.
Travel-पर्यटन

झिंबाब्वे मधील हत्तींना पाण्याचे दुर्भिक्ष


आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील, झांबेझी व लिम्पोपो या दोन नद्यांच्या मधल्या प्रदेशात, सर्व बाजू इतर राष्ट्रांनी वेढलेला झिंबाब्वे हा देश आहे. याच्या दक्षिणेला साऊथ आफ्रिका, नैऋत्येला बोटस्वाना आणि पूर्वेला मोझॅम्बिक या देशांच्या सीमा आहेत.

झिंबाब्वेचा पूर्वेकडचा भाग जरी डोंगराळ असला तरी उर्वरित देशामधील 20% भाग हा सपाट व शेती करण्यास अनुकूल असा ग्रामीण भाग आहे.जगामधील सर्वात मोठा व भव्य असा समजला जाणारा व्हिक्टोरिया धबधबा याच देशाच्या ईशान्य भागात झांबेझी नदीवर आहे. या देशाचे हवामान सौम्य स्वरूपातील उष्ण कटिबंधीय किंवा विषुव वृत्तीय म्हणता येईल असे असते व पावसाळा साधारण ऑक्टोबर अखेरीपासून ते मार्च महिन्यापर्यंत येतो. या अशा भौगोलिक कारणांमुळे झिंबाब्वेचा बहुतेक भूभाग हा मधून मधून खुजी झाडे व झुडुपे असलेला सपाट गवताळ प्रदेश (savanna) या वर्गात मोडतो. मात्र पूर्व झिंबाब्वेचा डोंगराळी प्रदेश हा मात्र सदा हरित अशा विषुव वृत्तीय जंगलांनी भरलेला आणि दमट हवामान असलेला आहे. झिंबाब्वे मध्ये 350 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. त्यांमध्ये ज्यांना मोठे 5′ या नावाने ओळखले जाते त्या हत्ती, सिंह, चित्त, गवा आणि वंश नष्ट होण्याचा धोका असलेला गेंडा या प्राण्यांचाही समावेश आहे.

हवान्गे राष्ट्रीय उद्यान (Hwange National Park) किंवा पूर्वीचे वॅन्की गेम रिझर्व्ह (Wankie Game Reserve) हे झिंबाब्वेमधील सर्वात मोठे असलेले अभयारण्य आहे. झिंबाब्वे मधील 2 क्रमांकाचे मोठे शहर बुलावायो (Bulawayo) आणि व्हिक्टोरिया धबधबा यांना जोडणार्‍या रस्त्यावर हे अभयारण्य लागते. या अभयारण्याची स्थापना 1949 मध्ये केली गेली होती. 14600 वर्ग किमी एवढे आवार असलेले हे अभयारण्य त्यात असलेल्या बडे 5 किंवा हत्ती, सिंह, चित्ते, गवे आणि नष्ट होण्याचा धोका असलेले गेंडे या प्राण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. या अभयारण्यात असलेल्या हत्तींची संख्या सध्या सुमारे 35000 ते 40000 याच्या दरम्यान आहे. अभयारण्याच्या अधिकार्‍यांच्या मताने ही संख्या या अभयारण्याच्या क्षमतेच्या दुपटीने आहे.

हत्तींच्या संख्येत एवढी मोठी वृद्धी झाल्याने या अभयारण्यात असलेल्या जनावरांना पिण्यासाठी म्हणून आवश्यक असलेल्या पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.. या मोठ्या संख्येत असलेल्या या हत्तींची तहान भागवण्यासाठी अभयारण्याच्या अधिकार्‍यांनी आता 45 नवे डिझेल इंजिनावर चालणारे पंपसेट्स बसवले आहेत. अभयारण्यातील अनेक जागी बोअरवेल खणून त्यातील पाणी पंप करून अभयारण्याच्या अगदी अंतर्भागापर्यंत असलेल्या अनेक तळ्यांच्यात साठवण्यात येते आहे. सध्या पाण्याचा दुष्काळ असलेल्या हवान्गे अभयारण्यातील जनावरांना पाणीपुरवठा करण्यासाठी हे डिझेल इंजीन पंप सतत चालू असतात. अभयारण्यातील सर्व जनावरांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मागच्या जून महिन्यापासून यातल्या प्रत्येक पंपामागे दर आठवड्याला 200 लिटर तरी डिझेल वापरले जाते आहे. हे पंप बहुधा पाऊस येइपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 2012 पर्यंत तरी चालवावे लागणार आहेत. झिंबाब्वे नॅशनल पार्क्स व वाइल्ड्लाईफ अ‍ॅथॉरिटीच्या एका शास्त्रज्ञाच्या मताने पंप केलेल्या पाण्याच्या 90 टक्के पाणी हे हत्तींनाच पिण्यासाठी लागते. त्याने केलेल्या एक मोठ्या रोचक निरिक्षणाप्रमाणे या अभयारण्यातील हत्तींना आता हे माहीत झाले आहे की ज्या ठिकाणी डिझेल पंपाचा आवाज ऐकू येतो आहे त्याच्या जवळपास कोठेतरी पिण्याचे पाणी उपलब्ध असणार आहे. या निरीक्षणामुळेच, या भल्या थोरल्या जनावराच्या बुद्धीमत्तेच्या एक पैलूवर नवा प्रकाश पडला आहे. असे या शास्त्रज्ञाला वाटते.

जनावरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या या प्रकल्पाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत असे पार्क अधिकार्‍यांना वाटते आहे. 2011 मध्ये अतिशय गरम हवा व पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे 77 हत्ती मृत्यूमुखी पडले होते. ती संख्या या वर्षी 17 पर्यंत खाली आली आहे. बर्‍याच पर्यावरणवाद्यांना मात्र, प्राण्यांना या प्रकारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची कल्पना मान्य नाही. त्यांच्या मताने हे निसर्गचक्राच्या विरूद्ध आहे व यामुळे नैसर्गिक रित्या अभयारण्याच्या क्षमतेनुसार हत्तींची संख्या मर्यादित राहू शकत नाहीये.

या अभयारण्यामधील झाडे, झुडुपे व गवत यासारख्या हिरवाईवर हत्तींच्या संख्येतील बेसुमार वाढीचे बरेच दुष्परिणाम दिसू लागले आहेत व हिरवाई कमी होऊ लागली आहे आणि झाडांची वाढ जशी होणे आवश्यक आहे त्या प्रमाणात होत नाही. झाडांपासून तयार होणार्‍या बिया कमी प्रमाणात तयार होत आहेत. हत्ती झाडांवर आपले आंग घासत असतात तसेच झाडांची मुळे खाण्यासाठी उकरण्याचा प्रयत्न करत राहतात यामुळे झाडांची पाने व फांद्या यांची जोमदार वाढ होत नाही. पर्यावरण तज्ञांच्या मताने आफ्रिकेतील गवताळ प्रदेशाचे (Savanna) पर्यावरण हे उंच झाडांची संख्या व भोवतीचा गवताळ प्रदेश यांच्यामधील समतोलावर आधारित आहे. जर गवताळ प्रदेश वाढला व झाडांची संख्या कमी झाली तर या झाडांच्या आश्रयाने राहणारे छोटे प्राणी व कीटक यांची संख्या कमी होऊन ते नामशेष होण्याच्या मार्गाला लागू शकतात.

पर्यावरण तज्ज्ञांचे काहीही म्हणणे असले तरी पर्यावरणासाठी हत्तींची संख्या कमी करणे हे झिंबाब्वेच्या अर्थव्यवस्थेला परवडण्यासारखे नाही कारण जलद विकास होत असलेला पर्यटन व्यवसाय या अर्थव्यवस्थेला एक संजीवनी ठरला आहे. मागच्या काही दशकातील राजकीय अनागोंदी मुळे पर्यटकांनी झिंबाब्वेकडे पाठच फिरवली होती. ते आता परत हळूहळू येऊ लागले आहेत. व या पर्यटकांसाठी झिंबाब्वेचे हत्ती हे सर्वात मोठे आकर्षण असते. गवताळ प्रदेशातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी हत्या करून हत्तींची संख्या कमी करण्याच्या मान्यतेला शासकीय पाठिंबा मिळणे अशक्यच आहे. या कारणामुळे वन अधिकारी, बेसुमार वाढ झालेल्या हत्तींच्या संख्येत कपात होईल असा दुसरा मार्ग शोधण्याच्या मागे आहेत.

22 नोव्हेंबर 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “झिंबाब्वे मधील हत्तींना पाण्याचे दुर्भिक्ष

 1. अभिनंदन आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर करण्यात आला आहे.
  अधिक माहितीसाठी भेट द्या.

  http://www.Facebook.com/MarathiWvishv
  http://www.MWvishv.Tk
  http://www.Twitter.com/MarathiWvishv

  धन्यवाद..!!
  मराठी वेब विश्व – मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
  आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

  टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!

  Posted by मराठी वेब विश्व (@MarathiWvishv) | नोव्हेंबर 23, 2012, 2:09 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: