.
Musings-विचार

इंग्लिश, हिंग्लिश आणि मंग्लिश


आंतरजालावर सध्या गाजत असलेल्या ‘कोलवेरी डी’ या गाण्याबद्दल बोलताना या गाण्याचे गायक धानुष यांनी हे गाणे टंग्लिश या भाषेत असल्याचे सांगितले आहे. टंग्लिश ही कोणती भाषा? याचा खुलासा करताना, तमिळ ढंगाने उच्चारलेले इंग्रजी शब्द या गाण्यात असल्याने या गाण्याची भाषा टंग्लिश आहे असे आपण म्हणतो आहोत असे त्यांनी सांगितले आहे. तसे बघायला गेले तर जगातल्या ज्या ज्या देशात इंग्रजी भाषा बोलली जाते त्या सर्व देशात (अर्थातच इंग्लंड हा देश सोडून) त्या देशाची खास इंग्लिश भाषा तयार झालेली आहे. अगदी अमेरिकेतील अमेरिकन इंग्लिश पासून सिंगापूर मधील सिंग्लिश, चिनी लोक बोलतात किंवा ज्या भाषेत ते इंग्रजीचे खून पाडतात ती चिंग्लिश अशा अनेक इंग्रजी आहेत. इंग्लंडचे घट्ट शेजारी असलेले आयर्लंड किंवा स्कॉटलंड हे देशही त्यांची स्वत:ची इंग्रजी भाषा बोलत असतात.

असे असताना भारतात बोलली जाणारी इंग्रजी भाषा साहेबाच्या मूळ भाषेसारखी असेल हे संभवनीयच नाही. त्यामुळे भारतात सुद्धा हिंग्लिश, मराठी- इंग्लिश, गुज्जु- इंग्लिश, कन्नड-इंग्लिश वगैरे उप भाषा आहेतच. त्यात ही टंग्लिश पण आली आहे. परंतु साहेबाच्या मूळ भाषेतील शब्द देशी ढंगाने म्हणत इंग्रजीत बोलणे( उदा.इंग्रजीतील स्नॅक हा शब्द गुज्जु श्टाइलने स्नेक असा उच्चारणे.) आणि ते मूळ इंग्रजी शब्द खुशाल आपल्या देशी भाषेत घुसडून देऊन एका धेडगुजरी भारतीय भाषेत संभाषण करणे किंवा लेखन करणे यात बराच फरक आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच वर्षांत दिल्लीच्या राज्यकर्त्यांना आपला देश स्वतंत्र झाला आहे तरी आपण इंग्रजीचे भूत डोक्यावर घेऊन वावरतो आहोत असा साक्षात्कार झाला व प्रोफेसर रघुवीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सरकारने स्थापन केली व राज्य कारभारात इंग्रजीच्या ऐवजी हिंदीचा वापर सुरू करण्यासाठी एक शब्द कोश निर्माण करण्याचे ठरवण्यात आले. प्रोफेसर. रघुवीर यांनी अत्यंत परिश्रमाने असा एक शब्द कोश बनवण्यात यश मिळवले या शब्द कोशातील अनेक शब्द अतिशय जडबंबाल व विनोदी होते असे मला आठवते. रेल्वे इंजिनला अग्निरथ सारखे शब्द या समितीनेच सुचवले होते. या शब्दांचा वापर सुरू झाल्यावर हिंदी शुद्ध झाली खरी पण ती बहुतेक लोकांना आणि विशेषत: परप्रांतीयांना तर समजेनाशीच झाली. त्यामुळे इंग्रजीची हकालपट्टी होण्याची प्रक्रिया जी थांबली ती थांबलीच.
जी गोष्ट इंग्रजीची, तीच मराठीची आहे. काही मंडळींना मराठीवर इंग्रजीचे आक्रमण होत आहे असा साक्षात्कार मधून मधून होत असतो. आंतरजालावर सुद्धा अशी मंडळी बरीच आहेत. कॉम्प्युटर या शब्दाला संगणक हा शब्द रूढ आहे व तो वापरला तरी फारसे बिघडत नाही. पण कीबोर्डला कळफलक , माऊसला, उंदीर किंवा क्लिक या शब्दाला टिचकी हे प्रतिशब्द वापरले की वाचणार्‍याचा गोंधळ हा होतोच. इंग्रजी भाषा ही जगात सर्वात जास्त लिहिली व वाचली जाणारी भाषा आहे. ब्रिटिश साम्राज्य हे जरी याचे ऐतिहासिक कारण असले तरी इतर भाषांतील शब्द शोषून घेऊन त्यांना आपलेसे करण्याचे या भाषेचे जे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळेच ही भाषा या स्थानाला जाऊन पोचली आहे. गुरू, बझार या सारखे भारतीय शब्द आता इंग्रजी बनले आहेत ही याची सहज आठवणारी उदाहरणे आहेत. दर वर्षी ऑक्सफर्ड हे पुस्तक प्रकाशक या वर्षी कोणकोणते नवीन शब्द इंग्रजीत आले आहेत याची मुळी एक यादीच प्रसिद्ध करते.
इंग्रजी भाषा जर नव्या नव्या शब्दांचा अंतर्भाव इतक्या सहज रित्या करू शकते तर मराठीमध्ये निदान प्रचलित तांत्रिक शब्दांना प्रतिशब्द शोधत बसण्यापेक्षा आहेत तेच शब्द आपण मराठीमध्ये ओढून घेऊन त्यांचा वापर का अधिकृत का करत नाही हे मला समजत नाही. भाषा सोपी ठेवा. लोकांना समजेल अशी ठेवा. म्हणजे ती वापरली जाईल हे अगदी साधे सूत्र आहे.
दिल्लीच्या केन्द्र सरकारने नुकताच एक आदेश काढून क्लिष्ट हिंदी शब्दांचा वापर करण्याऐवजी प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर सरकारी पत्रव्यवहारात करण्यास परवानगी दिली आहे. या संबंधी काढलेल्या परिपत्रकात गृहखात्याने स्पष्ट कबूली दिली आहे की “सरकारी कामकाजामध्ये भाषांतरासाठी हिंदीचा वापर करणे कठीण आणि गुंतागुंतीचे ठरते आहे. भाषांतरात पर्यायी इंग्रजी शब्दांचा वापर तातडीने सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. भाषांतरातून मूळ मुद्यांचा नेमका अर्थ लोकांपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. प्रत्येक इंग्रजी शब्दाला हिंदी प्रतिशब्द वापरणे म्हणजे भाषांतर नव्हे. ” याची काही उदाहरणे या परिपत्रकात दिली आहेत. “प्रत्याभूती” सारख्या क्‍लिष्ट शब्दाला “गॅरंटी”, “कुंजीपटल” या शब्दाला “कीबोर्ड”, “संगणक” ऐवजी “कॉम्प्युटर” हे शब्द वापरावे असे हे परिपत्रक म्हणते आहे.

मध्यवर्ती सरकारने इंग्लिश ऐवजी “हिंग्लिश” वापरा अशी दिलेली ही सूचना कार्यालयीन पत्रव्यवहार समजण्यास सुलभ करेल याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही.
याच धर्तीवर निदान आंतरजालावर उपयोगात आणल्या जाणार्‍या मराठी लेखनात तरी शुद्धतेचा अवास्तव बडेजाव न मांडला जाता रोजच्या व्यवहारातील प्रचलित इंग्रजी शब्द त्यात वापरले जातील अशी मला आशा वाटते. निदान माझ्या लेखनात तरी मी हे करतोच आहे व करत राहीनच.
6 डिसेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: