.
Travel-पर्यटन

दक्षिण सह्याद्रीमधील भटकंती- भाग 3


ऐतिहासिक दृष्टीने बघितले तर दक्षिण सह्याद्रीतील येल्लापूर गावाजवळच्या परिसरात असलेले सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे बनवासी हे गाव असे लगेच सांगता येते. या बनवासी गावाचा मागील 2250 वर्षांचा इतिहास ज्ञात आहे. बनवासी गावाबद्दलची सर्वात पूर्वीची ज्ञात नोंद, ..पूर्व 242 या वर्षामधील आहे. या वर्षी, म्हणजे सम्राट अशोक गादीवर आल्यानंतर 18 वर्षांनी, एक बौद्ध महासभा आयोजित केली गेली होती. या महासभेनंतर रक्षितया बौद्ध भिख्खूला बौद्ध धर्मप्रचारासाठी बनवासी येथे पाठवले गेले होते.

हे बनवासी गाव वरदा नदीच्या डाव्या किनार्‍यावर आणि सिरसी गावापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे. सहस्त्रलिंग या स्थानाला भेट दिल्यानंतर मी आता बनवासी गावाकडे निघालो आहे. सिरसी आणि बनवासी या गावांना थेट जोडणारा रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्यानेच मी आता निघालो आहे. सिरसीहून निघाल्यावर पहिले काही किलोमीटर तरी रस्ता अतिशय दाट अशा जंगलातून जातो मात्र या नंतर जंगल एकदम मागे पडते आणि लागवडीखाली असलेली जमीन दोन्ही किंवा निदान एका बाजूला तरी दिसू लागते. भात शेती शिवाय फळझाडे आणि मुख्यत्वेकरून अननसाची लागवड बर्‍याच ठिकाणी दिसते आहे. आमची गाडी काही छोट्या छोट्या गावांना पार करते आहे. ही गावे दिसायला तरी टुमदार दिसतात. गावांतील घरे नीट नेटकी व दिसायला बरी वाटत आहेत. या गावातील शेतकरी वर्ग बर्‍यापैकी सधन असावा असे रस्त्यावर जी काही उलाढाल चाललेली दिसते आहे त्यावरून मला तरी वाटते आहे. राजकीय दृष्ट्या इथले लोक बरेच सक्रीय असावेत. गावागावात, चौकाचौकात सगळीकडे बीजेपी चे ध्वज फडकताना दिसत आहेत.

बनवासी गावात पोचल्यावर प्रथम लक्षात भरतो तो तिथला अरूंद रस्ता. गावातील मुख्य रस्ता इतका अरूंद आहे की जर दोन वाहने एकमेकासमोर येऊन ठाकली तर एका वाहनाला पार गावाच्या बाहेर पर्यंत रिव्हर्स गिअर मधे मागे जावे लागते. तरच वाहतूक परत सुरळीत होऊ शकते. काही हजार वर्षे तरी अस्तित्वात असलेल्या या बनवासी गावात पोचताना माझ्या मनात थोड्या विचित्र पण संमिश्र भावना आहेत. भारतातील प्राचीन संस्कृती किती प्रगत होती याचे हे गाव म्हणजे एक द्योतक आहे असे मला वाटते. हे गाव प्राचीन भारतात अतिशय महत्वाचे मानले जात होते. पुण्याजवळ असलेल्या कार्ले येथील लेण्यांमध्ये, तेथील एक लेण्यात असलेले गुंफा मंदिर, बनवासी येथील एका व्यापार्‍याने इ..पूर्व 100 वर्षे या कालात, दान देऊन बनवून घेतल्याचा उल्लेख आहे. बनवासी गाव तेंव्हा वैजयंती या नावाने ओळखले जात होते. नाशिक येथील प्रसिद्ध बौद्ध लेण्यांमधील एका गुंफेतील शिलालेखात, ( गुंफा क्रमांक 2) वैजयंतीच्या प्रबळ सैन्यदलाचा उल्लेख सापडतो.(संदर्भ क्रमांक 1). दुसर्‍या शतकामध्ये ग्रीक भूगोलकार टॉलेमी याने बनवासी गावाचा Banaausi or Banauasi या नावाने उल्लेख केलेला आहे. बनवासी गावातच सापडलेल्या एका शिलालेखाप्रमाणे, टॉलेमीच्या कालातच, “हरितिपुत्र सातकर्णी या महाराष्ट्रातील सातवाहन राजघराण्यातील एका राजाची सत्ता बनवासीवर होती.

हे पुरातन संदर्भ जरी महत्वाचे असले तरी बनवासी गाव हे कदंब राजांची राजधानी म्हणूनच मुख्यत्वे ओळखले जाते. पहिल्या कदंब राजघराण्याची बनवासीवर चवथ्या किंवा पाचव्या शतकापासून सत्ता होती. “त्रिलोचनहा या कदंब राजघराण्याचा पहिला राजा होता. महाराष्ट्रावर राज्य करणारा प्रसिद्ध चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने बनवासी ताब्यात घेण्याचा बराच प्रयत्न केला होता परंतु त्याला त्यात यश मिळाले नव्हते असे इ.. 647 मध्ये खोदून घेतलेल्या पुलकेशीच्या प्रसिद्ध शिलालेखावरून दिसते. या शिलालेखात पुलकेशी राजाच्या सेनेने बनवासी गावाला फक्त वेढा घातल्याची नोंद आहे. मात्र पुढील काळात चालुक्य राजांना बनवासीवर आपली सत्ता आणण्यात यश मिळाले होते. त्या काळात (.. 947-48) बनवासी मध्ये 12000 खेडेगावांचा समावेश होता. प्रसिद्ध अरब इतिहासकार अलबिरूनी हा इ.. 1020 मध्ये बनवासीचा बनवासया नावाने त्याच्या पुस्तकात उल्लेख करतो. अकराव्या ते चवदाव्या शतकात, बनवासीवर पुन्हा एकदा कदंब राजघराण्याची सत्ता प्रस्थापित झाली होती. या नंतर बनवासीवर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती व त्यानंतर ते विजयनगर राज्यात सामील झाले. विजयनगरच्या र्‍हासानंतर जवळच्याच सोंदे गावातील राजांनी बनवासी ताब्यात घेतले. अरसाप्पा आणि रघू नाईक हे या सोंदे राजघराण्यातील पहिले दोन राजे होते. या सोंदे राजांचा उल्लेख मी मागच्या भागात सहस्त्रलिंग या स्थानाच्या संदर्भात केलेला आहे. इतिहासात एवढ्या ठिकाणी नामनिर्देश असला तरी या सर्व इतिहासाच्या कोणत्याच पाऊलखुणा दुर्दैवाने बनवासी गावात सापडत नाहीत. या सर्व इतिहासाचे एकुलते एक साक्षीदार असलेले प्रसिद्ध मधुकेश्वर शिव मंदिर, फक्त आज बनवासी गावामध्ये अस्तित्वात आहे व ते बघण्यासाठी मी आता निघालो आहे. गावातील मुख्य रस्ता जरी अगदी अरूंद व चिंचोळा असला तरी मधुकेश्वर मंदिराच्या बाहेर मात्र भरपूर मोकळी जागा ठेवलेली आहे. त्यामुळे वाहने ठेवण्यास कोणतीच अडचण येत नाही. मी गाडीतून बाहेर उतरतो. मंदिराच्या उजव्या हाताला एका मोठ्या शेडमधे एक भव्य लाकडी रथ मला ठेवलेला दिसतो. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीच्या दिवशी या रथातून मधुकेश्वराची भव्य रथ यात्रा काढली जाते.

प्रवेशद्वाराजवळील गजशिल्प

संध्याकाळच्या सोनेरी उन्हात झळाळणारा ओसरीवरचा दगडी स्तंभ

गरूड स्तंभ

गरूड स्तंभावरील बास रिलीफ

देवळाचा परिसर एका 12 ते 15 फूट उंचीच्या भरभक्कम भिंतीने सुरक्षित केलेला आहे. देवळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोठी गजशिल्पे आहेत. या गजशिल्पांमागे एक ओसरी आहे. ओसरीचा तळ अंदाजे 4 फूट तरी ऊंचीवर आहे व तळाच्या बाजूच्या भिंतीमधे बसवलेल्या दगडांच्यावर कोरीव काम केलेले दिसते आहे. ओसरीवर असलेल्या छताला आधार देण्यासाठी दीड ते दोन फूट व्यासाचे दगडी खांब आहेत. या खांबांच्यावरही कोरीव नक्षीकाम केलेले आहे. मुख्य प्रवेशद्वार अर्थातच पूर्वाभिमुख असल्याने ओसरीवरील या दगडी खांबावर, प्रवेशद्वारामधून येणारे संध्याकाळच्या सूर्याचे किरण, थेट पडताना मला दिसतात. घोटून गुळगुळीत केलेला हा खांब सुवर्णकांती असावी तसा झळकताना दिसतो आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून मी आत शिरतो. समोरच एक ऊंच स्तंभ दिसतो आहे. अर्थात हा गरूड स्तंभ आहे व याच्या तळावर कोरलेल्या बास रिलिफ शिल्पांमधे एक गरूडाचेही शिल्प आहे. या गरूड स्तंभाच्या बरोबर पुढे मंदिराचे 3 कक्ष व सर्वात शेवटी गाभारा हे एका पाठोपाठ एक असे बांधलेले आहेत. या सगळ्या कक्षांची बांधणी बाहेरच्या ओसरी प्रमाणेच उंचावलेला तळ, त्यावर उभारलेले दगडी गोल खांब व त्यावर छत या पद्धतीचीच आहे. अगदी अखेरीस असलेल्या गाभार्‍यात असलेले शिव लिंग, मधाचा रंग असलेल्या पाषाणापासून बनवलेले आहे. कन्नड देशातील हेमाडपंत, श्री जखनाचार्य हे या मंदिराचे बांधणीकार होते असे समजले जाते. शिवलिंग मधाच्या रंगाच्या पाषाणाचे असल्याने या मंदिराला मधुकेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते.

मधुकेश्वर मंदिर ; डाव्या बाजूचे छोटे मंदिर मधुमतीचे

बाजूने दिसणारा मंदिराचा देखावा; एका पाठोपाठ एक असणारे 3 कक्ष

काळ्या कातळापासून बनवलेली नंदीची मूर्ती

गरूड स्तंभाजवळ असलेल्या पहिल्या मंदिर कक्षात काळ्या कातळापासून बनवलेली 7 फूट उंचीची नंदीची मोठी सुंदर मूर्ती आहे. या नंदीचे डोळे तर फारच अप्रतिम आहेत. मधल्या कक्षात किंवा मंडपामध्ये, मध्यभागी एक गोल चबुतरा बांधलेला आहे. या चबुतर्‍यावर नर्तकी देवासमोर नृत्य सादर करत असत. या चबुतर्‍याच्या चारी बाजूंना असलेल्या गोल दगडी खांबांच्या साधारण मध्यावर अंतर्गोल व बहिर्गोल असे अत्यंत गुळगुळीत पृष्ठभागाचे गोलावे दिलेले असल्याने, मध्यभागी नृत्य करणार्‍या नर्तकीची अनेक प्रतिबिंबे चारी दिशांकडील खांबावर दिसत असत व हा सर्वच देखावा मोठा अद्भुतरम्य व देखणा दिसत असला पाहिजे यात शंका नाही.

त्रैलोक्य मंडप

पाताळ लोक दर्शविणारे 5 फण्य़ाच्या नागाचे शिल्प

स्वर्ग लोक दर्शविणारे शिव-पार्वती शिल्प ; त्रैलोक्य मंडप

त्रैलोक्य मंडपावरील बास रिलीफ

गाभार्‍याच्या सर्वात जवळ असलेल्या किंवा तिसर्‍या मंडपात एक मोठा दगडी देव्हारा, गाभारा प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला ठेवलेला आहे. या देव्हार्‍याला त्रैलोक्य मंडप असे नाव आहे. या मखराच्या तळाच्या बाजूस असलेला 5 फण्यांचा नाग, पाताळ लोक दर्शवतो मधला भाग अर्थातच पृथ्वी आहे व छत हे स्वर्गलोक दर्शवित असल्याने यावर नंदीवर आरूढ झालेल्या शिवपार्वतीची मूर्ती कोरलेली आहे.

मंदिराची सुबक बांधणी

मंदिराच्या कळसावरील कोरीव काम

मधुकेश्वर गाभार्‍याच्या डाव्या अंगाला, मधुमती किंवा पार्वतीचे एक लहान मंदिर आहे. बाहेरच्या कक्षात ठेवलेल्या नंदी मूर्तीची रचना अशी साधली आहे की या नंदीचा एक डोळा मधुकेश्वराच्या गाभार्‍यातून दिसतो तर दुसरा डोळा मधुमती मंदिराच्या गाभार्‍यातून दिसतो. मंदिरांच्या कक्षात उभे असलेले खांब असे उभारलेले आहेत की त्यांच्यामधून हा डोळा बरोबर दिसू शकतो. नंदीचे आपला मालक व मालकीण या दोघांच्या आज्ञेकडे अगदी बारीक लक्ष आहे हेच बहुदा मंदिर रचनाकारांना सुचवायचे असावे. मंदिराच्या बाह्य भिंतीच्या आतील बाजूस, भिंतीला लागूनच, अनेक कक्ष व मंदिरे बांधलेली आहेत. यात नृसिंह, कदंबेश्वर व गणपती यांची मंदिरे आहेत. गणपतीची मूर्ती अर्धी कापलेली आहे. मूर्तीचा उरलेला अर्धा भाग काशीमध्ये आहे असे मानले जाते. या शिवाय एका मंदिरात 5 फण्यांचा नाग कोरलेली एक पाषाण पाटी आहे. या पाटीवर बाजूंना ही पाटी हरितिपुत्र शातकर्णी याने मंदिराला दान दिली असल्याचा उल्लेख आहे. ही पाटी पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात मंदिराला दिली गेली असावी. बाह्य भिंतीजवळच्या एका खोलीत, अतिशय सुंदर रित्या घडवलेला एक पाषाण मंचक ठेवलेला आहे. या मंचकाच्या चारी कडांना पोस्टर पद्धतीचे नक्षीकाम केलेले उभे खांब आहेत. हा मंचक सोंदे घराण्याचा राजा, रघू नाईक याने मंदिराला भेट दिलेला आहे व तो फेब्रुवारी मधे होणार्‍या रथयात्रेमध्ये वापरला जातो. बनवासी मंदिरात असलेल्या 11 कन्नड भाषेतील शिलालेखांमुळे हे मंदिर व त्यातील शिलालेख हे इतिहासाच्या व प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी एक अमूल्य खजिना आहे यात मला तरी शंका वाटत नाही.

मंचकाच्या पोस्टरवरील अप्रतिम घडण काम

विष्णू मूर्ती

प्रवेश द्वारावरील कोरीव काम

एक बास रिलिफ पॅनेल

थोड्याशा जड अंत:करणानेच मी मधुकेश्वर मंदिरातून बाहेर पडतो आहे. हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीच्या 2250 वर्षाच्या इतिहासाचे एक द्योतक आहे आणि तरीही या मंदिराची देखभाल पाहिजे तेवढ्या उत्कृष्ट रितीने होत नाहीये. मंदिराच्या अगदी समोरच ताजे अननस कापून मिळण्याची व्यवस्था आहे. मी काही तुकडे खाऊन बघतो. अननसाची आंबट गोड चव इतकी मस्त आहे की परत एकदा आणखी थोडे तुकडे तोंडात टाकण्याचा मोह मला आवरत नाही. परतीचा प्रवास अगदी आरामात होतो. दिवसभराच्या भ्रमंतीने मी आता चांगलाच दमलो आहे. लवकर जेवण करून मी अंथरूणावर अंग टाकतो. डोळे कधी मिटतात ते कळतही नाही.

(क्रमश🙂

संदर्भ 1 – Bombay Gazetteer Vol XV Part I

12 नोव्हेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “दक्षिण सह्याद्रीमधील भटकंती- भाग 3

  1. chan sir bhartiya sanskritucha itka juna ek anmol theva apan wachakasthi uplabdha karun dila

    Posted by anil | नोव्हेंबर 14, 2011, 11:38 सकाळी
  2. मस्त आलेत फोटो…

    Posted by bolMJ | नोव्हेंबर 14, 2011, 6:44 pm
  3. फारच सुंदर चित्र! आवडली! ग्रेट भटकंती, मानले तुम्हाला… 🙂

    Posted by katyare | नोव्हेंबर 29, 2011, 9:45 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: