.
ताज्या घडामोडी Current Affairs, People व्यक्ती, Science

एकाच माळेचे मणी? भाग 1; Birds of the same feather & Flock? -Part I


भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO हा भारतातील मध्यवर्ती सरकारचा एक विभाग आहे. या संस्थेकडे अवकाश संशोधन या विषयासंबंधीच्या सर्व जबाबदार्‍या देण्यात आलेल्या आहेत. या जबाबदार्‍यांत अंतराळामध्ये शास्त्रीय प्रयोग व संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची रॉकेट्स किंवा अग्निबाण यांचा विकास व बांधणी या कामाचा अंतर्भाव आहे. याच संस्थेच्या हाताखाली असलेल्या दुसर्‍या एका विभागात, उपग्रह आणि अवकाशयाने, यांचे आराखडे बनवणे व त्या आराखड्यांनुसार विकास व बांधणी करणे ही कार्ये केली जातात. हे उपग्रह किंवा अवकाशयाने, ISRO बनवत असलेल्या रॉकेट्सच्या सहाय्याने अंतराळात पाठवले जातात किंवा युरोपियन स्पेस कमिशन किंवा रशियन स्पेस एजन्सी सारख्या दुसर्‍या देशांच्या मालकीच्या अवकाश संशोधन संस्थांच्या माध्यमातून एक व्यापारी सौदा या तत्वावर पाठवले जातात. (प्रत्यक्षात या व्यापारी सौद्यासाठी ISRO भरभक्कम रक्कम खर्च करून हे उपग्रह अंतराळात पाठवत असते.) ISRO करत असलेले विकास कार्य मोलाचे आहे याबद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. हा विभाग सुरू करण्यात आला तेंव्हा ही जबाबदारी स्वीकारणारे होमी भाभा किंवा होमी सेठना यांच्यासारख्या भारतीय संशोधकांची दूरदृष्टी या साठी कारणीभूत झालेली आहे. या संशोधकांनी रचलेल्या पायावर संशोधकांच्या काही पिढ्यांनी पुढे देशाला अभिमान वाटावा अशी प्रगती केली आहे

ISRO या संस्थेने अवकाशात पाठवलेले उपग्रह अनेक कारणासाठी वापरले जातात. यात भूभागांचे नकाशे बनवणे, अवकाशात शास्त्रीय संशोधन करणे आणि दळणवळण ही मुख्य कार्ये समजता येतील. दळणवळणाच्या क्षेत्रात उपग्रहांचे कार्य एखाद्या आरशाप्रमाणे असते. जमिनीवरून पाठवलेले संदेश उपग्रह प्राप्त करतात व त्या संदेशांची शक्ती वाढवून ते पृथ्वीकडे परत पाठवतात. यावरून हे लगेच लक्षात येऊ शकते की अतिशय कमी खर्चात, रेडिओ व टीव्ही लहरी, एका खूप मोठ्या भूभागाकडे प्रक्षेपित करण्याची क्षमता उपग्रहांमध्ये असते.

ही सर्व माहिती मी या लेखामध्ये अशा साठी देतो आहे की ISRO ही एक सरकारी मालकीची संस्था असून तिचा सर्व खर्च सरकार किंवा तात्पर्याने तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे सर्व साधारण लोक करीत आहेत हे लक्षात यावे. या खर्चाच्या बदल्यात ISROने खालील उद्दिष्टे गाठणे आवश्यक समजले जाते. सुरुवातीच्या काळात अंतराळ संशोधन व तंत्रज्ञानाचा विकास करणे व देशाला आंतर्राष्ट्रीय समाजात मान मिळवून देणे हीच उद्दिष्टे ISRO समोर होती. ही उद्दिष्टे ISROने बर्‍यापैकी प्रमाणात साध्य केली असे म्हणायला काहीच हरकत नसावी. 1970 च्या दशकानंतर तंत्रज्ञानात झालेल्या नेत्रदीपक प्रगतीनंतर उपग्रहांच्या मार्फत टीव्ही लहरी (ज्यांना बरीच बॅन्डविड्थ आवश्यक असते) प्रक्षेपित करणे शक्य झाले व ISRO साठी एक नवे क्षेत्र खुले झाले. य़ा नव्या क्षेत्रातून व्यापारी तत्वावर नफा कमवणे सहज शक्य होते. टीव्ही प्रक्षेपण केंद्रे, उपग्रह मालकांना, त्यांच्या उपग्रहावरून आपल्या वाहिनीच्या संदेशाचे प्रक्षेपण करण्यासाठी मोठी किंमत मोजण्यास तयार होते. याच काळात ARABSAT किंवा ASIASAT या सारखे उपग्रह केवळ टीव्ही लहरी प्रक्षेपण करण्यासाठी अवकाशात पाठवले गेले. भारताचे एकूण आकारमान बघता ISRO ने या क्षेत्रात उडी घेणे स्वाभाविक व आवश्यक होते व या नवीन मागणीला पुरे पडण्यासाठी ISROने INSAT मालिकेचे उपग्रह विकसित करण्यास सुरूवात केली. प्रथमत: सरकारी मालकीच्या दूरदर्शन वाहिन्यांसाठीच INSAT उपग्रह वापरले जात होते पण जसजसे INSATउपग्रह तांत्रिक दृष्ट्या उत्कृष्ट दर्जाचे होत गेले तसतशा खाजगी वाहिन्याही हे उपग्रह वापरू लागल्या आणि ISROला एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ लागली.

ISRO हा सरकारचा एक विभाग असल्याने व्यापारी सौद्यांसाठी सरकारी लालफितीचा फारच अडथळा होतो आहे हे लक्षात आल्याने भारतीय सरकारने एक योग्य निर्णय घेतला व सरकारी मालकीच्या पण कंपनी कायद्याखाली येणार्‍या Antrix Corporation या कंपनीची सरकारने स्थापना कली. ISRO च्या रॉकेट्सच्या सहाय्याने दुसर्‍या देशांनी बनवलेले उपग्रह अंतराळात पाठवण्याबाबत व्यापारी सौदे करणे या बरोबरच ISROच्या उपग्रहांवर उपलब्ध असलेली बॅन्डविड्थ टीव्ही वाहिन्यांना विकण्याचे कामही या कंपनीकडे आले.

थोडी तांत्रिक माहिती (रोचक न वाटल्यास वगळली तरी चालेल)

सर्व प्रकारच्या विद्युतचुंबकीय लहरी या एका वर्णपटाचा भाग असतात. या वर्णपटाच्या एका टोकाला लो किंवा मिडियम बॅन्ड रेडिओ लहरी असतात. (आकाशवाणीची रेडिओ स्टेशन्स याच बॅन्डवर आपले कार्यक्रम प्रक्षेपित करत असतात.) वर्णपटाच्या दुसर्‍या टोकाला दृष्य प्रकाश लहरी व त्या पलीकडे अतिनील लहरी व त्या पलीकडे क्ष किरण व गॅमा किरण असतात. दृष्य प्रकाश लहरींच्या थोडे खाली आपण मायक्रोवेव्ह म्हणतो त्या लहरी असतात. दृष्य प्रकाशात जसे तांबडा, पिवळा, निळा या सारखे बॅन्ड असतात त्याच प्रमाणे मायक्रोवेव्ह्ज मध्ये S, C या सारखे बॅन्ड असतात. यापैकी S, C, Kuहे बॅन्ड टीव्ही प्रक्षेपणासाठी उपग्रहाद्वारे वापरले जातात.

एकंदरीत सर्व चित्र स्पष्ट व्हावे म्हणून एक सारांश घेऊया.

1. ISRO सरकारी किंवा कर भरणार्‍यांच्या पैशांनी अवकाशात रॉकेट्स व उपग्रह प्रक्षेपण करत असते.

2. हे पाठवलेले उपग्रह निर्धारित कक्षेत किंवा ठिकाणी स्थिर ठेवण्याचे कार्य ISRO करते. यासाठी आवश्यक असलेली बरीच मोठी यंत्रणा व खर्च हा ISRO संस्थाच करते.

3. उपग्रहांवरील ट्रॅन्सपॉन्डर्स द्वारे उपलब्ध असलेली बॅन्डविड्थ एशिया खंडातील अनेक टीव्ही प्रक्षेपण करणार्‍या कंपन्यांना विकून, Antrix Corporation भारत सरकारसाठी बरेच द्रव्यार्जन करू शकते.

हे सगळे अगदी सोपे आणि सरळ भासत असले तरी प्रत्यक्षात समोर येत असलेली एक मोठी अडचण आपण हिशोबात घेतलेली नाही. भारत सरकारच्या कोणत्याही आर्थिक उलाढालीत, कोणी ना कोणी सरकारी कर्मचारी हे सरकारच्या यंत्रणेचा भाग हे असतातच. या कर्मचार्‍यांची कधीही न संपणारी व सतत वाढत जाणारी आर्थिक हाव आपण वर विचारात घेतलेलीच नाही. ही हाव असल्यानेच गेल्या काही वर्षात 2जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा किंवा मुंबईमधील आदर्श संकुल घोटाळा यासारखे अनेक घोटाळे सतत उघडकीस येत आहेत.गेल्या दशकात अतिशय जोमाने वाढणार्‍या व सबंध देशाचे वाटोळे करू पाहणार्‍या या भ्रष्टाचाराच्या राक्षसी कर्करोगापासून, ISRO मधील शास्त्रज्ञांचा समुदाय दोन हात अंतरावर असेल अशी माझी भाबडी समजूत होती. परंतु आता बाहेर आलेल्या माहिती प्रमाणे हा माझा भ्रमच होता हे स्पष्टपणे दिसून आले आहे.

दुर्दैवाने, ISRO मधील काही शास्त्रज्ञांनी इतर विभागातील भ्रष्ट सरकारी कर्मचार्‍यांपेक्षा आपण निराळे नसून एकाच माळेचे मणी आहोत हे आपल्या कृतीने सिद्ध करून दाखवले आहे.

या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनी एक नवीन कल्पना सरकारपुढे मांडली. Antrix Corporation ही कंपनी सरकारी मालकीची असल्याने बॅन्डविड्थ विकण्यासाठी या कंपनीला व्यापारी जगतातील सौदे करणे नीट जमणार नाही व या साठी Antrix Corporation ने जर संपूर्ण उपलब्ध बॅन्डविड्थ एकाच खाजगी वितरक कंपनीला विकली तर नंतर ती कंपनी नंतर टीव्ही वाहिन्यांना बाजारभावाप्रमाणे योग्य त्या भावात, ही बॅन्डविड्थ आवश्य्क तशी विकू शकेल व Antrix Corporation चा शेवटी फायदा होईल. सुरुवातीस एस बॅण्डची बॅन्डविड्थ फक्त या कंपनीला विकावी अशीही कल्पना निघाली.

प्रथमदर्शनी तरी या कल्पनेत काही तृटी आहेत असे कोणी म्हणणार नाही. वितरक नेमणे ही व्यापारी जगतातील सर्व मान्य प्रथा आहे. या वितरक कंपनीमुळे एकूण उपलब्ध बॅन्डविड्थचे योग्य रितीने, वापर करू पाहणार्‍यांना कंपन्यांना, त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे वितरण झाले असते व Antrix Corporation ला वितरणाची जबाबदारी टाळता आल्याने विक्रीवर होणारे ओव्हरहेड्स कमी करता आल्याने तिचा फायदा वाढला असता.

दुर्दैवाने नंतर असे लक्षात आले की या कल्पनेच्या मागचे खरे हेतू अगदी निराळे व गुन्हेगारी स्वरूपाचे होते.

क्रमश:-

5 फेब्रुवारी 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: