.
ताज्या घडामोडी Current Affairs

कत्तल करा! पण आमच्या पद्धतीने


ऑस्ट्रेलिया या देशाच्या निर्यातीचा एक मोठा हिस्सा, कत्तल करण्यासाठी म्हणून परदेशात पाठवण्यात येणार्‍या जिवंत जनावरांची निर्यात हा आहे. ऑस्ट्रेलियात अशा प्रकारची जनावरे वाढवून, मोठी करून, नंतर त्यांची निर्यात करणारे अनेक फार्म्स आहेत. हे फार्म्स दर वर्षी लाखांच्या संख्येने, बकर्‍या, मेंढ्या, गाईबैल या सारखी जनावरे परदेशी कत्तलखान्यांकडे त्या देशातील लोकांना या जनावरांचे मांसभक्षण करता यावे म्हणून पाठवत असतात. ऑस्ट्रेलियातून होणार्‍या जनावरांच्या निर्यातीची किंमत ही 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स पेक्षाही जास्त असून या व्यवसायामुळे काही हजारांच्या संख्येने असलेल्या लोकांना रोजगार मिळतो आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जनावरांची निर्यात होत असल्याने निर्यातीची प्रक्रिया ही बहुतांशी यांत्रिक पद्धतीने केली जाते. अनेक मजले असलेल्या ट्रक ट्रेलर्स मधून जनावरे बंदरापर्यंत आणली जातात व नंतर एखाद्या सरकत्या पट्यावरून जावे तशी ही जनावरे बोटींच्यावर चढवून परदेशी रवाना केली जातात.

जनावरांच्या निर्यातीचा व्यवसाय करत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वेलार्डया कंपनीने 21000 शेळ्या मेंढ्यांनी भरलेली एक बोट या वर्षीच्या जून महिन्यात मध्यपूर्वेमधील बहारिन या एका श्रीमंत देशाकडे पाठवली होती. हा देश अनेक छोट्या द्वीपांचा मिळून बनलेला आहे. बहारिनच्या बंदरावरील अधिकार्‍यांनी या बोटीवरील शेळ्या मेंढ्या रोग ग्रस्त असल्याचे कारण सांगून ही निर्यात अमान्य केली होती व या शेळ्यामेंढ्यांना बहारिन द्वीपावर प्रवेश नाकारला होता. ‘वेलार्डकंपनीने मग या शेळ्यामेंढ्या पाकिस्तान मधील आयातदारांना ऑफर केल्या. या ऑफरच्या अटी काय होत्या? पाकिस्तान मधील अधिकार्‍यांना बहारिनमध्ये या शेळ्यांना रोगग्रस्त असल्याने प्रवेश नाकारला होता हे सांगितले गेले होते का? किंवा पाकिस्तान शेतकी मंत्रालय, शेळ्यामेंढ्यांची निर्यात करण्याचा परवाना अदा करणारे ऑस्ट्रेलियन शेतकी मंत्रालय आणि वेलार्डयांच्यामध्ये काय स्वरूपाची बोलणी झाली याची काहीच माहिती बाहेर आलेली नाही. मात्र एवढे नक्की की पाकिस्तानने वेलार्डला आयात परवाना अदा केला व त्याप्रमाणे ही बोट पाकिस्तानमधील कराची बंदराकडे वळवण्यात आली.

बोट कराची बंदरावर पोचल्यानंतर त्यावरील सर्व शेळ्यामेंढ्याना जमिनीवर उतरवण्यात आले. या शेळ्यामेंढ्यांची कत्तलखान्याकडे रवानगी करण्याआधी पाकिस्तानी आरोग्य अधिकार्‍यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या शेळ्यामेंढ्यांना salmonella आणि Actinomyces बॅक्टेरियाची लागण झाल्याचे या तपासणीत उघड झाले. आता या व्यवहारात मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात आल्याने निर्यात करणार्‍या कंपनीच्या एजंटने एका इंग्लंडमधील प्रयोगशाळेकडे नमुने पाठवले व त्यांच्याकडून हे नमुने रोगविरहित जनावरांचे आहेत व या जनावरांचे मांस खाण्यास योग्य असल्याचे रिपोर्ट आणले. कराची महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी हे इंग्लंड मधील प्रयोगशाळेने दिलेले रिपोर्ट मान्य करण्याचे नाकारले. या नंतर पाकिस्तान पशुसंवर्धन खात्याच्या अधिकार्‍यांनी या सर्व 21000 रोगग्रस्त शेळ्यामेंढ्या नष्ट करून टाकाव्यात असा आदेश काढला.

निर्यातदार कंपनी वेलार्डच्या म्हणण्याप्रमाणे कराची पासून 50 किमी अंतरावर असलेल्या बिन कासिमगावामधील एका फार्ममधे तारेच्या कुंपणाच्या आत व कंपनीच्या सुरक्षारक्षकांच्या देखरेखीखाली या शेळ्यामेंढ्या ठेवण्यात आलेल्या होत्या. स्वयंचलित बंदूका घेतलेल्या पाकिस्तानी पोलिसांनी जबरदस्तीने या सुरक्षारक्षकांना या शेळ्यामेंढ्या ठेवलेल्या कुंपणामधून हाकलून बाहेर काढले.

यानंतर पाकिस्तानी अधिकार्‍यांनी आपली माणसे आणून अतिशय निर्घृण पद्धतीने म्हणजे लाकडी काठ्यांनी मारहाण, सुर्‍यांनी गळे चिरणे व जिवंत असतानाच या शेळ्या मेंढ्यांना जमिनीत पुरून टाकणे अशा पद्धतीने या शेळ्यामेंढ्यांची हत्त्या करून टाकली. या हत्येच्या घटनेचे अंगावर शहारे येतील असे व्हिडिओ चित्रण ऑस्ट्रेलियातील ABC या वाहिनीच्या Four Corners या कार्यक्रमात, सोमवारी म्हणजे 5 नोव्हेंबरला प्रक्षेपण करण्यात आले. या चित्रणात एक माणूस एका शेळीचा गळा चिरून एका रक्तरंजित खड्यात त्या शेळीला फेकून देत असल्याचे व मेलेल्या शेळ्या बुलडोझरच्या सहाय्याने खड्यात ढकलून देण्यात येत असल्याची, ऑक्टोबर 2012 महिन्यात चित्रित केलेली दृष्ये दाखवली गेली. माध्यमांच्या रिपोर्टप्रमाणे या चित्रणात दाखवलेल्या काही शेळ्या श्वासोच्छ्वास करत असतानाच त्यांना खड्यात फेकल्याचे स्पष्ट दिसत होते.

ABC ने केलेल्या या चित्रणामुळे ऑस्ट्रेलियामध्ये एका मोठ्या वादविवादाला आता तोंड फुटले आहे. ऑस्ट्रेलियन शेळ्यामेंढ्यांची अशा तह्रेने कत्तल केली जावी या घटनेचा सर्वच लोकांनी धिकार केला आहे. Australia’s National Farmers Federation म्हणते की तात्पुरता उपाय म्हणून काही कालासाठी पाकिस्तान व बहारिन या देशांना होणारी शेळ्यामेंढ्यांची निर्यात त्यांनी थांबवली आहे. आणि या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे. ऑस्ट्रेलियाचे शेतकी मंत्री जो लुडविग या प्रकरणाला भयावह असे म्हणतात. त्यांच्या मताने त्यांच्या मंत्रालयाने या शेळ्यामेंढ्या रोगमुक्त असल्याची खात्री करूनच वेलार्डला निर्यात परवाना दिलेला होता. ते म्हणतात की पाकिस्तानी अधिकार्‍यांचा शेळ्यामेंढ्या नष्ट करण्याचा निर्णय व त्यासाठी त्यांनी वापरलेली पद्धत या दोन्ही मागची कारणपरंपरा आम्हाला समजू शकलेली नाही.” ऑस्ट्रेलियन निर्यातदार दुसर्‍याच कारणासाठी काळजीत आहेत. व्हिक्टोरिया प्रांतातील फार्मसवरच्या 3000 ब्रीडर गाईंनी भरलेली एक बोट या आधीच पाकिस्तानकडे रवाना झालेली आहे. व या गाईंचे भविष्य शेळ्यामेंढ्यांसारखेच होणार काय? या शक्यतेने ते काळजीग्रस्त आहेत.

बर्‍याच लोकांना असे वाटते आहे की पाकिस्तान व मध्यपूर्वेकडे जिवंत जनावरांची निर्यात थांबवण्यात यावी. परंतु शेतकर्‍यांच्या दबाव गटाला हे मान्य नाही. या साठी त्यांनी ऑस्ट्रेलिआ हा जिवंत जनावरांच्या निर्यातीच्या व्यापारातील अग्रेसर देश असून ती थांबल्यास या व्यापारामध्ये सध्या जनावरांची जी काळजी घेतली जाते तिची गुणवत्ता खालावेल असे एक विचित्र कारण पुढे केले आहे. हा दबाव गट म्हणतो की ऑस्ट्रेलियाने जर जिवंत जनावरांची निर्यात थांबवली जागतिक पातळीवरील पशु देखभालीची गुणवत्ता खालावेल यात शंका नाही.” ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी सुद्धा, कराची मध्ये 21000 ऑस्ट्रेलियन शेळ्यांची अशी निर्घृण कत्तल का केली गेली याची पाकिस्तानने चौकशी करून स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.

बर्‍याच ऑस्ट्रेलियन लोकांना असे वाटते आहे की जिवंत जनावरांची निर्यात थांबवून फक्त गोठवलेले मांस निर्यात करावे. मात्र शेती सहकारी संस्थांना हे मान्य नाही. बर्‍याच लोकांचा असाही विचार दिसतो की ऑस्ट्रेलियन शेळ्यामेंढ्यांचाही मृत्यू हा आदरणीयच असला पाहिजे. आणि जरी त्यांना परदेशात कत्त्ल करण्यासाठी म्हणून पाठवलेले असले तरी ती कत्तल, ऑस्ट्रेलियन लोक ज्याला आदरणीय समजतात अशाच प्रकारची असली पाहिजे.

एकूण असे दिसते की ऑस्ट्रेलियाला जगाला असे सांगायचे आहे की कत्तल करा! आम्ही कत्तल करण्यासाठीच्या जनावरांचा तुम्हाला पुरवठा करू. पण तुम्ही ही कत्तल आम्ही सांगू त्याच पद्धतीने केली पाहिजे. ऑस्ट्रेलियन जनावरांना मृत्यू आदरणीय पद्धतीनेच आला पाहिजे.”

7 नोव्हेंबर 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “कत्तल करा! पण आमच्या पद्धतीने

 1. कत्तल आमच्या पद्धतीने करा ह्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.
  मुळात गोर्‍या देशातून निर्यात सदोष झाली. ती बहारीन करून नाकारण्यात आली हा मुद्दा बाजूला राहून परत गिरे तो भी टांग उपर अशी कांगारूंची अवस्था आहे.

  Posted by ninad kulkarni | नोव्हेंबर 8, 2012, 10:39 pm
 2. काही च्या काहीच!

  Posted by महेंद्र | नोव्हेंबर 9, 2012, 5:29 सकाळी
 3. अन्नपदार्थांचे घाऊक उत्पादन, विक्री आणि सेवन हे सर्वच प्रकार अनैसर्गिक असून, मानवी संस्कृतीच्या अनिर्बंध व अनियंत्रित हव्यासापोटी उद्भवत असतात. त्यांची सर्व प्रकारची पर्यवसाने अनिष्टकारक ठरावीत ह्यात नवल ते काय?

  मानवी अन्नपदार्थांची, मानवी लोकसंख्येच्या स्तरावरील वितरित निर्मिती आणि सेवन, अशा प्रकारे व्यवस्था केल्यास हे सर्व टळू शकेल!

  Posted by नरेंद्र गोळे | नोव्हेंबर 9, 2012, 2:51 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: