.
ताज्या घडामोडी Current Affairs

शांततेच्या मृगजलामागे


माझे आजोळ खरे म्हणजे रायगड जिल्ह्यातले! परंतु त्या बाजूचे सर्व नातेवाईक मुंबईला येऊन चाकरमाने झालेले! व आपले सर्व आयुष्य मुंबई या महानगरात घालवलेले पक्के मुंबईकर! त्यामुळे शाळेला लागलेल्या प्रत्येक सुट्टीत माझा मुंबईला मुक्काम हा होतच असे. मी लहान असताना माझे मामा पुष्कळ वेळा काही जुन्या गोष्टी सांगत रहात. या जुन्या गोष्टींपैकी त्यांनी अनेक वेळा सांगितलेली आठवण म्हणजे मुंबईचे जातीय दंगे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईला हिंदूमुस्लिम दंगे खूप मोठ्या प्रमाणात होत असत. जाळपोळ, दगडफेक, खून आणि मार्‍यामार्‍या यांना ऊत येत असे. माझे मामा मोठ्या आवेशात या दंग्यांचे वर्णन करीत की त्या वेळेला या दोन जमातीत वैरभाव कसा उफाळून आला होता? किंवा मुंबई शहराचे द्विभाजन त्या वेळी जातिनुसार कसे होत असे? वगैरे, वगैरे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतेक कट्टर मुसलमान पाकिस्तानला निघून गेले आणि त्या नंतर काही वेळा जरी जुने ताणतणाव मधून मधून डोके काढत असलेले दिसले तरी या जमातीमधील वैर भावना व दुफळी हळूहळू कमी होत गेली व निरनिराळ्या जातीजमातीच्या शेजार्‍यांबरोबर गुण्यागोविंदाने कसे नांदायचे हे मुंबईकर शिकत गेले.

मुंबईच्या भूतकालातील या अप्रिय कालावधीची आठवण मला आजच्या वृत्तपत्रातील एक बातमी वाचल्यावर प्रकर्षाने होते आहे. ही बातमी आहे दक्षिणपूर्व एशिया मधला नवा व क्लेशदायक असा धार्मिक संघर्ष जेथे उफाळून आला आहे त्या ब्रम्हदेशाच्या रखिन (Rakhine) राज्यातल्या सितवे (Sittwe) या शहरातील दंग्याबद्दल! या पूर्वी लिहिलेल्या एका लेखात मी या राज्यातील तणावग्रस्त परिस्थिती व त्याचे भारतातील मिझोराम राज्यावर होणारे दूरगामी परिणाम याचे व्यापक विवेचन केले होते. रखिन राज्याची राजधानी असलेल्या सितवे शहरात जून 2012 मध्ये नवे जातीय दंगे उफाळून आले होते. हे दंगे सुरू होण्यासाठी कारणीभूत ठरली होती ती, एका बौद्ध महिलेवर झालेला अत्याचार व तिचा खून या तथाकथित बातमीची अफवा. या वेळी भड्कलेल्या दंग्यांत 78 लोक मृत्यूमुखी पडले होते, 5000 निवासस्थाने जाळली गेले होती आणि 75000 हून अधिक लोक निर्वासित झाले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात दंगे परत भडकले. ब्रम्हदेशाचे अध्यक्ष श्री. थेइन सेइन (Mr . Thein Sein) यांनी स्वत: सांगितल्याबरहुकूम कमीत कमी 89 लोक या वेळी मृत्यूमुखी पडले असून 136 जखमी झाले आहेत. 5351 निवासस्थाने आगीच्या भक्षस्थळी पडली आहेत तर आणखी 32000 लोक निर्वासित झाले आहेत. या आकड्यांवरून या जातीय वैमनस्यतेने किती भीषण व भयंकर रूप धारण केले आहे याची सहज कल्पना येऊ शकते.

आता सितवे शहरात वर वर सर्व काही आलबेल दिसत असले तरी ही फसवी शांतता आहे व शहर अतिशय तणावाखाली असून अंतर्यामी खदखदत आहे ही जाणीव येथे राहणार्‍या सर्वांनाच आहे. जून व ओक्टोबर महिन्यामध्ये येथे झालेले दंगे हे राखिन राज्याचे रहिवासी असलेले बौद्ध धर्मिय व रोहिंग्या ही मुस्लिम जमात या मध्ये भडकले होते. या रोहिंग्या जमातीच्या लोकांना रखिन लोक बंगाली या नावाने ओळखतात. विस्थापित झालेले सर्व रोहिंग्या जमातीचे लोक आता सितवे शहराच्या एका कोपर्‍यात असलेल्या आणि अस्वच्छ व घाणीने भरलेल्या अशा निर्वासित छावण्यांत रहात आहेत. उदाहरणार्थ ते चुआंग (Te Chaung) छावणी निरनिराळ्या वयोगटाच्या लोकांनी भरून वाहत आहे. अधिकृत रित्या येथे 18500 निर्वासित राहतात, प्रत्यक्षात हा आकडा बराच जास्त असावा. जून 2112 मध्ये सितवे शहराच्या नाझिर या भागातली रोहिंग्या मुस्लिमांची निवासस्थाने जेंव्हा पेटवली गेली तेंव्हा प्रथम या छावणीमधे विस्थापित म्हणून रोहिंग्या जमातीचे लोक आश्रयासाठी आले. ऑक्टोबर 2012 मध्ये 5000 लोकांच्या एका जमावाने क्याउकफ्र्यु (Kyaukphyu) या वस्तीमधील 800 निवासस्थाने पेटवून दिली. त्यानंतर 20 तास प्रवास करून या वस्तीमधील आणखी विस्थापित ते चुआंग छावणीमध्ये आले.

सितवे शहरामधेच ते चुआंग छ्वणीसारख्या आणखी चार छावण्या आहेत. दंग्यांत जे रखिन बौद्ध विस्थापित झाले आहेत ते बहुतेक सर्व नाझिर छावणीमधे रहात आहेत. या छावणीमधली परिस्थिती इतर छावण्यांपेक्षा बरीच बरी आहे. नाझिर छावणीमधे असलेल्या प्रत्येक कॅम्प्मध्ये 700 ते 1000 विस्थापित रहात आहेत. बांबू व फळ्या यांचा वापर करून बांधलेल्या व त्यावर पत्र्याचे छप्पर असलेल्या झोपड्यांत हे विस्थापित रहात आहेत. आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक कॅम्पमधे स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहेत. असे असले तरी नाझिर छावणीमधल्या सर्व विस्थापितांची तक्रार आहे की आलेली मदत सर्वच्या सर्व रोहिंग्या मुस्लिमानाच दिली जात आहे.

रखिन बौद्ध आणि ब्रम्हदेशाचे सरकार यांच्या मताने रोहिंग्या मुसलमान हे वास्तविक: बांगलादेशी नागरिक आहेत. चेहर्‍यावरून तरी ते ब्रम्हदेशाचा शेजारी असलेल्या बांगलादेशाचे नागरिक वाटतात आणि बंगालीशी साधर्म्य वाटणारी भाषा बोलतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बरेच रोहिंग्या सफाईदार् रित्या उर्दू बोलू शकतात. ही भाषा त्यांनी कशी आत्मसात केली? असे विचारल्यावर बॉलिवूड चित्रपटांमुळे आपल्याला उर्दू बोलता येते असे ते म्हणतात. परंतु हे सगळे जरी सत्य असले तरी वस्तुस्थिती सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की रोहिंग्या अनेक पिढ्या अन पिढ्या ब्रम्हदेशात रहात आहेत.

संयुक्त राष्ट्र संस्था व Médecins Sans Frontières आणि Action Against Hunger याअ साअरख्या काही सेवाभावी संस्था ब्रम्हदेश सरकारने दिलेल्या संरक्षणाखाली या विस्थापितांना मदतीचे कार्य करत आहेत. परंतु मूळ वाद सुटला नाही तर या प्रकारचे दंगे परत उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या जातीय दंग्यांचा प्रभाव दक्षिणपूर्व राष्ट्रांची संघटना The Association of Southeast Asian Nations or ASEAN हिच्यावरही पडला आहे. या संघटनेची एकी या आधीच, दक्षिण चीन महासागरामधील विवादास्पद बेटांवर स्वामित्व सांगणार्‍या चीनच्या कुटील कारवायांनी भंग पावलेली आहे. या संघटनेमधील मलेशिया, इंडोनेशिया व ब्रुनेई या देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत तर कंबोडिया, ब्रम्हदेश, व्हिएटनाम व सयाम येथे बौद्ध धर्मीय बहुसंख्य आहेत. या कारणामुळे एसिआन संघटनेला रोहिंग्या पुनर्वसनच्या बाबतीत निर्णय एकमताने घेणे मोठे अवघड बनले आहे.

ब्रम्हदेश सरकार, देशात असलेले सर्व 8 लाख रोहिंग्या मुसलमान हे बांगलादेशातून आलेले बेकायदेशीर निवासित आहेत असे अधिकृत रित्या म्हणते. मात्र बांगलादेशी सरकारला ही भूमिका मान्य नसून ते त्यांना बांगलादेशात प्रवेश देण्यास राजी नाहीत.

या कारणांमुळे भारताला अशी भिती वाटते आहे की रोहिंग्या पुनर्वसनाचा वाद जर कायमस्वरूपी पद्धतीने लवकर मिटला नाही तर मिझोरामच्या सीमेवरून रोहिंग्या विस्थापितांचा ओघ मिझोरामकडे सुरू होईल. आसाम मध्ये नुकतेच झालेले जातीय दंगे आणि ईशान्येकडील राज्यांतील परिस्थिती या पार्श्वभूमीवर मिझोरामब्रम्हदेश सीमा ही पूर्णपणे असुरक्षित असल्याने भारताला ही काळजी साहजिकच वाटते आहे. वाटते आहे. बांगलादेशी सरकारने प्रवेश देण्याचे नाकारल्यानंतर मोडक्या तोडक्या बोटींवरून प्रवास करणार्‍या रोहिंग्या विस्थापितांचा लोंढा मलेशियाकडेही सुरू झालेला आहे. मलेशियामध्ये या आधीच अधिकृत पंजीकरण झालेले रोहिंग्या मुसलमान आहेत. बांगला

ब्रम्हदेशातील लोकप्रिय व शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या नेत्या, आंग सान सू चि (Aung San Suu Kyi) यांनी या विषयावर मौन बाळगणेच पसंत केले असून पश्चिम ब्रम्हदेशातील या भयानक जातीय दंग्यांबाबत आपण आपल्या नैतिक नेतृत्वाचा उपयोग करून कोणत्याही एका बाजूच्यातर्फे बोलणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्या म्हणतात की जोपर्यंत लोक एकमेकाचा जीव घेण्यासाठी टपलेले आहेत आणि एकमेकांच्या घरांना आगी लावत आहेत तोपर्यंत आपण कोणत्या आधाराने हा विवाद सोडवणार आहोत?”

रोहिंग्या प्रश्नाचे जर लवकर निरसन झाले नाही आणि हा प्रश्न सुटला नाही तर दक्षिण पूर्व एशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशा बाळ्गणे हे मृगजळामागे धावण्याप्रमाणेच असणार आहे. ब्रम्हदेशातील जातीय दंग्यांमुळे होणार्‍या रक्तपाताचे पर्यावसान अफगाणिस्तान मधील यादवी युद्धाप्रमाणे शेवटी अतिरेकी कारवायांमध्ये होण्याची शक्यता चांगलीच बळावली आहे. दुर्दैवाने ते तसे झाले तर संपूर्ण दक्षिण पूर्व एशिया मधील परिस्थिती अस्थिर होणे शक्य आहे.

5 डिसेंबर 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “शांततेच्या मृगजलामागे

  1. सहमत आहे.
    ईशान्य भारतात सीमेवर तटबंदी करणे व चौक्या वाढवणे अश्या अनेक गोष्टी सरकारने तातडीने केल्या पाहिजेत.

    Posted by ninad kulkarni | डिसेंबर 8, 2012, 5:47 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: