.
ताज्या घडामोडी Current Affairs

आजोबा; Grandfather


एक आजोबा म्हणून तुम्हाला अतिशय क्लेश देणारे प्रसंग कोणते? अशी विचारणा जर मला कोणी केली तर उत्तर देण्यासाठी मला फारसा अवधी लागणार नाही. नातवंडांच्या बाबतीत मनाला अतिशय क्लेश देणार्‍या गोष्टी म्हणजे एक तर त्यांना आलेली आजारपणे, यात अगदी सर्दी पडसे खोकला ताप यापासून कोणत्याही दुखण्याचा अंतर्भाव आहे. पण आजारपणात निदान हे माहिती असते की योग्य तो औषधोपचार झाला की हे आजारपण दूर होणार आहे. पण यापेक्षाही मनाला सर्वात जास्त क्लेश होतात ते म्हणजे नातवंडांच्या रूदनाचे स्वर कानावर पडले की! कोणत्याही आणि कुठल्याही परिस्थितीत नातवंड रडू लागले की मन अगदी हळवे व सैरभैर होऊन जाते. त्याचे ते रडणे थांबून त्याच्या चेहर्‍यावर परत हास्य उमटेपर्यंत काही मला चैन पडत नाही. माझी मुले नेहमी या बाबत आश्चर्य व्यक्त करत असतात की त्यांच्याबरोबर वेळप्रसंगी अतिशय कठोरपणे वागणारा त्यांचा बाबा आता नातवंडांच्या बाबतीत इतका हळवा कसा झाला आहे? पण नातवंडांच्या बाबतीतले हे हळवेपण काही फक्त माझ्यातच आलेले आहे असे नाही. माझे मित्र, परिचित यापैकी आजोबा झालेल्या सर्वांनाच हे हळवेपण आपसुकच आलेले आहे. ते कदाचित या नात्यामुळे आणि वयामुळे निर्माण झालेले असावे.

या हळवेपणामुळेच, आज वृत्तपत्रात एका अमेरिकन आजोबाची बातमी वाचल्यावर प्रथम विश्वास बसणेच कठिण गेले.अमेरिकेतील इंडियाना राज्याचा स्थायिक असलेल्या व 45 वर्षाच्या ख्रिस्तोफर ऍलन कार्लसन (Christopher Alan Carlson) या एका आजोबाला पोलिसांनी अटक करून 8,9 12 वर्षाच्या आपल्या तीन नातवांशी अत्यंत दुष्टपणाचे वर्तन करून त्याना शारिरीक इजा करणे व त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करणे या सारख्या आरोपांखाली खटला दाखल केला आहे. प्रथम मला आश्चर्य वाटले की हा 45 वर्षाचा माणून 3 नातवांचा आजोबा कसा काय झाला? पण त्याची सर्वात मोठी मुलगी मिसेस तारा डॅनाहर (Mrs. Tara Danaher) हिचा जन्म तो फक्त 15 वर्षाचा असल्याचा झाल्याचे वाचल्यावर निदान या गोष्टीचा तरी उलगडा झाला.

हा कार्लसन आपल्या तीन नातवांना घेऊन मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात (1911) ऍरिझोना राज्यातील ग्रॅन्ड कॅनियन या ठिकाणी ट्रेकसाठी म्हणून काही वेळा घेऊन गेला होता. ग्रॅन्ड कॅनियन हा भाग अतिशय खोल दर्‍या व तसेच उंच उंच तुटलेले कडे व अतिशय उंष्ण असलेला भाग म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मागच्या वर्षीच्या 28 ऑगस्टला ट्रेकसाठी आलेल्या एकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे येथे असलेल्या रेंजर्सचे येजा करणार्‍या ट्रेकर्सवर बारीक लक्ष होते. एका रेंजरला आपल्या बायनॉक्युलर मधून हा कार्लसन आपल्या मोठ्या नातवाला कंबरेच्या पट्ट्याने मारताना दिसला. त्यामुळे रेंजर्सनी त्याच्याकडे बारीक लक्ष देण्यास सुरूवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अतिशय कडक उन्हात कार्लसन आपल्या नातवांना चालायला लावत होता. त्या वेळेस तेथील तपमान 42 अंश सेल्सस एवढे होते. रेंजर्सनी कार्लसनला अटक केली तेंव्हा त्याच्या तिन्ही नातवांना ओकार्‍या होत होत्या त्यांचे ओठ संपूर्णपणे कोरडे पडून फाटले होते व अंगावर फोड आले होते. रेंजर्सनी मुलांना खायला प्यायला दिले व कार्लसनची जबानी घेतली. आपली नातवंडे फार लठ्ठ आहेत व त्यांना धट्टेकट्टे करण्यासाठी आपण हे करतो आहोत असे त्याने रेंजर्सना सांगितले.

कोर्टात या तिन्ही नातवांनी दिलेल्या साक्षीत कार्लसनने त्यांच्या केलेल्या छळाची अत्यंत धक्कादायक माहिती कोर्टासमोर आली. या मुलांना सेलरी शिवाय दुसरे काहीही खाण्यासाठी कार्लसन देत नव्हता. एवढ्या कडक उन्हातून फिरल्यावर पाणी पिण्याची त्यांना बंदी केलेली होती. कचर्‍यात पडलेल्या भाज्या या मुलांनी उचलून खाण्यासाठी म्हणून लपवून ठेवल्या होत्या. रस्त्यात भेटणार्‍या कोणालाही आपण मजेत आहोत असे सांगण्याची सक्त ताकीद या मुलांना होती. तरीही मोठ्या नातवाने एका ट्रेकरला पोलिसांना कळवण्यास सांगितल्याची साक्ष या ट्रेकरने नंतर दिली. मुलांना मारणे, त्यांचा गळा दाबणे व त्यांना खुशाल दगडावर ढकलून देणे अशा शिक्षा कार्लसन करत असे. फ्लॅगस्टफ येथील जिल्हा न्यायालयात मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हा खटला उभा राहिला. खटल्याचे कामकाज चालू असताना या मुलांची आई सतत अश्रू ढाळत असताना दिसत होती. मागच्या आठवड्यात ज्युरींनी या सर्व आरोपांखाली, कार्लसनला दोषी ठरवले आहे. जून महिन्यात त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या आरोपाखाली असलेली जन्मठेपेची शिक्षा त्याला दिली जाऊ शकते.

कार्लसन व त्याच्या नातवांची ही हकिगत वाचताना मला अतिशय वाईट वाटले. मुलांना धट्टेकट्टे बनवण्याचा त्याचा उद्देश खरोखरच होता? की तो एक विकृत मनोवृत्तीने पछाडलेला माणूस आहे हे सांगणे कठिण आहे. 8 किंवा 9 वर्षाच्या कोवळ्या मुलांना या पद्धतीने धट्टेकट्टॆ बनवण्याचा अघोरी प्रयत्न जगातील कोणताही आजोबा करेल यावर विश्वास ठेवणे सुद्धा कठिण आहे.

पण कोणी एक आजोबा आपल्या नातवांशी असे वागू शकतो हे नुसते समजल्याने सुद्धा माझी मान शरमेने खरोखरच खाली झुकली आहे.

2 मार्च 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “आजोबा; Grandfather

 1. बाप रे…. भयंकर 😦 😦

  Posted by सुहास | मार्च 2, 2012, 9:59 सकाळी
 2. ग्र्यांड क्यानियान हा अमेरिकेतील प्रांत मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. तेथे हा आजोबा आपल्या कोवळ्या वयाच्या नातवांशी किती अमानुषपणे वागत होता, हे वाचून मला खरे वाटेना. एखाद्या सहृदय माणसाने कोणाशीही असे वागू नये.
  मंगेश नाबर.

  Posted by Mangesh Nabar | मार्च 6, 2012, 6:36 pm
 3. bhayankar! konahi manasane dusaryanshi ase vagu naye mulanshi tar prashnach nahi. 15vya varshi bap zala-tyamule manasik sthiti kalun yete. mhanun — tya tya vayasarakhe vagave ase apan mhanato te kiti khare ahe.
  medha

  Posted by medha | मार्च 16, 2012, 1:24 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: