.
Science

कॉफी, कोक आणि मधमाशा


मला पहिल्यापासूनच कॉफी खूप आवडते. पण बाहेर कोठे कॉफी प्यावीशी वाटली तरी ते कळकटलेले कप, बादलीत घेतलेले कॉफीच्याच रंगाचेच पाणी व त्यात बुचकळून काढलेल्या कपबशा, यामुळे कॉफी पिण्याच्या आनंदाऐवजी, मनात संशयाचे वातावरणच जास्त तयार होत असे. काही वर्षांपूर्वी प्रथम कागदी व नंतर प्लॅस्टिकचे कप वापरात आले. या कपात कॉफी मिळाली की ती पिऊन झाल्यावर तो कप फेकून द्यायचा असल्याने मनातील संशय निवळण्यास मदत झाली व मी कॉफी मोठ्या मजेने आता पिऊ शकतो.

जी गोष्ट कॉफीची तीच थोड्या फार प्रमाणात कोक सारख्या फसफसणार्‍या पेयांची! पिझ्झा किंवा भेळ खाताना बरोबर काही कोकचे घोट घ्यायला मला खूप आवडते. पूर्वी ही पेये फक्त काचेच्या बाटल्यातून मिळत. एकदा पिऊन झाले की रिकाम्या बाटल्या परत कंपनीकडे पाठवल्या जात. अलीकडे ही पेये प्लॅस्टिकच्या मोठ्या बाटल्यांतून विकली जातात. आपण पिताना छोट्या कागदी किंवा प्लॅस्टिकच्या कपात आपल्याला पाहिजे तेवढा कोक ओतून घ्यायचा व नंतर कप फेकून द्यायचा. सगळे स्वच्छ आणि आटोपशीर!

आपल्याला जी सुविधा स्वच्छ व आटोपशीर असल्याने वापरावीशी वाटते ती दुसर्‍याही काही सजीवांना आवडू लागू शकते हे काही आपल्या लक्षात येणे शक्य नाही. त्यासाठी आपण आता जाऊया वरच्या कॉफी किंवा कोकच्या विषयाकडून, एका फार लांबच्या विषयाकडे! हा विषय आहे मधमाशा पालनाचा व्यवसाय. या व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना गेली काही वर्षे मधमाशांच्या संख्येत अचानक घट झाल्याचे आढळून येऊ लागले आहे. या अशा प्रकारच्या संख्येतील अचानक होणार्‍या घटीला Colony collapse Disaster (CCD) असे शास्त्रीय नाव आहे. हे कदाचित तुम्हाला माहित नसेल की भारतातील 80% पिकांचे परागीकरण pollination हे मधमाशांद्वारे होत असते. मधमाशांच्या संख्येत जर अचानक एवढी मोठी घट झाली तर त्याचा पिकांच्या परागीकरणावर व अन्वयाने पिकावर परिणाम हा होणारच. साहजिकच कृषि उत्पादन संबंधित तज्ञांच्या मेजावर धोक्याच्या घंटा जोराने वाजू लागल्या असल्या तर त्यात काही नवल नाही.

School of Biological Sciences in Madurai Kamaraj University मधले एक संशोधक डॉ. एस. चंद्रशेखरन व त्यांचे सहकारी यांनी नुकताच या विषयावरील संशोधनाचा 1 वर्ष कालावधीचा प्रकल्प पूर्ण केला आहे व त्यांनी काढलेले निष्कर्ष धक्कादायक तर आहेतच पण विचार करायला लावणारे ही आहेत. त्यांच्या या संशोधनाचे निष्कर्ष त्यांनी Current Science या मासिकात नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. या आपल्या लेखात श्री चंद्रशेखरन म्हणतात की शहरीकरण झालेल्या भागांत अलीकडे कॉफी व थंड पेये विकणारी दुकाने मोठ्या प्रमाणावर उघडली जाऊ लागली आहेत. या सर्व ठिकाणी अलीकडे काचेचे ग्लास किंवा कप यांच्याऐवजी कागद किंवा प्लॅस्टिकचे कप वापरले जाऊ लागले आहेत. हे कप वापरल्यावर कचर्‍यात फेकून दिले जातात. या कपांमध्ये तळाला साखरेचा काही अंश खाली चिकटून बसलेला असतो. या ठिकाणी फुलांतील मध गोळा करत उडणार्‍या मधमाशा आल्या की त्या फुलातून मध गोळा करण्याचे बंद करून या कपांच्या तळात असलेली शिल्लक साखर काढून घेण्याचा प्रयत्न करू लागतात. अन्न सहज रित्या व विनासायास मिळत असताना ते फुलांतून कष्ट करून प्राप्त करण्याचा खटाटोप अगदी मधमाशा असल्या तरी कशासाठी करतील? परंतु कपांतील ही साखर गोळा करण्याच्या हव्यासापायी आपले प्राण आपल्याला गमवावे लागतील हे त्या मधमाशांच्या लक्षात येत नाही. कपाच्या तळाला असलेल्या साखरेला या मधमाशा चिकटून बसतात आणि मग उडता न आल्याने त्या मरण पावतात.

डॉ. चंद्रशेखरन व त्यांचे सहकारी यांनी तामिळ नाडू मधल्या पाच व्यापारी कॉफी बार मध्ये हा अभ्यास केला. या 5 बार मध्ये सरासरीने दिवसाला 1225 कप कॉफी पिऊन झालेले असे कप बाहेर कचर्‍यावर फेकून दिले जातात. डॉ. चंद्रशेखरन यांना 1 महिन्याच्या अवधीत 25000 च्या वर मेलेल्या मधमाशा या कपांच्यात आढळून आल्या. या कपाभोवती घोंघावणार्‍या मधमाशांपैकी तब्बल 23% माशा मृत्यूमुखी पडत होत्या. या शिवाय आणखी थोड्या माशा हे कप कचरा डेपोमध्ये फेकून दिल्यावर मरत होत्या. जगभरात 130 कोटी कप कॉफी व 80 कोटी कप चहा रोज प्यायला जातो हे लक्षात घेतले तर किती मधमाशा मृत्यूमुखी पडत असतील याचा अंदाज सहज करता येतो. डॉ. चंद्रशेखरन यांच्या मते मधमाशांची स्मृती अतिशय अल्पकालीन असते. त्यामुळे जोपर्यंत त्यांना कचर्‍यात फेकलेले असे कप माहीत नसतात तोपर्यत त्या तेथे येत नाहीत पण एकदा का त्यांना ती जागा माहित झाली की फुलांवर बसण्याचा आपला परंपरागत स्वभाव सोडून त्या या कपांच्यातील साखर गोळा करण्याच्याच मागे लागतात.

मधमाशा करत असलेले परागीकरण हे कृषि उत्पादनांसाठी मोठे महत्वाचे आहे. या परागीकरणाला जर कॉफी व थंड पेये पिऊन फेकून दिल्या गेलेल्या कपांमुळे हानी पोचणार असेल तर आपल्याला हे कप फेकून न देता ते परत एकत्र करून योग्य रित्या कसे नष्ट करता येतील त्याचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

23 नोव्हेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: