.
Health- आरोग्य, Musings-विचार

धार्मिक अंधपरंपरांची बळी


एका आधुनिक पाश्चिमात्य देशात राहणार्‍या 31 वर्षाच्या एका गरोदर तरुणीचा अकाली गर्भपात होणार याची स्पष्ट चिन्हे दिसत असताना व त्यामुळे तिला ब्लड पॉइझनिंग होते आहे हे लक्षात येऊनही तिचा जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय उपायांनी तिचा गर्भपात घडवून आणण्यास, 2012 या वर्षामध्ये, एका पाश्चिमात्य देशातील एखादे आधुनिक रुग्णालय, नकार देऊ शकते व अखेरीस या तरुणीचा मृत्यू ओढवतो या घटनेवर तुमचा विश्वास बसू शकतो का? बहुधा नाही बसणार! परंतु ही घटना पूर्ण सत्य आहे. पश्चिम आयर्लंड मधील गॅल्वे शहरात राहणारी आणि स्वत: दंतवैद्य असणारी ही भारतीय तरूणी पोटातून कळा येत असल्याने या रुग्णालयात दाखल झाली तेंव्हा तिला गरोदर राहून फक्त 17 आठवडे झाले होते. तरीही डॉक्टरांनी वैद्यकीय गर्भपात करण्यास नकार दिला आणि तिला मृत्यूमुखी पडावे लागले.

 

40 किंवा 50 वर्षांपूर्वी अनेक हिंदी/मराठी चित्रपट किंवा कथा कादंबर्‍या यात प्रेक्षकांच्या/वाचकांच्या भावनांना हात घालणारा एक प्रसंग अनेक वेळा दाखवत असत. या प्रसंगात एखादा डॉक्टर कोणा गरोदर स्त्रीच्या पतीला, डॉक्टरांनी कोणाला वाचवायचे, आई की बाळ? असे विचारत असे आणि त्या स्त्रीचा पती अर्थातच त्याच्या पत्नीवर असलेले त्याचे असीम प्रेम स्मरून आईला वाचविण्यास सांगत असे. हे लक्षात घेतले पाहिजे की त्या काळी भारतात वैद्यकीय आपत्काळ सोडला तर बाकी इतर कोणत्याही कारणासाठी केलेला गर्भपात हा अवैध मानला जात असे. मी नंतर माझ्या एका गायनॉकॉलजिस्ट डॉक्टर मित्राला, चित्रपट किंवा कादंबर्‍या या मध्ये दाखवल्या जाणार्‍या या प्रकारच्या भावनिक प्रसंगांतील सत्याबद्दल विचारले होते. तेंव्हा त्याने मला स्पष्टपणे सांगितले होते की हे असले प्रसंग म्हणजे कवी कल्पना असतात. गरोदर स्त्रीच्या तब्येतीला कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी डॉक्टर सर्व प्रथम घेत असतात आणि असले काल्पनिक प्रश्न, गरोदर स्त्रीच्या पतीला फक्त कथा कादंबऱ्यांतील डॉक्टर्स विचारत असतात. प्रत्यक्षात नाही. माझ्या डॉक्टर मित्राने सांगितलेल्या या सत्याचा निर्देश या ठिकाणी मी अशासाठी करतो आहे की 50 वर्षांपूर्वीच्या कालातील भारतासारख्या देशात सुद्धा, कोणत्याही डॉक्टराने आपल्या पेशंटला ब्लड पॉइझनिंग होते आहे हे दिसत असताना, फक्त 17 आठवडे गरोदर असलेल्या पेशंटचा वैद्यकीय गर्भपात करण्यास नकार दिला नसता. तरीही आयर्लंड सारख्या सुधारलेल्या पाश्चिमात्य देशात 2012 मध्ये अशी घटना घडू शकते. आणि या घटनेला कारणीभूत असलेला आणि प्राचीन काळात म्हणजे 1861 साली तेथील पार्लंमेंटने मंजूर केलेला व गर्भपात घडवून आणणे हा गुन्हा आहेअसे सांगणारा कायदा तेथील सुप्रीम कोर्टाने चुकीचा आहे व बदला असे सांगूनही सरकारने अजून बदललेला नाही, यावर सहजासहजी कोणाचा विश्वास बसेल का? पण दुर्दैवाने हे सगळे सत्यच आहे.

 

बहुसंख्य लोक कॅथोलिक ख्रिश्चन असलेल्या आयर्लंड या देशातील राज्यघटनेनुसार असलेल्या नियमानुसार, गर्भपात करण्यास बंदी आहे. परंतु या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने, ज्या वेळी मातेच्या आयुष्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते अशा वेळी गर्भारपण चालू न ठेवता वैद्यकीय उपायांनी गर्भपात करणे कायदेशीर आहे असा निवाडा 1992 मध्येच दिलेला आहे. असे असूनही पाठोपाठ निवडून आलेल्या 5 सरकारांनी, गेल्या 20 वर्षांत या संबंधीचा कोणताही कायदा मंजूर न करता आयर्लंड मधील रुग्णालयांकडे अशा केसेस मधील निर्णय सोडून दिला आहे. ही जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेण्यास नाखुष असलेली रुग्णालये, फक्त जेंव्हा अगदी स्पष्टपणे (अपघातासारख्या केसेस) मातेच्या आयुष्याला धोका असतो तेंव्हाच गर्भपात करण्याचा निर्णय घेत आलेली आहेत. इतर सर्व केसेस मध्ये ही इस्पितळे गर्भपाताचा निर्णय घेण्यासच तयार नसतात.

 

श्रीमती सविता व त्यांचे पति श्री. प्रवीण हळ्ळपणवार हे गॅलवे मध्ये राहणारे एक सर्वसाधारण व आनंदी जोडपे होते. जीवनातला सर्व आनंद लुटत असलेले हे जोडपे आपल्या प्रथम अपत्याची आता उत्कंठेने वाट बघत होते. श्री. प्रवीण हे आधुनिक वैद्यकीय उपचार सामुग्रीचे उत्पादन करण्याच्या एका उद्योगात काम करत होते तर श्रीमती सविता या एक दंतवैद्य होत्या.

 

पोटामधून तीव्र वेदना होत असल्यामुळे श्रीमती सविता यांना ऑक्टोबर 21, 2012 या दिवशी गॅलवे मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करून घेण्यात आले. त्यांची तपासणी करणार्‍या डॉक्टर्सनी काही तासातच त्यांचा गर्भपात होत असल्याचे निदान केले. आत्यंतिक शारिरीक वेदना व ब्लड पॉइझनिंगमुळे खालावत गेलेली श्रीमती सविता यांची तब्येत आणि स्वत: या जोडप्याने सतत केलेल्या आर्जवी विनंत्या याकडे दुर्लक्ष करत या इस्पितळाने पुढचे 3 दिवस, श्रीमती सविता यांचा वैद्यकीय गर्भपात करण्यास स्पष्ट नकार दिला. श्री प्रवीण यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या ज्या वेळी विशेषज्ञ सविता यांना ठेवलेल्या वॉर्ड्सच्या फेरीवर येत होते त्या प्रत्येक वेळी श्रीमती सविता यांनी बाळाला वाचवता येणे शक्य नसले तर कृपया गर्भपाताचा विचार करा अशी विनंती स्वत: डॉक्टरांना केली होती. यावर हे विशेषज्ञ त्यांना, जोपर्यंत गर्भाच्या ह्रदयाचे ठोके व्यवस्थित ऐकू येत आहेत तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही, असेच उत्तर देत राहिले होते.

 

यानंतर दुसर्‍या दिवशी या विशेषज्ञांनी हा देश कॅथॉलिक देश असून, गर्भपात करण्यावर येथे बंदी आहे असे श्रीमती सविता यांना परत एकदा सांगितले. त्यावेळी सविता यांनी मी आयरिश नाही आणि कॅथॉलिकही नाही असे डॉक्टरांना सांगून गर्भपाताची परत एकदा विनंती केली होती. परंतु या वेळेसही डॉक्टरांनी कोणतीही कार्यवाही करण्यास नकार दिला होता. श्रीमती सविता यांना सतत ओकार्‍या होत होत्या व त्या रात्री त्या मूर्च्छित झाल्या. परंतु गर्भाच्या हृदयाचे ठोके चालू असल्याने डॉक्टरांनी कोणतेही उपचार करण्यास नकार दिला. याच्या दुसर्‍या दिवशी गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबले व वैद्यकीय उपायांनी सविता यांचा गर्भपात इस्पितळात करण्यात आला. काही तासातच सविता यांना आयसीयू विभागात ब्लड पॉइझनिंगमुळे शरीर संस्था मंदावत असल्याचे निदान करून नेण्यात आले व त्यांना गुंगीचे औषध देऊन ठेवण्यात आले. आणखी दोन दिवसात त्यांचे यकृत, मूत्रपिंड व हृदय बंद पडल्याचे निदान केले जाऊन 28 ऑक्टोबर 2012 या दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याचे इस्पितळाने जाहीर केले. फक्त एका आठवड्यात श्री. प्रवीण यांचे छोटेसे आनंदी जग अज्ञातात कायम स्वरूपी विरून गेले. आयर्लंड मधील भारतीय समाजाने दीपावलीच्या निमित्ताने ठरवलेले आपले सर्व कार्यक्रम रद्द केले व आयर्लंड शासन व तेथील कायदे या संबंधी कमालीचा असंतोष व रोष या समाजात स्वाभाविकपणे पसरला.

 

श्रीमती सविता यांच्या गर्भाचे ठोके नैसर्गिक रित्या थांबण्याची वाट बघत न बसता आधीच जर त्यांचा गर्भपात केला असता तर त्यांना झालेला ब्लड पॉइझनिंगचा विकार बरा झाला असता का? या सारख्या कोणत्याच प्रश्नाबाबत युनिव्हर्सिटी हॉस्पिटलआता काहीही निवेदन देण्यास तयार नाही.या बाबतीत सरकारची राष्ट्रीय आरोग्य योजना चौकशी करत आहे एवढेच उत्तर हे इस्पितळ आता देत आहे.

 

या सर्व भयानक प्रसंग मालिकेचे यापुढे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीत आणि हे असे घडू शकते याची कल्पनाही करणे माझ्यासाठी अवघड बनते आहे. या कर्तबगार तरूणाचे छोटेसे विश्व नष्ट झाल्यावर आणि एक तरूण उत्साही महिला या जगातून कायमची निघून गेल्यावर, आयर्लंड मधील विरोधी पक्ष जागे झाले आहेत व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे सरकारने पालन करावे असे ते सांगत आहेत. आयर्लंड मधील जनता, विशेषेकरून स्त्रिया, यांनी अनेक शहरात मोर्चे, निदर्शने काढेले आहेत. आयर्लंड सरकारने श्री. प्रवीण यांच्या आयुष्याची पुनर्बांधणी करण्यासाठी सर्व मदत (म्हणजे काय करणार?) देऊ केली आहे तर भारतीय परराष्ट्रीय खात्याने या संबंधात आयर्लंड सरकार बरोबर या विषयावर बोलणी सुरू केली आहेत.

 

या सर्व प्रकरणात काही अतिशय मुलभूत मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे असे मला वाटते. ज्यावेळी एखादी गरोदर स्त्री पूर्ण शुद्धीत असताना डॉक्टरांना आपला गर्भपात करण्याची विनंती करते आहे त्या वेळी डॉक्टर्स तिला नकार कसा देऊ शकतात? जी आयर्लंडची नागरिक सुद्धा नाही अशा व हिंदू धर्माचे पालन करणार्‍या स्त्रीवर कॅथॉलिक नियमांची जबरदस्ती कशी केली जाते? मातेच्या आरोग्याला धोका असण्याची शक्यता असल्यास गर्भपात करण्यास हरकत नाही असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने या संबंधी दिलेला असताना सुद्धा इस्पितळ योग्य ती पाऊले उचलण्यास कसा नकार देऊ शकते? कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रथम कर्तव्य त्याच्या पेशंटचा प्राण वाचवणे असते हे सर्वमान्य आहे. असे असताना गॅलवे मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि सविता यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांनी गर्भपात करण्यास नकार देऊन आपल्या कर्तव्य पालनात कसूर केलेली नाही का?

माझी खात्री आहे की या दुर्दैवी जोडप्याची ही कहाणी वाचल्यावर तुम्ही माझ्याप्रमाणेच बैचैन झाला असणार व तुम्हालाही प्रचंड राग आलेला असणार आहे. परदेशी स्थायिक होऊ पहाणार्‍या तरूण जोडप्यांनी आपण ज्या देशात स्थायिक होणार आहोत तेथील कायदेकानू आधुनिक आहेत की पुराणमतवादी आहेत हे तेथे जाण्याआधी तपासून बघण्याची आता वेळ आली आहे असे नक्कीच म्हणता येईल.

 

3 जानेवारी 2013

 

 

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: