.
अनुभव Experiences

अनुभव; An Experience


बेंगलुरू शहरामध्ये, केंद्र सरकारच्या आधारकार्डासंबंधीच्या संगणक कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी एक कार्यालय आहे. तुषार आणि मॅट हे या कार्यालयात काम करणारे दोन तरूण. नोकरी लागल्यावर एकच सदनिका शेअर करण्याचे त्यांनी ठरवले व एकत्र रहायला लागल्यानंतर दोघांची चांगलीच मैत्री जुळली. दोघांचे पूर्वायुष्य तसे साधारण एकाच चाकोरीतून गेलेले! तुषार हा हरयाणामधील एका पोलिस अधिकार्‍याचा मुलगा! भारतातील शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर इनव्हेस्टमेंट बॅन्कर म्हणून 3 वर्षे अमेरिका व सिंगापूरला काम केलेला! मॅट हा आपल्या आईवडिलांबरोबर लहान वयातच अमेरिकेला स्थायिक झाला. अमेरिकेतील एम आय टी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून त्याने शिक्षण घेतले. या दोन्ही तरूणांच्या मनाने घेतले की आपण भारतात परत जावे म्हणजे आपल्या देशाला आपला काहीतरी उपयोग होईल. त्याप्रमाणे ते परत आले व त्यांनी बेंगलुरूमध्ये ही नोकरी घेतली.

येथे आल्यावर त्यांच्या असे साहजिकच लक्षात आले की अरे! आपल्याला भारतातल्या लोकांसंबंधी काही माहितीच नाहीये! एकदा या विषयी गप्पा मारत असताना तुषारच्या डोक्यात अशी कल्पना आली की सामान्य भारतीयाची सुखदुःखे आपल्याला समजावून घ्यायची असली तर आपण सामान्य नागरिकाचे जीवन जगून का बघू नये? आणि या साठी, सामान्य भारतीयाकडे महिन्याला खर्च करण्यासाठी जेवढे पैसे उपलब्ध असतात तेवढ्याच पैशात आपण महिना काढणे, यापेक्षा जास्त उत्तम उपाय असूच शकत नाही. मॅटला ही कल्पना एकदम पसंत पडली व दोघांनी ती कल्पना कार्यवाहीत आणण्याचे ठरवले.

सुरुवातीला सामान्य भारतीयाचे उत्पन्न काय हे त्यांना कळेना. शेवटी त्यांनी सरकारने प्रसिद्ध केलेले महिन्याला 4500 रुपये हे भारतीय नागरिकांचे सरासरी उत्पन्न म्हणून धरण्याचे ठरवले. बहुतेक लोक उत्पन्नाचा 1/3 भाग घरभाडे म्हणून देतात. तेंव्हा घरभाडे वगळल्यावर सर्वसामान्यांकडे महिन्याला 3000 रुपये खर्चासाठी उरत असणार असे धरून त्यांनी दिवसाचा खर्च 100 रुपयाच्या आत बसवण्याचे ठरवले.

त्यांच्याकडे घर सफाई वगैरे करणार्‍या एका मोलकरणीकडून त्यांनी एका महिन्यासाठी तिची खोली राहण्यासाठी मिळवली व त्यांचे सर्वसामान्य भारतीयाचे जीवन सुरू झाले. पहिला प्रश्न जेवण खाण करण्याचा आला. काय जेवण करायचे? व त्यासाठी लागणार्‍या गोष्टी कोठून पैदा करायच्या? हे ठरवण्यातच त्यांचा बराच वेळ जाऊ लागला. बाहेर जेवणे अशक्यप्रायच होते. डबा लावणे सुद्धा आपल्या बजेटच्या बाहेर आहे हे त्यांच्या लक्षात आले. ब्रेड, लोणी किंवा तूप या गोष्टी वापरणे शक्यच नव्हते. दूध व दही अगदी क्वचितच व थोड्याच प्रमाणात त्यांना परवडू शकत होते. थोडे रिफाईन्ड तेल ते वापरू शकत होते. दोघेही अतिशय उत्तम जेवण बनवणारे असल्याने त्यांनी किंमत व कॅलरी याचा बराच विचार करून आपला आहार ठरवला. त्यांच्या शोधाप्रमाणे सोया नगेट्स व पार्ले जी बिस्किटे ही सर्वात उत्तम ठरत होती. बिस्कीटे व सुकेळी हे मिळून केलेला गोड पदार्थ त्यांच्या दृष्टीने रोजची मेजवानी असे.

5 किमी पेक्षा जास्त लांबचा बसचा प्रवास परवडत नसल्याने त्यांचे आयुष्य शहराच्या छोट्या भागात सीमित होऊ लागले. वीज दिवसाला 5ते 6 तासच परवडत होती. संगणक आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी दिवे पंखे याचा वापर अगदी मर्यादित करावा लागला. लाइफबॉय साबणाची एक वडी दोन भाग करून महिनाभर पुरवावी लागे. सिनेमा बघणे शक्यच नसल्याने बाजारातील दुकानांसमोर जाऊन विंडो शॉपिंग करणे एवढी एकच करमणूक शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणत्याही प्रकारची औषधयोजना शक्य नसल्याने आजारी न पडणे एवढेच त्यांच्या हातात होते.

सर्व सामान्यांसारखा एक महिना काढल्यावर एक नवीन आव्हान त्यांना खुणावू लागले. भारतातील नियोजन आयोगाने मध्यंतरी सुप्रीम कोर्टाला एक अतिशय वादग्रस्त विधान सादर केले होते. या विधानाम्रमाणे दर दिवशी 32 रुपयापेक्षा कमी रक्कम स्वत:वर खर्च करू शकणार्‍या शहरी व्यक्तीलाच नियोजन आयोग गरीब म्हणण्यास तयार होता. खेडेगावांच्यात तर ही रक्कम 26 रुपये एवढीच होती. तुषार आणि मॅट यांनी 32 रुपयावर रहाता येईल का? हे पहाण्याचे ठरवले. परंतु त्यांच्या लक्षात आले की शहरात 32 रुपयात रहाता येणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे खेडेगावात 26 रुपयात रहाण्याचे त्यांनी ठरवले.

मॅटचे पूर्वज केरळ मधल्या ज्या करुकाचलगावात रहात होते ते गाव त्यांनी निवडले. दिवसाला फक्त 18 रुपये अन्नखर्च ते आता करू शकत होते. कोणताही समतोल आहार या बजेट्मध्ये शक्य नसल्याने

उकडा तांदूळ, रानवट भाजीपाला व केळी यावर त्यांनी दिवस काढले. दूध, साखर परवडत नसल्याने फक्त काळा चहा ते पिऊ शकत होते. दिवसाला खूप चालणे होत असे कारण कोणतेही वाहन परवडणे शक्यच नव्हते. मोबाईल, संगणक वापर शक्यच नव्हता. साबण वापरणे बंद करून त्यांनी पैसे वाचवले. दिवसभर ते फक्त खाण्याचा विचार करत असत. जर ते आजारी पडले असते तर ते एक महासंकटच ठरले असते. तुषार व मॅट हे दोघेही या अनुभवाला आपल्या आयुष्यातला एक महाभयानक अनुभव असे मानतात.

त्यांचा हा अनुभव संपल्यावर त्यांच्या मित्रमैत्रिणींनी एक जंगी खाना त्यांना दिला. तुषार व मॅट दोघेही म्हणतात की या अनुभवातून जात असताना असल्या राजेशाही जेवणाची स्वप्ने त्यांना नेहमीच पडत असत. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक घास घेतांना त्यांना ज्या लोकांना दोन घास मिळत नाहीत अशा बहुसंख्य लोकांची सतत आठवण येत राहिली व जेवण काही वाटले होते तेवढे रुचकर वाटले नाही.

या अनुभवातून आपण काय शिकलो? हे सांगताना ते म्हणतात की गरिबी हा एक अतिशय भयानक अनुभव आहे. गरिबीत अगदी अतिशय सामान्य स्वप्ने पूर्ण करणे सुद्धा अशक्यप्रायच असल्याने स्वत:चा प्रचंड राग येतो. सर्वसामान्यांना पुरेसे पोषण मिळेल एवढे अन्न मिळेल याची व्यवस्था करणारा कायदा हा आवश्यक आहे. आपण गरिबीत दिवस काढत असताना, ज्यांना भविष्याबद्दल काहीही आशा नाही अशा दुसर्‍या गरिबांनी जी उदारता त्यांना दाखवली त्याची कल्पनाही गरीब नसलेल्यांना करता येणार नाही. कोणत्याही लोकशाही असलेल्या देशांमधे, करूणा असलेले कायदेच गरीबांसाठी केले गेले पाहिजेत.

तुषार आणि मॅट यांनी घेतलेला हा अनुभव त्यांना आयुष्यभरासाठी शिक्षण देणारा हा अनुभव राहणार आहे. या अनुभवाच्या पाठीवर आयुष्यात ते जे काही करतील ते देशातील गरीबांच्या कल्याणासाठीच असेल.

(द हिंदू मधील मूळ इंग्रजी वृत्तावर आधारित)

16 फेब्रुवारी 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

12 thoughts on “अनुभव; An Experience

 1. Nice to know about there Exp.
  Where do you get this story ?

  Posted by Nilesh | फेब्रुवारी 16, 2012, 10:46 सकाळी
 2. Wonderful experience… we should learn from this.

  Posted by Nagesh Deshpande | फेब्रुवारी 16, 2012, 11:59 सकाळी
 3. चंद्रशेखरजी

  वास्तविक जे लोक सरकारी ध्येयधोरणं अन कायदे बनवितात त्यांनी हा अनूभव घ्यावयास हवा होता . जे लोक ३२ न २६ रू. चे निकष लावून गरीब असणं ठरवतात असे लोक नियोजन मंडळात चालवत आहे . तेव्हा ह्या देशात गरिबांच काय होईल हे ब्रम्हदेवालाच ठाउक . पण एक खरं की हे लोक बौध्दिकदृष्ट्या खूप दरीद्री आहेत . आपण कसे लोक देशाचा विकास करायला बसवले आहेत ज्यांना कधी गरीबी माहीत नाही जे हयातभर श्रींमंतीत लोळत आहेत त्यांना आपण गरीबांच कल्याण करायला बसविले आहेत . मनमोहनसिंग , सोनियागांधी . किंवा नियोजन आयोग ह्यांना तेल ,साखर , डाळी ह्यांचे भाव माहीत असतील का? सोनियागांधीनी कधी हा अनूभव घेतला असेल का जिथे खेड्यापाड्यात पिण्याचे पाणी मिळत नाही तिथे महीला कैक किलोमिटर लांबून डोक्यावर अन कंबरेवर पाण्याचे हंडे ठेउन खूप कष्टाने पाणी आणतात . दुर्दैव हेच आहे की ज्यांनी कधी गरीबीचे चटके अनूभवले नाही . ते ह्या देशाच्या गरीबांच कल्याण करणारेत .

  मन खूप तळतळतं पण करू काही शकत नाही

  संदीप

  Posted by संदीप देवकर | फेब्रुवारी 16, 2012, 7:42 pm
 4. चंद्रशेखरजी

  मी पूर्वी निराशावादी नव्हतो पण बहूधा हळूहळू निराशावादाकडे झुकत चाललो आहे . तुम्हीच सांगा आशावाद निर्माण होईल असं तरी काय देशाच्या राजकारणात अन समाजकारणात घडत आहे . मी तुमच्या कडे जी प्रतिक्रिया देतो ती माझी एकट्याचीच नाहीए.

  वेळोवेळी आमच्या ऑफीस मध्ये सहकार्‍यांशी , मित्रांसोबत , तसेच विद्यार्थी मित्रांसोबत राजकारण , समाजकारण ह्याबाबत जी चर्चा होते त्याचाच हा एक प्रातिनिधिक भाग माझ्या प्रतिक्रिया आहेत. त्यातून निराश व्हावं असंच चित्र तयार होतं . हे माझं एकट्याचं मत नसून हे जनमत होत आहे .

  फार लहानपणा पासून माझ्यावर घरची जबाबदारी पडलीये . त्यामूळे मी महागाई , बेरोजगारी , शिक्षणातील अडचणी , ह्यांचा अनूभव घेतला आहे. इतके दिवस मी ह्याची जाहीर वाच्यता करत नव्हतो पण तुमच्या ब्लॉगलेखणाने त्याला वाचा फोडली .

  ह्याविषयावर लिहीण्यासारख खूप आहे . शेवटी फक्त एवढंच सांगेन की मी सर्वच बर्‍यावाईट गोष्टींचा खूप जवळून अनुभव घेतला आहे . माझ्या प्रतिक्रिया वांझ नाहीएत .

  संदीप

  Posted by संदीप देवकर | फेब्रुवारी 19, 2012, 5:22 pm
  • संदीप –
   तुम्ही म्हणता तसे बरे वाईट अनुभव खूप लोकांच्या वाट्याला येतात किंवा येतच होते. माझा तुम्हाला एक मित्रत्वाचा सल्ला आहे की वाचायची आवड असली तर महर्षि अण्णासाहेब कर्वे, गोपाळ गणेश आगरकर वगैरे सारख्या लोकांची आत्मचरिते तुम्ही जरूर वाचा. त्यांनी जे हाल, काबाडकष्ट किंवा मानहानी सहन केली आहे ती वाचा. सध्या मराठीत काही दलित मंडळींची जी आत्मचरित्रे प्रसिद्ध झाली आहेत ती वाचा. मग तुमचे स्वत:चे आयुष्य या मंडळींच्या मानाने किती सुखमय आहे हे तुमच्या लक्षात ये ईल आणि निराशा पळून जाईल.

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 20, 2012, 6:22 सकाळी
 5. kahrach etake sope ahe ka 32 rupayat rahne
  jivan jagane ….mala tar kalpanach karavt nahi

  Posted by gajendra | फेब्रुवारी 19, 2012, 9:11 pm
 6. आपल्याला ह्या प्रयोगातून निदान एक गोष्ट तरी शिकता येईल की अन्नाची किंवा कुठल्याच वस्तूची नासाडी तरी करू नये….आणि आपली गरज , हौस आणि हाव ह्यातल्या सीमारेषा तरी नीट ओळखून त्या प्रामाणिकपणे पाळल्या जाव्यात.एव्हढ जरी पाळलं तरी अनेक गरीब लोकांना आपण मदत करू शकू.

  Posted by अंजली | डिसेंबर 20, 2012, 12:36 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: