.
अनुभव Experiences, ताज्या घडामोडी Current Affairs, History इतिहास

इतिहासाची चोरी


मागच्या एका लेखात मी तमिळनाडू राज्यातील सुतमल्ली या लहानशा गावातील एका फारशा कोणाला माहिती नसलेल्या मंदिरातील नटराजाची चोरी व हीच मूर्ती कर्मधर्मसंयोगाने न्यूयॉर्कमधील व आता कुप्रसिद्ध ठरलेल्या आर्ट ऑफ द पास्टया आर्ट गॅलरीत कशी सापडली होती याची माहिती दिली होती. सुभाषचंद्र कपूर या नावाचा एक अनिवासी भारतीय व त्याची निंबस इम्पोर्ट अ‍ॅन्ड एक्स्पोर्टही कंपनी हे दोन्ही या चोरीच्या व्यवहाराला मुख्यत्वे जबाबदार असल्याचे लक्षात आले होते. आता याच व्यक्तीने व त्याचे इतर चोर व गुन्हेगार असलेले सहभागी यांनी, याच प्रकारचे अनेक चोरीचे गुन्हे केल्याचे आढळून येते आहे व त्याबद्दलची अधिक अधिक माहिती बाहेर येऊ लागली आहे.

या प्रकरणातील आरोपी सुभाषचंद्र कपूर हा दक्षिण व आग्नेय एशियामधील सांस्कृतिक ठेवा व प्रत्यक्ष इतिहास मानल्या जाणार्‍या ऐतिहासिक वास्तूंची गेली अनेक दशके लूटमार करणार्‍या एका कुटुंबातच जन्माला आला असल्याचे नुकतेच लक्षात आले आहे. या सुभाषचंद्राचा बाप म्हणजे पुरुषोत्तम राम कपूर हा अत्यंत धिटाई दाखवणारा एक गुंड असा चोर होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या कालापासून भारतातील सांस्कृतिक ठेवा समजला जाणारी मंदिरे व इतर वास्तू यांच्यामधील वस्तूंची लूटमार त्याने चालू केलेली होती.

तसे पहायला गेले तर तात्त्विक रित्या भारतातील कोणत्याही पुराण वस्तूची चोरी करणे ही एक अशक्य बाब आहे. भारतीय कायद्यांप्रमाणे खाजगी मालकीच्या वस्तूंसह सर्व पुराण वस्तूंची रीतसर नोंद योग्य त्या शासकीय अधिकार्‍याकडे करणे हे अनिवार्य आहे. त्यांच्या निर्यातीवर संपूर्णतः बंदी घातलेली आहे. या वस्तूंच्या प्रती कोणास नव्याने काढावयाच्या असल्यास पुरातत्व विभागाकडून या प्रती ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या नसल्याचे रीतसर प्रमाणपत्र घेतल्यानंतरच त्या वस्तुंची निर्यात करणे शक्य असते. अशा प्रकारच्या पुराणवस्तु किंवा कलाकुसरीच्या वस्तू यांची निर्यात करताना त्यांची कस्टम विभागाकडून कडक तपासणी होणे आवश्यक असते.

या कडक भासणार्‍या नियमांवर मात करण्यासाठी सुभाषचंद्र कपूर याने मोठ्या अक्कल हुषारीने व शिताफीने एक कुमार्गी मद्धत शोधून काढली होती. या व्यवहारात तो वैयक्तिक रित्या कधीच भाग घेत नसे. त्याने स्थानिक पातळीवरील भुरटे चोर व चोरटा व्यापार करणारे दलाल यांची पद्धतशीर कार्य करणारी एक सोनेरी टोळी बनवली होती. हे भुरटे चोर भारतातील फारशी कोणास माहिती नसलेली व असंरक्षित अशी संग्रहालये व देवळे यांच्यात कोणत्या गोष्टी चोरण्यासारख्या आहेत याचा शोध घेऊन नंतर त्या चोरत असे. संजिवी अशोकन हा कुविख्यात चोर या सोनेरी टोळीचा भारतातील मुख्य होता. कपूर याच्याशी हातमिळवणी करून या चोरीच्या व्यवहारात सामील असलेल्या, स्थानिक हस्तकला व कलाकुसरीच्या वस्तूंच्या किरकोळ व्यापार्‍यांकडे, या चोरलेल्या वस्तू संजिवी अशोकन याच्या मार्फत पोहोचत असत.

अधिकृत प्रमाणपत्र मिळालेल्या व खरेदीचे बिल असलेल्या नवीन मूर्ती, हस्तकला व कलाकुसरीच्या इतर वस्तू यांची मोठ्या कंटेनरमधून निर्यात करताना कपूरच्या टोळीचे हस्तक असलेले अशा वस्तूंचे किरकोळ व्यापारी, चोरीच्या वस्तू त्यात बेमालूमपणे लपवत असत आणि कस्टम अधिकार्‍यांचे हात ओले करून चोरलेल्या वस्तू निर्यात करत. या शिवाय ही टोळी अवलंबत असलेला दुसरा मार्ग म्हणजे चोरीच्या वस्तू सारख्याच हुबेहुब दिसतील अशा अनेक डुप्लिकेट वस्तू तयार करून घेऊन त्यांच्यात चोरीचा माल मिसळून टाकत. डुप्लिकेट वस्तू नवीनच बनवलेल्या असल्याने त्यांचे अधिकृत प्रमाणपत्र लगेच मिळणे शक्य होत असे. अशा डुप्लिकेट वस्तुंबरोबर चोरीचा माल मिसळल्याने कस्टम अधिकार्‍यांना तो शोधणे शक्य नसे व चोरीचा माल निर्यात होत असे. कपूर एक काळजी नेहमी घेत असे. चोरीच्या माल असलेली कोणतीही कनसाइनमेन्ट थेट आपल्या न्यूयॉर्क मधील गॅलरीच्या पत्त्यावर पाठवली जाणार नाही याची तो काळजी घेई‘. झूरीच, सिंगापूर, लंडन किंवा हॉन्गकॉन्ग मधील मैत्रीचे संबंध असलेल्या दुसर्‍या आर्ट गॅलरी किंवा दलाल यांच्याकडे या चोरीच्या कनसाईनमेन्ट्स जात असत. यासाठी कपूरने कशा पद्धतीने चोरीचा माल एका ठिकाणाहून दुसरीकडे कसा न्यायचा याची एक ठराविक पद्धत बनवली होती व आपले जगभरचे जाळे व्यवस्थित पसरवून ठेवले होते. एकदा का चोरीचा माल या ठिकाणी पोचला की हे दलाल त्यांच्या अधिकृत पत्त्यावरून तो लंडन किंवा न्यूयॉर्क येथे लिलाव करण्यासाठी अधिकृतपणे पाठवत असत.

कपूरच्या या सोनेरी टोळीने आपले बस्तान इतके मजबूत बसवले होते की 1980 ते 2010 या कालात त्यांनी जगभरच्या सांस्कृतिक ठेवा असलेल्या अशा किती गोष्टी लंपास केल्या असतील याची आपल्याला कल्पना करणेही शक्य नाही. अशा चोरीच्या प्रकरणांपैकी फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच प्रकरणे उघडकीस येऊ शकली आहेत. त्यापैकी काही या प्रमाणे आहेत.

1. सन 1983 मध्ये राजस्थान पोलिसांनी हस्तकला वस्तूंचा विक्रेता असलेल्या वामन नारायण घिया या व्यक्तीला अटक केली. त्याचे दुकान म्हणजे फक्त एक बाह्य देखावा होते. प्रत्यक्षात चोरीच्या मालाच्या निर्यातीचे ते एक केंद्रस्थान होते. पोलिसांना त्याच्या दुकानात 348 चोरीच्या मूर्ती, एक मुघल कालीन पॅव्हेलियन आणि अनेक प्रकारच्या पुरातन वस्तूंचा एक प्रचंड साठा मिळाला. या मालाबरोबरच सॉथबी व ख्रिस्ती या जगप्रसिद्ध लिलावाची बोली लावणार्‍या लिलावदारांचे भारतीय व अग्नेय एशिया मधील लिलावासाठी उपलब्ध असलेल्या मूर्ती व पुराणवस्तूंचे 34 कॅटलॉग त्याचेकडे मिळाले. या कॅटलॉगमधील वस्तूंपैकी अंदाजे 700 वस्तू आपल्या दुकानामार्फत परदेशात गेल्याचे घिया याने पोलिसांसमोर मान्य केले.

2. सन 2007 मध्ये मुंबईच्या कस्टम अधिकार्‍यांनी सुभाषचंद्र कपूर याच्या निंबस इंम्पोर्ट एक्सपोर्ट कॉर्पोरेशन कडे पाठवण्यात येत असलेली तथाकथित संगमरवरी दगडांची बनवलेली, बागेतील वापराच्या टेबलांची एक निर्यात कनसाईनमेन्ट अडवली. तपासणी केल्यावर त्यात चोला कालातील अनेक मौल्यवान मूर्ती असल्याचे आढळून आले. यापैकी काही मूर्तींची किंमत लाखो डॉलर्स एवढी होत होती. ही पकडली गेलेली कनसाईनमेन्ट एका दृष्टीने फार महत्त्वाची ठरली. कारण फाजील आत्मविश्वास आल्याने सुभाषचंद्र कपूर याने ही कनसाईनमेन्ट आपल्या न्यूयॉर्क मधील पत्त्यावर मागवून आपल्या चौर्यकर्म आयुष्यातील पहिली व सर्वात मोठी चूक केली होती. त्याला पोलिसांनी जेंव्हा चौकशीसाठी बोलावले तेंव्हा त्याने ही कनसाईनमेन्ट अवैध असल्याचे मान्य केले व त्यातील मालावरील आपला हक्क सोडून दिला. या क्षणापासून भारत व न्यूयॉर्क मधील गुप्तचर खात्यांना कपूरच्या अवैध धंद्याचा सुगावा लागला व त्याच्या प्रत्येक हालचालीकडे पोलिस बारकाईने लक्ष देऊ लागले.

3. सन 2009 मध्ये मुंबई कस्टम अधिकार्‍यांना 15 व्या शतकातील सॅन्डस्टोन पाषाणातून बनवलेल्या शिवपार्वतीच्या मूर्ती, खोटे कागद्पत्र करून अस्तित्वात नसलेल्या पत्त्यावर निर्यात होत असताना मिळाल्या. या मूर्ती सुभाषचंद्र कपूर याचा एक जवळचा साथीदार व हाशिशचा स्मगलर, किशोर भट याने निर्यात केल्या होत्या. किशोर भट अजूनही इंग्लंडमध्ये असून पुराव्याअभावी पकडला गेलेला नाही

आता अशाच काही वस्तूंची एक यादी. या सर्व वस्तू चोरी करून निर्यात केलेल्या होत्या व आता त्यांचा ठावठिकाणा मिळालेला आहे.

1. पथुर नटराज हा तमिळनाडू मधून 1976 मध्ये चोरीस गेला. 1982 मध्ये ब्रिटिश म्युझियम मध्ये अवतीर्ण झाला. एका मोठ्या कायदेशीर लढाई नंतर 1991 मध्ये भारतात परत.

2. शिवपुरम नटराज ब्रॉन्झ, 1956 मध्ये चोरीस गेला. अमेरिकेतील नॉर्मन सायमन फाऊंडेशन यांनी तो विकत घेतला आणि न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी 1973 मध्ये ठेवण्यात येणार होता. कायदेशीर लढाईनंतर 10 वर्षे प्रदर्शनानंतर तो भारताला परत करण्याचे त्यांनी मान्य केले.

3. कपूरच्या आर्ट ऑफ द पास्ट गॅलरीमधून न्यूयॉर्क पोलिसांनी सुथमल्ली, तमिळनाडू येथील ब्रॉन्झ नटराज, चोरलेल्या ठिकाणाचा पत्ता न मिळू शकलेली एक देवतेची मूर्ती, गांधार कुषाण कालातील 3 मूर्ती, एक अप्रतिम सुंदर गणेशमूर्ती, बोधिसत्व पाषाणमूर्ती (अंदाजे किंमत 12000 हजार डॉलर) 22000 डॉलर किंमत असलेल्या 2 भारतीय पुराणवस्तू पुराणवस्तू आणि 3,28,600 डॉलर किंमतीच्या 22 लाकडी पुराणवस्तू जप्त केल्या आहेत.

चोरलेल्या मूर्ती व पुराणवस्तू यांचा आजमितीला होत असलेला जागतिक व्यापार अनेक कोटी शतके डॉलर्स एवढा होत असावा असा अंदाज आहे. इंटरपोलच्या मताने, हा व्यापार, हत्यारे व मादक पदार्थ यांच्या अवैध व्यापाराइतकाच धोकादायक आहे. परंतु मला सर्वात दुःखदायक काय वाटत असेल तर ज्या देशातील अशा पुराणवस्तू चोरल्या जातात त्या देशाच्या इतिहासाची व संस्कृतीची पुन्हा कधीही भरून न येणारी अपरंपार हानी या चोरट्या व्यापारामुळे दुर्दैवाने होते. कंबोडियातील यादवी युद्धात तेथून गायब झालेल्या मोठ्या पाषाणमूर्ती नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये उजेडात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान मधून गायब झालेल्या पुराणवस्तू नियमितपणे युरोपीय शहरांमध्ये सापडत आहेत. कदाचित युरोप अमेरिका व इतर श्रीमंत राष्ट्रांमधील धनवान व गब्बर मंडळींना आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचा हा मार्ग वाटत असेल. परंतु ज्या देशांतून या वस्तू मूलतः चोरल्या गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी या वस्तू म्हणजे देशाच्या इतिहासाचा एक दुवा असल्याने या वस्तूंची चोरी ही त्या देशांच्या इतिहासचीच चोरी मानली पाहिजे.

( हा लेख द हिंदू या वृत्तपत्रात आलेल्या या विषयांवरील काही लेखांवर आधारित आहे. लेखासोबत असलेली सर्व छायाचित्रे सुद्धा द हिंदू या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहेत.)

13 डिसेंबर 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “इतिहासाची चोरी

 1. मराठी वाचकांना तुम्ही फार सुंदर माहिती देऊन ह्या पुरातन वस्तूंच्या तस्करी बद्दल माहिती दिलीत.

  Posted by ninad kulkarni | डिसेंबर 14, 2012, 4:04 सकाळी
 2. Very informative article. Feels really bad when our own people want to sell the history to someone like that. 😦 I watch a TV serial in US where a con-man works for a division where they find such thefts. It feels fun, but reading this, i can imagine how sad it is to actually happen to someone.
  -Vidya.

  Posted by Vidya | डिसेंबर 14, 2012, 4:29 सकाळी
 3. it’s all horrifying! and what is worst is that our own people for their greed are doing such disgusting acts. one gets a feeling of hopelessness for the future of India and our following generations!

  Posted by arunaerande | डिसेंबर 14, 2012, 2:44 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: