श संवेदनशील असल्याने अतिशय मंद गतीने कार्य करत होता व बॅटरीचे आयुष्य अतिशय अल्प असल्याचेही आढळून आले होते. भारत सरकारने या नंतर हा संगणक मुंबईच्या आयआयटी कडे यात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी पाठवला. आयआयटी कडून या संगणकाचे नवीन डिझाइन करण्यात आले आहे.

भारत सरकारने या संगणकाची स्तुती करताना हा भारताच्या इतिहासातील एक टप्पा असल्याचे व भावी पिढ्या हा संगणक भारतात बनवलेला असल्याने नेहमीच स्मरणात ठेवतील असे म्हटले होते हे बर्‍याच वाचकांच्या स्मरणात असेलच. हा संगणक किंमतीने स्वस्त, टिकाऊ असल्याने लाखोवधी भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक वरदान आणि भारतीयांच्या राष्ट्रीय अस्मितेचा भाग बनेल असेही सरकारचे म्हणणे होते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी हा संगणक म्हणजे अत्यंत कमी खर्चात आधुनिक उपकरण विकसित करण्यात भारत हा कसा अग्रेसर आहे याचे एक उदाहरण ठरणार होता.

भारत सरकारने या संगणकाचे उत्पादन व पुरवठा या संबंधी काढलेले टेंडर श्री, सुनीत सिंग टुली यांच्या मालकीच्या परंतु कॅनडा या देशातील डेटाविन्ड या कंपनीला देण्यात आलेले होते. टेंडर मिळाल्यानंतर या कंपनीने, टॅबलेट्चे उत्पादन करण्यासाठी आपला भारतात कारखाने सुरू करण्याचा मनसुबा जाहीर केला होता.

न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने नुकताच या डेटाविन्ड कंपनीच्या उत्पादन संबंधित कार्याबद्दल एक चौकशीवजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मला हा अहवाल फारच रोचक वाटल्याने त्यातील प्रमुख बाबी मी उद्धृत करतो आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाप्रमाणे डेटाविन्ड्ने 4 भारतीय उत्पादकांशी संपर्क साधलेला आहे. या उत्पादकांची या प्रकल्पासंदर्भात परिस्थिती किंवा स्टेटस काय आहे ते पाहूया.

*व्हीएमसी सिस्टीम्स ही सिकंदराबाद मधली कंपनी आपले डेटाविन्ड बरोबर कॉन्ट्रॅक्ट झाल्याचे मान्य करते परंतु उत्पादित संगणकांच्या संख्येबद्दल काहीही सांगण्यास तयार नाही.

*दिल्लीच्या परिसीमेवर असलेल्या नोयडा शहरामधील डेटाविन्डचा एक उत्पादक आपल्याला मिळालेले हे पहिलेच टॅबलेट जुळणीचे कॉन्ट्रॅक्ट असल्याचे मान्य करतो व उत्पादन अजून सुरू न झाल्याचे सांगतो.

*बेंगळुरूच्या डिजिटल सर्किट्स या कंपनीने ऑगस्ट 1912 मध्ये टॅबलेट जुळणीच्या कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या असल्या तरी अजून आपण कोणतेही टॅबलेट जुळणी न केल्याचे मान्य करतात. या कंपनीलाही टॅबलेट जुळणीचा कोणताही अनुभव नाही.

*म्हैसूरची विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ही कंपनी आपण डेटाविन्डशी कॉन्ट्रॅक्ट केल्याचे मान्य करते परंतु या शिवाय कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाप्रमाणे, भारतात या टॅबलेट संगणकाची जुळणी करण्याचा प्लॅन संपूर्णपणे फसला असून या प्रकल्पाला आलेले हे अतिशय मोठे अपयश आहे. या प्रकल्पाची जबाबदारी अंगावर असलेले मुंबई आयआयटी चे प्रोफेसर दीपक पारेख पारेख् हे डेटाविन्ड्ला आलेले हे अपयश पूर्णपणे मान्य करतात. त्यांच्या मताप्रमाणे डेटाविन्डने कॉन्ट्रॅक्ट केलेल्या मूळ पुरवठादारांपैकी कोणताही सबकॉन्ट्रॅक्टर या टॅबलेट्सचा पुरवठा करू शकलेला नाही. प्रो. पारिख सांगतात की डेटाविन्डला मिळालेल्या टेंडरच्या अटींप्रमाणे डिसेंबर 2012 पर्यंत या टेंडरच्या खाली पुरवायचे असलेले सर्व म्हणजे 1 लाख टॅबलेट सरकारला पुरवणे या कंपनीला बंधनकारक होते. हा पुरवठा जर ही कंपनी करू शकली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. याबाबत सूचना आयआयटी ने डेटाविन्ड्ला पाठवलेलीच आहे. डेटाविन्डने या नंतर ही तारीख 31 मार्च 2013 पर्यंत वाढवून घेतली आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने डेटाविन्ड कंपनीशी संपर्क साधला असता ही कंपनी भोंगळ व उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे आढळून आले आहे. परंतु एकूण उत्तरांवरून या संगणकांचे उत्पादन भारतात होत नसल्याचे डेटाविन्ड मान्य करते आहे असे आढळून आले आहे. या कंपनीने दिलेली काही उत्तरे पाहू.

* अमृतसर, पंजाब येथे असलेली कंपनीची उत्पादन सुविधा व इतर 4 सबकॉन्ट्रॅक्टर मिळून कंपनीची एकूण उत्पादनक्षमता दिवसाला 3000 संगणक एवढी आहे.

*संगणकाचा पडदा डेटाविन्डच्या मॉन्ट्रिएल, कॅनडा येथे असलेल्या उत्पादन सुविधेमध्ये उत्पादित होतो आहे. संगणकाचे सर्व मेकॅनिकल पार्ट्स, मदरबोर्ड आणि ऑपरेटिंग प्रणाली ही कंपनीने स्वत: डिझाइन केलेली आहे.

*उत्पादन करण्यास पुरेसा अवधी नसल्याने मदरबोर्ड आणि किट्स किंवा संच सध्या कंपनीच्या चिनी सबकॉन्ट्रॅक्टरच्या उत्पादन सुविधेमध्ये उत्पादित होत असून असे संच भारताकडे जुळणीसाठी पाठ्वले जाणार आहेत.

*संगणकांची जुळणी व प्रोग्रॅमिंग हे डेटाविन्डची अमृतसर सुविधा आणि दिल्लीचे ऑफिस या मध्ये केली जात आहे.

या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमध्ये खरे चित्र काय आहे या साठी न्यूयॉर्क टाइम्सने चीन मध्ये पुढचा शोध घेतला आणि चिनी उत्पादकांकडून मिळालेल्या उत्तरांवरून डेटाविन्डचा खरा अंतस्थ प्लॅन काय आहे? हे शोधून काढले आहे. चिनी उत्पादकांकडून मिळालेली उत्तरे या प्रमाणे:

हॉन्गकॉन्ग मधून कार्य करणार्‍या कालोन्ग टेक्नॉलॉजी या कंपनीने ए13 या प्रकारचे सुमारे 500 टॅबलेट डेटाविन्डसाठी उत्पादित केल्याचे मान्य केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या संगणकाचे पडद्यासकट सर्व भाग चीनमधे बनलेले आहेत. कंपनीने टॅबलेट्सची जुळणी करून त्यात अ‍ॅन्ड्रॉइड प्रणाली कार्यरत करून दिली आहे. डेटाविन्डने संगणकाचे बाह्य डिझाइन आणि स्वत:चे काही सॉफ्ट्वेअर त्यात टाकलेले आहे.

शेन्झेन यथील डासेन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स म्हणते की डेटाविन्डने त्यांच्याकडून आतापर्यंत 4500 संगणक 3 बॅचेज मध्ये खरेदी केले आहेत. संगणकाचे सर्व भाग चीन मध्येच बनलेले असून, जुळणी चीनमध्येच केलेली आहे. मात्र डिझाइन हे डेटाविन्डच्या गरजेनुसार आणि सल्ल्याने त्यांनी केलेले आहे.

शेन्झेन मधील अणखी एका कंपनीने ए13 प्रकारच्या संगणकांचा पुरवठा डेटाविन्डला केल्याचे मान्य केले.

न्यूयॉर्क टाइम्सने शोधून काढलेल्या माहितीप्रमाणे चीन मधील 4 कंपन्यांकडून एकूण 11000 संगणक 42.00 ते 42.86 डॉलर्स या किंमतीच्या फरकात डेटाविन्डने खरेदी केले आहेत. यापैकी 10,000 संगणकांचा पुरवठा त्यांनी आयआयटी मुंबई यांना केला आहे. या संगणकांपैकी काही संगणक भारताच्या राष्ट्रपतींनी या संगणकाचे अनावरण केले तेंव्हा पाठवले गेले होते. भारतामध्ये आजमितीपर्यंत एका संगणकाचे सुद्धा उत्पादन झालेले नाही.

न्यूयॉर्क टाइम्सने शोधून काढलेल्या या माहितीमुळे अगदी स्पष्ट होते आहे की आकाश संगणक, संपूर्णतया चीन मध्ये उत्पादित होतो आहे व डेटाविन्ड फक्त त्यांचे डिस्ट्रिब्यूशन करते आहे. भारत सरकारने या ऐवजी संगणक थेट चीन मधून उत्पादन करून घेतले व भारतातील विद्यार्थ्यांना पुरवले तर कदाचित या संगणकाची किंमत आणखी थोडी कमी होऊ शकेल. थोडक्यात म्हणजे आकाश संगणकांचे भारतातील उत्पादन हा एक प्रचंड मोठा विनोद झाला आहे आणि यात आणखी कोणाकोणाचे मोठे हसू झाले आहे हे ओळखून काढणे काही फारसे कठीण नाही.

हा आकाश प्रकल्प ज्या शासकीय विभागाच्या अखत्यारीत मोडतो तो नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इनफरमेशन अ‍ॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीविभाग आता नवीन डिझाइनच्या आकाश संगणकाचे एक टेंडर काढण्याच्या तयारीत आहे. या टेंडरमधील संगणकांची संख्या ऐकून बर्‍याच मंडळींना भोवळ येण्याची शक्यता आहे. ही संख्या काही दशलक्ष एवढी आहे. हे संगणक नंतर भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत म्हणे! खरी दांडगी चिकाटी म्हणजे काय? हे बघायचे असले तर या मंडळींचे उदाहरण समोर ठेवले पाहिजे. एकूण काय? चिनी टॅबलेट उत्पादकांना सुगीचे दिवस येणार आहेत, आणखी काय?

(न्यूयॉर्क टाइम्सचा मूळ रिपोर्ट येथे क्लिक केल्यास वाचता येईल.)

14 जानेवारी 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “मोठ्ठा विनोद!

  1. Namaskar ,
    Some infromation I got —
    All sites related to Akash tab were nonfunctioning .
    Toll-free no. not working .

    Posted by apashchim | जानेवारी 16, 2013, 12:06 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: