.
अनुभव Experiences

ब्रिटिश साम्राज्याच्या एका पाऊलखुणेचा अंत


मी लहान असताना, मागच्या पिढीतील प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ व भारताच्या नियोजन आयोगाचे पूर्व डेप्युटी चेअरमन धनंजयराव गाडगीळ, हे माझ्या घरासमोर रहात असत. धनंजयराव गाडगीळ यांच्या धाकट्या चिरंजीवांशी माझी चांगली मैत्री असल्याने, गाडगीळांच्या घरात माझे नेहमीच जाणेयेणे असे, धनंजयरावांचे स्वत:चे असे एक मोठे सुरेख ग्रंथालय व अभ्यासिका होती, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयाच्या पुस्तकांबरोबर, इंग्रजीमराठी कथा कादंबर्‍या, नाटके, कविता अशी हजारावर पुस्तके या ग्रंथालयात होती. वर्षातून एकदा सगळी पुस्तके खाली काढून धूळ झटकून परत नीट लावून ठेवण्याचे काम धनंजयरावांच्या चिरंजीवांकडे असे. त्यामुळे या ग्रंथालयात मी बर्‍याच वेळा गेलो होतो. या ग्रंथालयात एका बाजूला एक मोठी पेटी ठेवलेली असे. या पेटीचा रंग ब्राऊन किंवा काळसर होता व बहुदा त्यावर लेदर चढवलेले होते असे मला अंधुक आठवते. या पेटीत काय असावे याबद्दल मला बरीच उत्सुकता होती. एकदा ही पेटी उघडलेली दिसल्याने मला आत डोकावून बघता आले होते. या पेटीत अगदी एकसारख्या एक दिसणार्‍या व कातडी कव्हर चढवलेल्या पुस्तकांचा एक संच आहे हे माझ्या लक्षात आले होते. अर्थात त्यावेळी इंग्रजीचा गंधही नसल्याने ती पुस्तके कसली आहेत हे कळणे शक्यच नव्हते. पुढे इंग्रजी लिहिता वाचता यायला लागल्यावर (आम्हाला इंग्रजी एबीसीडी शिकण्यासाठी आठव्या इयत्तेत जाई पर्यंत वाट बघावी लागली होती.) या पेटीत एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकानावाच्या पुस्तकाचे खंड आहेत हे समजले होते. नंतर ही पुस्तके बघण्याचा योग आला. कोणत्याही विषयातील कोठलीही माहिती, या खंडांमध्ये एबीसीडी या अनुक्रमाने आवश्यक असल्यास सचित्र स्वरूपात दिलेली असे. त्यावेळेस माहिती मिळवण्याचा हा राजमार्गच होता असे म्हणता येईल. ब्रिटिश साम्राज्याच्या कानाकोपर्‍यात एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकापोचलेला असे व आपले ज्ञानदानाचे काम सतत चालू ठेवत असे.

एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती ही जर एनसायक्लोपिडीया ब्रिटानिकामधे नसेल तर ती गोष्ट बहुदा अस्तित्वात नाही असे समजा असे एनसायक्लोपिडीया ब्रिटानिकाचे प्रकाशक मोठ्या आत्मप्रौढीने सांगत असत व बहुदा त्या काळात ते खरेही होते.

आज या एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाची आठवणे मला होते आहे कारण 244 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर या पुस्तकाचे खंड छापील स्वरूपात यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार नाहीत. या पुस्तकाची 32 खंडात असलेली व 1400 अमेरिकन डॉलर किंमत असलेली आणि सध्या मिळणारी छापील आवृत्ती, ही शेवटची ठरणार आहे. हे पुस्तक आता आतापर्यंत किती लोकप्रिय होते याची कल्पना 1990 साली या पुस्तकाच्या 120000 प्रतींची फक्त अमेरिकेत विक्री झाली होती या आकड्यावरून लक्षात येईल. मात्र पुढच्या 10 वर्षात या खपात झपाट्याने घट झाली व 2010 मध्ये फक्त 8000 प्रती अमेरिकेत विकल्या गेल्या. आता गोदामात असलेल्या 4000 प्रती विकल्या गेल्या की हे पुस्तक परत विकत मिळणार नाही.

विल्यम स्मेली व त्याचे सहकारी यांनी मिळून 1768 मध्ये स्कॉटलंड मधील एडिंबरो येथून प्रथम एनसायक्लोपिडीया ब्रिटानिकाची निर्मिती केली होती. तेव्हापासून दर दोन वर्षांनी या पुस्तकाच्या खंडांची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध होते आहे. एका बेकरी मालकाचा मुलगा व एका केसांचे टोप बनवणार्‍याचा मुलगा या दोघांना लोकाना माहिती हवी असते पण ती कोठेच मिळत नाही हे लक्षात आले व त्यामुळे या स्वरूपातील पुस्तक लोकांना आवडेल अशी या पुस्तकाची कल्पना त्यांच्या मनात प्रथम आली. पुढे विसाव्या शतकाच्या सुरूवातीस या पुस्तकांचे प्रसिद्धी हक्क अमेरिकेतील एका कंपनीने विकत घेतले. तेंव्हापासून हे पुस्तक अमेरिकेतून प्रसिद्ध होते आहे. अमेरिकेतून हे पुस्तक प्रसिद्ध होऊ लागल्यावर घरोघरी जाऊन हे पुस्तक विकण्याची कल्पना खूपच लोकप्रिय झाली.

1970 मध्ये या पुस्तकाची डिजिटल आवृत्ती प्रथम प्रसिद्ध झाली तर 1994 मध्ये हे पुस्तक आंतरजालावर प्रथम अवतीर्ण झाले. परंतु डिजिटल माध्यमांचे महत्व एनसायक्लोपिडीया ब्रिटानिकाने पुरेपूर जाणले नाही असे खेदाने म्हणावे लागते. त्याचप्रमाणे एका अधिकृत स्त्रोताकडून सर्व माहिती मिळवण्यापेक्षा अनेक लोकांनी मिळून जमवलेली माहिती देणारे विकीपिडिया सारखे संकेतस्थळ जास्त लोकप्रिय होईल हे सुद्धा बहुदा ब्रिटानिकाच्या प्रकाशकांच्या लक्षात आले नसावे.

यापुढे ब्रिटानिका आंतरजालावरूनच उपलब्ध होणार आहे. वर्षाला 70 अमेरिकन डॉलर एवढ्या फी मध्ये ब्रिटानिका कोणालाही बघता येईल. विकीपिडीया जरी मोफत असला तरी त्यावरील माहिती अधिकृत व सत्य असेल अशी खात्री देता येत नाही. ब्रिटानिकावरील माहिती मात्र अधिकृत व सत्यच असणार आहे. त्यामुळे संशोधन संस्था किंवा इतर ग्राहक ज्यांना माहितीच्या सत्यतेची खात्री आवश्यक असते असे ग्राहक ब्रिटानिकाकडे वळत राहतील याबद्दल खात्री वाटते.

ज्या ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता अशा साम्राज्याच्या कानाकोपर्‍यात पोचलेला व त्यामुळेच या साम्राज्याची एक पाऊलखूण बनलेल्या या ग्रंथाचे अस्तित्व आता मिटल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची आणखी एक पाऊलखूण काळाच्या पडद्याआड गेली आहे असे म्हणणे चुकीचे ठरू नये.

17 मार्च 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “ब्रिटिश साम्राज्याच्या एका पाऊलखुणेचा अंत

  1. sir your writing is interesting i really like it….sir always give such information

    Posted by balasaheb | मार्च 26, 2012, 3:00 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: