.
ताज्या घडामोडी Current Affairs, Travel-पर्यटन

आकाशातील ‘ होन्डा सिव्हिक ‘


जपानच्या होन्डा मोटर कंपनीने बनवलेली सिव्हिकही चारचाकी त्यांच्या गाड्यांपैकी, जगभर अतिशय लोकप्रिय असलेली एक चारचाकी गाडी आहे. प्रत्यक्षात या सिव्हिक गाड्या म्हणजे अमेरिकन स्टॅन्डर्ड प्रमाणे ज्यांना सबकॉम्पॅक्ट म्हणतात अशा श्रेणीतील गाड्या म्हणून प्रथम होन्डा कंपनीने अमेरिकन ग्राहकांना ऑफर केल्या होड्या. काही वर्षांनी या गाड्यांचा आकार जरा मोठा बनवला गेला व त्यांना कॉम्पॅक्ट श्रेणी मिळाली. 1972 मधले या गाडीचे मॉडेल फक्त 2 दरवाजे असलेले होते. त्यानंतर 3 दरवाजे असलेले मॉडेल कंपनीने सादर केले होते. फक्त अमेरिकेतच लक्षावधीच्या संख्येने विकल्या जात असलेल्या सिव्हिक गाड्या आता जगभर, अगदी भारतात सुद्धा, होन्डा कंपनी विकत असते. अनेक देशात सर्वात खप असलेली गाडी हा मान सिव्हिक गाड्यांना अजूनही मिळतो आहे. भारतात जरी नाही तरी इतर देशांत मात्र सिव्हिक ही गाडी सर्वसामान्यांची गाडी म्हणूनच मानली जाते.

या होन्डा कंपनीला सिव्हिक चारचाकी गाड्यांच्या उत्पादन आणि विक्री व्यवसायात जे उल्लेखनीय यश मिळाले ते आता विमानांच्या उत्पादन आणि विक्री व्यवसायात मिळवायची इच्छा झाली आहे असे दिसते. अमेरिकेतील Greensboro, North Carolina येथील कंपनीच्या कारखान्यात, या कंपनीने एका नव्या व चाकोरी बाहेरील डिझाइन असलेल्या एका छोट्या प्रवासी जेट विमानाची निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. होन्डा कंपनीला अशी आशा वाटते आहे की 1970 च्या दशकात सादर केल्या गेलेल्या होन्डा सिव्हिक गाड्यांनी, डिट्रॉइट मधील बड्या मोटरगाड्या उत्पादकांमध्ये जशी खळबळ उडवून दिली होती तशीच खळबळ जगातील छोट्या विमानांचे उत्पादन करणार्‍या उत्पादकांमध्ये होंडा कंपनीची ही आकाशातील सिव्हिक गाडी किंवा हे होन्डाजेटविमान उडवून देईल व होन्डा कंपनीला जगातील छोट्या विमानांच्या उत्पादकांच्या पंक्तीत एक जबरदस्त प्रतिस्पर्धी म्हणून स्थान मिळवून देईल.

होन्डाजेट हे फक्त 5 प्रवासी नेऊ शकणारे एक छोटेखानी जेट विमान आहे. हे विमान अतिशय उच्च कार्यक्षमता असल्याने इंधनाची बचत करणारे, अतिशय हुशारीने केलेले विमानाचे डिझाइन आणि विमानाच्या आत भरपूर जागा असलेले असे असणार आहे. या विमानाची 2 इंजिने पारंपारिक पद्धतीने पंखांखाली न बसवता पंखांच्या बर्‍याच वर आणि पायलॉन्सवर बसवलेली असल्याने हे विमान दिसण्यास जरा विचित्र वाटते परंतु कंपनीच्या एक विक्रेत्याच्या मताप्रमाणे या विमानाच्या आत असलेली भरपूर जागा व कमी इंधनाची गरज या ग्राहकाच्या दृष्टीने फायदेशीर गोष्टी काही प्रमाणात तरी या विचित्र भासणार्‍या आराखड्यामुळेच प्राप्त झालेल्या आहेत. होन्डाजेट विमान, या वर्गातील (बिझिनेस जेट विमाने) इतर विमानांच्या तुलनेने कमी लांबीच्या धावपट्ट्यांवरून उड्डाण करू शकते आणि या विमानाचा वेग प्रतिस्पर्धी विमानांच्या वेगापेक्षा निदान 10 टक्के तरी अधिक आहे. या विमानाची सध्याची किंमत 4.5 मिलियन अमेरिकन डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे व त्यामुळे हे विमान अमेरिकन बाजारात उपलब्ध असलेले या वर्गातील सर्वात स्वस्त विमान ठरले आहे. होन्डाजेट हे विमान एम्ब्रेअर फेनॉम 100 किंवा सेसना सायटेशन सीजे1+ या सध्या उपलब्ध असलेल्या विमानांसारखे असले तरी ते वापरण्यास सर्वात स्वस्त पडणार आहे. या विमानांच्या मानाने होन्डाजेट 20% तरी कमी इंधन खर्च करते व त्यात 20% जास्त बैठकीची जागा व मोठी सामान ठेवण्याची जागा उपलब्ध आहे. या विमानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या व्यापारी विमानांसारखे मोठ्या आकाराचे स्वच्छतागृह या विमानात उपलब्ध होणार आहे. या आकाराच्या इतर विमानांत ही सोय उपलब्ध नसते.

होन्डाजेटचा प्रकल्प 1980 च्या दशकात सुरू करण्यात आला होता. परंतु त्या वेळेस तो प्रत्यक्षात येण्याबद्दल बरीच साशंकता होती. हा प्रकल्प सुरू करताना, अमेरिकेत मोटरगाड्यांचे उत्पादन करणार्‍या आठ किंवा दहा जपानी उत्पादकांपैकी एक अशा स्वरूपात उल्लेख करण्यात येणार्‍या होन्डा मोटार कंपनीचे अमेरिकेत विमानांचे यशस्वी उत्पादन करणारी एक जपानी कंपनी असे रूपांतर व्हावे अशी कंपनीची इच्छा होती. परंतु सुरूवातीस या विमानाचा पारंपारिक कल्पनांना फाटा देणारा आराखडा बघून कंपनीमधील अधिकारीच या प्रकल्पाच्या यशाबद्दल साशंक होते. आतासुद्धा विमानाच्या या अपारंपारिक डिझाइनमुळे व प्रत्यक्षात त्याचे सर्व्हिसिंग व निगराणी याबाबत काहीच पूर्वानुभव नसल्याने ते बाजारात प्रत्यक्ष उतरल्यावर कितपत यशस्वी होईल याचा अंदाज बांधता येत नसल्याने विमानाच्या विक्रीमध्ये बर्‍याच अडचणी येण्याची शक्यता आहे. या सगळ्या नाविन्यामुळे अनेक ग्राहक थांबा व वाट पहा अशी भूमिका घेण्याची बरीच शक्यता आहे. हा प्रकल्प आधीच 2 वर्षे तरी रेंगाळलेला आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांना अमेरिकन सरकारचे, या विमानाचे इंजिन विमानात बसवण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र 2012 च्या डिसेंबरपर्यंत व हे विमान एकंदरीत रित्या उड्डाण करण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र 2013च्या अखेरीपर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे. कंपनीकडे या आधीच 100 विमानांची नोंदणी झालेली आहे. दर वर्षाला 100 विमाने बनवण्याची उत्पादनक्षमता पुढच्या 2 ते 3 वर्षात कंपनीकडे असेल असा प्रयत्न कंपनीकडून चालू आहे.

होन्डा कंपनीचे अनेक अधिकारी या प्रकल्पाकडे मोठ्या आशेने बघत आहेत. सुरवातीच्या काळात धोके स्वीकारून पुढे जाण्याचे असलेले या कंपनीचे धोरण मध्यंतरी कातडी बचाऊ झाले आहे असे त्यांना वाटते. या विमान प्रकल्पामुळे ते जुने धोरण परत एकदा कंपनी अंगीकारेल व कंपनीच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल असे त्यांना वाटते.

10 नोव्हेंबर 2012.

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: