.
Science

32000 वर्षापूर्वीच्या फळातून रुजलेले फुलझाड; Flowers bloom from a 32000 year old Fruit


आपल्यापैकी अनेकांना, 1993 सालात स्टीव्हन स्पिलबर्ग याने निर्माण केलेला एक चित्रपट, ‘जुरॅसिक पार्कहा चांगलाच स्मरत असेल. ऍम्बर हा नैसर्गिक रित्या सापडणारा एक पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अत्यंत जुन्या काली अस्तित्वात असलेल्या झाडांपासून तयार झालेली जीवाश्म असतात. हा पदार्थ नैसर्गिक रित्या खळीसारख्या चिकट स्वरूपात मिळतो व त्याचे नंतर घनीकरण होते. या प्रक्रियेत, माशा, कोळी यांसारखे कीटक आत अडकून राहतात व नंतर घनीकरण झालेले ऍम्बर हे पारदर्शी असल्याने हे कीटक आता अडकलेले दिसत राहतात. जुरॅसिक कालातील ऍम्बरमधे अडकलेली एक माशी सापडल्याने, त्या माशीचे डीएनए वापरून, डायनॉसोरस सारख्या प्राण्यांना परत एकदा वाढवले जाते, अशी कल्पना या चित्रपटात वापरली होती. प्रत्यक्षात प्राणी जगताच्या बाबतीत असे काही घडणे कठिण आहे. परंतु रशिया मधील काही शास्त्रज्ञांनी 32000 वर्षापूर्वी अर्धवट तयार झालेल्या एका फळांतील बियांपासून ते झाड यशस्वी रित्या वाढविल्याने वनस्पती जगतात असे प्रयोग करणे शक्य आहे हे दाखवून दिले आहे.

मॉस्को जवळ असलेल्या Pushchino येथील Institute of Cell Biophysics, Russian Academy of Sciences research centre मधील शास्त्रज्ञांचा एक गट गेली काही वर्षे सैबेरिया मधील रानटी खारींच्या बिळांसंबंधी संशोधन करतो आहे. ईशान्य सैबेरिया मधील टंड्रा प्रदेशातील लोअर कोल्यमा नदीच्या काठावर ही बिळे या शास्त्रज्ञांना सापडली आहेत. या ठिकाणी ही नदी सध्या एका खोल घळीतून वहात असल्याने तिच्या दोन्ही काठांवरचे कडे उघडे पडलेले आहेत. या कड्यांमध्ये ही बिळे प्राचीन काळीच माती आणि बर्फ यांनी पूर्ण सीलबंद झालेली आहेत. शास्त्रज्ञांच्या या गटामधील एक शास्त्रज्ञ, Stanislav Gubin, याच्या सांगण्याप्रमाणे 70च्या वर खारींची अशी सीलबंद बिळे या शास्त्रज्ञांना सापडली आहेत. तो म्हणतो की

या खारी त्यांची बिळे बांधण्यसाठी बर्फाने गोठलेल्या जमिनीमध्ये फुटबॉलच्या आकाराचे खड्डे खणून त्यात वाळलेले गवत आणि नंतर लोकरीचे धागे यांचे एक अतिशय उबदार असे घर तयार करतात.. हे बीळ सीलबंद झाल्यावर एक उत्तम शीतगृह होते.”

या गटाला सापडलेली बहुतेक बिळे खारींनी खणून तयार केल्यावर थोड्याच दिवसात वार्‍याबरोबर उडणार्‍या धुळीने सीलबंद झालेली होती. जमिनीची सध्याची जी पातळी आहे त्या पातळीच्या 60 ते 130 फूट खाली या दरम्यान ही बिळे कायमस्वरूपी गोठलेल्या स्वरूपात आढळून आली आहेत. या मुळे ही बिळे एखाद्या विशाल डीप फ्रीझरमधे ठेवल्यासारखी असल्याने, त्यांच्या मध्ये ज्या काय गोष्टी खारींनी आणून ठेवलेल्या होत्या त्या गोष्टी या बिळाच्या बंद जगात कोणताही उपद्रव न होता किंवा त्यांचे तपमान परत गोठणबिंदूच्या वर न येता -7 अंश सेल्सस किंवा 19 अंश फॅरनहाईट तपमानाला काही दशसहस्त्र वर्ष राहिलेल्या आहेत. खारींची ही बिळे ज्या भागात आहेत त्या भागात प्राचीन जगतातील (Late Pleistocene Age) गवे, घोडे, हरणे, अंगावर लोकर असलेले गेंडे व हत्तीसमान प्राणी (mammoth) व इतर प्राणी यांची हाडे नेहमीच सापडतात.

शास्त्रज्ञांच्या या गटाला या बिळात, खारींनी साठवून ठेवलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या बिया व फळे हजारोंच्या संख्येने आढळून आलेली आहेत. यापैकी सापडलेली फळे ही सायबेरिया मध्ये आढळून येणार्‍या एका Narrow-leafed Campion’ या नावाच्या किंवा वनस्पतीशास्त्रातील Silene stenophylla हे नाव धारण करणार्‍या, एका फुलझाडाची आहेत. ही फळे ताजी असतानाच गोठवली गेल्याने व नंतर त्याच परिस्थितीत सतत राहिल्याने, कुजण्याची प्रक्रिया चालू न होता, चांगल्या स्थितीत टिकून राहिली आहेत.

शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख, Svetlana Yashina आणि David Gilichinsky, या दोघांच्या नावाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालाप्रमाणे शास्त्रज्ञांनी मॉस्को जवळील त्यांच्या प्रयोगशाळेत या बिळांत सापडलेल्या परिपक्व बिया एका कुंडीत पेरून त्या रुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयोगात शास्त्रज्ञांना यश मिळाले नाही. त्यामुळे या फुलझाडाच्या फळाकडे शास्त्रज्ञांनी आपले लक्ष वळवले. या फळांतील बिया अजुन अर्ध्या कच्च्या होत्या व त्या बियांभोवती placental tissue ची अनेक आवरणे होती. हा placental tissue व त्याच्या आत असलेल्या बिया यांना एका पौष्टिक द्राव असलेल्या डिशमधे ठेवण्यात आले. असे ठेवल्यावर काही दिवसातच फळातील अर्ध्या कच्च्या बिया परिपक्व झाल्याचे आढळून आले. नंतर सुनियंत्रित प्रकाश व तपमान असलेल्या जागेवर ठेवलेल्या कुंडीत या बिया पेरण्यात आल्या. आता या बियांमधून झाडे उगवली असून त्यांना फुलेही आली आहेत.

सध्या नैसर्गिक रित्या सायबेरियाच्या टंड्रा प्रदेशात उगवणारी झाडे व शास्त्रज्ञांनी रूजवलेले हे झाड यात अगदी सूक्ष्म फरक असून हा फरक मुख्यत्वे पानांचा आकार व या झाडाच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभाग घेण्याची फुलांची पद्धत या मध्ये फक्त आहे.

शास्त्रज्ञांनी रुजवलेल्या या झाडाला आता जगातील सर्वात प्राचीन झाड या नावाने संबोधणे सहज शक्य आहे कारण रेडिओकार्बन तंत्राने या झाडाची फळे 31800 वर्षे जुनी असल्याचे सिद्ध झाले आहे.

मात्र हा अहवाल प्रसिद्ध होण्याआधीच या शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख David Gilichinsky यांचा अकस्मात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला व त्यांना आपले संशोधन प्रसिद्ध झाल्याचे काही बघता आले नाही.

24 फेब्रुवारी 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

7 thoughts on “32000 वर्षापूर्वीच्या फळातून रुजलेले फुलझाड; Flowers bloom from a 32000 year old Fruit

 1. चंद्रशेखरजी

  लेख मस्त आहे .
  विश्वास होत नाही हे फूलझाड खरंच ३२ हजार वर्षांपूर्वी चे असेल . ह्या वनस्पतीत त्यावेळचे हवामान व पर्यावरण विषयक काही संकेत दडले असतील त्यांचा अभ्यास करून त्या वेळची परिस्थिती काय होती हे पाहणं खूप मनोरंजक ठरेल ह्यात वाद नाही .
  आपल्या लेखानं माहीतीत भर घातली त्या बद्दल आभारी . तुम्ही तुमच्या ब्लॉगचा माहीती तंत्रज्ञानासाठी अचूक उपयोग करतात .

  संदीप

  Posted by संदीप देवकर | फेब्रुवारी 24, 2012, 8:07 pm
 2. खुपच छान लिहिले आहे.माहिती आवडली

  Posted by prashantredkar | फेब्रुवारी 26, 2012, 6:06 pm
 3. लेखातील माहिती अत्यंत लक्षवेधक आहे. आपली अनुदिनी या बाबतीत नेहमीच पुढे असते. किती म्हणून वाखाणणी करू ? शब्द अपुरे पडतात.
  मंगेश नाबर.

  Posted by Mangesh Nabar | फेब्रुवारी 27, 2012, 10:46 सकाळी
 4. अतिशय उद्बोधक लेख ! इंटरनेट च्या मायाजाळाला “माहीतीजाळ” बनविण्यात आपल्या सारख्यांचा फार मोठा हातभार आहे, तो असाच चालू राहो.

  Posted by Pavan Kale, Pune | फेब्रुवारी 29, 2012, 8:51 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: