.
Travel-पर्यटन

दक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 4


आपली शाळा, तिथले वर्गमित्र, त्यांच्याबरोबर केलेली मौजमजा, यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणींना आपल्या आयुष्यात कहीतरी विशेष स्थान असते. तरीही शाळेतल्या दिवसांच्या माझ्या आठवणी या कृष्णधवल छायाचित्रांसारख्या आहेत, गतकाळातील काही क्षण फक्त त्यांनी पकडून ठेवलेले आहेत असे मला नेहमी वाटते. 1954-55 या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेने कर्नाटकची एक सहल आयोजित केली होती.

मी त्या वेळी पाचवीसहावी इयत्तेमध्ये होतो व या सहलीमध्ये मी भाग घेतला होता. या सहलीमधल्या ज्या काही थोड्याशा आठवणी अजून मला आहेत त्या सुद्धा सगळ्या अशाच कृष्णधवल छायाचित्रांसारख्या आहेत. या छायाचित्रांपैकी स्पष्ट आठवणारे व विस्मृतीच्या गर्तेत कधीच न दडू शकणारे असे एक चित्र एका खूप मोठ्या, खूप रूंद अशा धबधब्याचे आहे. या धबधब्यात प्रत्यक्षात चार किंवा पाच धबधबे एका शेजारी एक होते. मी हा धबधबा समोरच्या बाजूस असलेल्या एका कड्याच्या टोकावरून बघितला होता. पाणी खूप उंचीवरून पडत होते व त्यामुळे तयार झालेल्या धुक्याने मी व समोरचा धबधबा यांच्यामध्ये असलेली खोल दरी संपूर्णपणे भरूनच गेलेली होती. हा धबधबा जगातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असा मानला जात असे व त्या वेळेला तो गिरसप्पा धबधबा या नावाने परिचित होता.

विस्मृतीच्या कप्प्यांमध्ये दडलेले हे एक स्मृती छायाचित्र आज मी परत आठवण्याचा प्रयत्न करतो आहे याचे कारण म्हणजे याच धबधब्याला पुर्नभेट देण्याचा आमचा आज बेत आहे. हा धबधबा आता जोग फॉल्स या नावाने सुपरिचित आहे. काल संध्याकाळी मला कोणीतरी या धबधब्याला जोग फॉल्स असे नाव का दिले गेले याची एक कथा सांगितली. या कथेप्रमाणे पुण्याच्या एका बांधकाम व्यावसायिकाने या धबधब्यापासून 6 किलोमीटर अंतरावर मागे एक मोठे धरण 1964 साली बांधले होते. तो प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल त्या व्यावसायिकाचे नाव म्हणे या धबधब्याला आता दिले आहे. माझा विश्वास काही या कथेवर बसत नाहीये व ही एक लोणकढी थाप कोणाच्या तरी सुपीक मेंदू मधून आली असावी असा माझा कयास आहे. मला राहवत नसल्याने मी शेवटी माझ्या संगणकावर थोडी शोधाशोध करतो व माझ्या कयासाप्रमाणे ही कथा ही एक शुद्ध लोणकढी आहे हे लगेचच समजून येते. प्रत्यक्षात गिरिसप्पा या नावाचे एक खेडे शरावती नदीच्या किनार्‍यावर होनावर या पश्चिम समुद्र किनार्‍याजवळ असलेल्या गावांच्या पूर्वेला साधारण 16 मैलावर आहे व या गावाच्या नावाने हा धबधबा ओळखला जात होता. मात्र या धबधब्याजवळ रहात असलेले स्थानिक या धबधब्याला जवळच असलेल्या जोग या नावानेच प्रथम पासूनच ओळखत असल्याने शेवटी हेच नाव अधिकृत म्हणून ठरवण्यात आले आहे.

मी आता जोग फॉल्स कडे जाण्यासाठी निघालो आहे. सिरसी गावापासून सिद्दपूर गावाकडे जाण्यासाठी राज्य महामार्ग क्रमांक 93 हा रस्ता आहे व हाच रस्ता आम्ही धरला आहे. या रस्त्यावर लागणार्‍या कन्सूर गावापासून ते सिद्दपूरपर्यंतचा रस्ता अगदी दाट जंगलाच्या मधून जातो आहे. सिद्दपूर गावाजवळ या राज्य महामार्गाला माविनगुंडी गावाकडे जाणारा एक फाटा लागतो. या फाट्याने सरळ आले की माविनगुंडी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 206 (होनावरशिमोगा) लागतो. या रस्त्याने सागर गावाच्या दिशेने थोडे किलोमीटर गेले की शरावती नदीवरचा पूल लागतो. या पुलापाशी आम्ही पोचलो आहोत. हा पूल ओलांडला की लगेचच एखादा किलोमीटर अंतरावर, जोग फॉल्स बघण्यासाठी म्हणून प्रसिद्ध असलेला वॅटकिन्सप्लॅटफॉर्म हा व्हिस्टा पॉइंट लागतो.

आमची गाडी एका मोठ्या पटांगणावर येऊन थांबते व मी खाली उतरतो. कर्नाटक शासनाने येथे खूप मोठी जागा प्रवाशांची वाहने ठेवण्यासाठी म्हणून विकसित केली आहे. या पटांगणाच्या बाजूला, प्रवाशांच्या सोईसाठी, स्वच्छता गृहे, उपहार गृहे व राहण्यासाठी कक्ष उपलब्ध आहेत. या पटांगणापासून, कॉंक्रीटमध्ये बनवलेला पायर्‍या पायर्‍यांचा एक रस्ता, कड्याच्या टोकाकडे व तेथून कड्याच्या परिमितीवर तुम्हाला घेऊन जातो.

गिरसप्पा किंवा जोग फॉल्स सध्याचा व पूर्वीचा

काही ठिकाणी मधे असलेल्या घळी ओलांडता याव्या म्हणून या वाटेवर टांगते पूल सुद्धा बनवलेले आहेत. या रस्त्याने कड्याच्या टोकाकडे जात असताना मी 1950 च्या दशकात परत एकदा मनाने गेलो आहे. त्या वेळी, हाच धबधबा बघण्यासाठी म्हणून मी आलो होतो व इथे फारशा काहीच सोई वगैरे उपलब्ध नव्हत्या. एका मोकळ्या जागेवर आमची बस थांबली होती व आम्ही मुले एका रांगेत शिक्षकांच्या नजरेसमोरून चालत चालत या कड्याच्या टोकापाशी असलेल्या एका बंगलेवजा इमारतीच्या पुढच्या बाजूस येऊन थांबलो होतो. या कड्याच्या टोकाजवळचा भाग तेंव्हा वॅटकिन्स प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात होता. या इथे उभे राहून मी जे दृष्य त्या वेळी समोर बघितले होते ते माझ्या स्मृती कोषात एखाद्या शिलालेखाप्रमाणे पक्के बसलेले आहे. मी उभा असलेल्या कड्याच्या टोकाखाली एक अतिशय खोल अशी, निदान 1000 फूट तरी खोल, एक दरी होती व या दरीच्या पलीकडच्या बाजूला, पीक कापणी करण्यासाठी शेतकरी जो विळा वापरतात त्या मुठीसकट विळ्याच्या आकाराचा, एक मोठा खडकाळ असा तुटलेला कडा दिसत होता. या खडकाळ कड्यावरून थोड्या थोड्या अंतरावरून पाण्याचे विस्तृत असे चार ओघ कडाडल्यासारखा आवाज करत खाली कोसळत होते. हे जलौघ एवढे रूंद होते की मोठ्या पांढर्‍या चादरी त्या कड्यावरून खाली सोडल्या आहेत की काय? असे वाटावे. कडाडून खाली आदळणार्‍या या जलौघांनी खाली दरीमध्ये धुक्याचा एक मोठा ढग तयार केला होता. मधून मधून वार्‍याबरोबर हे धुके इकडे तिकडे फेकले गेले की समोरचा निम्मा धबधबा सुद्धा दिसेनासा होत होता. आणि अचानज वार्‍याची दिशा आमच्या बाजूला फिरल्याने, दरीच्या विरूद्ध बाजूच्या कडांवर उभे असलेली आम्ही मुले त्या धुक्यामुळे अंगावर उडणार्‍या तुषारांनी मोठे आनंदित झालो होतो. त्या धबधब्याचा कडाडणारा आवाज एवढा प्रचंड होता की आमची बस ठेवली होती त्या ठिकाणांपर्यंत हा आवाज ऐकू येत होता.

1950 च्या दशकातील गिरसप्पा धबधबा आता क्वचितच, तो सुद्धा ऐन पावसाळ्यात (जुलैऑगस्ट मध्ये) दिसू शकतो. याचे कारण म्हणजे या धबधब्यापासून सुमारे 6 किलोमीटर मागे लिंगनमक्की या नावाचे एक मोठे धरण शरावती नदीवर कर्नाटक सरकारने 1964 मध्ये बांधले आहे. या धरणामुळे शरावती नदी मध्ये वाहणार्‍या पाण्याचा ओघ एकदम आटल्यासारखा झाला आहे. ऐन पावसाळ्यात जेंव्हा हे धरण पूर्ण भरून वाहू लागते त्याच वेळेस फक्त गिरसप्प्याचे पूर्ण जलवैभव आता बघता येते.

जोग फॉल्स ; सध्याचे 

राजा, रोअरर व रॉकेट धबधब्यांचे पाणी तळाच्या जलाशयात पडताना

या धबधब्याचे 60 वर्षांपूर्वीचे जलवैभव आता काही आपल्याला पुन्हा बघता येणार नाही आणि जो धबधबा समोर दिसणार आहे तो म्हणजे पाण्याचे थोडे मोठ्या आकाराचे ओहोळ असणार आहेत याची मनाला पूर्ण जाणीव असल्यामुळे, थोड्याशा नाराजीने व अनिच्छेने मी कड्याच्या टोकाकडे असलेल्या वॅटकिन्स प्लॅटफॉर्म घेऊन जाणार्‍या पायवाटेने चालू लागलो आहे. कड्याच्या टोकापाशी पोचल्यावर मला समोर परत एकदा दिसते आहे तीच 1000 फूट खोल असलेली दरी व त्याच्या मागे असलेला मूठ असलेल्या विळ्याच्या आकाराचा कडा. मात्र आता या कड्याच्या टोकावरचे सर्व खडक उघडे बोडके पडलेले दिसत आहेत. साधारण मध्यान्हीची वेळ असल्याने सूर्य अगदी डोक्यावर तळपतो आहे. त्यामुळे दरीच्या अगदी तळाला असलेली, नदीच्या पाण्यातील छोटी मोठी डबकी, धबधब्यांचे पाणी जिथे खाली पडते आहे तेथे असलेला एक मोठा जलाशय आणि पात्रातील खडक अगदी स्पष्ट दिसत आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्या धुक्यामुळे मला गिरसप्पा धबधबा अतिशय गूढ व जादूचा वाटला होता त्या धुक्याचा आता मागमूसही दिसत नाहीये. प्रवाहातील कमी पाणी किंवा दुपारची वेळ यामुळे हे धुके दिसत नसावे अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतो.

वॅटकिन्स प्लॅटफॉर्म

त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच वाटते आहे की चारी धबधब्यांचे प्रवाह अजूनही पहायला मिळत आहेत. सगळ्यात डाव्या अंगाला असलेला राजा धबधबा (याला ग्रॅन्ड, मेन किंवा घोड्याच्या नाल अशीही नावे आहेत.) अजूनही दरीत 830 फूट खोल कोसळतो आहे. विळ्याच्या आकाराच्या कड्यावर मुठीपासून सर्वात दूर असलेल्या वक्राकार भागातून, हा जल प्रवाह खाली येतो आहे. आणि खाली पडताना या प्रवाहाला कोणत्याही खडकाचा अडथळा नसल्याने वरून खालपर्यंत हा प्रवाह म्हणजे एक सलग पांढर्‍या रंगाचा पट्टा वाटतो आहे. हा प्रवाह खाली पडताना मोठ्या सुरेख रित्या एका वक्राकार परिघावर पडतो आहे व खालच्या जलाशयाशी पोचल्यावर अनेक फवारे उडवत जलाशयाच्या पाण्यात लुप्त होतो आहे. मात्र पूर्वी हा प्रवाह जसा एक पांढरी चादर वाटत असे तसे न वाटताना एखादी पांढरी चिंधी असावी तसाच दिसतो आहे. या प्रवाहाच्या साधारण 1000 फूट डावीकडे आणि कड्याच्या विळ्याच्या आकाराच्या मुठी जवळच्या वक्राकार भागातून, दुसरा धबधबा खाली कोसळताना दिसतो आहे. हा धबधबा पूर्वी प्रचंड कोलाहल निर्माण करत असे व त्यामुळे त्याला रोअरर असे नाव होते. वैभवाच्या कालात हा रोअरर, कड्याच्या अगदी वरच्या टोकावरून राजा धबधब्याकडे तोंड करून कोसळत असे. त्यामुळे या धबधब्याचे पाणी, राजा धबधब्याच्या पाण्यावर मध्यंतरी हवेतच कोठेतरी आदळून ध्वनी गर्जना व मी वर वर्णन केलेले प्रसिद्ध धुके निर्माण करून या धबधब्याला एक गूढत्व व जादू प्रदान करत असे. आता मात्र हा धबधबा कड्याच्या वरच्या टोकावरून कोसळत नसून मधेच अर्ध्या खोलीवर कोठेतरी कड्यावरून बाहेर येतो व याचे पाणी राजा धबधब्याच्या पाण्याला अगदी तळाशी भेटते त्यामुळे याची गर्जना व धुके हे दोन्हीही लुप्त झाले आहेत. हा रोअरर किंवा गर्जणारा धबधबा बघितल्यावर याचे नाव आता कण्हणारा धबधबा असे ठेवले पाहिजे असे मला वाटते आहे. या रोअरर धबधब्याच्या सुमारे 700 फूट डावीकडे आणि विळ्याच्या मुठीच्या जागी जो धबधबा आहे त्याला रॉकेट असे नाव आहे कारण हा धबधबा प्रथम 100 फुटांची खाली उडी घेतो व या धबधब्याचे पाणी एका बाहेर आलेल्या खडकावर आदळल्यामुळे ते पाणी समोरच्या दरीत एखाद्या रॉकेट सारखी हवेत झेप घेते व त्यानंतर राजा फॉल प्रमाणेच एका वक्राकार परिघावर घरंगळत खाली येते. सुदैवाने या रॉकेट धबधब्याचे वैभव अजून बर्‍यापैकी टिकून आहे. हा एकच धबधबा जुन्या गिरसप्प्याची आठवण करून देऊ शकतो आहे. या रॉकेट धबधब्याच्या सुमारे 500 फूट डावीकडे शेवटचा म्हणजे राणी धबधबा आहे. या धबधब्याचे जुने नाव ल दाम ब्लांच असे होते. आता याला राणी धबधबा असे म्हणतात. हा धबधबा खालच्या खडकांच्यावर मलमलची चादर पांघरलेली दिसावी तसा हळूवारपणे घरंगळत खाली येताना दिसतो आहे. अर्थात आता पाणी कमी असल्याने चादरीऐवजी मलमलची पट्टी पांघरावी असे दिसतो आहे.

गिरसप्पा किंवा जोग फॉल्सची तुलना जगातल्या नायगारा सारख्या मोठ्या धबधब्यांशी पूर्वी केली जात असे. आता मात्र याची तुलना मध्यम आकाराच्या धबधब्यांशी करणेही कठिण आहे. फक्त पावसाळ्यात या धबधब्याची गणना आता जगातील मोठ्या धबधब्यांशी करणे शक्य आहे. वॅटकिन्स प्लॅटफोर्म वरून जोग फॉल्स कडे बघत असताना धबधब्याच्या उजवीकडे मला सुबक व छान दिसणारे 3 बंगले दिसत आहेत. मी असे वाचले आहे की रॉयल इंजिनियर्स या सैनिकी पलटणीतील एक अधिकारी कॅप्टन क्रुकशॅन्क यांनी या ठिकाणी 1868 मध्ये एक चुन्यामध्ये बांधकाम केलेला एक बंगला, वरिष्ठ ब्रिटिश अधिकार्‍यांसाठी म्हणून बांधला होता. समोर दिसणार्‍या घरांपैकी एखादे अजून त्याच वेळचे आहे का आता ते पाडून नवे बांधले गेले आहे? हे कळण्यास मला तरी वाव नाही. त्या वेळेस या बंगल्यातून दिसणारा व्ह्यू अतिशय अप्रतिम आणि स्वप्नवत होता. हा बंगला धबधब्याच्या इतका जवळ होता की पाण्याच्या गर्जनेने घराची दारे खिडक्या हादरत असत. या बंगल्यातून आज धबधबा दिसत तरी असेल का? या बाबत माझ्या मनात शंका आहे. अर्थातच धबधब्याच्या गर्जनेचे आता कण्हण्यात रूपांतर झालेले असल्याने तो आवाज या बंगल्यात ऐकू येण्याचीही सुतराम शक्यता वाटत नाही.

कॅप्टन क्रुकशॅन्क बंगला ?

वॅटकिन्स प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूंना असलेल्या डोंगराच्या कडांवर आता कर्नाटक सरकारने व्हिस्टा पॉइंट्स व त्यांना जोडण्यासाठी टांगते पूल बांधले आहेत त्यावरून मी एक फेरफटका मारतो. खरे तर सर्व धबधबे वरच्या टोकापासून खालपर्यंत दिसू शकतील अशी जागा फोटो काढण्यासाठी मी शोधतो आहे. तशी जागा मला सापडते पण तेथून काढलेले फोटो मात्र निराशाजनक आहेत.

जोग फॉल्स बघून झाल्याने मी परत गाडीकडे वळतो आहे. येताना लागलेल्या शरावती नदीवरचा पूल परत न ओलांडता त्याच्या उजव्या बाजूने असलेल्या एका रस्त्याने मी आता कारगल या गावाकडे निघालो आहे. पुढे परत एक पूल लागतो मात्र हा पूल शरावती नदी वरचा नसून एका मानव निर्मित नदीवरचा आहे. लिंगनमक्की धरणात अड्वलेले शरावतीचे पाणी या कॅनॉल मधून शरावती जल विद्युत केंद्राकडे नेण्यात येते. कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन ही संस्था हा प्रकल्प चालवते. या लिंगनमक्की धरणाने अडवलेल्या पाण्याचा जलाशय पावसाळ्यात तुडुंब भरला की जास्त आलेले पाणी सोडून न देता पश्चिम बाजूला असलेल्या तलकालाली या दुसर्‍या जलाशयात साठवले जाते. पुण्याजवळच्या पानशेत व वरसगाव येथील जलाशय जसे एकमेकाला लागून व मधे असलेल्या एका टेकडीमुळे विभाजित होतात तसाच काहीसा प्रकार येथे दिसतो आहे. मात्र ही दुभाजक टेकडी अतिशय घनदाट अशा अरण्याने माखलेली आहे. या जंगलातून असलेल्या रस्त्याने आता आम्ही दक्षिणेकडे असलेल्या कारगल या गावाकडे निघालो आहोत. मात्र आजूबाजूचे जंगल हे बहुदा गेल्या अर्ध शतकात म्हणजे धरण पूर्ण झाल्यावरच एवढे फोफावलेले असावे. कारगल गाव ओलांडून पुढे गेल्यावर काही किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्याचा एक फाटा लागतो. हा रस्ता अतिशय अरूंद आहे. आमची गाडी जेमतेम या रस्त्यावरून जाऊ शकते आहे. थोडे पुढे गेल्यावर समोर एक प्रवेशद्वार व त्यावर असलेली कमान दिसते आहे. कमानीच्या बाजूला असलेला मोपाणी अभयारण्यामध्ये तुमचे स्वागत असोअसा फलक मला दिसतो आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रवेशद्वार कुलुप लावून बंद केलेले आहे. एकूण सगळा गोंधळच आहे. आम्ही काही कालापूर्वी ओलांडून आलेल्या कारगल गावातील ऑफिस मधून प्रवेश पत्रिका आम्ही घेऊन येणे गरजेचे आहे असे तिथल्या काही मंडळींचे म्हणणे दिसते आहे. गरम व जोरदार चर्चा, उशीर व एकूण गोंधळ भरपूर झाल्यानंतर शेवटी एक कर्मचारी सायकलवरून किल्ल्या घेऊन येताना दिसतो व दार उघडले जाते. 30 ते 40 मिनिटे रस्त्याच्या बाजूचे सृष्टी वैभव बघून कंटाळलेल्या आम्हाला अखेरीस अभयारण्यात प्रवेश मिळतो आहे.

जंगलातील आडवळणाची वाट

मोपाणी अभयारण्यामधील रस्ता इतक्या वेड्यावाकड्या वळणांचा व चढउतारांचा आहे की आमची गाडी तो 3 किलोमीटरचा रस्ता अगदी कण्हत कुंथत पार करते आहे. अखेरीस जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका मोकळा जागेत गाडी थांबते व मी खाली उतरतो. चहू बाजूंना नजर फिरवल्यावर लक्षात येते की सगळीकडे घनदाट अशी झाडी आहे की ज्याच्यातून सूर्यप्रकाशही खालपर्यंत उतरू शकत नाहीये. फक्त समोरच्या बाजूच्या झाडीमधून आणखीनच अरूंद असा एक कच्चा रस्ता वळणाआड लपलेला दिसतो आहे. या रस्त्याने फार फार तर एखादी जीप जाऊ शकेल. पुढे आता चालत जाण्याशिवाय काही प्रत्यवाय नाही हे लक्षात आल्याने मी चालायला सुरूवात करतो. चालायला लागल्यावर लक्षात येते की घनदाट झाडीमुळे या रस्त्याने चालणे खूपच सुखकर वाटते आहे. अर्धा किलोमीटर चालल्यानंतर समोर एक मोठा जलाशय दिसतो आहे. या जलाशयाच्या किनार्‍यावर पोचल्यावर लक्षात येते आहे की हा जलाशय, मागची झाडी आणि किनारा यामुळे हे स्थळ नितांत रमणीय बनले आहे.

मोपाणी अभयारण्यातील जलाशय

हे स्थळ म्हणजे प्रत्यक्षात कर्नाटक शासनाने उभारलेली ही एक पर्यटक छावणी आहे. येथे एक पर्यटक निवास आहे. पर्यटकांना तंबू ठोकण्यासाठी मोकळी जागा आहे. ज्यांना जंगलांची आवड आहे अशांसाठी ही पर्यटक छावणी म्हणजे एक पर्वणीच आहे. समोरच्या तलावाचे पाणी शांत आणि मनोहर आहे. येथे तुम्ही पोहू शकता. किनार्‍यावर स्वैपाकपाणी करू शकता आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनाला पूर्ण विसरून विरंगुळ्याचे चार क्षण निवांतपणे घालवू शकता. समोर दिसणारा जलाशय लिंगनमक्की जलाशय आहे की तालकालाली जलाशय आहे हे सांगणे मला मोठे कठिण वाटते आहे. आमच्या प्रवासाची दिशा बघितली तर कदाचित हे तालकालाली सरोवर असू शकेल असे मला वाटते. आजूबाजूच्या कोणालाही विचारून काहीच फायदा नाही कारण इंग्लिश किंवा हिंदी जाणणारे कोणी दिसत नाहीयेत. मात्र सगळे फलक किंवा नकाशे मात्र हा जलाशय लिंगनमक्की आहे असे सांगतात त्यामुळे कदाचित हा जलाशय लिंगनमक्की असू शकतो.

मोपाणी अभयारण्यातील जलाशयाचा किनारा

अभयारण्यातील घनदाट झाडी मधील रस्ता

या जलाशयाच्या काठावर थोडा काल व्यतीत केल्यावर मी परतीच्या मार्गाला लागतो. परत एकदा जोग फॉल्सच्या परिसरातून जाताना माझ्या मनाला प्रश्न पडतो. आता भविष्यकालात माझ्या स्मरणात कोणता धबधबा राहील? 60 वर्षांपूर्वी बघितलेला गिरसप्पा धबधबा की मोठे ओहोळ या स्वरूपातला जोग धबधबा? तुम्ही उत्तराचा नक्कीच अंदाज बांधू शकाल. शाळेच्या सहलीत बघितलेला गिरसप्पा हा कोणत्याही क्षणी आणि परिस्थितीत आज बघितलेल्या जोग फॉल्स वर सहज मात करू शकेल.

(क्रमश🙂

18 नोव्हेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “दक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 4

  1. wow ………. khoop chan aprtim pice man bharun aale tya bhabhaba chya pice la baghun……………………

    Posted by swapnali sonawane | सप्टेंबर 5, 2012, 1:23 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: