.
ताज्या घडामोडी Current Affairs

पुण्यातील नद्यांसाठी स्मरणगीत- भाग 1; Requiem for Pune Rivers- Part I


Case of a Missing Stream;  हरवलेल्या नाल्याची कथा 
मी लहान असताना प्रभात फिल्म कंपनीच्या रस्त्यावर असलेले माझे घर व प्रभात कंपनी यांच्यामध्ये फक्त एक माळरान होते. या माळरानाच्या एका बाजूला प्रभात कंपनीकडे जाणारा रस्ता तर दुसर्‍या टोकाला वेताळ टेकड्यांपैकी सर्वात बुटकी असलेली पायथ्याची एक टेकडी होती. माझ्या घराच्या गच्चीवरून प्रभात फिल्म कंपनीचे कुंपण सहज दिसत असे. एखाद्या दिवशी बाह्य चित्रीकरण असले की आमच्या गच्चीवरून ते स्पष्टपणे दिसू शके.
 1950 च्या दशकातील, प्रभात फिल्म कंपनीच्या शेजारचे माळरान.
हा भाग आता संपूर्णपणे विकसित झाला आहे. 
या मधल्या माळरानाला जरी टेकडी पासून ते प्रभात फिल्म कंपनीकडे जाणारा रस्ता असा एक सर्वसाधारण उतार असला तरी असंख्य उंचवटे व त्या बाजूंच्या घळी यामुळे मधल्या जमिनीला सपाटपणा असा नव्हताच. खडकाळ मुरमाड जमिनीमुळे मोठी झाडे वगैरे नव्हतीच. होती ती बाभळीची काटेरी झुडपे. या माळरानाला साधारण तिरपा, म्हणजे प्रभात फिल्म कंपनीच्या आवाराच्या नैऋत्य टोकापासून, छेद देत साधारण दक्षिणेच्या दिशेला जाणारा एक बर्‍यापैकी मोठा ओढा किंवा नाला होता. एकदा पाऊस सुरू झाला की या ओढ्याला नोव्हेंबर-डिसेंबर अखेरपर्यंत भरपूर पाणी असे. टेकडीवरून वहात येणारे सर्व पाणी या ओढ्यात एकत्र येऊन, हा ओढा सध्याची अभिनव शाळा आहे त्या जागेतून जाऊन कर्वे रस्ता ओलांडत असे व पुढे सरळ मुठा नदीला जाऊन मिळत असे. पावसाचे सर्व अतिरिक्त पाणी या नाल्यातून वहात जात असल्याने रस्ते व बाजूचा भाग जलमय कधीच होत नसत. पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून नेण्याची ही एक नैसर्गिक प्रणालीच होती. पावसाळ्याचे चार पाच महिने हे माळरान हिरवेगार बनत असे व या मधल्या ओढ्याच्या काठी वाढलेले उंच गवत. त्यावरचे असंख्य कीटक, फुलपाखरे, बेडूक आणि हे खाद्य बघून गोळा होणारे खंड्या व इतर पक्षी यामुळे हा परिसर मोठा रमणीय बनत असे. या माळरानामुळे या भागातले पर्यावरण आल्हादकारक राहण्यास मदत होत असे मला वाटते.
साठ किंवा सत्तरच्या दशकानंतर पुण्यात स्थायिक होण्यासाठी बाहेरून लोक येऊ लागले. त्यांना राहण्याची घरे बांधण्याचा मोठा उद्योग पुण्यात विकसित होऊ लागला. या उद्योगाने माझ्या घराशेजारच्या माळरानाचा कधी घास घेतला ते मला कळलेच नाही. या ठिकाणी हळूहळू तीन समांतर रस्ते व त्यांच्या मध्ये घरे, बंगले उभे राहिले. या सगळ्यात तो ओढा व माळरान हे सगळे हरवलेच. ओढ्याच्या खालच्या पात्रात अभिनव शाळा उभी राहिली, ओढ्याचे काही थोडे फार तुकडे अस्तित्वात राहिले होते ते बुजवले गेले व आता येथे पूर्वी कधी ओढा होता हे सांगितले तरी विश्वास बसणार नाही.
माझ्या घराशेजारचा ओढा, माळरान हे सगळे नाहीसे झाले असले तरी पुण्यात पाऊस अजून पूर्वीसारखाच पडतो. उन्हाळ्याच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्यात तशाच धुवांधार सरी येतात. असा पाऊस पडायला लागला की टेकड्यांवरून पडलेले पाणी खाली उताराकडे धावू लागते. टेकडीच्या पायथ्याशी हे पाणी असंख्य ओहोळ, झरे या स्वरूपात येऊन ओढ्यात एकत्र होत असे. पण आता ओढाच नसल्याने हे पाणी घरांच्या कांपाउंड्स मध्ये शिरते किंवा जे तीन रस्ते बनवले आहेत त्या रस्त्यांवरून वाहू लागते व या रस्त्यांना छोट्या नद्यांचे स्वरूप येते.
खरे तर अलीकडे दर वर्षी पाऊस पडला की निर्माण होणारी ही परिस्थिती मी पाहतो आहे पण कुठेतरी काहीतरी गडबड आहे, चुकले आहे ही जाणीवच मला होत नव्हती. मध्यंतरी डॉ. राजेंद्रसिंहजी यांनी राजस्थान मध्ये स्थापन केलेल्या जल बिरादरी या संस्थेचे पुण्यातले संघटक श्री सुनील जोशी यांचे एक व्याख्यान ऐकण्याचा योग आला आणि माझे डोळेच उघडले. ज्या कारणांमुळे अतिशय सुखद हवामानाचे शहर म्हणून पुणे प्रसिद्ध आहे त्यापैकी काही प्रमुख कारणे पुसुन टाकून, पुण्याचे पर्यावरणच नष्ट होण्याची भिती, बांधकाम उद्योगातील काही बडे व्यावसायिक, राजकीय पाठिंबा असलेले धनदांडगे व पुण्याच्या महानगरपालिकेतील काही मंडळी हे सर्व मिळून करत असलेल्या एका उद्योगामुळे निर्माण झाली आहे. या उद्योगाची व्याप्ती बघितल्यावर हे जर असेच चालू राहिले तर थोड्याच वर्षात पुणे हे एक अत्यंत गलिच्छ व घाणेरडे शहर होणार आहे या बाबत माझी खात्रीच पटली आहे. वैयक्तिक फायद्यासाठी पुण्याचे पर्यावरण नष्ट करण्याचा हा जो अभद्र उद्योग सध्या ही मंडळी करत आहेत त्याची वाचकांना थोडीफार माहिती व्हावी म्हणून या लेख मालिकेचा प्रपंच करतो आहे.
पुणे महानगरपालिकेने आपल्या वेब साईटवर ‘Pune storm water master plan drawings’ या नावाखाली पुण्यातल्या सर्व विभागात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी काय व्यवस्था केली आहे याची तपशीलवार नकाशे ठेवले आहेत. यापैकी ‘प्रभात रोड खोरे’ (Prabhat Road Basin) हा नकाशा मी उघडला.
 
प्रभात रोड परिसरातील पाऊसपाण्याचा निचरा कसा होईल? महानगरपालिकेने 
प्रसिद्ध केलेला नकाशा. यात फक्त एक नैसर्गिक नाला(निळ्या रंगात) दाखवला आहे.
या ड्रॉइंगवर अस्तित्वात असलेले सर्व नदी नाले निळ्या रंगात आखलेले आहेत तर महानगरपालिकेने टाकलेल्या पाणीवाहक नळ्या लाल रंगात दाखवलेल्या आहेत. यानंतर माझे घर आणि प्रभात फिल्म कंपनी (सध्याची फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) या मधले माळरान जिथे होते तो नकाशाचा भाग मी उघडला.
या ठिकाणी झालेले नवे समांतर रस्ते या रस्त्यांच्या कडांनी महानगरपालिकेने टाकलेले नळ वगैरे सर्व या नकाशात आहे. पण माझ्या घराशेजारचा ओढा नकाशात नाहीच. तो संपूर्णपणे गायब झालेला आहे. माझी खात्री आहे की सर्व्हे ऑफ इंडियाच्या कोणत्याही जुन्या नकाशात हा ओढा असणार आहे पण महानगरपालिकेच्या हिशोबात हा ओढा किंवा नाला कधी अस्तित्वातच नव्हता.
प्रभात फिल्म कंपनी शेजारील परिसरातील पाण्याचा निचरा. निळ्या रंगात 
दाखवलेला जुना नाला आता अस्तित्वात नाही.
समजा हा ओढा तसाच ठेवून नवीन प्लॉट्स पाडायचे असे महानगरपालिकेने ठरवले असते तर काय झाले असते? एकतर या ओढयाची संपूर्ण जागा घरबांधणी न करता आल्याने बांधणी व्यावसायिकांच्या दृष्टीने पूर्ण वाया गेली असती. सध्याचे एकमेकाला समांतर रस्ते, त्या मधली घरे हे सगळे साध्य झाले नसते. म्हणजे जमीन मालक, डेव्हलपर या सर्वांचे नुकसानच झाले असते. त्यामुळे नकाशावरून ऑढाच गायब केला की काम सोपे झाले.
माझ्या पक्के स्मरणात आहे की माझ्या घराशेजारील ओढ्यासारखेच आणखी दोन मोठे ओढे या भागात होते. त्यातील एक ओढा डहाणूकर सोसायटीच्या थोड्या अलीकडे कर्वे रोडला छेदत असे तर दुसरा एक मोठा ओढा कासट पेट्रोल पंपाजवळ कर्वे रोडला छेदत असे. या ओढ्याच्या पाण्याला एवढी ओढ असे की 1060च्या दशकात खडकवासल्याच्या ऍकॅडमीमधल्या एका अधिकार्‍याचे सर्व कुटुंब आपल्या गाडीतून हा ओढा क्रॉस करत असताना वाहून जाऊन मृत्यूमुखी पडले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेच्या नकाशांच्यात या ओढ्यांचा आज मागमूसही दिसत नाही. (एरंडवणे व भांबुर्डे या जुन्या दोन खेड्यांच्या सीमेवरचा मोठा ओढा, जो लॉ कॉलेज परिसराच्या मागच्या टेकडी पासून सुरू होऊन हा परिसर दुभागतो व ज्याच्या पात्रामधेच कमला नेहरू पार्क शेजारचे दत्त मंदिर बांधलेले आहे; तो ओढा फक्त या नकाशात मला सापडला.)
नकाशावरची निळी रेघ खोडून टाकली की ओढा गायब होऊ शकतो. सबंध पुणे शहरातले असे किती ओढे नकाशावरून गायब झाले किंवा केले गेले असतील हे सांगणे केवळ अशक्य आहे. पण ओढे गायब झाले तरी हे ओढे जे पाणी पूर्वी नदीकडे वाहून नेत असत ते पाणी अजुनही तसेच व तितक्याच जोराने टेकड्यांवरून वहात येते आहे. हे पाणी मग लोकांच्या सदनिका संकुलात शिरले, घरात शिरले तर त्यात नवल करण्यासारखे काही नाही.
ओढे गायब करून जास्त जास्त जमीन घर बांधणीला उपलब्ध करून घ्यायचा हा सोपा मार्ग पुण्यातल्या जमीन मालकांना आणि घरबांधणी व्यावसायिकांना सापडला खरा! परंतु आता जुने पुणे व त्याच्या आजुबाजूच्या भागात, मोकळ्या जागाच घरबांधणी व्यावसायिकांना उपलब्ध राहिल्या नव्हत्या. या सुमारास पुण्याच्या उत्तरेकडे हिंजवडीला माहिती उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होऊ लागला. या घटनेमुळे पुण्याच्या उत्तरेला असलेल्या व पश्चिम-पूर्व वाहणार्‍या मुळा नदीच्या दोन्ही काठांवरील भूखंडात, घरबांधणी उद्योग विकसित करण्याची एक मोठी संधी या उद्योगापुढे चालून आली. मुळा नदीच्या दक्षिण तीरावरच्या भूखंडाचा विकास करण्यात या व्यावसायिंकासमोर दोन मोठ्या अडचणी होत्या. या अडचणी दोन छोटेखानी नद्यांच्या स्वरूपात होत्या. या पैकी जरा मोठ्या असलेल्या नदीचे नाव आहे राम नदी व अगदीच छोटेखानी असलेल्या दुसर्‍या नदीला देव नदी असे नाव आहे. शहरात आधी अस्तित्वात असलेल्या व नकाशावरून पुसुन टाकल्या गेलेल्या असंख्य ओढ्यांसारख्या या नद्या नव्हत्या. त्यांना थोडेफार का होईन सतत पाणी वर्षभर होते आणि पावसाळ्यात त्या चांगल्याच फुगत होत्या.
घर बांधणी उद्योग व महनगपालिका यांच्या संयुक्त उद्यमाने या नद्यांची मृत्यूघंटा वाजवण्याचा कसा प्रयत्न केला गेला त्याचा आढावा पुढील भागात घेऊया.
22 जानेवारी 2012
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “पुण्यातील नद्यांसाठी स्मरणगीत- भाग 1; Requiem for Pune Rivers- Part I

 1. श्री चंद्रशेखरजी
  तुमची पुण्याबद्दलची हळहळ लेखातून कळते . नैसर्गिक ओढे , नाले ., छोट्या छोट्या नद्या बुजवून म्हणा किंवा नकाशावरून गायब करून म्हणा . बांधकाम व्यवसायिक जागा मिळवताहेत . आणि हे सगळं राजेरोसपणे चालू आहे सगळीकडे हीच परिस्थिती आहे . राजकिय नेते अन प्रशासनातिल बडे धेंड हाताशी धरून हे सगळं होत आहे . त्याला पुणं तरी कसं अपवाद राहिल . मला तर नविन बांधकाम पाहिले तर खूप टेन्शन येतं . काही दीवसांनी मोकळी पटांगण आणी मैदानं राहतील की नाही सांगता येत नाही . सर्व मोकळ्या जागा वेगानं भरत आहेत . ह्या सर्व गोष्टीत शहराचं नैसर्गिक पर्यावरण नष्ट होत आहे . आमच्यागावी ही हीच परिस्थिती आहे . मला ते सर्व बघून हळहळायला होतं
  संदीप

  Posted by संदीप देवकर | जानेवारी 28, 2012, 8:00 pm
  • संदीप –

   तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. पुण्यामध्ये जल बिरादरी या संस्थेच्या पुणे शाखेने या बाबतीत चांगले काम सुरू केले आहे. श्री.सुनील जोशी या संस्थेचे पुण्यातील संघटक आहेत व त्यांनी मुंबई हाय कोर्टातून महानगरपालिकेच्या नदी सुधार योजनेवर स्टे आणला आहे. यामुळे सध्या तरी महानगरपालिकेचे काम थांबलेले आहे. पुढे काय होते ते कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

   Posted by chandrashekhara | जानेवारी 29, 2012, 6:15 सकाळी
   • चंद्रशेखरजी
    चांगली बातमी आहे की सध्या पुणे महानगरपालीकेच्या नदी सुधार योजनेला स्टे आणला आहे . हे काम जेल लोक करताहेत त्यांचे मी आभार मानतो . अनेशा पर्यावरणाचा विषय निघाला आहे तर . उर्जेच्या अपव्ययाबद्दल लिहावं अशी इच्छा झाली . आपल्या कडे सध्या विजेची खूप टंचाई त्यामूळे सगळी कडे कमी अधिक प्रमाणात लोडशेडींग सुरू आहे . लोकांनी विजेची बचत करावी म्हणून सरकार देखिल दुरदर्शन वर विज बचत कशी करावी ह्याची जाहिरात नेहमी दाखवत असते . ही जाहिरात महाउर्जा ह्या सरकारी वेबसाईटच संदर्भ देउन दाखवली जाते . कारण शेवटी त्यांचे नांव येते . विजेची टंचाई असल्यावर विजबचत करणे स्वाभाविकच आहे पण विजबचत फक्त सामान्य नागरिकांनाच सांगितली जाते . पण विरोधाभास बघा सरकारी स्तरावरच सर्वात जास्त विजेचा अपव्यय होतो भर दिवसा गरज नसतांना महानगर पालिकचे स्ट्रिटलाईट सुरू असतात ते ही अगदी दिवसभर . नगरपालिका वाले घरपाट्टी , जकात , नळपट्टी अशा अनेक प्रकारे सामान्य जनतेकडून कर रूपात पैसा गोळा करून त्याला अशा प्रकारे उडवतात पॉवरबिल भरून . पाण्याचंही तसंच आहे मी राहतो त्या ठीकाणी नगरपालीकेचं शुध्द नळाचं पाणी म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत आहे ह्यानगरपालीकेचा फिल्टरप्लँट हा महाराष्ट्रात क्रमांक दोनचा आहे . इथलंपाणी बर्‍यापैकी चांगल असत गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही बोअरवेल व १२ गांव योजनेचं घाणेरडं मळकट पाणी पितो तेही मध्यरात्री ऐन साखर झोपेच्या वेळी केव्हाही ४ ते ५ दिवसांआड येतं अन शहराच्या मध्यभागी असलेल्या लोकांसाठी नळाच पाणी इतकं भरमसाठ उपलब्ध आहे की ते वापरून गरजेपुरतं भरून खूप खूप वाया जातं अक्षरश गटारित नळं मोकळे करून धो धो वाया जातं . इतकं पाणी नगरपालीका लोकांना देते की लोक सर्व गरजेचं पाणी भरून नंतर नळ्या लाउन घरं , रस्ते , आंगण , मोटारगाड्या , गाई , म्हशी , शेळ्यां सारखी जनावते धूतात नाहीच काही धूवायला असलं तर नळ मोकळा सोडून पाणी वाया जाउ देतात इकडे नळांना तोट्या दिसत नाहीत ही परिस्थिती दोन तीन दिवसांआड कायम दीसते . हे सगळं बघून माझा जिव खूप हळहळतो . एकीकडे माझ्या सारखे बोअरवेलचं पाणी पिउन जगतात तर दुसरी कडे काही विशिष्ट समाजाचे लोक पाण्याची मजा लूटतात . जेव्हा मी हे दृश्य बघतो तेव्हा मनात येतं की पाण्याचा एकेक थेंब धरणातून शहरापर्यंत आणण्यासाठी अन तो शुध्द करून लोकांच्या घरांपर्यंत पोहोचविण्यासाठी कीती खर्च अन मेहनत करावी लागते . ती ह्यासाठीच का हे लोक पाणी असं वापरतील

    हे सगळ बघून मी खूप हळहळतो काही करू शकत नाही मुकाट्यानं बघावं लागतं

    संदीप

    Posted by संदीप देवकर | जानेवारी 29, 2012, 8:00 pm
   • संदीप –
    पोटतिडिकीने तुम्ही लिहिलेला प्रतिसाद अत्यंत वाचनीय आहे यात शंकाच नाही.

    Posted by chandrashekhara | जानेवारी 30, 2012, 6:53 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: