.
अनुभव Experiences

पदपथावरची साहसे (Sidewalk Adventures)


  रोज सकाळी फिरायला जाताना, प्रथम काही अंतर, मला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पदपथावरून चालावे लागते. हा पदपथ म्हणजे एक संशोधनाचा विषय होऊ शकेल इतका रोचक आहे. या पदपथाचा रस्त्याच्या बाजूला असलेला जो हिस्सा आहे तो बहुतेक ठिकाणी मोकळा आहे परंतु या मोकळ्या भागाला सायकल मार्ग असे नाव दिलेले असल्याने एखादी सायकल जर कोणा धाडसी युवकाने येथून चालवण्याचे ठरवले तर तुम्ही त्या सायकलच्या मार्गाच्या मधे येऊ शकता. आता या पदपथाचा जो उर्वरित हिस्सा आहे त्यावर अनेक वेडी वाकडी झाडे वाढलेली असल्याने कपाळमोक्ष होणार नाही या पद्धतीनेच चालावे लागते. दोन वर्षांपूर्वी एकमेकात अडकवलेल्या कॉंक्रीट ब्लॉक्सनी हा संपूर्ण पदपथ (सायकल मार्ग व पादचारी मार्ग) मढवला गेला होता. परंतु थोड्याच दिवसात हे ब्लॉक उखडून टाकून तेथे एक मोठी पाईप लाईन पुरली गेली. ती पुरल्यावर वरच्या भागात परत हे कॉंक्रीट ब्लॉक्स होते तसे बसवण्याची काळजी कोणी न घेतल्याने, तेथील जमीन तशीच उघडी पडून राहिली आहे. सर्वच पदपथ इतका ऊंच-सखल आणि वेडा वाकडा आहे की डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. या शिवाय खणलेल्या मातीच्या व कामासाठी आणलेल्या वाळूच्या, मधून मधून ठेवलेल्या ढिगांनीही बरीच जागा व्यापलेली आहे. बरीच मंडळी या कारणांमुळे पदपथावरून न चालता रस्त्यावरूनच चालतात.
सकाळी या पदपथावरून जाताना आणखी एका संकटाचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरून आपल्या प्रिय श्वान महाशयांना फिरवून आणणारी बरीच मंडळीही दिसतात. हे सगळे श्वान महाशय त्यांची दैनिक कर्मे या पदपथावरच उरकत असल्याने फारच बारीक लक्ष ठेवावे लागते जरा जरी दुर्लक्ष झाले तरी शी! पाय भरला! म्हणून हळहळण्याची पाळी येते. अमेरिकेत व सिंगापूरला अशी कुत्री फिरवणारी मंडळी हातात एक छोटे फावडे व प्लॅस्टिकची पिशवी घेऊन तयार असतात. बरोबरच्या श्वान महाराजांनी विधी केला रे केला की लगेच ती विष्ठा ही मंडळी प्लॅस्टिकच्या पिशवीत जमा करतात व नंतर ती पिशवी कचरापेटी जमा करतात. आपल्याकडे रस्ते आणि पदपथ या कुत्र्यांच्या जन्मसिद्ध विधी करण्याच्या जागा असल्याने विष्ठा उचलण्याची प्रथा नसते व त्यामुळे नंतर तेथून ये-जा करणार्‍याला शिक्षा भोगावी लागण्याची बरीच शक्यता असते.
भारतातल्या पादचारी वर्गाला सामना करावयाला लागणारे हे संकट भारत सोडून बाकी कोठे नसेल असे मला आपले उगीचच वाटत होते. परंतु तैवान सारख्या प्रगत देशात सुद्धा ही अडचण पादचार्‍यांना भेडसावते आहे हे कळल्यावर माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला आहे. 1980 सालानंतर तैवान मधली श्रीमंती जसजशी वाढू लागली तसतशी घरगुती कुत्री पाळणार्‍या मंडळींची संख्याही वाढू लागली. 2.3 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील पाळीव कुत्र्यांची संख्या आता 2 लाखापर्यंत पोचली आहे. या शिवाय रस्त्यावर सोडून दिलेली मोकाट कुत्री पण आहेतच. ही पाळीव कुत्री रस्त्यावर करत असलेल्या घाणीच्या संकटाचा सामना करण्यासाठी 2009 मध्ये तायचुंग या शहरातील अधिकार्‍यांनी एक अभिनव उपक्रम प्रथम राबवला. 1 किलो कुत्र्यांची विष्ठा आणून देणार्‍यांना त्यांनी 3 अमेरिकन डॉलर्स किंमतीची कुपने देण्यास सुरूवात केली. या कुपनांसाठी 1,30000 तैवानी डॉलर्सचे अंदाजपत्रक तयार केले गेले. अधिकार्‍यांची अशी कल्पना होती की ही अशी कुपने दिल्यावर लोक जागृती होईल व लोक काळजी घेतील. परंतु हा प्रयोग पूर्ण फसला. अंदाजपत्रकाप्रमाणे पैसे तर खर्च झाले पण त्यानंतर परत रस्त्यावरील घाण तशीच राहिली.
तैवानची राजधानी तैपैहला लागूनच असलेल्या नवे तैपेह शहरात या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात एक नवी योजना कार्यान्वित केली गेली. या योजनेंतर्गत, कुत्र्यांची विष्ठा आणून देणार्‍या लोकांना सोन्याची बिस्कीटे बक्षीस असलेल्या एका सोडतीची किंवा लॉटरीची तिकिटे देण्यास सुरूवात केली गेली. या लॉटरीची बक्षीसे 2000 ते 500 अमेरिकन डॉलर्स एवढ्या किंमतीचे सोन्याचे बार आहेत.
या लॉटरीची बक्षिसे नुकतीच जाहीर करण्यात आली. शहरातील अधिकार्‍यांच्या मताने या कालात 4000च्या वर लोकांनी 14500 प्लॅस्टिकच्या पिशव्यात कुत्र्यांची विष्ठा जमा केली होती. अर्थात हे जमा करणारे लोक कुत्र्यांचे मालक आहेत का बक्षिसाच्या आशेने विष्ठा जमा करणारी मंडळी आहेत हे सांगणे कठिण आहे.
आता ही लॉटरी संपली आहे. त्यामुळे लोकांच्यात जागृती निर्माण झाली आहे की तायचुंग शहरासारखाच ये रे माझ्या मागल्या हा प्रकार या शहरात चालू होईल या बद्दल सांगणे सध्या तरी या शहरातील अधिकार्‍यांना शक्य वाटत नाही. रस्त्यावरील कुत्र्याच्या विष्ठेत असलेल्या बॅक्टेरियामुळे व राउन्डवर्म्समुळे लोकांना आणि विशेषत: लहान मुलांना toxocariasis या आजाराची बाधा हो ऊन पोट बिघडण्याची शक्यता असते असे हे अधिकारी म्हणतात.
तैवान सारख्या प्रगत देशात जर ही परिस्थिती असेल तर आपल्या येथे काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी!
10 डिसेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: