.
Health- आरोग्य

माझ्या बागेमधला केर-कचरा


भारतातील सर्वात सुंदर शहरांच्या यादीत गणना होणार्‍या बेंगलुरू शहरातील एका जगप्रसिद्ध संस्थेमधून मी 1960च्या दशकात पदवीधर झालो होतो. रूंद आणि दोन्ही बाजूंना असलेल्या घनदाट वृक्षराईखाली असलेले दाट सावलीमधले रस्ते, शहराच्या मध्य भागात असलेली विस्तीर्ण उद्याने, मोठी आरामदायी हवा आणि मला अतिशय प्रिय असलेली कॉफी हाऊसेस, यामुळे हे शहर अजूनही माझ्या स्मरणात पक्के आहे. त्या वेळेस बेंगलुरूकर मजेने म्हणत असत की बेंगलुरू हे नैसर्गिक रित्याच वातानुकूलित असलेले शहर आहे. इथे कधीच गरम किंवा फार थंड होत नाही. आणि ते बहुतांशी खरेही होते. परंतु पुढे जसजसा काळ गेला तसे बेंगलुरूमध्ये प्रथम कारखानदारी आली आणि इ.. 2000 नंतर माहिती तंत्रज्ञान उद्योग अतिशय झपाट्याने व मोठ्या प्रमाणात बेंगलुरूमध्ये वाढत गेला. या नवीन उद्योगामध्ये बेंगलुरू अगदी अग्र स्थानावर प्रथमपासूनच ते आजपर्यंत राहिले आहे. औद्योगिकता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याबरोबर त्याच्या बरोबर शहरात सुबत्ता आणि श्रीमंती यांचेही तेवढ्याच मोठ्या स्वरूपात आगमन झाले. या वाढत्या सुबत्तेबरोबर शहराची लोकसंख्या पण बेसुमार वाढू लागली. पूर्वीच्या छोट्या बैठ्या घरांच्या जागी उंच उंच अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस या नवश्रीमंतांसाठी उभे राहू लागले. दुर्दैवाने या सगळ्या प्रगतीची (तसे म्हणायचे असल्यास) पण किंमत होती आणि ती बेंगलुरूकरांना अदा करायलाच लागते आहे. बेंगलुरूची प्रसिद्ध व नैसर्गिक रित्या वातानुकूलित असलेली सुखकर हवा अदृष्य झाली आणि त्या जागी धूळ व प्रदुषणयुक्त हवा शहरात खेळू लागली.

लोकसंख्याची अतिप्रमाणात वाढ झालेल्या या शहरात या वर्षीच्या (2012) ऑगस्ट महिन्यात एका नवीन राक्षसाने आपले डोके प्रथम वर काढले आहे. अनेक दशके किंवा शतकांपासून येथील महानगरपालिका कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात निर्माण होणारा कचरा तेथून उचलत असते व नंतर हा कचरा बेंगलुरूजवळील मावलीपुर, चीमासंद्रा, अंजनपुर, मंडुर आणि गुंडालहल्ली गावातील टेरा फर्मा येथे नेऊन टाकत असते. बेगलुरूमधून बाहेर येणार्‍या अंदाजे 5000 टन कचर्‍याचा ओघ बघून मावलीपुर कचरा डेपो जवळच्या 15 गावातील गावकरी अतिशय त्रस्त झाले आणि त्यांनी बेंगलुरूच्या मेयरांकडे आणि कर्नाटक प्रदुषण मंडळाकडे आपल्या मागण्या सादर केल्या. या यादीप्रमाणे रामकी या कंपनीला मावलीपुर गावाजवळ कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा कारखाना उभारण्यास दिलेली परवानगी मागे घेणे. मावलीपुर कचरा डेपो मध्ये टाकलेला 40 लाख टन, गावाजवळील मध्यवर्ती शासनाच्या व जंगले विभागाच्या मालकीच्या जागेतील 16 लाख टन आणि आरक्षित गायरानावर टाकलेला 20 लाख टन कचरा तेथून हलवणे वगैरे मागण्या त्यात केलेल्या आहेत.

या मागण्यांना प्रतिसाद देत कर्नाटक प्रदुषण मंडळाने मावलीपुर येथील कचरा डेपो बंद करण्याचा आदेश बेंगलुरू महानगरपालिकेला ऑगस्ट 2012 मध्ये दिला. या वेळेस चीमासुंद्रा व अंजनपुरा येथील कचरा डेपो पूर्णपणे भरलेले होते. यामुळे साहजिकच बेंगलुरूमध्ये रोज निर्माण होत असलेल्या कचर्‍याचा निचरा करण्यासाठी तयार झालेला सर्व कचरा मंडुर कचरा डेपो मध्ये टाकण्यास महानगरपालिकेने सुरूवात केली. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे अतिशय त्रस्त झालेल्या मंडुरच्या व टेरा फर्माच्या गावकर्‍यांनी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला. 27 ऑगस्ट 2012 पासून मंडुर कचरा डेपोकडे येणारे सर्व कचरा ट्रक गावकर्‍यांनी थांबवण्यास सुरूवात केली तर टेरा फर्माच्या गावकर्‍यांनी 30 ऑगस्ट पासून ट्रक थांबवण्याचे ठरवले. बेंगलुरूमधला कचर्‍याचा प्रश्न आता खर्‍या अर्थाने ऐरणीवर आला.

बेंगलोरू महानगपालिकेने 30 ऑगस्ट 2012ला घोषणा केली की मावलीपुर कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे बंद करण्यात आलेले आहे आणि कचर्‍याचा हा प्रश्न शहरवासी प्लॅस्टिकचा कचरा इतर कचर्‍यापासून अलग करत नसल्यामुळे निर्माण झालेला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एक योजना चालू केली आहे. ही योजना 2 ऑक्टोबर 2012ला कार्यान्वित करण्यात आली. परंतु दुर्दैवाने बेंगलुरूमधील शहरवासियांनी या योजनेला फारसा प्रतिसाद सुरवातीस तरी दिला नाही व जेमेतेम 15 % शहरवासियांनी कचर्‍याचे वर्गीकरण करून महानगपालिकेकडे फक्त सेंद्रिय कचरा विल्हेवाट लावण्यासाठी दिला. ही नवी योजना कार्यान्वित झाली त्या दिवशी शहरातील 8 विभागांनी मिळून फक्त 514 टन अलग केलेला सेंद्रिय कचरा दिला तर प्लॅस्टिक मिसळलेला 2766 टन कचरा महानगरपालिकेकडे दिला.

13 ऑक्टोबर 2012 या दिवशी कर्नाटक सरकारने वापरात नसलेल्या 3 दगडखाणी महानगरपालिकेकडे एक तात्पुरता उपाय म्हणून हस्तांतरित केल्या. 19 ऑक्टोबरला महनगरपालिकेने शहरात 6000 टन कचरा रस्त्यांवर साठलेला असून तो कुजत असल्याची घोषणा केली तर 20 ऑक्टोबरला महानगरपलिकेने हे मान्य केले की कचरा टाकण्यासाठी कोणतीच जागा उपलब्ध नसल्याने शहराच्या रस्त्यांवरील कचरा हलवण्यास महानगरपालिका असमर्थ असल्याने कचरा फक्त शहराच्या बाहेर नेऊन टाकण्यात येत आहे.

शेवटी 23 ऑक्टोबरला मुंडुरच्या गावकर्‍यांनी फक्त 3 महिन्यांसाठी म्हणून तेथील कचरा डेपो वापरण्यास बेंगलुरू महानगरपालिकेला परवानगी दिली व शहरवासियांना तात्पुरता का होईना, सुटकेचा निश्वास टाकता आला. महानगरपालिकेने लगेचच दिवसाला 300 टन कचरा प्रत्येक दिवशी हलवण्यास सुरूवात केली. शहरात साठलेल्या कचर्‍यमुळे डासामार्फत प्रसार होणार्‍या रोगांच्यात प्रचंड वाढ झालेली आहे . शहराच्या सीमांतर्गत डेंग्यूची 868 केसेस झाल्याचे वृत्त आहे

बेंगलुरूची ही कहाणी किती दुख्खद आणि भयावह आहे नाही? बेंगलुरू शहरात झालेली नेत्रदीपक प्रगती व तिथे आलेली सुबत्ता व श्रीमंती या गोष्टींचा जर शहराला मूलभूत सुविधाच जर पुरवता येत नसल्या तर काय उपयोग? कदाचित बेंगलुरू मधे आज जे घडते आहे ते उद्या दुसर्‍या कोणत्याही शहरात अगदी पुण्यालाही घडू शकते. भविष्यकाळात काय घडेल हे सांगणे कठिण आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे. माझे अतिशय आवडते व उद्यान शहर म्हणून नावाजलेले पण आता कचर्‍यांच्या ढिगांखाली गुदमरलेले बेंगलुरू शहर आता कायमचेच नष्ट झाले आहे. माझ्या बागेत आता फक्त कचरा साठला आहे आणि तो साफ करणे अशक्यच आहे.

11 नोव्हेंबर 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: