.
People व्यक्ती

त्या आल्या, त्यांनी पाहिले आणि ……..?


भारतात आजकाल ज्याचे भाषण ऐकावे किंवा विचार समजावून घ्यावेत असा कोणी मोठा सामाजिक किंवा राजकीय नेता कितीही शोधले तरी सापडणे कठिणच किंवा दुर्लभच आहे असे मला वाटते. माझ्या मताने ज्याला आदर्श मानून चालावे अशी कोणी व्यक्तीच सध्या उरलेली नाही व हीच स्वतंत्र भारताची सद्यःस्थितीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे असे म्हणता यावे. मी लहान असताना ज्यांनी आपले सर्व आयुष्य एखाद्या सामाजिक किंवा राजकीय चळवळीला वाहून घेतलेले आहे व त्यासाठी आयुष्यातील सर्व सुखोपभोगांचा त्याग करून हालअपेष्टा किंवा प्रसंगी तुरुंगवासाची शिक्षा सहन करण्यास ज्यांनी कधी मागे पुढे पाहिले नव्हते अशा अनेक थोर पुरुषांची उदाहरणे समाजासमोर होती. विधवा स्त्रियांचा उद्धार यासारख्या सामाजिक चळवळीला वाहून घेतलेले अण्णासाहेब किंवा धोंडो केशव कर्वे, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शेतकर्‍यांची राजकीय चळवळ उभारणारे वल्लभभाई पटेल यांचे आदर्श समाजासमोर होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, प्रल्हाद केशव अत्रे यांसारखे असामान्य पत्रकार व साहित्यिक, पु.ल. देशपांड्यांसारखे साहित्यिक अशी कितीतरी नावे डोळ्यासमोर येतात. या सगळ्या मंडळींच्या पुढे सध्याचे पुढारी किंवा चळवळींचे अग्रणी असलेल्या मंडळींची तुलना मनातल्या मनात करून बघा म्हणजे ही मंडळी किती खुजी आहेत हे तुमच्या लगेच लक्षात येईल. नाही म्हणायला भारताचे या आधीचे पंतप्रधान, सध्याच्या श्रेष्ठींच्या खुजे पणाला असलेला एक अपवाद मानता येतील. परंतु त्यांचे वय लक्षात घेता त्यांना आजच्या पिढीमधील मानणे म्हणजे जरा कठिणच वाटते.

मात्र जागतिक स्तरावर, ज्यांचे विचार आवर्जून ऐकावे व ज्यांच्याबद्दल नितांत आदर मनात बाळगावा अशी काही मंडळी अजूनही आहेत असे मला वाटते. या अशा काही व्यक्तींमध्ये ज्यांना आपल्या आयुष्यातील तब्बल 15 वर्षे सैनिकी हुकुमशहांच्या अंमलाविरूद्ध लढा देत असताना तुरुंगवासात काढावी लागली आहेत त्या ब्रम्हदेशाच्या मदाम ऑन्ग सान सू चि ( Madam Aung San Suu Kyi) यांचा समावेश नकीच करावा लागेल. मदाम सू चि यांचा उल्लेख ब्रम्हदेशात आदराने द लेडी असा केला जातो जातो व मला तो मोठा योग्य वाटतो. कांही दिवसांपूर्वी (नोव्हेंबर 2012) त्या भारताच्या दौर्‍यावर, ब्रम्हदेशच्या नवीन घटनेनुसार, अधिकृत विरोधी पक्षनेत्या या नात्याने आल्या होत्या. या दौर्‍याच्या दरम्यान त्यांचे भाषण ऐकता येईल अशी माझी अपेक्षा होती व मी त्याची वाट बघत होतो. माझ्या अपेक्षेनुसार वृत्तपत्रात बहुतेक टीव्ही वाहिन्या त्यांचे भाषण लाईव्ह प्रक्षेपित करणार आहेत हे वाचल्यावर साहजिकच मला मोठा आनंद वाटला होता होता आणि 13 नोव्हेंबर 2012 ला झालेले त्यांचे जवाहरलाल नेहरू मेमोरियल भाषण मला संपूर्णपणे लाईव्ह ऐकता आले हे मी माझे सुदैव समजतो.

इंग्रजी भाषेचे सखोल ज्ञान व मनातील विचारांना शब्दरूप देताना अत्यंत चपखल शब्द निवडण्याचे कौशल्य अंगी असल्यामुळे, मदाम सू चि या एक अतिशय प्रभावी वक्त्या श्रोत्यांना वाटतात. राजकारणी असल्याने आपल्या मनातील विचार नेमके श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. त्यांचे इंग्रजीमधील भाषण ऐकताना, त्यांचे उच्चार स्पष्ट व भारतीय श्रोत्यांना योग्यरीत्या समजू शकतील आहेत असे वाटले. हे कौशल्य कदाचित भारतामध्ये झालेले त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण व 1987-88 मध्ये आपल्या पतींसमवेत Indian Institute of Advanced Studies या संस्थेत फेलो म्हणून व्यतीत केलेल्या कालामुळे त्यांना प्राप्त झाले असावे. आपल्या भाषणात त्यांनी आपल्या स्वत:च्या विचारसरणीवर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे विचार व या शिवाय भारतीय स्वातंत्र्यलढा ज्या विचारधारेवर लढला गेला या सर्वांचा कसा सखोल परिणाम झाला व परिणामी ब्रम्हदेशात लोकशाही रुजवण्यासाठी लढा देण्यासाठी त्या कशा उद्युक्त झाल्या याचे मोठे सुंदर विवेचन केले. त्यांच्या मताने ब्रम्हदेशातील स्वातंत्र्य चळवळ व गेल्या काही दशकांतील लोकशाही साठीचा लढा हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांचे विचार व कृती यावर आधारित असल्याने पूर्णपणे शांतीपूर्ण होता व राहिला आहे.

मदाम सू चि, उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डला पोहोचल्या आणि त्याच वर्षी जवाहरलाल नेहरूंचे निधन झाले किंवा त्यांना प्रथम स्थानबद्ध करण्यात आले ते वर्ष नेहरू जन्मशताब्दीचे होते या सारख्या आठवणींनी त्यांच्या मनावर असलेला नेहरूंच्या आयुष्याच्या प्रभावाचा उल्लेख त्यांनी श्रोत्यांना दर्शवला खरा! परंतु याचबरोबर नेहरूंना प्रथम तुरुंगवास भोगावा लागला त्या वेळचे, कोणाची नेमकी बाजू घ्यावी यासारखे त्यांच्या (नेहरूंच्या) मनातील प्रश्न आणि अनिश्चितता या गोष्टी व मदाम सू चि यांना अटक झाली तेंव्हा त्यांच्या मनातील विचार या दोन्हीमध्ये असलेले साधर्म्य व साम्य हेही त्यांनी मोठ्या रोचकपणे विशद केले.

त्यांच्या राहत्या घरात जेंव्हा त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते त्या कालाबद्दल बोलताना, आपण जवाहरलाल नेहरूंचे आत्मचरित्र व त्यांनीच लिहिलेला डिस्कव्हरी ऑफ इंडिया (Disovery of India’) हा ग्रंथ, यांच्या आधाराने पुढचा स्थानबद्धतेचा अनिश्चित व अज्ञात कालखंड, व्यतीत कसा करायचा? याचा आपण एक आराखडा  मनात तयार केला होता व त्या आधारावर आपण आपल्या स्थानबद्धतेचा कालखंड पार करू शकलो होतो ही गोष्ट मुद्दाम नमूद केली व याचबरोबर 12व्या शतकात लिहिल्या गेलेल्या व कश्मिरच्या राजांची चरित्रे सांगणार्‍या कल्हण कवीच्या राजतरंगिणी ग्रंथाच्या वाचनातून “कायदा व सुव्यवस्था” याचे ज्ञान आपण कसे प्राप्त करून घेतले होते हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत.

मात्र मदाम सू चि यांनी आपल्या भाषणात, भारतातील सध्याच्या राजकीय नेत्यांच्या फळीबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. हे त्यांनी राजकारणाचा एक भाग म्हणून केले की सध्याच्या भारतीय नेत्यांच्या गुणवत्तेच्या दर्जाबद्दल त्यांचे काय मत आहे हे अपरोक्षपणे दर्शवून देण्यासाठी केले हे मला तरी सांगणे शक्य नाही. परंतु सध्याच्या भारतीय नेतेमंडळींची गुणवत्ता काय प्रतीची आहे? यावरचे हे एक प्रकारचे भाष्यच होते असे मी मानतो.

मला विशेष आवडलेला त्यांच्या भाषणातील भाग म्हणजे दोन राष्ट्रांमधील मैत्रीची त्यांनी केलेली व्याख्या, असे म्हणता येईल. मदाम सू चि म्हणाल्या की या भारत भेटीला सुरुवात केल्यापासून त्यांना भारतापासूनच्या त्यांच्या अपेक्षा आणि भारताने ब्रम्हदेशातील लोकशाही चळवळीच्या पाठीमागे उभे न राहिल्यामुळे त्यांची केलेली निराशा या दोन गोष्टींबद्दल सतत प्रश्न विचारले जात आहेत. परंतु असे म्हणता येईल   की आपण कोणाबद्दलही कितीही अपेक्षा ठेवू शकतो परंतु ती व्यक्ती किंवा राष्ट्र आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले नाही तर निराशा मनात बाळगून ठेवून सतत राहू शकत नाही. आमच्या (ब्रम्हदेशाच्या) कठीण कालात, भारताने अंगीकारलेल्या धोरणामुळे आणि मी मनाने भारताच्या जवळ असल्याने, मला दुख्ख तर नक्कीच वाटले होते आणि असेही वाटले होते की जर महात्मा गांधी आज हयात असते तर भारताने ब्रम्हदेशाबाबत स्वीकारलेल्या धोरणांबद्दल त्यांनी आपला विरोध असल्याचे प्रगट केले असते व लोकशाहीच्या मूल तत्त्वांवर स्वत:चा गाढा विश्वास असल्याने ते ब्रम्हदेशातील लोकशाहीच्या बाजूने ताठपणे उभे राहिले असते व त्यांनी भारतालाही आपली धोरणे बदलण्यास भाग पाडले असते. मात्र पुढे मदाम सू कि हे सांगण्यास विसरल्या नाहीत की त्यांचे मन जरी दुःखित असले तरी भविष्याबद्दल त्या आशादायी आहेत. दोन राष्ट्रांतील मैत्री ही परस्पर देशांतील सरकारी संबंधांवर अवलंबून नसून त्या दोन देशातील लोकांच्या संबंधांवर खरी अवलंबून असते. सरकारे येतात व जातात आणि म्हणूनच लोकशाहीला महत्त्व आहे.

भविष्याबद्दल बोलताना मदाम सू चि यांनी कोणताच आडपडदा ठेवला नाही. 2015 ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक आपण लढवणार असल्याचे व या बाबतीत आपल्या मनात कोणतीही चलबिचल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपला पक्ष, राजकीय पक्ष असल्याने निवडणूक जिंकण्याचा पक्षाचा प्रयत्न असणारच व त्या बरोबरच पक्षप्रमुख या नात्याने शासन प्रमुख म्हणू निवडून येण्याचा आपण प्रयत्न केला नाही तर लोकशाहीला काय अर्थ राहील? असे त्या म्हणाल्या.

ब्रम्हदेशाच्या या लोकमान्य नेत्याची सभेच्या प्रारंभी ओळख करून देताना सांगितले गेले होते की मदाम सू चि या अतिशय निर्भय, नैतिक व बौद्धिक धैर्य बाळगणार्‍या नेत्या आहेत. चिकाटी आणि वैयक्तिक राग किंवा निराशा यापासून त्या नेहमीच अलिप्त राहिलेल्या आहेत. व या ओळखीत काहीही औपचारिकता किंवा अतिशयोक्ती नाही असे मला मनापासून वाटते. अशा या नेत्या खूप कालावधी नंतर भारतात आल्या आणि भारतात घडून आलेले बदल त्यांना जवळून अनुभवता आले. परंतु त्यांना असा प्रश्न नकीच पडला असेल की सध्या असलेले भारताचे खुजे नेतृत्त्व, सांमजस्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखून जनसामान्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यात यशस्वी होऊ शकेल का? नाहीतर मदाम सू चि यांच्या या भेटीचे फलित, त्या आल्या, त्यांनी पाहिले व त्या निराश झाल्या एवढेच राहील.

मला असे प्रामाणिकपणे वाटते की मदाम सू चि सारख्या व्यक्ती भारताच्या खर्‍या मित्र व हितचिंतक आहेत हे भारताचे सुदैवच आहे. भारताने त्यांना ब्रम्हदेशात लोकशाही प्रस्थापित करण्याच्या कार्यात शक्य ते सहकार्य केले पाहिजे.

28 डिसेंबर 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “त्या आल्या, त्यांनी पाहिले आणि ……..?

  1. नक्कीच. पण भारताने जर लष्करी सत्तेला पाठिंबा दिला नसता तर कदाचित चीनने मोठ्याप्रमाणात सहकार्य मिळवून सुरक्षेला मोठा धोका उत्पन्न केला असता.

    Posted by cpk | डिसेंबर 28, 2012, 5:19 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: