.
ताज्या घडामोडी Current Affairs, Science

एकाच माळेचे मणी- भाग 2; Birds of the same feather and flock? -Part II


1992 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था किंवा ISRO ने Antrix corporation या कंपनी कायद्याखाली पंजीकृत केलेल्या एका कंपनीची स्थापना करण्याचे ठरवले. या कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन प्रमाणे या कंपनीची जी प्रस्तावित कार्ये ठरवण्यात आली होती त्यात अवकाश संबंधी उत्पादनांचे व्यापारीकरण, तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य आणि ISRO ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानांचे दुसर्‍या कंपन्यांकडे व्यापारी हस्तांतरण यांचा उल्लेख केलेला आहे. या शिवाय भारतामध्ये अवकाश संबंधित उत्पादने व सेवा यांच्यासाठी आवश्यक अशा औद्योगिक क्षमतेचा विकास करण्यासाठी मदत करणे, या कार्याचीही उल्लेख केलेला आहे. त्यामुळेच 2003 सालच्या मार्च महिन्यात Antrix corporationने जेंव्हा ‘Forge Advisors या अमेरिकेतील एका व्ह्युहात्मक सल्लागारांबरोबर, ‘डिजिटल माध्यमांद्वारे दिल्या जाणार्‍या सेवाया क्षेत्रात काय संधी उपलब्ध होऊ शकतील या बाबत सल्ला घेण्याविषयीच्या एका करारावर स्वाक्षर्‍या केल्या तेंव्हा त्यात शंकास्पद असे काही असल्याचे कोणालाच वाटले नाही.

मात्र कराराप्रमाणे, Antrix corporationला सल्ला देण्याऐवजी या Forge Advisorsने डिसेंबर 2004 मध्ये जेंव्हा अचानक भारतामध्ये एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली तेंव्हा आत काहीतरी शिजते आहे याचा वास संबंधिताना आल्याशिवाय राहिला नाही. Devas Multimedia हे नाव दिलेल्या या कंपनीचे सुरुवातीचे भाग भांडवल फक्त 1,00,000 रुपये होते व हे भांडवल फक्त दोन भागधारकांकडून कडून जमा केलेले होते. यापैकी एक भागधारक हा ISRO मधून बाहेर पडलेला डी.वेणुगोपाल हा शास्त्रज्ञ होता तर दुसरी व्यक्ती एम. उमेश या नावाची होती. मात्र Forge Advisors तर्फे कोणीही व्यक्ती या कंपनीच्या संचालक मंडळात नव्हती.

देवाज मल्टीमिडिया या कंपनीची स्थापना झाल्यापासून काही दिवसांत म्हणजे 24 डिसेंबर 2004 रोजी Antrix Corporation च्या संचालक मंडळाने, Antrix व देवाज या दोन कंपन्यांमध्ये सहकार्य करण्याबाबतच्या एका प्रस्तावित कराराला मान्यता दिली आणि एका महिन्यात म्हणजे 28 जानेवारी 2005 रोजी या दोन कंपन्यांमधील सहकार्याच्या करारावर सह्या देखील करण्यात आल्या. या कराराद्वारे खालील बाबींना मान्यता दिली गेली.

1.करार अंमलात आल्यापासून पुढच्या 12 वर्षासाठी Antrix Corporation कडील दोन उपलब्ध उपग्रहांवरील, 90% बॅन्डविड्थ ही देवाज साठी राखून ठेवली जाईल.

2. या आरक्षणासाठी देवाज मल्टीमिडिया, Antrix Corporation ला ऍडव्हान्स म्हणून प्रत्येक उपग्रहामागे 20 मिलियन अमेरिकन डॉलर देईल. व त्या नंतर प्रत्येक वर्षी 9 मिलियन अमेरिकन डॉलर प्रति उपग्रह भाडे म्हणून देईल.

या कराराप्रमाणे पुढच्या 12 वर्षात Antrix Corporation ला देवाज कडून 300 मिलियन अमेरिकन डॉलर मिळणे अपेक्षित होते. मात्र हा करार देवाजच्या पक्षास झुकलेला व अगदीच एकतर्फी होता असे म्हणता येते. उपग्रहाचे कार्य नीट न चालल्यास ती भारत सरकारच्या अवकाश विभागाची जबाबदारी होती व असे झाले तर देवाजला मोठी नुकसान भरपाई दिली जाणार होती.

या करारातील सर्वात रोचक भाग असा होता की ज्या दोन उपग्रहांवरील बॅन्डविड्थ, देवाजला भाड्याने दिली जाणार होती त्या दोन उपग्रहांचे उत्पादन करण्याची मंजुरी सुद्धा केंद्र सरकार व केंद्रीय मंत्रीमंडळ यांच्याकडून अवकाश विभागाला मिळालेली नव्हती. असे असताना सुद्धा या दोन प्रस्तावित उपग्रहांवरची बॅन्डविड्थ, देवाज मल्टीमिडिया या कंपनीला भाड्याने देण्याचा करार Antrix ने करून टाकला होता. या वेळेस देवाज मल्टीमिडीया कंपनीकडे फक्त 1,00,000 लाख रुपये भांडवल होते. या क्षेत्रातील कोणताही अनुभव त्यांना नव्हता किंवा त्या क्षेत्रातील कोणतीही पेटंट्स त्यांच्याकडे नव्हती. तरीही हा करार Antrixने त्यांच्या बरोबर केला होता. या कराराप्रमाणे उपग्रह उपलब्ध न झाल्यास देवाजला भरपाई दिली जाणार होती व ठरवलेले भाडे 12 वर्षांसाठी स्थिर राहणार होते. देवाजला या धंद्यातून भरपूर फायदा झाला असता तरी भाड्याची रक्कम तीच राहणार होती.

Antrix बरोबरचा करार झाल्याबरोबर देवाजमध्ये पुढच्या काळात एकदम रहस्यमय घडामोडी सुरू झाल्या. डिसेंबर 2005 पर्यंत (1 वर्षभरात) भागधारकांची संख्या 12 झाली व भाग भांडवल 5,00,00 रुपये झाले. भागधारकांत आता Forge Advisorsचे तीन भाग धारक आले व त्यांच्या हातात एकूण भाग भांडवलापैकी 60 % भाग आले. या शिवाय मॉरिशस स्थित दोन भागधारक या 12 मध्ये आले.

2007-2008 मध्ये Forge Advisors व सुरुवातीचे दोन भाग धारक यांनी आपल्या भागांपैकी काही भागांचे हस्तांतरण Deutsche Telekom (20%), मॉरिशस स्थित भाग धारक (17%) ISRO मधून बाहेर पडलेले एक शास्त्रज्ञ एम. जी. चंद्रशेखर (19%) यांना केले. या हस्तांतरणासाठी प्रत्येक भागामागे 25,505 रुपये एवढा प्रिमियम त्यांना दिला गेला. आणखी 3 वर्षांत म्हणजे मार्च 2010 पर्यंत भागधारकांची संख्या 17 पर्यंत वाढली. त्या वेळेस हस्तांतर केलेल्या भागांवर 1,26,821 रुपये प्रति भाग एवढा प्रिमियम सुरवातीच्या भागधारकांना मिळाला व या भागधारकांना कंपनीने कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या आधीच 2 कोटी व 7.4 कोटी रुपये एवढा फायदा मिळाला.

हे कसे शक्य झाले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला परत एकदा ISRO कडे जाणे आवश्यक आहे. मी वर उल्लेख केला आहे की ज्या वेळेस Antrix-Devas करारावर सह्या झाल्या त्या वेळेस Antrix कडे कोणताही उपग्रह उपलब्ध नव्हता किंवा असे कोणते उपग्रह बनवण्याच्या कोणत्याही प्रस्तावित निर्णयाला सरकारी मंजुरीही मिळालेली नव्हती. परंतु त्या वेळेस ISRO चे चेअरमन आणि सरकारच्या अवकाश विभागाचे सचीव या दोन्ही पदांवर एकच व्यक्ती होती. Antrix-Devas करार झाल्याबरोबर मे 2005 मध्ये अवकाश विभागाच्या सचिवांनी, केंद्रीय मंत्रीमंडळापुढे एक ठराव मंजुरीसाठी ठेवला. या ठरावात असे म्हटले होते की अनेक व्यापारी संस्थांनी आपल्याला बॅन्डविड्थ खरेदी करण्यात रस असल्याची पत्रे दिलेली असल्याने, GSAT-6 या उपग्रहाची बांधणी करण्यास मंजुरी दिली जावी. प्रत्यक्षात या वेळी देवाज बरोबरील करार झालेला होता परंतु ही बाब या ठरावात नमूद केली गेली नव्हती. याच पद्धतीने ऑक्टोबर 2009 मध्ये GSAT 6A उपग्रहाच्या बांधणीचा ठराव केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केला तेव्हाही प्रत्यक्षात हे दोन्ही उपग्रह देवाज साठी बनवण्यात येणार आहेत ही माहिती किंवा देवाज बरोबरच्या कराराची माहिती यापैकी कोणतीच माहिती या ठरावात दिली गेली नव्हती.

केंद्रीय मंत्रीमंडळाची उपग्रह बांधणीला मंजुरी मिळाल्याच्या तारखा, व देवाजच्या भाग धारकांना भाग हस्तांतरण करताना मिळालेला प्रिमियम, यामधील संबंध अगदी सरळपणे दिसू शकतो आहे. मात्र या सगळ्या आर्थिक व्यवहारात खरा फायदा कोणाचा झाला आहे? व त्यात कोणी आर्थिक गैरव्यवहार केलेले गुन्हेगार आहेत का? हे योग्य त्या संस्थेतर्फे चौकशी केल्यावरच समजू शकणार आहे.

2011 सालच्या सुरूवातीस वृत्तवाहिन्यांनी या Antrix-Devas घोटाळ्यासंबंधी माहिती प्रथम प्रसृत केली.

(क्रमश):-

7 फेब्रुवारी 2012

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “एकाच माळेचे मणी- भाग 2; Birds of the same feather and flock? -Part II

 1. देश विकायला काढलाय सगळ्यांनी…त्यात शास्त्रज्ञही सामील झालेत!

  सुंदर लेख आहे सर…मी बातम्या बघितल्या पण इतके विश्लेषणात्मक काहीच समजू शकले नव्हते.
  आणि लेखाचा मुख्य अंश सोडून दुसरी कुठलीही टिपण्णी आपण केलेली नाही हे जास्त भावले..वाचकांवर सोडले सगळे.
  मीही एक संशोधक आहे, पुढे चालून मलाही एखाद्या केंद्रीय संशोधन संस्थेत संशोधनाची संधी मिळेल. पण असे खिसेभरू प्रकार करून स्वतःला शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे माफियां इतकेच बेशरम आणि नालायक आहेत; आणि येणाऱ्या पिढीने तसे करू नये म्हणून मी माझ्या प्रत्येक संशोधन करणाऱ्या मित्रांना हा लेख पोहोच करणार..

  Posted by tusharss | फेब्रुवारी 8, 2012, 7:48 सकाळी
 2. यात manipulation केले गेले नाही याची खात्री झाल्याशिवाय निष्कर्ष काढणे योग्य नाही.

  Posted by मनोहर | फेब्रुवारी 8, 2012, 10:37 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: