.
Travel-पर्यटन

पूर्व काराकोरम मधील हिमशिखरे; Mighty peaks of Eastern Karakorams


  भारताच्या उत्तर सीमेवरील लडाख  हा भाग झान्स्कर, लडाख व काराकोरम या तीन पर्वतराजी व यांच्या मध्ये असलेल्या नद्यांची खोरी यांचा मिळून बनलेला आहे. विमानाने लेह विमानतळावर उतरताना या भौगोलिक परिस्थितीची चांगली कल्पना येते. परंतु प्रत्यक्ष लडाखमधे, स्वाभाविकपणे सगळी गावे, नदी खोर्‍यांच्यात वसलेली असल्याने, आजूबाजूला बघितले तर फक्त त्या खोर्‍याला लागून असलेले दोन्ही बाजूंचे उंच पर्वत दिसतात. त्याच्या मागे असलेली व गगनाला स्पर्श करणारी अतिउंच शिखरे दिसतच नाहीत. ही शिखरे बघणे विमानातून तरी शक्य आहे किंवा त्यासाठी एखाद्या उंच स्थानी जाणे आवश्यक आहे. गिर्यारोहण न करणार्‍या सर्वसाधारण प्रवाशाला सहज जाता येईल अशी दोन उंच स्थाने लडाखमध्ये आहेत. यापैकी पहिले स्थान म्हणजे चांग चेन्मो विभागातील चांग ला खिंड. परंतु या खिंडीतून दिसणारा पूर्वेकडचा देखावा, एका उंच पर्वताने पडदा टाकावा तसा झाकून टाकल्याने, येथून लांबवरची कोणतीच हिमशिखरे बघणे शक्य होत नाही.
उंच स्थानाचा दुसरा पर्याय म्हणजे खारडुंग ला खिंड ही खिंड 18380 फूट उंचीवर असल्याने येथून लांबवरचे दृष्य दिसण्याची शक्यता असते. परंतु खारडुंग ला मधे हिम वर्षाव आणि ढग यांचे अस्तित्व सातत्याने असल्याने बहुदा काहीच दिसत नाही. या खिंडीतून लेहला परत येत असताना मला अतिशय छान हवामान लाभण्याचे सुदैव लाभले होते. या वेळेस पूर्व क्षितिजावरही फारसे ढग नसल्याने अतिशय लांबवरचा देखावा दिसू शकत होता. या ठिकाणाहून दिसलेल्या हिमशिखरांचा एक छोटासा आढावा मी येथे घेतो आहे.

 

डावीकडून सुरूवात केल्यावर प्रथम दिसणारा शिखर समूह म्हणजे सासेर कांग्री पर्वत शिखरे! सासेर मुझताघ या पर्वतावर असलेली ही चार शिखरे आहेत. यापैकी सर्वात उंच म्हणजे सासेर कांग्री 1 (7672 मीटर)हे शिखर आहे. याच्या उजवीकडे सासेर कांग्री 3 (7495 मीटर) व सासेर पठार शिखर(7287 मीटर) ही दोन शिखरे आहेत. सर्वात उजवीकडे सासेर कांग्री 2 (7513 मीटर) हे शिखर आहे. सासेर कांग्री हे शिखर 1973 मध्ये इंडिया-तिबेट बॉर्डर पोलिस() यांच्या एका दलाने प्रथम काबीज केले होते. यानंतर 1987 मध्ये एका भारतीय-ब्रिटिश दलाने परत एकदा या शिखरावर पाय ठेवला होता. सासेर कांग्री 2 या शिखरावर या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मानवाने प्रथम पाऊल ठेवले तर त्याच्या जवळ असलेल्या सासेर कांग्री पठार शिखरावर इंडो-जपानी दलाने 1984 मध्ये पाय ठेवला होता. सासेर कांग्री 3शिखर 1986 मध्ये इंडिया-तिबेट बॉर्डर पोलिस दलाच्या एका तुकडीनेच काबीज केले होते. या सासेर मुझताघ पर्वताच्या उत्तरेला चीनच्या शिंजियांग कडून येणार्‍या पुरातन रेशीम मार्गावरची कुप्रसिद्ध सासेर ला खिंड आहे.
सासेर कांग्रीच्या उजव्या हाताला दिसणारे शिखर म्हणजे चुश्कु कांग्री. हे शिखर 6853 मीटर एवढे उंच आहे. हे शिखर बहुदा अजून कोणीच पादाक्रांत केलेले नाही. या शिखराच्या बर्‍याच उजवीकडे दिसणारी दोन संपूर्ण बर्फाच्छातित शिखरे म्हणजे कटाक्लिक कांग्री 1 (6880 मीटर) व कटाक्लिक कांग्री 2(6820 मीटर) ही आहेत. ही दोन्ही शिखरे भारत-चीन प्रत्यक्ष ताबा रेषेवर असल्याने, त्यांवर गिर्यारोहण करण्याचा प्रयत्न साहजिकच झालेला नाही.
या शिखरांच्या उजवीकडे, सर्वात जवळ असल्याने बराच मोठा दिसणारा अरगनग्लास पर्वत आहे. यावरील अरगनग्लास कांग्री हे शिखर हरिश कपाडिया यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या एका इंडो-ब्रिटिश पथकाने 2002 मध्ये काबीज केले. याच्या उजव्या बाजूला व खारडुंग ला वरून नजरेच्या टप्यात येणारे शेवटचे शिखर म्हणजे कुनचुंग कांग्री(6751 मीटर) हे शिखर अजून कोणीच पादाक्रांत केलेले नाही.
खारडुंग ला खिंदीतून दक्षिणेकडे बघितल्यास खरे तर लेह शहर दिसायला हवे पण येथेही एक उंच पर्वत आपला देखावा पूर्णपणे अडवून टाकतो.
खारडुंग ला मधून दिसणारे दक्षिणेकडचे दृष्य
चांग ला खिंडीतील दृष्य; समोरील पर्वतामुळे पूर्वेकडचे काहीच दिसू शकत नाही
लडाखला जाणार्‍या सर्वसाधारण पर्यटकांना काराकोरम पर्वतामधील ही बलाढ्य शिखरे आपल्याला दिसू शकतील याची कल्पनाही नसते. लेह मधल्या पर्यटन विभागालाही या बद्दल काहीच सांगता आले नव्हते. केवळ माझ्या सुदैवाने ही शिखरे मला बघता आली असे मी मानले तर फारसे चुकीचे ठरू नये.
2 जानेवारी 2012
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: