.
History इतिहास

सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे


भारतीय द्वीपकल्पामध्ये कधी काळी अस्तित्वात असणार्‍या व सर्वात पुरातन असलेल्या सिंधू संस्कृतीचा शोध 1920च्या दशकात प्रथम लागला. त्या काळापासून ते आजपर्यंत, सिंधू नदीच्या खोर्‍यामध्ये आणि पंजाब मधील सिंधू नदीच्या उपनद्यांच्या खोर्‍यांमध्ये, अगदी समुद्र तटापासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंतच्या प्रदेशापर्यंत, विपुल प्रमाणात उत्खनन व या संस्कृतीबद्दल संशोधन केले गेलेले आहे. या संशोधनाचे फलद्रूप म्हणून आता सर्वसाधारणपणे असे मानले जाते की सिंधू नदीच्या खोर्‍यामध्ये व सध्याच्या पाकिस्तान मधील मेहरगढ या गावाजवळ खेडेगाव या स्वरूपातली मानवी नागरी वस्ती सर्वप्रथम इ..पूर्व 4500-5000 या कालात वसवली गेली. या मानवी वसाहतींचे मोहोंजोडारो किंवा हडाप्पा सारख्या मोठ्या शहरांच्यात इ..पूर्व 3900 च्या सुमारास रूपांतर झाले व ही शहरी वस्ती इ..पूर्व 1500 या कालापर्यंत तरी अस्तित्वात होती.

सिंधू संस्कृतीचा काल व स्वरूप यासंबंधी जरी एकवाक्यता असली तरी ऐन बहरात असलेल्या या संस्कृतीचा एकाएकी व अचानक र्‍हास का व कसा झाला? या कोड्याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत तरी कोणालाही देता आलेले नाही. मागच्या 80किंवा 90वर्षांत हे उत्तर देण्यासाठी आर्यांचे आक्रमण,मोठ्या प्रमाणातील भूकंप किंवा नदीपात्रातील मोठ्या प्रमाणातील फेरफार यासारखी कारणे दिली गेली. मात्र शास्त्रीय संशोधनाच्या मानकावर यापैकी कोणतेही कारण टिकू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे.

वैदिक संस्कृतीचे मूळ आधार असलेल्या धर्मग्रंथांत, गंगा नदीच्या पश्चिमेला असलेल्या भारतीय द्वीपकल्पाच्या भूभागाचे सप्तसिंधू प्रदेश म्हणून वर्णन केले गेलेले आहे. या सात नद्यांपैकी सिंधू व तिच्या 5उपनद्या यांची सहज ओळख पटवता येते. वेदात, सरस्वती या नावाने व विशालता आणि सौंदर्य या दृष्टीकोनातून सर्वश्रेष्ठ नदी असा उल्लेख केली गेलेली, 7वी नदी मात्र ज्ञात इतिहास कालखंडात कधीच सापडलेली नाही. धर्मग्रंथातील उल्लेखाप्रमाणे ही नदी हिमालयातील हिमनदापासून उगम होत असून तिचे जल, पर्वत ते समुद्र किनारा या संपूर्ण प्रवासात अतिशय शुद्ध असल्याचे मानले जाते. पंजाबमधील हाकरा खोर्‍यात वाहणारी घग्गर नदी ही धर्मग्रंथातील सरस्वती नदी बहुदा असावी असे आता अनेक तज्ञ मानतात. मात्र या घग्गर नदीला कोणत्याही हिमनदाकडून जल पुरवठा न होता फक्त मॉन्सूनच्या पाऊसकाळातच पाणी असते व पुढे ही नदी कोणत्याच समुद्राला जाऊन न मिळता या नदीचे पाणी हाकरा खोर्‍याच्या टोकास असणार्‍या वाळवंटात फक्त लुप्त होते ही गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे.

सिंधू संस्कृतीचा झालेला अचानक र्‍हास व सरस्वती नदीचे अदृष्य होणे या दोन गोष्टी,भारतीय द्वीपकल्पाच्या प्राचीन इतिहासातील सर्वात अतर्क व अगम्य असलेली गूढे म्हणून यामुळेच मानली जातात. Proceedings of the National Academy of Sciences या प्रकाशनाच्या 28मे 2012 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात या दोन्ही कोड्यांची उकल करण्यात शास्त्रज्ञांचा एक गट यशस्वी झाला असल्याचे नमूद केले गेले आहे. Woods Hole Oceanographic Institution (WHOI) या संस्थेत संशोधन करणारे Liviu Giosan या भूशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्‍या 16शास्त्रज्ञांच्या एका आंतर्राष्ट्रीय गटाने या दोन्ही कोड्यांची उत्तरे शोधण्यात आपल्याला यश आले आहे असा दावा केला आहे. चेन्नई येथील Institute of Mathematical Sciences या संस्थेतील एक शास्त्रज्ञ श्री. रोनोजय अधिकारी हे भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा या गटाचे एक कार्यरत सभासद होते. शस्त्रज्ञांच्या या गटाने 2003ते 2008या कालखंडात पाकिस्तान मधील अरबी समुद्र काठचा भाग, पंजाबमधील सुपिक खोरी, थर वाळवंटाचा उत्तरेचा भाग या सर्व भूभागाचा बारकाईने अभ्यास करून आपले निष्कर्ष काढले आहेत. या गटाने उपग्रहावरून प्राप्त झालेली छायाचित्रे व Shuttle Radar Topography Mission या मोहिमेकडून प्राप्त झालेली भूपृष्ठरचनेसंबंधीची माहिती (topographic data) यांचा वापर करून सिंधू व इतर नद्यांच्या खोर्‍यामधील भूपृष्ठ वैशिष्ट्यांचे (landforms) डिजिटल नकाशे प्रथम तयार केले. या विश्लेषणात्मक कार्याला सर्व नद्यांच्या खोर्‍यांना प्रत्यक्ष भेटी देऊन जमिनीत खोल बोअर आणि खंदक स्वरूपी खड्डे घेतले गेले व या खोल बोअर मधून मिळालेल्या जमिनीच्या कोअर्सचे क्रॉस सेक्शन्स व खड्यांच्या भिंतींचे क्रॉस सेक्शन्स यांच्या अभ्यासाची जोड देण्यात आली.

या सर्व माहितीच्या आधाराने Giosan यांच्या नेतृत्वाखालील या गटाला 5200 वर्षांपूर्वी (3100..पूर्व) सिंधू संस्कृतीचे वसतीस्थान असलेल्या सिंधू नदी व इतर नद्या यांच्या काठावरच्या सपाट भूपृष्ठांच्या आसमंतांची पुनर्र्चना संगणकावर करण्यात यश मिळाले. याच बरोबर हडाप्पा सारखी मोठी शहरे कशी वसवली गेली? व या नदीकाठच्या सपाट भूपृष्ठांच्या आसमंतांचा र्‍हास 3900 to 3000 वर्षांपूर्वी (1800 BCE- 900 BCE) या कालखंडात हळूहळू कसा होत गेला? हे नेमकेपणे सांगणे शक्य झाले. Giosan यांचा गट या अभ्यासानंतर खालील निष्कर्षांप्रत येऊन पोचला.

अरबी समुद्रापासून ते गंगेचे खोरे एवढ्या विस्तीर्ण व अंदाजे 10,00,000चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या भूप्रदेशावर पसरलेली सिंधू संस्कृती ही प्राचीन नागरी संस्कृतींपैकी सर्वात मोठी असली तरी या संस्कृतीबद्दलची जगाला असलेली माहिती फारच अपुरी आहे. इजिप्त किंवा मेसोपोटेमिया येथील प्राचीन संस्कृतींप्रमाणेच सिंधू संस्कृती हीसुद्धा विशाल नद्यांच्या काठाने फुलत गेली. परंतु सिंधू संस्कृतीचे पुरातन अवशेष जसे आज अस्तित्वात असलेल्या नद्यांच्या काठी सापडतात त्याचप्रमाणे नदीपासून बर्‍याच दूर असलेल्या मरूभूमीमध्येही सापडतात. असे मानले जाते की दक्षिण एशिया खंडातील या पुरातन संस्कृतीत त्या वेळच्या जगाच्या लोकसंख्येच्या किमान 10टक्के तरी लोक रहात असावेत. असे असूनही 1920 सालामध्ये या संस्कृतीचा आधुनिक जगाला शोध लागेपर्यंत ही संस्कृती पूर्णपणे विस्मृतीच्या पडद्यामागे गेलेली होती. 1920 सालानंतर झालेल्या पुरातत्व संशोधनानुसार ही संस्कृती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण नागरी संस्कृती होती.या संस्कृतीच्या अंतर्गत जी शहरे किंवा नगरे वसलेली होती त्यांच्यामध्ये चालू असलेल्या परस्पर व्यापारासाठी व्यापारी मार्ग तयार केले गेले होते. त्याचप्रमाणे मेसोपोटेमिया बरोबर या संस्कृतीचा समुद्र मार्गे व्यापार चालत असे. शहरांच्यात बांधलेल्या इमारती एका मानकाप्रमाणे बांधलेल्या असत. मैला व सांडपाणी वाहून नेण्यासाठी या शहरांच्यात उत्तम व्यवस्था केलेली असे. कला व हस्तकौशल्य यांना या संस्कृतीत महत्व होते व या संस्कृतीची स्वत:ची अशी लिपी लेखनासाठी होती. दुर्दैवाने ही लिपी अजुनही आपल्यासाठी दुर्बोधच राहिलेली आहे.

 

या अभ्यासात भाग घेतलेले व University College London येथे संशोधन करणारे भूशास्त्रज्ञ Dorian Fuller म्हणतात की

या प्रदेशाच्या भू प्रस्तरांविषयी ही नवीन माहिती आम्हाला मिळल्यानंतर, या पुरातन संस्कृतीमधील वस्त्या ज्या ज्या ठिकाणी होत्या त्या वस्त्यांसंबधी पूर्वी ज्ञात असलेली माहिती, कोणती पिके येथे काढली जात होती? व येथील वस्त्या व कृषी उत्पादन कालानुसार कसे बदलत गेले? या सर्व बाबींची पुन्हा तपासणी आम्ही करू शकलो. या अभ्यासामुळे, सिंधू संस्कृतीतील लोकसंख्येचे, पूर्व दिशेला झालेले स्थलांतर, मोठ्या शेती कडून लघु आकाराची शेती करणार्‍या व शहराकडून छोट्या खेडेगावांकडे जाणार्‍या समाजरचनेची प्रक्रिया आणि उत्तर हडप्पा कालात झालेला शहरी लोकसंख्येचा र्‍हास या गोष्टींवर नवा प्रकाश टाकता आला.”

सिंधू संस्कृती या अतिशय विशाल अशा भूप्रदेशावर वसली जाण्याच्या आधीची अंदाजे दहा सहस्त्र वर्षे तरी सिंधू व तिच्या उपनद्या वहात असलेल्या भूभागात मॉन्सूनचा पाऊस जवळ जवळ वर्षभर आणि तुफान स्वरूपात पडत होता व यामुळे या सर्वच नद्या अतिशय बेफाम स्वरूपात व कोठेही व कशाही वहात राहिल्या होत्या. नद्यांच्या या बेफाम वाहण्यामुळे या सर्व प्रदेशात नद्यांतून वहात आलेल्या व पिकांना अतिशय उपयुक्त असलेल्या गाळाचे थर या नद्यांनी रचले होते. Giosan यांच्या संशोधन गटाला सिंधू नदीच्या दक्षिणेकडील पात्राला समांतर असलेली, 10ते20मीटर उंच, 100पेक्षा जास्त किलोमीटर रूंद व अंदाजे 1000किलोमीटर लांबीची एक सपाट टेकडी किंवा पठार या कालात या बेफाम वाहणार्‍या नद्यांनी गाळाचे थर एकावर एक रचून निर्माण केल्याचे आढळून आले. या पठारवजा सपाट टेकडीचे या गटाने Indus mega-ridge असे नामाकरण केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सिंधू संस्कृतीचे जे जे पुरातन अवशेष गेल्या 90वर्षात सापडलेले आहेत ते सर्व या Indus mega-ridge च्या जमिनीखाली न सापडता फक्त पृष्ठभागावरच सापडलेले आहेत.

या सर्व नद्यांना सतत पूर आणत रहाणारा मॉन्सूनचा पाऊस यानंतरच्या कालात कमी कमी होऊ लागला. यामुळे व हिमालयातून घेतले गेलेले पाणी कमी प्रमाणात नद्यांच्यात आल्याने या सर्व नद्यांचे बेफाम वागणे नियंत्रित झाले आणि या सर्व भूप्रदेशात कृषी उत्पादने घेण्यासदृष्य परिस्थिती निर्माण झाली. सिंधू व इतर नद्यांच्या काठाने अरबी समुद्र ते हिमालयाचा पायथा या सर्व प्रदेशात मानवी वस्त्या स्थापन झाल्या. कमी झालेल्या मॉन्सूनच्या पावसामुळे हडप्पा कालीन लोकसंख्येला उत्तम हवामान, भरपूर पाणी आणि सुपिक जमीन या गोष्टी मिळून एक मोठी सुसंधी प्राप्त झाली असे म्हणता येते. पुढची 2000वर्षे तरी टिकून राहिलेल्या या सुसंधीमुळे हडप्पा कालीन लोकसंख्येला या प्रदेशात एक मोठी संस्कृती निर्माण करण्यात यश मिळाले व आपल्या कष्टाळू व उद्यमप्रिय स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांनी या सुसंधीचे सोने केले. सिंधू व घग्गरहाकरा नद्यांच्या काठालगत असलेल्या पाण्याच्या भरपूर उपलब्धतेमुळे सिंधू संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य अमाप कृषी उत्पादन हेच राहिले होते. या कृषी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात शेतमजुरांची आवश्यकता भासू लागली व त्यामुळे मानवी स्थलांतर सुरू होऊन मोहेंजोडारो किंवा हडप्पा सारखी मोठी शहरे निर्माण झाली.

मॉन्सूनचा पाऊस पुढे पुढे सतत कमी होत गेल्याने 2000वर्षांची ही सुसंधी आटत चालली व त्याच बरोबर विस्तृत प्रमाणात ज्या ठिकाणी पूर्वी मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होते अशा भूभागाचे मरूभूमीकरण होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. या मरूभूमीकरण प्रक्रियेमुळे हडप्पाकालीन लोकसंख्येचे पूर्वेकडे म्हणजे गंगा नदीच्या खोर्‍याकडे स्थलांतर साधारण 1500 ..पूर्व या कालखंडापासून सुरू झाले. या भागातील मॉन्सूनचा पाऊस जरी स्थिर स्वरूपाचा असला तरी पावसावर अवलंबून असलेली शेती व नद्यानाल्यातील उपलब्ध पाणी हे फक्त छोट्या स्वरूपातील शेतीसाठीच उपयुक्त होते. या कारणामुळे सिंधू खोर्‍यातील मोठ्या शहरांसारखी शहरे गंगा खोर्‍यात निर्माण न होता मर्यादित स्वरूपाच्या शेतीच्या आधारावर टिकू शकतील अशा फक्त लहान नगर राज्यांची अर्थव्यवस्था येथे स्थापली गेली. मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या. आणि स्थलांतरित जनसंख्या लहान लहान गावात विखुरली गेली.

या अभ्यासात आणखी एका गूढाचा उलगडा करता आला आहे असे हा अहवाल म्हणतो. ते गूढ म्हणजे सरस्वती नदी अदृष्य होण्यामागचे कारण. सरस्वती नदी म्हणजे सध्याची घग्गर नदी असेही हा अहवाल म्हणतो. घग्गरहाकरा नदीच्या खोर्‍यात, हडप्पा कालात अतिशय दाट स्वरूपात वस्ती असल्याचे पुरावे या भागात केलेल्या उत्खननात आढळून आलेले आहेत. नदीच्या काठावर असलेले गाळाचे थर व नदी खोर्‍यातील भूपृष्ठभाग रचना या स्वरूपाच्या व या अभ्यासातून प्राप्त झालेल्या भूशास्त्रीय पुराव्याप्रमाणे या नदीचे पात्र खरोखरच विशाल व मुबलक पाणी असलेले होते असे दिसते. परंतु या कालात सुद्धा या नदीला असलेले मुबलक पाणी हे सध्याप्रमाणेच पण केवळ त्या काळात पडणार्‍या सशक्त मॉन्सूनच्या पावसामुळेच होते. या नदीला हडप्पा कालात सुद्धा हिमालयातून पाणी उपलब्ध होत नव्हते. त्याचप्रमाणे या नदीच्या जवळून वाहणार्‍या सतलज किंवा यमुना नद्यांमध्ये जे पाणी हिमालयातून येत होते ते या नदीच्या पात्रात वहात आल्याचा काहीच पुरावा मिळत नाही. या नदीला बारमाही पाणी असले तरी ते त्या काळातील सशक्त मॉन्सूनचेच होते.

या अभ्यासामध्ये, आजच्या घटकेला असलेल्या सिंधू नदीच्या जलसिंचन योजनांना एक धोक्याचा कंदील दाखवलेला आहे. या अभ्यास गटाचे प्रमुख Giosan म्हणतात की आजमितीला सिंधू नदी जलसिंचन योजना ही जगातील सर्वात मोठी या स्वरूपाची योजना आहे. या योजनेत सिंधू नदीचे पाणी अनेक धरणे व कॅनॉल्स मार्फत अडवले गेलेले आहे. भूतापवृद्धीमुळे जर काही लोक म्हणतात तशी मॉन्सूनच्या प्रमाणात वाढ झाली तर 2010 सारख्या भयंकर पुरासारखी परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते. नियंत्रित स्वरूपात वाहणार्‍या सिंधू नदीवरील जलसिंचन योजना मॉन्सूनच्या पावसात वाढ झाल्यास केंव्हाही कोलमडू शकते.” पाकिस्तानसाठी हा एक धोक्याचा इशाराच समजला पाहिजे.

8 जून 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

16 thoughts on “सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे

 1. अतिशय उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण लेख. सिंधू-सरस्वती संस्कृती हा माझा जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय, त्यामुळे या लेखाकडे लगेच खेचला गेलो , अर्थातच निराशा झाली नाही.

  Posted by संकेत | जून 8, 2012, 11:16 सकाळी
 2. नमस्कार!
  मी तुमचा ब्लॉग नियमित वाचते. नेहमीच सर्व लिखाण माहितीपूर्ण आणि सुबोध असते.
  पण आजची ही पोस्ट काही मला कळली नाही. कदाचित मी लक्षपूर्वक वाचली नाही किंवा विषय क्लिष्ट असावा!

  Posted by sharvaree | जून 8, 2012, 12:23 pm
  • शर्वरी –
   या ब्लॉगपोस्टचा विषय जरी सोपा असला तरी तो बराचसा शास्त्रीय स्वरूपाचा आहे.त्यामुळे कदाचित आकलन झाले नसावे.

   Posted by chandrashekhara | जून 8, 2012, 1:55 pm
 3. काका, तुमचा ब्लॉग मी नियमीत वाचत असतो पण प्रतिक्रिया आज पहिल्यांदाच देत आहे. अतिशय सुंदर माहिती, अतिशय सोप्या शब्दांत… धन्यवाद काका ह्या माहितीबद्दल…

  Posted by Santosh | जून 8, 2012, 2:43 pm
 4. हि माझी पहिलीच प्रतिक्रिया आहे तुमच्या ब्लॉगवर….तुमचा ब्लॉग मी नेहमीच वाचतो…..खुप खुप छान आणि माहितीपुर्ण लेख तुम्हि लिहिता….हा लेख माझ्या जिव्हाळ्याच्या विषयासंबंधी आहे त्यामुळे खुपच जास्त आवडला….प्रतिक्रिया देण्याचे खास कारण अश्यासाठी कि तुमचे लेखन मी माझ्या शेजारच्या काकांना दाखवले..ते सुद्दा निवृत झालेले आहेत आणि दिवसभर काय करायचे या विंवचनेत असतात्…तुमचे लेख वाचल्यावर त्यांना दिवसभर काय करायचे याचा प्रश्न सुटला..आता ते सुद्धा थोड्या दिवसांनी ब्लॉगलेखन करणार आहेत….तुमच्या या अज्ञात मार्गदर्शनासाठी खुप खुप धन्यवाद…..

  Posted by स्वप्नील | जून 8, 2012, 5:41 pm
  • स्वप्नील –
   प्रतिसादासाठी धन्यवाद.तुमच्या शेजारच्या काकांचा ब्लॉग लवकर चालू होवो ही सदिच्छा.

   Posted by chandrashekhara | जून 8, 2012, 6:16 pm
  • namaskar,mazya kade lipyancha sangrah aahe ajun kahi mahiti mala devu shakal ka mahiti khup sundar aahe mazya dnyanat ajun bhar padli dhanyawad

   Posted by nagraj kashinath malshetti | ऑक्टोबर 4, 2012, 5:19 pm
   • नागराज काशिनाथ मालशेट्टी –

    प्रतिसादासाठी धन्यवाद. आपल्याकडील लिप्यांच्या संग्रहाबद्दल जास्त महिती करून घेण्यास आवडेल.

    Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 4, 2012, 5:49 pm
 5. काका, सिंधू संस्कृती बद्दल वाचायला नेहमीच आवडते, एवढे मोठे क्लिष्ट संद्शोधन तुम्ही खुपच सोप्या शब्दात सांगितले आहे.
  ह्या सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासा वरून आताच्या मानवजातीने नक्कीच धडा घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण पृथ्वी वरची रिसोर्सेस वापरतो आहे त्या वेगाने जर वापरत राहिलो तर ह्या आपल्या मानवजातीचा नाश व्हायला वेळ लागणार नाही.
  धन्यवाद,अशीच छान माहिती देत राहा.

  Posted by भोवरा | जून 29, 2012, 11:05 pm
 6. सिंधू संस्कृती बाबत आपण उपलब्ध करून दिलेल्या आजवरच्या सर्वात विस्तृत माहिती बद्दल धन्यवाद
  अविनाश लक्षण दुधवडे ,(पत्रकार) चाकण ,ता. खेड ,जि .पुणे (महाराष्ट्र) ९९२२४५७४७५

  Posted by avinash dudhawade | नोव्हेंबर 6, 2012, 12:06 pm
 7. very good article. But needs more reaserch about Sarswati Nadi

  Posted by Ajit. | मार्च 23, 2013, 3:17 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: