.
अनुभव Experiences, ताज्या घडामोडी Current Affairs

Evil Shadows of Ignorance; अडाणीपणाचे सावट


एखाद्या दिवशी सकाळी वृत्तपत्र उघडून ताज्या बातम्यांवर नजर फिरवली की मन उदासच होऊन जाते. खरे म्हणजे या सगळ्या बातम्यांशी आपला तसा जवळचा संबंध नसतो. पण तरीही मनाला काहीतरी खुटखुटत राहते. आज सकाळी तसेच झाले. आज सलग तिसर्‍या दिवशी पुणे -मुंबई जलद मार्गावर प्रवासी वाहतुक करणार्‍या आणखी दोन बसेसचा चेंदामेंदा झाल्याचे फोटो बघितले व मन अक्षरश: सुन्न झाले. अशा वेळी या आधुनिक सोई सुधारणा करून घेण्यास आपण लायकच नाही असे मला वाटत राहते. या मुंबई-पुणे जलद मार्गावर नेहमीच अपघात घडत असतात. पण ओळीने तीन दिवस बस किंवा मिनी बसेसना इतके भयानक अपघात होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.
तीन दिवसापूर्वी रात्री साडेबाराच्या सुमारास पुण्याच्या गिरिकंद ट्रॅव्हल्स कंपनीची मिनीबस, थायलंडला जाणार्‍या 19 प्रवाशांना मुंबईच्या विमानतळावर सोडण्यासाठी म्हणून चालली होती. लोणावळ्याजवळ या बसच्या चालकाचा बसवरचा ताबा अचानक सुटला व रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येत असलेल्या एका ट्रकवर ही मिनीबस जाऊन आदळली. हा आघात इतका जोराचा होता की या मिनीबसमधले 6 जण जागीच ठार झाले तर 13 जण जबरदस्त जखमी झाले.

 

या अपघाताच्या दुसर्‍या दिवशी ठाणे येथील युनिव्हर्सल स्कूल या शाळेत शिकणारी 44 मुले खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ त्यांची बस अपघातग्रस्त झाल्याने रात्री साडेआठच्या सुमारास जखमी झाली. ही मुले कोल्हापूरला सहलीसाठी म्हणून गेली होती व परत येताना हा अपघात झाला. या ठिकाणी देखील बस चालकाचा बसवरील ताबा सुटून तो दुभाजकावर आदळल्यानेच हा अपघात झाला.
यानंतर काल रात्री परत, एक सोडून दोन बस अपघातग्रस्त झाल्या. अंधेरीहून जेजुरीकडे निघालेल्या एका बसच्या चालकाचा बसवरचा ताबा सुटल्याने ती पहाटे 5 च्या सुमारास समोरच्या वाहनावर आदळली व उलटली. यात बसमधील 5 जण गंभीर रित्या जखमी झाले. दुसर्‍या एका अपघातात पुण्याजवळच्या सोमाटणे येथे एका आरामगाडीवर मागून एक वाहन आदळल्याने ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडकावर आदळली व एक जण जखमी झाला. हा अपघातही पहाटे 5 च्या सुमारासच झाला.
सलग 3 दिवस चार अपघात होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. तसे बघायला गेले तर हा जलद मार्ग एखाद्या परदेशात असावा इतका उत्तम बांधलेला आहे. 3 लेन, दोन्ही बाजूंनी जाणार्‍या वाहनांच्या दिव्यांचा उजेड समोरच्या चालकाच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून मधला रस्ता दुभाजक भरपूर रूंद, मधे लागणार्‍या बोगद्यांमध्ये प्रकाशाची सोय वगैरे सर्व सोई या रस्त्यावर आहेत. या मार्गावर वाहनांची गती मर्यादा किती असावी याचे फलक सगळीकडे लावलेले आहेत. थोडक्यात म्हणजे रस्त्यावर टीका करण्यासारखे फारसे काही नाही.
अडचण आहे ती आपल्या अडाणीपणाची आणि कोणतेही नियम न पालन करण्याच्या आपल्या स्वभावाची. तुम्ही कधीही या रस्त्याने रात्री प्रवास करा. बहुसंख्य ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूच्या, जास्त गतीमान वाहनांच्या, लेन मधून जाताना तुम्हाला दिसतील. या ट्रक्सच्या मागचे लाल दिवे कधीच चालू नसतात. ट्रेलर असला तर तसे मागून कळतही नाही. या रस्त्यावर 80 कि.मी. ची गती मर्यादा आहे. गाड्या एस.यू.व्ही. वगैरे सर्रास 120 ते 140 कि.मी. गतीने जाताना दिसतात. लेनची शिस्त पाळा म्हणून सगळीकडे फलक आहेत पण प्रत्यक्षात कोणीच पालन करत नाही. अशा जलद मार्गावरून जाताना गाडीचे टायर सुस्थितीत असणे आवश्यक असते. परंतु बहुसंख्य टॅक्सींना गोटा झालेले टायर्स असतात व ते बदलावे असे कोणालाच वाटत नाही. घाट सेक्शनमधे वाहने हळू चालवणे बहुदा चालकांना कमीपणाचे वाटत असावे. कारण हे नियम कोणीच पाळत नाही.
नियम पालन न करण्याची जी एक सामाजिक सवय आपल्याला लागलेली आहे त्याचेच हे फलित आहे या बद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पोलिस तरी काय करणार? असा एक सूर नेहमी ऐकू येतो. तो काही अंशी खरा असला तरी काही गोष्टी तपासणे सहज शक्य आहे. सर्व वाहने निदान दोन टिकाणी टोल भरण्यासाठी या रस्त्यावर थांबत असतात. तेथे वाहनाचे मागचे लाल दिवे व ब्रेक लाईट चालू आहेत की नाही? ट्रेलर असल्यास तशी धोका सूचना लावलेली आहे किंवा नाही? आणि टायर्स सुस्थितीत आहेत किंवा नाही? हे तपासणे अगदी सहज शक्य आहे. हे केले तरी अपघातांच्या संख्येत घट होईल. त्याचप्रमाणे रात्री 1 किंवा 2 ते पहाटे 4 या वेळात ज्या वाहनांत फक्त एकच चालक उपलब्ध आहे. (लांब पल्ल्याच्या बसेस, ट्रक्स यात पर्यायी चालक उपलब्ध असतात व चालकांना झोपण्याची मागील बाजूस सोय केलेली असते.)अशा वाहनांना हा जलद मार्ग वापरण्यास बंदी करणे या सारखे इतर काही उपाय करणे सहज शक्य आहे.
पूर्वीच्या काळी सूर्योदय ते सूर्यास्त या कालातच प्रवास करण्याची पद्धत होती. नवीन युगात तसे करणे शक्य नाही. पण मुंबई-पुणे जलद मार्गाने जायचे असले तर ही परंपरा चालू ठेवणे हे आपली सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने चांगले पाऊल आहे असे म्हणावे लागते आहे. वैयक्तिक रित्या बोलायचे तर माझा या रस्त्याशी संबंध सहार विमानतळावर जाण्या-येण्यापुरताच येतो. मी एक पथ्य अलीकडे पाळायला सुरूवात केली आहे. विमान प्रवासाच्या वेळा अशाच निवडायच्या की जेणेकरून या जलद मार्गावरचा प्रवास दिवसा उजेडीच होईल. ते शक्यच नसले तर विमानतळावर काही काळ थांबून रहायचे व दिवस उजाडला की पुढे प्रवास सुरू करायचा असे मी करतो.
एखाद्या 16 वर्षे वयाच्या व नवीनच वाहन चालवायला शिकलेल्या मुलाच्या हातात फेरारी गाडी देणे किंवा नवीन सैन्यात दाखल झालेल्याला AK47 रायफल हातात देण्यासारखाच प्रकार हा रस्ता आमच्या अडाणी आणि निष्काळजी वाहन चालकांना उपलब्ध करून दिल्यामुळे झाला आहे व त्याचेच दुष्परिणाम सामान्य प्रवाशांना भोगायला लागत आहेत ही मोठी दुर्दैवाची बाब आहे असे मला वाटते. पण याला काहीच इलाज माझ्यासारख्या सामान्य प्रवाशाजवळ नाही. बावळटपणा वाटला तरी आपल्या सुरक्षिततेसाठी आपणच आपली पथ्ये ठरवून ती पाळणे, एवढेच आपण करू शकतो.
30 डिसेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: