.
History इतिहास

नाट्यातून इतिहास शिक्षण; Teaching history through role playing


एखाद्या शाळेतील आठवी किंवा नववीच्या वर्गाची कल्पना करा. पहिला तास नुकताच संपला आहे. पुढचा तास इतिहासाचा असल्याने मुले इतिहासाची पुस्तके वह्या काढून शिक्षकांची वाट पहात आहेत. आणि अशा वेळी समजा कंबरेला तलवार लटकवलेले साक्षात शिवाजी महाराज वर्गात अवतीर्ण झाले व आपण आग्र्याहून आपली सुटका कशी करून घेतली हे सांगू लागले किंवा उपरणे पगडी या वेषातील नाना फडणवीस अवतीर्ण होऊन आपण बारभाईचे कारस्थान कसे यशस्वी केले हे सांगू लागले तर त्या वर्गातील मुलांना इतिहास हा विषय, तहाची कलमे व सनावळ्या यांनी भरलेला एक कंटाळवाणा विषय न वाटता खूप रोचक विषय वाटेल की नाही? माझी खात्री आहे की इतिहासाबद्दल अजिबात आवड नसलेल्या मुलांतून सुद्धा इतिहासप्रेमी नक्कीच निर्माण होतील. ऐतिहासिक घटना नाट्यरूपातून शिकवण्याची ही अनोखी कल्पना सिंगापूरच्या चुंग चेंग हाय स्कूल मधील एक शिक्षक मिस्टर. माल्कम टॅन याने गेल्या कित्येक वर्षापासून यशस्वी रित्या राबवलेली आहे.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सिंगापूर हे शहर जपानी सेनेने ब्रिटिश सैन्याचा पराभव करून ताब्यात घेतले होते व नंतरची 3 वर्षे ते जपानच्या अंमलाखाली होते. या कालाचा इतिहास अर्थातच सिंगापूरच्या शाळांतून शिकवला जातो. हा भाग शिकवण्यासाठी माल्कम टॅन जेंव्हा कंबरेला तलवार लटकवलेल्या एका जपानी सार्जंटच्या वेषभूषेत वर्गात शिरला तेंव्हा ही व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक टॅन आहेत हे माहिती असून सुद्धा वर्गातील 40 मुलांच्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. परंतु हा इतिहासाचा तास म्हणजे फक्त त्या कालखंडातील सिंगापूरचा इतिहास शिकवणे नव्हते. त्या काळातील लोक काय अनुभवातून गेले होते त्याची एक प्रचिती मुलांना यावी असा प्रयत्न यामागे होता. त्यामुळे टॅन सर वर्गात आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप संगणकावरून किमिगायोहे जपानी राष्ट्रगीत प्रथम ऐकण्यास मिळाले. यानंतर सर्व मुलांना खाली वाकून बान्झाई ” ( परमेश्वर सम्राटाचे रक्षण करो.) अशी घोषणा करावी लागली. व यानंतर टॅन सरांनी आता तुम्हाला आमच्या जीवन पद्धतीबद्दल (जपानी लोकांच्या) माहिती मी सांगणार आहे.” अशी सुरूवात केली व तास सुरू झाला. पुढची 50 मिनिटे टॅन सर इतिहासाचे शिक्षक नसून एक जपानी सार्जंट बनले.

35 वर्षाचा माल्कम टॅन 2001 सालापासून मुलांना या पद्धतीने इतिहास शिकवतो आहे. या आधी तो बेन्डेमीर हाय स्कूल मध्ये शिकवत असे. गेली काही वर्षे तो या शाळेत शिकवतो. टॅनने प्रथम इतिहासाचा जो भाग शिकवायची त्या भागातील वेषभूषा करून जर तो भाग शिकवला तर विद्यार्थ्यांना जास्त रस निर्माण होतो हे अनुभवले. मात्र या साठी ही वेषभूषा निर्माण करण्यासाठी तो बरेच संशोधन करून स्वत:ची पदरमोड करून असे कपडे आंतरजालावरील ईबे सारख्या संकेतस्थळांवरून मिळवतो. दर वेशभूषेमागे स्वत:चे निदान 50 डॉलर तरी तो खर्च करतो.

माल्कम टॅन हा स्वत: व्हिक्टोरिया स्कूल या शाळेत शिकलेला आहे. मात्र आपण क्रमिक पुस्तक वाचून त्यातील भाग लक्षात ठेवणे या पद्धतीनेच इतिहास शिकल्याचे तो सांगतो. सिंगापूरच्या सेंटोसा येथील संग्रहालयातील मेणाचे पुतळे बघून शिकवताना नाट्य आणले तर मुलांना जास्त रस निर्माण होईल अशी स्फुर्ती निर्माण झाल्याचे तो सांगतो. यामुळे प्रथम त्याने सुरूवातीस फक्त त्या कालातील वेषभूषा करण्यास सुरूवात केली. 2009 मध्ये इंग्लंडमधील हॅम्प्टन कोर्ट येथे त्याने इंग्लंडचा राजा आठवा हेनरी याच्या ट्युडॉर कालातील काही इतिहास प्रसंग नाट्यरूपात बघितले व त्याला त्यात इतकी मजा वाटली व रस आला की आपणही नुसती वेषभूषा न करता ती व्यक्ती त्या वेळेला बनून मुलांना शिकवावे असे त्याने ठरवले. अर्थात या साठी त्याला बराच अभ्यास व तयारी करावी लागते. जपानी सार्जंटच्या भुमिकेशिवाय टॅन याने एक ब्रिटिश सैनिक, 1950 मधील दंग्यांच्या वेळचा एक पोलिस, ब्रिटिश लेफ्टनंट जनरल पर्सिव्हल व ऍडोल्फ हिटलर यांच्या भुमिकाही निभावल्या आहेत. माओ त्त्झे डॉन्ग बद्दल शिकवताना तो त्याचे वैयक्तिक आयुष्य, त्याला असलेल्या 4 बायका याबद्दलही सांगतो. चीनमध्ये 1956 साली माध्यमिक शाळांत जे दंगे झाले होते त्याबद्दल शिकवताना त्याच्या विद्यार्थ्यांनी शाळेत फलक घेऊन मोर्चे काढले होते व भाषणे दिली होती. दर वर्षी निदान सहा वेळां तरी तो या पद्धतीचे मुलांचा सहभाग असलेले नाट्यप्रसंग सादर करतो.

सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठातून मास्टर्सची पदवी संपादन केलेला व त्याच्या शाळेने ‘Most Engaging Teacher Award’ देऊन गौरवलेला माल्कम टॅन आपल्या या शिकवण्याच्या पद्धतीमुळे आपले विद्यार्थी जास्त चौकस बनून इतिहासाबद्दल जास्त वाचन करतात असे खात्रीलायकपणे सांगतो. आधीच्या वर्षी इतिहासात नापास झालेल्या एक दोन विद्यार्थ्यांना या वर्षी इतिहासात इतका रस निर्माण झाला आहे की त्यांना आता उत्तम गुण मिळू लागले आहेत हे सांगून हेच आपल्या परिश्रमाचे खरे पारितोषिक आहे असे त्याला वाटते.

26 मार्च 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “नाट्यातून इतिहास शिक्षण; Teaching history through role playing

 1. आपल्याला जे कळले आहे ते आंतरिक प्रेरणेने दुसर्‍यास अवगत करवून देणारे शिक्षक दुर्मिळ असतात.

  आम्हाला एक कमल देशपांडे बाई म्हणून बाई होत्या. त्यांनी शिकवलेल्या प्लासीच्या लढाईचा धडा मला आजही लक्षात आहे. अयोध्येचा नबाब (सिराजौदौला) आणि ब्रिटिश अधिकारी (रॉबर्ट क्लाईव्ह) यांच्या हालचाली, किल्ल्याचा वेढा इत्यादी इत्यादी.

  आपल्या चतुरस्त्र आणि चोखंदळ दृष्टीतून आम्ही जग पाहू शकत आहोत ह्याचा आनंद आपली अनुदिनी पाहतांना होतो. त्याखातर आपणास मनःपूर्वक धन्यवाद! अशाच आणखीही नोंदींकरता आपणास हार्दिक शुभेच्छा!

  Posted by नरेंद्र गोळे | एप्रिल 8, 2012, 4:19 pm
  • नरेंद्र्जी
   प्रतिसादासाठी धन्यवाद.चांगले शिक्षक मिळणे ही अतिशय भाग्याची गोष्ट नेहमीच असते.तुम्ही माझा इंग्लिश ब्लॉग वाचता का? तेथेही तुम्हाला काही अतिशय रोचक वृत्ते मिळू शकतील असे मला वाटते.

   Posted by chandrashekhara | एप्रिल 9, 2012, 6:55 सकाळी
 2. hello sir tumche hali post mala milat nahit……………..

  Posted by geeta | एप्रिल 20, 2012, 12:24 pm
  • गीता
   गेले 3/4 महिने भारताबाहेर वास्तव्य असल्याने मराठी लेखन खूपच कमी झाले आहे हे मान्य! आता भारतात परत आलो असल्याने मराठीमधून लेख तुम्हाला वाचायला नक्की मिळतील.
   एवढेच आश्वासन आता देऊ शकतो.

   Posted by chandrashekhara | एप्रिल 20, 2012, 4:09 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: