.
अनुभव Experiences

कसे आहे देशी स्टारबक्स ?


काही आठवड्यांपूर्वी भारतातील उपभोक्त्यांनी (consumers) जागतिकीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. हे पाऊल अनिष्ट की स्वागतार्ह? घडायला हवे की नको? वगैरे चर्चा मी येथे करत बसणार नाहीये. तो माझ्या या लेखाचा विषयच नाही.

मागच्या वर्षी भारत सरकारने एका किंवा सिंगल ब्रॅन्ड असलेल्या परदेशी कंपन्यांना भारतात दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. अशी दुकाने उघडताना त्यांना त्यांचे भाग भांडवल म्हणून 100 टक्के रक्कम आणण्यास सुद्धा सरकारने मुभा दिली होती. असे 100% टक्के भांडवल मूळ परदेशी कंपनीचे असल्यास त्यांचे व्यवसाय कौशल्य व ब्रॅन्ड्चे नाव हे पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात अशी कल्पना या मागे आहे. काही फॅशन हाऊसेसनी आपल्या ब्रॅन्डची दुकाने दिल्ली, मुंबई सारख्या महानगरांच्या पॉश भागात मागच्या वर्षभरात चालूही केली होती. परंतु याची फारशी माहिती तुम्हा आम्हाला झाली असण्याचे फारसे काहीच कारण नव्हते. कारण सर्वसामान्यांना उपयुक्त अशा वस्तू किंवा सेवा देणारा कोणताच बडा (किंवा बिग टिकिट म्हणतात तो) ब्रॅन्ड भारतात आला नव्हता. काही आठवड्यांपूर्वी मुंबईमध्ये स्टारबक्सच्या पहिल्या कॅफेचे उद्घाटन झाले आणि ही परिस्थिती बदलली असे नक्की म्हणता येईल.

स्टारबक्स या कंपनीला स्वत:ची प्रतिमा आणि व्यवसाय कौशल्य याबद्दल इतकी खात्री आहे की त्यांनी 100% भागभांडवल या नवीन उडीमध्ये आणण्याचा वगैरे खटाटोप सुद्धा केला नाही व भारतातील एक मोठा औद्योगिक व्यवसाय असलेल्या टाटा उद्योग समूहाबरोबर त्यांनी 50% भागीदारीत व्यवसाय करण्याचे मान्य केले. टाटा समूहाला भारतात असलेला, चहा, कॉफी यांचे उत्पादन, विक्री आणि अशाच प्रकारच्या कॉफी हाऊसेसच्या साखळ्या चालवणे यातील आधीचा अनुभव आणि त्यांच्या मालकीच्या असलेल्या महानगरातील पॉश विभागातील इमारती, या दोन्ही बाजू टाटा समूहाला चांगल्याच जमेच्या आहेत व त्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही ही भागीदारी चांगलीच फायदेशीर ठरेल अशी खात्री टाटा समूहाला असणार आहे.

तर मग स्टारबक्सच्या या देशी अवताराकडे कॉफी पिण्यासाठी गेलेल्या लोकांचा काय अनुभव आहे? ज्यांनी परदेशी स्टारबक्सच्या कॅफेजना भेट दिलेली आहे त्यांना ही देशी स्टारबक्स कॅफे कशी वाटता? आत प्रवेश करण्यासाठी आणि स्टारबक्सचा अनुभव घेण्यासाठी म्हणून या कॅफेच्या प्रवेशद्वारापाशी रांगा लावणार्‍या ग्राहकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर भारतात या नवीन कॉफी चेनचे आगमन एकूण धूमधडाक्यात झाले आहे व निदान मुंबईच्या चोखंदळ कॉफी रसिकांना तरी हा नवा चॉइस रुचला आहे असे म्हणता येईल.

मुंबईच्या फोर्ट या भागात असलेल्या हॉर्निमन सर्कल या स्थानावर 4500 चौरस फूट एवढ्या भल्या थोरल्या जागेत हे दुमजली कॅफे सुरू झाले आहे. हॉर्निमन सर्कल हे मुंबईच्या व्यापारी जगतातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेले व मनावर मोठे छाप पाडणारे असे एक ठिकाण आहे. चहूबाजूंनी वर्तुळाकार ऊंच ऊंच इमारती व मध्यभागी एक बाग असे स्वरूप असलेले हे ठिकाण,आपले पहिले कॅफे सुरू करण्यासाठी निवडून स्टारबक्सने आपली व्यापारी दूरदृष्टी किती अचूक आहे हे नक्कीच दाखवून दिले आहे. स्टारबक्सच्या या पहिल्या कॅफेत प्रवेश मिळवण्यासाठी बाहेर असलेल्या रांगा,शनिवार किंवा रविवार म्हणजेच वीक एन्डसना अधिक अधिक लांब होताना दिसत आहेत. आणि बाहेर रांगेत उभे रहाणार्‍या मंडळींना आपला हा वेळ फुकट जातो आहे असे अजिबातच वाटत नाहीये. कारण येथे पटकन एक कप कॉफी घेऊन पुढे जाऊ!” अशा उद्देशाने कोणीच आलेले नाही. हे सर्व ग्राहक,स्टारबक्स अनुभव,आरामात घेण्यासाठी म्हणून आलेले आहेत. सध्यातरी बहुतेक टेबले कॉलेज विद्यार्थीविद्यार्थिनी यांनीच भरलेली दिसतात. या सगळ्यांचा येथे येण्याचा उद्देश स्टारबक्स कॅफे बघण्याबरोबरच आपण सुद्धा येथे आलो आहोत हे इतरांनी बघावे हा असल्याने,बाहेर पडण्याची घाई कोणालाच दिसत नाही.

या देशी स्टारबक्सचा मेन्यू तरी काय आहे? भारतात यश मिळवायचे असले तर भारतीय रूचीला आवडतील असेच पदार्थ मेन्यूवर असणे आवश्यक आहे हे आता भारतात आलेल्या व खाद्यपदार्थ उद्योगातील प्रत्येक परदेशी कंपनीच्या लक्षात आलेले आहे. आंतर्राष्ट्रीय ब्रॅन्ड्चे नाव धारण करणार्‍या व भारतात उपहारगृहे चालवणार्‍या KFC, McDonald’s किंवा Pizza hut या सारख्या कंपन्यांच्या उपहारगृहात तुम्ही गेलात व मेन्यू कार्डवर नजर टाकलीत तर उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ भारतीय रुचीला व येथील समाज व्यवस्थेला रुचतील असेच बनवले जातात याची खात्री पटू शकते. मग स्टारबक्सने या बाबतीत काय पाऊले उचलली आहेत? हे कळण्यासाठी त्यांच्या मेन्यूकडे एक नजर टाकली तर स्टारबक्सने कॅफे सुरू करण्याआधी येथील खाद्यसंस्कृतीचा व्यवस्थित अभ्यास करूनच पहिले पाऊल टाकले आहे याची खात्री निदान मेन्यूवरून तरी पटू शकते. भारतातील अनेक समाजातील लोक हे पूर्ण शाकाहारी असतात, अगदी अंड्याला सुद्धा ते शिवत नाहीत. स्टारबक्सने अशा ग्राहकांसाठी स्वतंत्र काऊंटर्स चालू केले आहेत. सर्व खाद्य पदार्थ हे शाकाहारी व मांसाहारी अशा दोन निरनिराळ्या काऊंटर्समध्ये स्वतंत्रपणे बनवून किंवा गरम करून दिले जातात. हे गरम करण्याच्या भट्या सुद्धा निरनिराळ्या आहेत.

पेये मात्र अगदी आंतर्राष्ट्रीय म्हणजे स्टारबक्सच्या इतर देशातील मेन्यूप्रमाणेचन उपलब्ध आहेत. मात्र स्टारबक्स येथे वापरत असलेल्या कॉफी बिया, मात्र भारतातच पिकवलेल्या आहेत व त्या येथेच दळून घेतल्या जात आहेत. सटारबक्सची स्पेशालिटी मानली जाणारी “Caramel Frappuccino,” किंवा Chai Tea Latte” ही पेये सुद्धा येथे उपलब्ध आहेत. मात्र चहाला भारतात किंवा निदान मुंबईत चायअसेच संबोधले जात असल्याने चाय टीहे नाव जरा विनोदी वाटते.

स्टारबक्सने खास भारतासाठी म्हणून काही शाकाहारी पदार्थांची निर्मिती केलेली दिसते आहे. कारण हे पदार्थ जगात दुसरीकडे कोठेच मिळत नाहीत. ” चटपटा पराठा रॅपकिंवा कांद्याची पात, चीज, मिरी आणि चाट मसाला यांचा वापर केलेली ही डिश अशीच खास भारतातील खवय्यांसाठी बनवलेली दिसते आहे. त्याचप्रमाणे गरिबांच्या चमचमीत वडापावाचा श्रीमंत भाऊ, येथे char-grilled sliced potato and pepper in a ciabatta sandwich या नावाने वावरताना दिसतो आहे. मात्र जगभर अतिशय लोकप्रिय असलेले ब्लूबेरी व डबल चॉकलेट मफिन्स मात्र येथे त्याच स्वरूपात उपलब्ध आहेत. Elaichi Mawa Croissant ही मावा वापरलेली अशीच एक खास डिश भारतासाठी बनवलेल्या या मेन्यूवर आहे.

मांसाहारी पदार्थांची आवड असलेल्यांना चिकन पॅटीज सॅन्डविच, Murg tikka panini या नावाने उपलब्ध आहे. या शिवाय खास Tamarind Peanut Chicken Calzone” किंवा Konkani Twist या नावाचे मटन पफ या मेन्यूमध्ये आहे.

थोडक्यात सांगायचे तर स्टारबक्सने, भारतीयांना रुचतील असे फरक आपल्या आंतर्राष्ट्रीय मेन्यूमध्ये जरूर केलेले दिसत आहेत. परंतु सर्वसाधारण भारतीय ग्राहक हा अतिशय चोखंदळ आणि आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळतो की नाही हे पहाणारा असल्याने तो या स्टारबक्सच्या कॅफेजना पुढे कितपत लोकप्रियता मिळवून देईल? हा भविष्यातील एक अंदाजच अजून आहे. जोपर्यंत स्टारबक्समध्ये जाणे हा एक स्टेटस सिम्बॉल मानला जात आहे तोपर्यंत या कॅफेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी झुंबड लागणार आहे हे उघड आहे. परंतु या कॅफेजशी संख्या वाढून त्यांची दुर्मिळता जशी कमी कमी होत जाईल त्यावेळी ग्राहकांना टिकवून धरण्यासाठी स्टारबक्सने ग्राहकांना त्यांच्या पैशाचा भरपूर मोबदला दिला तरच मॅकडोनल्ड किंवा पिझ्झा हट या सारख्या साखळी उपहारगृहांची लोकप्रियता स्टारबक्स कॅफेजना लाभू शकेल.

16 डिसेंबर 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “कसे आहे देशी स्टारबक्स ?

 1. सुंदर व मार्मिक विवेचन केले आहे.
  भारतात ह्याचा सी सी डी वर काय परिणाम होतो. हे पाहणे मनोरंजक आहे.
  ह्या आधी कोस्टा ने आपला जम बसवलेला आहे.

  Posted by nskbond007 | डिसेंबर 16, 2012, 5:56 pm
 2. मालाड च्या ओबेरॉय मॉल मधे पण आहे . अजून जायची इच्छा झालेली नाही 🙂

  Posted by महेंद्र | डिसेंबर 17, 2012, 7:04 सकाळी
  • महेंद्र
   प्रतिसादासाठी धन्यवाद. हळूहळू बर्‍याच स्थानांवर ही कॅफेज उघडली जातीलच. मग बघायचे की भारतीयांना स्टारबक्स अनुभव आवडतो की नाही ते!

   Posted by chandrashekhara | डिसेंबर 17, 2012, 8:27 सकाळी
 3. Wow Nice info.. thanks for sharing..

  Posted by Gaurav Vyavahare | डिसेंबर 18, 2012, 9:46 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: