.
Health- आरोग्य

आल्याचा चहा आणि ब्रिटिश पेटंट ऑफिस; Ginger Tea and British Patent Office


 पावसाळ्याचा दिवस असतो. एक ओला गारवा जाणवत असतो. थंडगार वारेही सुटलेले असतात. अशावेळी तुम्हाला कसली आठवण येत असेल ते मला माहीत नाही. मला मात्र अशा वेळी आठवण येते मस्तपैकी आले घालून उकळलेल्या चहाची. तो गरम गरम घसा भाजत जाणारा चहा प्यायला की थंडी, वारे, गारवा सगळे पळूनच जाते. हा चहा घरीच प्यायला पाहिजे असे काही नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या टपरीत मिळणारा सुद्धा असाच आले घालून उकळलेला चहा तितकाच मस्त लागतो. आल्याचा चहा हा फक्त एक भाग झाला पण आल्याच्या वड्या किंवा रामनवमीला केला जाणारा सुंठवडा यांची चव विसरणे शक्य आहे का. या खाण्याच्या गोष्टी किंवा पूर्वी डोके दुखत असल्यास कपाळावर सुंठीचा लेप लावत असत या सारखे घरगुती उपाय हे, आले किंवा सुंठ या बद्दलच्या आपल्या पारंपारिक माहितीचा एक अविभाज्य भाग आहेत हे कोणीही सांगेल.
पारंपारिक किंवा पिढ्या न पिढ्या चालत आलेले हे ज्ञान आम्ही शोधून काढले आहे असे सांगून त्यावरून स्वत;चा गल्ला भरण्याचा कोणी प्रयत्न करू लागला तर कोणत्याही भारतीयाला राग येईलच. पाच सहा वर्षांपूर्वी हेच उपद्व्याप, निकोलस जॉन लारकिन्स या लंडनमध्ये राहणार्‍या एका इसमाने केले. ‘ अतिरिक्त कफ निर्माण न होण्यासाठीचा औषधी उपाय’ (Pharmaceutical composition for the treatment of excess mucous production) या नावाखाली या गृहस्थाने ब्रिटिश पेटंट ऑफिसकडे ‘आले’ (Zingiber officinale)व ‘कुटकि’ (Picrorhiza kurroa) या दोन वनस्पतीं वापरून खोकला आणि फुफ्फुसांचे आजार यावर आपण अदभुत उपाय शोधून काढला असल्याचे पेटंट (GB2436063) दाखल केले.
भारत सरकारला या उद्योगांचा पत्ता 2011 मध्ये लागला व सरकारने हे पेटंट दिले जाऊ नये म्हणून ब्रिटिश पेटंट ऑफिसकडे मागणी केली. या साठी आवश्यक तो पुरावा दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत पेटंट ऑफिसने लारकिन्सचा पेटंट अर्ज नामंजूर करून रद्द करून टाकला. हे पेटंट रद्द झाले म्हणून बरे झाले नाहीतर आल्याचा चहा प्यायल्याबद्दल या गृहस्थांनी भारतीयांकडून रॉयल्टी मागायला सुद्धा कमी केले नसते.
भारतीय पारंपारिक ज्ञानाच्या भांडाराची लुटमार करण्याचा पाश्चिमात्य देशातील लोकांचा काही हा पहिला प्रयत्न नाही. 1995 मध्ये युरोपियन पेटंट ऑफिसने कडुनिंबाच्या औषधी गुणधर्माबद्दल एक पेटंट मंजूर केले होते. भारताने तक्रार केल्यावर आणि 10 वर्षाची कायदेशीर लढाई केल्यानंतर 2005 मध्ये हे पेटंट रद्द केले गेले. 1995 मधेच अमेरिकन पेटंट ऑफिसने हळदीच्या औषधी गुणधर्मांबद्दलचे एक पेटंट मंजूर केले होते परंतु भारताने तक्रार केल्यावर 1997 मध्ये हे रद्द केले गेले.
पाश्चिमात्य लुटमारीचा हा प्रकार थांबवण्यासाठी, सी.एस.आय.आर. या भारतीय संस्थेने ‘पारंपारिक ज्ञानाचा डिजिटल कोश’ (The Traditional Knowledge Digital Library, or TKDL) निर्माण करून आंतरजालावर ठेवला आहे. या कोशात 2.4 कोटी पृष्ठे असून त्यांतील माहितीचा पद्धतशीर शोध घेणे शक्य आहे. या कोशात जुन्या संस्कृत पोथ्यांचा समावेश आहे आणि जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश व जपानी भाषेत भाषांतर करण्याची सुविधा आहे. कोणताही देश, असा पेटंट अर्ज मंजूर करत नाही की ज्यामधील माहिती आधीच प्रसिद्ध झालेली असते. त्यामुळे या ज्ञान कोशाच्या उपलब्धतेने खरे तर असली लूटमार पेटंट्स ताबडतोब रद्द झाली पाहिजेत. इतर देशातील पेटंट ऑफिसांनी अशा पेटंटसचा विचार करताना या कोषाचा वापर करावा अशी भारत सरकारची त्यांच्याकडे मागणी आहे. परंतु आतापर्यंत तरी त्याला कोणत्याही पेटंट ऑफिसने प्रतिसाद दिलेला नव्हता. युरोपियन पेटंट ऑफिसने हा कोष वापरण्याचे आता मान्य केले आहे. प्रत्यक्षात काय होते ते पुढील काळातच समजेल.
खोट्या पेटंटच्या अर्जांशी दिली जाणारी कायदेशीर लढाई अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने प्रत्येक वेळी असे करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे या कोषात दिलेली व पारंपारिक चालत आलेली माहिती मुख्यत्वे औषधी उपयोगांसंबंधीच असल्याने या वनस्पतींच्या इतर उपयोगासंबंधीची पेटंट्स (हळदीपासून निर्माण केलेला रंग) मान्य होऊ शकतीलच.
भारतीय वन उत्पादनांच्या पारंपरिक चालत आलेल्या उपयोगांच्या माहितीचा, कोणी वैयक्तिक फायद्यासाठी वापर करू नये यासाठी त्या देशात रहात असलेले भारतीय वंशाचे लोकच काही करू शकतात. त्यांनी जागरूक राहून वेळेतच पेटंट ऑफिसला अशा कोणत्याही प्रस्तावित पेटंटला आपला विरोध असल्याचे सांगितले तर पुष्कळ उपयोग होऊ शकेल. अन्यथा या पारंपारिक व चालत आलेल्या भारतीय ज्ञानाची लूटमार चालूच राहील अशी भिती आहे.
4 जानेवारी 2012
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “आल्याचा चहा आणि ब्रिटिश पेटंट ऑफिस; Ginger Tea and British Patent Office

 1. श्री चंद्रशेखर ,
  अत्यंत उपयुक्त माहिती .माझ्या मते सर्व फिरंगी आणि चीनी हे अत्यंत लबाड आणि बदमाश आहेत .
  आपल्या कडिल लोक सरकारी संपत्ति घशात घालायचा नाद सोडून हा अत्यंत महत्वाचा वारसा जपून
  वृद्धिंगत करतील तेंव्हा उन्नति होइल .
  धन्यवाद

  विजय बुद्धिसागर

  Posted by vijay buddhisagar | जानेवारी 10, 2012, 9:05 सकाळी
 2. पारंपारिक ज्ञानाचा डिजिटल कोश वापरण्याच्या मागणीची डब्ल्यू टी ओ ला प्रथम पटवावयास हवी. तशी विनंती ब्यापारखात्याकडे केली जावयास हवी

  Posted by मनोहर | जानेवारी 11, 2012, 10:52 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: