.
Uncategorized

महाराजाच्या साथीने उड्डाण- 35 वर्षांनंतर; Flying with Maharaja after 35 years


सिंगापूरच्या विमान प्रवासाचे तिकिट, मी एअर इंडिया या विमान कंपनीचे काढले आहे हे माझ्या मित्रांना कळल्यापासून “काय हा वेडेपणा? ” या पासून ते “तुम्हाला विमानतळावरून बहुदा परत घरी परत यावे लागेल.” किंवा “त्या कंपनीत नेहमी संप होत असतात.” या सारखे अनेक उत्स्फूर्त प्रतिसाद मला गेले काही दिवस, बर्‍याच वेळा ऐकण्याची वेळ आली आहे. आणि खरोखरच वृत्तपत्रांतून प्रथम एअर इंडियाचे स्टुअर्ट संपावर जाणार अशा बातम्या मागच्या आठवड्यात आल्या व नंतर विमानचालकांच्या प्रस्तावित संपाबाबत बातम्या वाचण्यात आल्या तेंव्हा मित्रांना ‘शुभ बोल रे नार्‍या!’ असे म्हणायची माझ्यावर वेळ येते की काय? असे मला वाटू लागले. पण हे सगळे संप प्रस्तावितच राहिले आणि आपला प्रवास सुखरूप पार पडणार असे मला वाटू लागले.
माझा पहिला आंतर्राष्ट्रीय विमान प्रवास मी एअर इंडियाच्याच विमानाने अंदाजे 35 वर्षांपूर्वी केला होता त्याची या विमान प्रवासामुळे आठवण होणे साहजिकच आहे. त्या वेळी भारत सरकारच्या विचित्र कायदेकानूंमुळे परदेश वारी करणे फक्त सरकारी बाबू व बडे कारखानदार यांनाच शक्य होत असे. सर्व सामान्यांना परदेशी चलन मिळत नसल्याने परदेश बघणे हे स्वप्नवत वाटत असे. 1960 च्या दशकात राज कपूरने ‘संगम’ नावाचा एक मोठ्या बजेटचा चित्रपट काढला होता. चित्रपटाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लंडन, पॅरिस येथे त्याचे चित्रकरण केले होते. या चित्रपटात लहान वयाचा राज कपूर आपल्या मैत्रिणीला आपल्या आयुष्याच्या महत्वाकांक्षेबद्दल सांगताना आपण मोठे झाल्यावर जगात सगळीकडे म्हणजे लंडन, पॅरिस, रोम वगैरे सगळीकडे कसे विमानाने फिरणार आहोत याबद्दल सांगतो. आता अगदी लहान लहान मुले सुद्धा सुट्टीत परदेशाला जात असतात. त्यामुळे आज जर कोणी ‘संगम’ चित्रपट बघितला तर हा डायलॉग त्याला नक्कीच हास्यास्पद वाटेल. पण त्या वेळी तो कालानुसार अगदी योग्यच होता. परदेशवारी त्यावेळी एक महत्वाकांक्षा असू शकत होती. या नंतर सरकारने नियम थोडे शिथिल केले व दर 3 वर्षांनी एकदा 100 डॉलर परदेशी चलन कोणालाही मिळू शकेल असे ठरवले.(काही जणांना हे 100 डॉलर म्हणजे 700 ते 800 भारतीय रुपये, आपल्यालाच मोजायला लागणार नसून, भारत सरकार फुकट देणार आहे असा भ्रम असे.) त्या मुळे या सुमारास माझ्या सारख्या सर्व सामान्य तरूणांना थोडे दिवस तरी परदेशी जाऊन येता येईल असे शक्यता वाटू लागली. या नियमानुसार प्रवास करायचा असला( म्हणजे तुम्हाला 100 डॉलर्स परदेशी चलन हवे असले) तर एअर इंडियाने प्रवास करणे बंधनकारक होते.
एअर इंडियाने प्रवास बंधनकारक असला तरी त्या बद्दल राग येण्याचे किंवा बंधनकारक वाटण्यासारखे तेंव्हा काहीच नव्हते. एअर इंडिया ही त्या वेळेस जगातल्या सर्वोत्तम विमान सेवा कंपन्यांत गणली जात असे. तेंव्हा ही कंपनी सरकारी मालकीचीच असली तरी प्रसिद्ध उद्योजक जे.आर.डी.टाटा या कंपनीचे चेअरमन होते व एकंदरीतच या कंपनीच्या विमानांतून केलेला प्रवास एक सुखद व संस्मरणीय असा अनुभव ठरत असे.
या मधल्या 35 वर्षांच्या कालात माझ्या खूपच परदेश वार्‍या झाल्या पण परत एअर इंडियाच्या विमान सेवेचा लाभ घ्यावा असे काही वाटले नाही. जुनाट, गळकी विमाने, मोडक्या खुर्च्या, संपाच्या सतत धमक्या देणारे चालक व इतर कर्मचारी या सगळ्या कारणांमुळे मी इतर विमान कंपन्यांनीच प्रवास करण्यास सुरवात केली. गेली कित्येक वर्षे तर मी फक्त सिंगापूर एअरलाईन्सनेच प्रवास करतो आहे. ही विमान कंपनी सध्या जगातील एक सर्वोत्तम विमान कंपनी मानली जाते. व सर्वच बाबतीत या कंपनीची सेवा सरस असते यात शंकाच नाही. मग तरीही या वेळेस मी एअर इंडियाकडे वळलो कारण विमान सेवेची गुणवत्ता कितीही संशयास्पद असली तरी एक दोन गोष्टीत एअर इंडियाचे पारडे सर्वात जड होत होते. यापैकी एक कारण म्हणजे अर्थातच तिकिटाची किंमत हे होते. सिंगापूर, जेट, किंगफिशर या सर्वांपेक्षा एअर इंडियाचे तिकिट बरेच स्वस्त आहे असे मला आढळून आले. जालावर तिकिट काढले तर ते आणखीनच स्वस्त पडत होते. 5 तासाचा तर प्रवास आहे अगदी खराब सेवा असली तरी चालेल अशी मी मनाची सोईस्कर समजूत करून घेतली. पण तिकिटाच्या किंमतीपेक्षा मी ज्या कारणासाठी एअर इंडियाची निवड केली ते कारण अगदीच निराळे होते.
बाकी सर्व विमान कंपन्यांच्या विमानांच्या वेळा मुंबईच्या प्रवाशांना सोईस्कर पडतील अशा ठरवलेल्या आहेत. जाताना रात्री किंवा लवकर सकाळी ही विमाने मुंबईहून निघतात व परत येताना रात्री 9 किंवा 10 वाजता ही विमाने मुंबईला पोचतात. या नंतर, पुण्याला जातानाचा रात्रीचा प्रवास एक्स्प्रेस वे वरून करून रात्री पुण्याला पोचायला रात्रीचे 2 ते 3 वाजतात. गेल्या काही महिन्यांपासून एक्सप्रेस वे वर अतिशय मोठ्या संख्येने प्राणघातक अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे शक्यतो या रस्त्यावरचा रात्रीचा प्रवास टाळायचा असे पथ्य आम्ही अलीकडे पाळायला सुरवात केली आहे. एअर इंडियाचे विमान मुंबईहून रात्री 12 वाजता निघत असल्याने मुंबई विमानतळावर नऊ, साडेनऊ वाजेपर्यंत पोहोचणे क्रमप्राप्त होते. या साठी पुणे मुंबई प्रवास संध्याकाळचाच होत होता. परतीचे विमान मुंबईला दुपारी 1 वाजता पोहोचत असल्याने परतीचा मुंबई-पुणे प्रवास हा ही दिवसा उजेडीच होत होता. एअर इंडियाच्या विमान सेवेच्या वेळा मला एकदम भावल्या व मुख्यत्वे या कारणासाठीच मी एअर इंडियाची निवड केली.
जालावरून तिकिट काढण्याचा अनुभव एकंदरीत सुखकर व जगातील इतर विमान कंपन्यांसारखाच वाटला व चेक इन जालावरून करता येईल हे समजल्याने कम्फर्ट लेव्हल जरा वर गेली. जालावरचे चेक इन सुद्धा सहज करता आले. या सगळ्या कारणांमुळे किंवा मुंबई विमानतळावर मोठ्या संख्येने असलेल्या चेक काऊंटर्समुळे बॅगा विमान कंपनीच्या ताब्यात देणे व बोर्डिंग कार्ड घेणे वगैरे सोपस्कार फारसा काहीच मनस्ताप न होता पार पडले. अर्थात मुंबई विमानतळावर असलेल्या प्रवाशांच्या प्रचंड संख्येने, इमिग्रेशन व सुरक्षा सोपस्कारांना आता खूप वेळ लागतो व हा एक अतिशय कंटाळवाणा अनुभव बनत चालला आहे. पण याला एअर इंडियाला जबाबदार म्हणता येणार नाही. कोणत्याही विमान कंपनीने प्रवास केला असता तरी हा त्रास असाच झाला असता. हे सगळे सोपस्कार पार पाडून आम्ही गेट समोर जाऊन बसलो. रात्रीच्या साडे अकरा वाजता एक बाई सिंगापूर, सिंगापूर अशा घोषणा देऊ लागल्या तेंव्हा त्वरेने आम्ही गेट मधून बाहेर पडून समोर असलेल्या बसमध्ये जाऊन बसलो. 35 वर्षांपूर्वी ही अशाच एका बसमध्ये बसल्याची मला आठवण झाली. अर्थात त्या वेळेसची बस मोठी झकपक होती. त्या मानाने आजची बस साधारणच होती व बरीच जुनाट असावी असे वाटले. अलीकडे बहुतेक विमान कंपन्या विमानात बसणे प्रवाशांना सोईचे व्हावे म्हणून एअरो ब्रिज वापरतात पण कदाचित आमचे विमान लहान असल्याने व एकंदरीत काटकसरीचा उपाय म्हणून आम्हाला एअर इंडियाने बसने विमानापर्यंत नेले असावे. अर्थात ही बाब अतिशय किरकोळ असल्याने मला काही त्याचे विशेष वाटले नाही. मात्र व्हील चेअरवाल्या मंडळींसाठी हा प्रकार त्रासदायक होता. जिना चढून विमानात गेल्यावर विमान कदाचित फारसे जुने नसल्याने, एकंदरीत आसन व्यवस्था स्वच्छ व नेटकी वाटली. प्रत्येक आसनासमोर टीव्ही असणे किंवा दोन आसनांमधले अंतर भरपूर असल्याने प्रवास आरामदायी होऊ शकेल असे वाटले.
विमान बरोबर प्रस्तावित वेळेला निघाले. हा मात्र आश्चर्याचा धक्का होता. विमान वर गेल्यावर पट्टे सोडले तरी चालतील अशी घोषणा झाली पण पुढे काहीच घडले नाही. हवाई सुंदर्‍या निदान पाणी तरी विचारतील अशी माफक अपेक्षा होती पण हवाई सुंदर्‍यांचा पत्ता नव्हता. बर्‍याच वेळानंतर हवाई सुंदर्‍यांचे दर्शन घडले. 35 वर्षांपूर्वी एअर इंडियातील हवाई सुंदरी बनणे ही मुंबईच्या मुलींसाठी एक मोठी मानाची करियर होती. त्या वेळेस या एअर होस्टेसेसच्या साड्या ही मोठी टॉप फॅशन समजली जात असे. तसेच 35 च्या पुढे वय झाले की या मुली निवृत्त होत. आता बहुदा हे नियम गेले असावेत कारण बहुतेक एअर होस्टेसेस, चष्मे लावलेल्या प्रौढ स्त्रिया होत्या. वयानुसार एकूणच कार्यतत्परता व हालचाली मंदगतीनेच त्या करत होत्या. इतर विमान कंपन्यांच्या मानाने विमानातील सेवा खालच्या दर्जाचीच वाटत होती. बहुतेक वेळ या होस्टेसेस कोठेतरी कोपर्‍यात दडून बसत असाव्यात असे वाटले.
आसनासमोरच टीव्ही असण्याचा माझा आनंद फार काल टिकला नाही. फक्त 5 चॅनेल त्यातल्या 3 वर जुने हिंदी चित्रपट, एकावर कार्टून व एकावर हिंदी सिनेमातील गाणी याला काही फारसा आकर्षक मेन्यू असे म्हणता येणार नाही. बाकी खाद्य पेये सेवा ठीकच होती. अर्थात सर्वच विमान कंपन्यात या सेवेचा दर्जा अलीकडे खालावला असल्याने 35 वर्षांपूर्वीचे गरम गरम जेवण व पेयांची लयलूट मला आठवल्यावाचून राहिले नाही.
विमान प्रवास मात्र उत्तम झाला. आसन व्यवस्था आरामदायी असल्याने सकाळी सिंगापूरला विमान वेळेवर उतरले तेंव्हा एकूणच फारसा शीण जाणवला नाही. 35 वर्षांपूर्वीच्या एअर इंडिया सेवेला जर 100 गुण दिले तर या सेवेला 60 ते 70 गुण द्यायला हरकत नाही. महाराजाच्या सेवेचा लाभ घ्यायला हरकत नाही पण तक्रार न करता कशालाही तोंड देण्याची तयारी असली तर!. नवीन पिढीतले किती जण त्याला तयार होतील हे सांगणे कठीण आहे.
19 जानेवारी 2012
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “महाराजाच्या साथीने उड्डाण- 35 वर्षांनंतर; Flying with Maharaja after 35 years

  1. पु. ल.. च्या म्हणण्यानुसार विमानाचा प्रवास (प्रकर्षाने केलेला वास) हा प्रवासच नव्हे. विमान कोलांट्या खात गेले व उतारूंच्या पोटात गलबलले तरच तो प्रवास होईल.

    Posted by मनोहर | जानेवारी 26, 2012, 10:51 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: