.
Travel-पर्यटन

दक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 5


जोग धबधब्याला भेट दिल्यानंतर झालेल्या निराशेवर दुसर्‍या एखाद्या धबधब्याला भेट देणे हा उत्तम उपाय असू शकेल असा एक विचार काल संध्याकाळी कोणीतरी मांडला. मागोड धबधब्याला सध्या भरपूर पाणी असल्याची माहिती पण कोणीतरी दिली. सर्वांनाच ही सूचना पसंत पडली व आज परत मागोड धबधब्याच्या एका नव्या जंगल सफारीला जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सकाळी गेल्या काही दिवसांप्रमाणेच, इडली, उप्पीठ, नीर डोसा आणि त्याच्या जोडीला गरमागरम ऑमलेट असा मस्त ब्रेकफास्ट आज पण झाला आहे व सफारीहून परत यायला थोडा उशीर झाला तरी चालण्यासारखे आहे.

मागोड धबधब्याला जाण्यासाठी असलेला एकुलता एक रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 ( हुबळीकारवार रस्ता) या रस्त्याला येल्लापूरच्या पश्चिमेकडे साधारण 3 किलोमीटरवर एक फाटा लागतो तेथून पुढे सरळ दक्षिणेकडे जातो. त्यामुळे साहजिकच आम्ही प्रथम येल्लापूरकडे निघालो आहोत. येल्लापूर या गावाला मध्यम आकाराचे गाव असे म्हणता येईल. हुबळीकारवार रस्ता गावातून जात असल्याने साधारण 25000 वस्ती असलेले हे गाव महामार्गावरील सर्वसाधारण गावे असतात तसेच आहे. हे गाव मला तरी अगदी लोणावळा खंडाळ्याची आठवण करून देते आहे. गावातून जाणार्‍या महामार्गाच्या बाजूला, अनेक चहाच्या टपर्‍या, वाहनदेखभाल करण्यासाठी गॅरेजेस व बरा दर्जा असलेली उपहारगृहे व दुकाने दिसत आहेत. आज दिवाळीचा दिवस असल्याने येल्लापूर मार्केट फुलांच्या ढिगांनी नुसते सजलेले दिसते आहे. झेंडू, मोगरा या सारखी फुले मोठ्या ढिगांनी विकली जात आहेत. घरांची प्रवेशद्वारे, गाड्या, मोटर सायकली या सारख्या सर्व गोष्टी फुलांच्या माळांनी सजवलेल्या आहेत. साधारणपणे अशा आकाराच्या गावातून जाताना उघड्या गटारांमुळे प्रथम आपल्याला लक्षात येतो तो एक विशिष्ट दुर्गंध! आज मात्र येल्लापूर मध्ये नाकाला जाणवतो आहे तो धुंद करणारा मोगर्‍याचा सुवास. येल्लापूर मार्केट मधील एकूण गर्दी, उलाढाल बघून सुपारीच्या व्यापारामुळे हे एक सधन झालेले गाव आहे हे लगेच लक्षात येते आहे. अर्थात गावाच्या बाहेर अनेक मैलांपर्यंत हिरवीगार भातशेती सर्व बाजूंना दिसतेच आहे.

मागोड गावाकडे जाणारा रस्ता

मागोड फाट्यावर वळल्यानंतर लगेचच अतिशय घनदाट अशी झाडी आमचे स्वागत करते आहे. रस्ता अतिशयच अरूंद आहे व रस्त्याच्या दोन्ही कडांना असलेल्या ऊंचऊंच झाडांच्या फांद्या व काटक्या एकमेकात इतक्या अडकून किंवा मिसळून गेल्या आहेत की वरून येणार्‍या सूर्यप्रकाशाला सुद्धा वाट काढणे मुष्कील व्हावे. या रस्त्याने थोडे पायी चालावे या विचाराने मी खाली उतरतो. मी काही वनस्पतीतज्ञ नाही तरीही बाजूच्या जंगलात असलेली साग, जांबा, किंजल, सावर व जांभूळ या सारखी झाडे मला लगेच ओळखू येतात. काली रात्री बहुदा येथे जोरदार वादळ झाले असावे कारण जमिनीवर तुटलेल्या फांद्या व काटक्या यांचा खच पडला आहे. रस्त्याच्या एका बाजूला मला काही फूट तरी ऊंच असलेले एक मुंग्यांचे वारूळ दिसते आहे. या वारूळाचा आकार एखाद्या किल्यासारखा वाटतो आहे. मुंग्यांना जात्याच बहुदा वास्तुबांधणी शास्त्र अवगत असले पाहिजे.

मागोड रस्त्यावरील मुंग्यांचे वारूळ

मागोड गाव येल्लपूरहून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्यापैकी 12 किलोमीटर अंतर जंगलातील हा अरूंद रस्ता आहे. या रस्त्याची परिस्थिती व चिंचोळेपणा यामुळे वाहन चालवणे म्हणजे एक परीक्षाच असल्याने हे अंतर कापायला आम्हाला 1 तासाहून अधिक काल लागला आहे. मागोड गावातील घरे तशी मोठ्या भागावर पसरली असावीत असे वाटते कारण गावाच्या मध्यभागी फक्त 2 किंवा 3 घरे दिसत आहेत. या गावाला येताना शेवटचे काही किलोमीटर रस्ता तर सदाबहार अशा गच्च हिरव्यागार जंगलातून आलेला आहे. मागोड गावात एक वाहनतळ आहे तेथे आमची गाडी थांबते व मी खाली उतरतो. पर्यटकांना आवश्यक अशा स्वच्छतागृहासारख्या थोड्या सुविधा येथे उपलब्ध केलेल्या दिसत आहेत. मागोड गावापासून खूप उतार असलेली एक छोटी पायवाट पुढे जाते. या पायवाटेवर काही ठिकाणी पायर्‍या बांधलेल्या असल्याने मार्ग काढणे तसे सोपे आहे. ही पायवाट प्रथम वळणावळणाने एका अरूंद खिंडीत खाली उतरते व ही खिंड पार केल्यावर पुढे चढाचा रस्ता लागतो. हा रस्ता समोर असलेल्या एका बर्‍यापैकी ऊंच व बांबूची दाट वने असलेल्या एका टेकडीवर चढतो व टेकडीला वळसा घालून परत खिंडीपर्यंत येतो. या सर्व रस्त्याच्या किंवा पायवाटेच्या पूर्वेकडच्या बाजूला ठिकठिकाणी लोखंडी कठडे बांधून सुरेख व्हिस्टा पॉइंट्स बनवलेले आहेत. तेथे उभे राहिले की समोर 800 फूटाची उडी घेणार्‍या मागोड धबधब्याच्या भव्य दर्शनाचा आनंद मनमुराद लुटता येतो.

मागोड धबधबा

मागोड धबधब्याचा मुख्य भाग

मागोड या पदपथाने फिरत मी मागोड धबधब्याचे चांगले छायाचित्र कोठून घेता येईल हे बघतो आहे. मागोड धबधबा बेडथी या नदीवर आहे आणि या धबधब्याला जोग फॉल्स सारखे पाण्याचे दुर्भिक्ष नसून भरपूर पाणी असल्याने या धबधब्याला भेट देण्याची कल्पना योग्यच होती असे म्हणता येईल. मात्र या धबधब्याची एकूण ऊंची 800 फूट असली तरी जोग फॉल्स सारखा हा धबधबा ही ऊंची एका उडीत घेत नाही. प्रथम बेडथी नदी उतारावरची अनेक वळणे (Rapids) घेत खळखळाट करत एका मोठ्या जलाशयात येते. व या जलाशयातून अधिकच गतीमान होऊन 200 फुटाची एक जबरदस्त उडी घेते. यानंतर ही नदी एका बाजूला असलेल्या 800 फूट उंचीच्या सरळ कड्यामुळे एका अंगाला दाबली गेल्याने या कड्याला लागून असलेल्या घळीतून, मी उभा आहे त्या टेकडीच्या तळाला, सबंध टेकडीभोवती चक्कर मारते. टेकडीच्या दुसर्‍या बाजूला बटरमिल्क फॉल्स या एका धबधब्यामधून वाहत आलेले सोंदे नदीचे पाणी या नदीला येऊन मिळते व त्या नंतर या प्रवाहाला गंगावल्ली असे म्हटले जाते. ही गंगावल्ली नदी या बिंदूपासून पश्चिमेला वहात जाते. 200 फुट उडी घेणारा पाण्याचा प्रवाह एवढ्या जोराने खाली पडतो आहे की त्यामुळे तळाला धुक्याचा एक मोठा ढग तयार झाला आहे. डोक्यावर दुपारचा सूर्य तळपत असल्याने त्या प्रकाशात या धुक्यामध्ये तयार झालेले एक दुहेरी इंद्रधनुष्य मला दिसते आहे.

धबधब्याच्या तळाजवळ तयार झालेले धुके

हे अप्रतिम सुंदर दृष्य जास्तीत जास्त जेवढा वेळ बघणे शक्य होईल तेवढा वेळ मी या टेकडीवर काढतो आहे. परंतु वेळ खूपच भरभर चालला आहे व परतण्याची वेळ जवळ आली आहे. परत फिरताना प्रथमच माझे लक्ष आजूबाजूला जाते. अनेक काळेभोर डोळे माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत हे माझ्या लक्षात येते. मागोड परिसरात खूपच माकडे आहेत व प्रवाशांच्या हातात काही खाद्यवस्तू असली तर एका सेकंदात त्यावर डल्ला मारून ती पळवण्याच्या प्रयत्नात ही माकडे असतात.

चंदगुळि परिसरातील घनदाट झाडी

परतीच्या प्रवासात आमची गाडी एका बाजूच्या कच्च्या रस्त्यावर वळते व चंदगुळी नावाच्या अगदी एका छोट्या खेड्याजवळ उभी राहते. या खेड्यात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घरे आहेत. यापैकी एका घराच्या छतावर कळस दिसतो आहे. जवळच लावलेल्या एका फलकाप्रमाणे हे गणेशाचे मंदिर आहे. चंदगुळी सिद्धिविनायक मंदिर या नावाने हे मंदिर ओळखले जाते. या गणेश मंदिराचे एक मोठे गंमतीदार वैशिष्ट्य आहे. या मंदिराला भेट देणारे भाविक गणेशाला त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे छोट्या मोठ्या आकाराची घंटा देवापुढे वाहत असतात. त्यामुळे हे मंदिर एक घंटांचे संग्रहालय झाले आहे. अगदी छोट्या घंटांपासून भरभक्कम घंटेपर्यंत सर्व प्रकारच्या घंटा भाविकांनी देवाला वाहिलेल्या आहेत. या मंदिराच्या भिंती, ओसरी, छत आणि प्रवेशद्वार हे घंटांनीच सजवलेले आहे. या गणपतीला घंटा ग़णेश असेही नाव पडलेले आहे.

चंदगुळि मंदिरातील घंटा

मी गाडीत बसतो व आम्ही पुढे निघतो. आता आम्हा सर्वांच्या पोटात कावळे चांगलेच कोकलू लागले आहेत. तरीही आम्ही वाटेतच लागलेल्या एका मोठ्या सुंदर दिसणार्‍या जलाशयाशी थोडा वेळ थांबतोच. या जलाशयाचे नाव कवडीकेरे असे आहे. जलाशयातील पाणी मोठे नितळ, स्वच्छ वाटते आहे. जलाशयाशेजारीच एक देवीचे मंदिर आहे. हा सर्वच परिसर अतिशय रमणीय आहे यात शंकाच नाही. मंदिराला एक धावती भेट देऊन आम्ही आता परतीच्या मार्गावर आहोत. आजची आमची सफर छान झाल्याने समाधान वाटते आहे. जेवण झाल्यावर नंतर आराम करायला भरपूर वेळ आहे.

कवडीकेरे जलाशय

सह्याद्री पर्वतराजी तसे बघायला गेले तर मला काही नवीन नाही. माझे पुण्यातले घर या पर्वतराजीमधल्या काही टेकड्यांच्या अगदी जवळ आहे. अगदी लहानपणापासून मी या टेकड्यांवर मनमुराद भटकलो आहे. परंतु याच सह्यराजीच्या दक्षिण भागात फिरण्याचा हा गेल्या काही दिवसांचा अनुभव मला नवीन व हृद्य असाच वाटतो आहे. दक्षिण सह्याद्री परिसर उत्तरेपेक्षा निराळाच आहे. घनदाट जंगले, नितळ पाण्याचे निसर्गरम्य जलाशय, धबधबे हे तुम्हाला एका निराळ्याच विश्वात घेऊन जातात. दक्षिण सह्याद्री मधली माझी ही सफर आता संपल्यासारखी असली तरी स्मृती पटलावरून ती पुसली जाणे माझ्या उर्वरित आयुष्यात तरी शक्य वाटत नाही.

(समाप्त)

21 नोव्हेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “दक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 5

  1. 5 bhagatil pravas varnan apratim. pratyaksha bhet dilyacha aanand vachun milala.
    ashok

    Posted by Ashok Patwardhan | नोव्हेंबर 24, 2011, 3:58 pm
  2. अप्रतीम. मजा आली.
    विनय र. र.

    Posted by विनय र. र. | डिसेंबर 3, 2014, 1:42 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: