.
ताज्या घडामोडी Current Affairs

किम डॉटकॉम -एक अफलातून व्यक्ती; Kim Dotcom’s boom and bust


  नियमबाह्य मार्गांनी लोकांना हव्या असलेल्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या व त्यातून अमाप पैसा कसा कमावयाचा याचे इंगित काही लोकांना जन्मजातच प्राप्त असते. किंबहुना यासाठी हे लोक जे तंत्रज्ञान विकसित करतात त्यातून पुष्कळ वेळा शेवटी कायदेशीर मार्गांनी मिळणार्‍या सेवाच कायदेशीर आणि स्वस्त होऊन जातात. पूर्वी भारतातून केलेले आंतर्राष्ट्रीय फोन कॉल्स एवढे महाग असत की अक्षरश: घड्याळाकडे बघून बोलावे लागत असे. पंचवीस तीस वर्षांपूर्वी 3 मिनिटाचा कॉल परदेशात केला की 60 रुपयाच्या आसपास बिल येत असे. (त्या वेळेस 60 रुपये ही रक्कम बरीच होती.) नंतर आंतरजालावरून फोन करता येऊ लागले. प्रथम असे फोन संपूर्ण बेकायदेशीर आहेत असे भारत सरकारने ठरवले व लोकांना आंतरजालावरून फोनची सेवा उपलब्ध करून देणार्‍या काही मंडळीवर कायदेशीर कारवाई केली. नंतर तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की त्याला आवर घालणे अशक्य आहे हे भारत संचार निगमच्या लक्षात आले व त्यांना शेवटी आंतर्राष्ट्रीय फोन कॉल्स अगदी स्वस्त करणे भाग पडले.
नवीन आलेले चित्रपट, गाणी, साऊंड ट्रॅक्स हे खूप लोकांना बघायचे असतात व ऐकायचे असतात. पण अशा चित्रपट किंवा गाण्यांच्या डीव्हीडी, सीडी यांची किंमत बरीच असते. कॉपीराईट कायद्याप्रमाणे अशा चित्रपटांचे किंवा गाण्यांचे वितरण कोणालाही करण्यास परवानगी नसते. नाहीतर आपण या मूळ चित्रपटाची किंवा गाण्याची सीडी, डीव्हीडी आणायची व कॉपी काढून त्या लोकांना वितरित करायच्या हा उद्योग कायदेशीर रित्या कोणालाही करता आला असता. हा उद्योग करायला बंदी घालणे व ती पाळली जाते आहे की नाही ते पहाणे हे त्या मानाने सोपे असल्याने काही मंडळींनी एक नवीच शक्कल लढवली. एका संकेतस्थळावर जे चित्रपट किंवा गाणी लोकांच्या स्वत:च्या संगणकात आहेत अशा चित्रपटांची किंवा गाण्यांची यादी प्रसिद्ध करण्यास सुरवात केली. कोणाला या यादीपैकी चित्रपट किंवा गाणे स्वत:च्या संगणकात डाऊनलोड करायचे असेल तर त्या व्यक्तीचा संगणक व ज्याच्याकडे ते गाणे किंवा चित्रपट आहे त्या व्यक्तीचा संगणक हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून एकमेकाशी जोडले जाऊ लागले व हा चित्रपट किंवा गाणे विनासायास वितरित होऊ लागले.
हे अशा प्रकारचे वितरण खूप मंद गतीने होते व त्यात विश्वासार्हता खूपच कमी असते हे लक्षात आल्याने एक नवीच शक्कल काही लोकांनी लढवली. एक संकेतस्थळ स्थापन करून त्यावर त्या संकेतस्थळाच्या सभासदांना स्मृती कक्ष उपलब्ध करून द्यायचा. या स्मृतीकक्षात लोक त्यांच्या जवळचे चित्रपट, गाणी वगैरे अपलोड करून ठेवून देऊ शकतात. कोणालाही यातील चित्रपट, गाणी हवे असल्यास ते डाऊनलोड करून ती प्राप्त करून घेऊ शकतात. या स्मृतीकक्षात ठेवलेल्या फाइल्सवरची मालकी ज्याने चित्रपट, गाणे अपलोड केले आहे त्याचीच असल्याने संकेतस्थळाची या बाबतची जबाबदारी काही नाही व या संकेतस्थळाने कोणत्याही कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. ही शक्कल वापरून स्वत:चे संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना ज्या लोकांच्या डोक्यात आली त्यामधे किम श्मिट्झ या नावाचा एक जर्मन संगणकतज्ञ होता. किमने ‘मेगॅअपलोड. कॉम’ या नावाचे एक संकेतस्थळ तयार केले व त्यावर लोकांना आपल्याकडच्या फाईल्स ठेवून देता येतील असा मोठा स्मृती कक्ष उपलब्ध करून दिला. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तो लोकांकडून वर्गणी घेत असे व आपल्या संकेतस्थळावर जाहिरातींना जागा उपलब्ध करून देत असे. या जाहिराती व वर्गण्यांमधून त्याला 175 मिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी प्राप्ती झाली असावी असा अंदाज आहे.
या किम श्मिट्झने काही वर्षांपूर्वी आपले नाव बदलून ते किम डॉटकॉम असे केले. 37 वर्षाच्या किमचे आतापर्यंतचे आयुष्य एखाद्या कथा कादंबरीत शोभण्यासारखे आहे.जर्मनीतील कील शहरात जन्माला आलेल्या या तरूणाच्या हातात पहिला संगणक 9 वर्षाचा असताना आला. प्रथम कॉम्पुटर गेम्स विकत घेऊन त्यांच्या बेकायदेशीर प्रती त्याने आपल्या मित्रांना विकण्यास सुरूवात केली. या नंतर थोड्याच काळात टेलिफोनच्या सहाय्याने दुसर्‍या व्यक्ती किंवा संस्था यांच्या संगणक प्रणाली हॅक करण्याच्या उद्योगात त्याने प्रचंड यश मिळवले. नासा, पेंटॅगॉन व एक खाजगी बॅन्क यांच्या संगणक प्रणाली त्याने हॅक केल्या. 1998 मध्ये त्याला या बाबत गुन्हेगार ठरवून शिक्षा झाली. ही शिक्षा भोगल्यानंतर त्याने किमव्हेस्टर या नावाची कंपनी चालू केली व संगणक सुरक्षा सल्लागार म्हणून सेवा देण्यास सुरवात केली. या सुमारास त्याच्याजवल बरीच माया जमली होती. त्यातून त्याने नव्या संगणक प्रणाली विकसकांना भांडवल पुरवण्यास सुरूवात केली.
2002 मध्ये किमने एका आंतरजालावरून व्यवसाय करणार्‍या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून तिची मालकी हस्तगत केली व आपण या कंपनीत अमेक मिलियन डॉलर गुंतवणूक करत असल्याचे जाहीर केले. यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत खूप वर गेली व त्याबरोबर किमने आपली सर्व गुंतवणूक काढून घेतली. या बद्दल त्याला जर्मन न्याय व्यवस्थेने गुन्हेगार ठरवले. परंतु किमने थायलंडला पोबारा केला. तेथे त्याला अटक करून परत जर्मनीला आणण्यात आले आणि 1 लाख यूरो दंड व 18 महिने वर्तन सुधारण्यासाठी कालावधी देण्यात आला. यानंतर किम गायब झाला व दोनतीन वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये अवतीर्ण झाला. एव्हांना त्याने आपले नाव बदलले होते. न्यूझीलंडमध्ये 10 मिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक करण्याचे मान्य केल्याने त्याला न्यूझीलंडमध्ये कायम स्वरूपी वास्तव्य करण्याची परवानगी मिळाली.
6 फुटांपेक्षा जास्त ऊंची व 130 किलोग्रॅम वजन असलेला किम अतिशय गर्विष्ठ आहे. लहानपणीच तो मित्रांना आपण बिल गेट्सपेक्षा जास्त हुशार असल्याने जगातील श्रीमंत लोकांपैकी एक होणार आहोत असे सांगत असे.
मागच्या आठवड्यात अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेने मेगॅअपलोड .कॉम या संकेतस्थळाचे काही स्मृती कक्ष अमेरिकेमध्ये असल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग होत असल्याचे ठरवले व हे संकेतस्थळ बंद करून किमला अटक करण्याची विनंती न्यूझीलंड सरकारला केली. न्यूझीलंडचे पोलिस जेंव्हा किमच्या प्रासादतुल्य घरात गेले तेंव्हा स्वत:ची ओळख पटवून दिल्यावरही किमने अनेक इलेक्ट्रॉनिक कुलपांची सुरक्षा असलेल्या कक्षात स्वत:ला कोंडून घेतले व ही सर्व यंत्रणा उध्वस्त करूनच पोलिसांना त्याला अटक करावी लागली.
त्याचा न्यूझीलंडमधला प्रासाद एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या निवासस्थानासारखा बांधलेला आहे व अतिशय आलीशान आहे.
अमेरिकन सरकारचे असे म्हणणे आहे की किमच्या कंपनीने चित्रपट किंवा गाण्यांच्या कॉपीराईट मालकांचे निदान 500 मिलियन डॉलर्स तरी बुडवले आहेत. परंतु मेगॅअपलोड. कॉम किंवा किम यांनी बेकायदेशीर कृत्य केले आहे किंवा नाही हे कोर्टातच ठरेल. मेगॅअपलोडच्या अमेरिकन वकीलाचे म्हणणे आहे की हे संकेतस्थळ आपल्या सभासदांना आंतरजालावर फक्त स्मृतीकक्ष उपलब्ध करून देत होते व या संकेतस्थळाने कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही.
मेगॅअपलोड च्या माध्यमातून चित्रपट किंवा गाणी हस्तांतर करणार्‍या बर्‍याच शौकिनांची आता अडचण होणार आहे हे नक्की.
24 जानेवारी 2012
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: