.
Travel-पर्यटन

दक्षिण सह्याद्री मधील भटकंती- भाग 2


घनदाट जंगलाच्या मध्ये पहाट लवकर उगवतच नाही. सभोवताली असलेली गर्द झाडी सकाळच्या सूर्याचे सोनेरी कोवळे किरण मुळी पूर्णपणे अडवूनच टाकते. रात्री मस्त झोप काढल्यावर माझे डोळे सकाळी उघडतात तेंव्हा आजूबाजूला अजून काळोखच दिसतो आहे. तरी सुद्धा अनेक स्वरातली चिवचिव, कुहकुहु, घुमणे माझ्या कानावर पडते आहे. इतक्या पहाटे व इतक्या विविध स्वरांतील पक्षांचे गायन ऐकण्याचा माझा हा बहुतेक पहिलाच प्रसंग असावा. मी उठून खिडकीजवळ जातो. बाहेर अजून अंधाराचेच साम्राज्य आहे. मात्र वर बघितल्यावर पूर्व दिशेकडच्या आकाशाला थोडी निळाई आल्यासारखी भासते आहे. मी परत एकदा अंथरूणावर आडवे पडण्याचा विचार करतो पण तेवढ्यात आज आपल्याला एका मोठ्या रोचक स्थानाला भेट देण्यासाठी जायचे आहे हे माझ्या लक्षात येते व मी दिनक्रम सुरू करण्याच्या मागे लागतो.

या भागातील स्थानिक खाद्यपदार्थ म्हणजे उप्पीट, लुसलुशीत इडल्या व त्यांच्या बरोबरीने ब्रेड, ऑमलेट असा साग्रसंगीत ब्रेकफास्ट उरकून मी आजच्या भ्रमंतीच्या कार्यक्रमाला सुरवात करतो. सकाळची हवा आल्हादकारक वाटते आहे खरी! पण थंडी जरा जास्त प्रमाणात असती तर मला अधिक रुचले असते हे नक्की! आम्ही परत एकदा सिरसीयेल्लापूर रस्त्याला लागलो आहोत. आज हा रस्ता मला अधिकच अरूंद व जास्त खड्यांनी भरलेला असा का कोण जाणे? वाटतो आहे. सिरसी हे एक मध्यम आकाराचे गाव असले तरी येथे हॉस्पिटल्स सारख्या सर्व आधुनिक सुविधा मात्र उपलब्ध आहेत. गावामधे एक स्टेडियम सुद्धा दिसते आहे. सिरसी पासून पश्चिमी समुद्र किनार्‍यावरचे कुमटा हे गाव, यांना जोडणार्‍या 69 क्रमांकाच्या महामार्गावरून आता आम्ही पुढे निघालो आहोत. सिरसी पासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर एक फाटा लागतो. या फाट्यापुढचा रस्ता अगदी लहान (एका वेळी एकच गाडी जाऊ शकेल एवढा) आहे. या रस्त्याच्या काही भागावर अतिशय गर्द झाडी असलेली जंगले आहेत व त्यातूनच पुढे जावे लागते. या रस्त्यावरच्या खाच खड्यांतून अंदाजे 10 किलोमीटर तरी प्रवास केल्यावर आमची गाडी थांबते. पुढे गाडी जाऊ शकेल असा रस्ता अस्तित्वात नाही. या पुढची वाटचाल पायी करणे आवश्यक आहे. मी खाली उतरतो व समोर बघतो. समोर अतिशय उतार असलेला एक कच्चा रस्ता दिसतो आहे. काल रात्री बहुदा या भागात जोरदार पाऊस पडलेला असावा कारण समोरचा रस्ता भिजलेला व त्यामुळे घसरडा झालेला दिसतो आहे. आजूबाजूला असलेल्या गर्द झाडीमुळे पावसाचा ओलावा अजून तसाच टिकून राहिलेला आहे व त्यामुळे हवा अतिशय दमट व चिकचिक करणारी आहे. बरीच काळजी घेत, पावलांकडे बघत, मी त्या उतारावरून खाली उतरतो आहे. काही अंतर गेल्यावर हा कच्चा रस्ता डावीकडे वळतो आहे. रस्त्याच्या त्या कोपर्‍यावर थोडी कोरडी जागा मला दिसते. मी तिथे काही क्षण थांबण्याचे ठरवून उभा राहतो व मान वर उचलून समोर पाहतो.

मोहिनी शिखर

समोर दिसणारे दृष्य मोठे आश्चर्यचकित करणारे आहे यात शंकाच नाही. समोर दिसत असलेल्या गर्द हिरव्या झाडा झुडपांच्या मागे अगदी काळ्याभोर रंगाचा एक भला थोरला पाषाण पर्वत उभा आहे. या पर्वताला अनेक अणकुचीदार शिखरे आहेत. त्या शिखरांच्या मधे मधे तितक्याच टोकदार घळ्या दिसत आहेत. यातील काही घळ्या किंवा दर्‍या तर इतक्या खोल आहेत की त्यांचे तळ माझ्या नजरेच्याही खाली व समोरच्या झुडपांच्या मागे लपले आहेत. ही शिखरे व घळ्या, लाखो वर्षे पाऊस व हवेतील बदल सहन करत आलेले असल्याने, अतिशय खडबडीत झालेल्या आहेत तर त्यांच्या कडा अगदी धारदार वाटत आहेत. या प्रकारचे पाषाण पर्वत मी फक्त सायन्स फिक्शनच्या पुस्तकांतून, कोण्या चित्रकाराच्या कल्पना शक्तीतून एखाद्या परग्रहावरचे म्हणून चित्रित केलेले, फक्त चित्रात पाहलेले आहेत. अवनीतलावर असे पाषाण पर्वत अस्तित्वात असू शकतात हे मला आज प्रथमच दिसते आहे. या पाषाण पर्वताचा काळा रंग सोडला तर बाकी रूप एखाद्या दुसर्‍या परग्रहावरचे नक्‍कीच वाटते आहे. या पाषाण पर्वताला स्थानिकांनी मोहिनी शिखर असे नाव दिलेले आहे.

मोहिनी शिखराचा आणखी एक देखावा

मी पुढे चालत रहातो. वळल्यानंतर काही मीटर अंतरावर रस्ता एकदम सपाट होतो आणि या सपाट रस्त्याच्या अखेरीस या मोहिनी शिखराचे एक मोठ्या आकारातील रूपांतर उभे आहे. या पाषाण पर्वताला भैरव शिखर असे नाव आहे. भैरव शिखर जमिनीपासून 120 मीटर उंच आहे तर मोहिनी शिखर 90 मीटर उंच आहे. झाडांच्या शेंड्यांमागे खडे असलेले हे भैरव शिखर एखाद्या किल्ल्याच्या बुरुजांसारखे दिसते. इथे असलेल्या वस्तीला यान किंवा याना असे नाव असल्याने या पाषाण पर्वतांना यान पर्वत असे नाव मिळाले आहे.

नेत्रदीपक यान पाषाण पर्वत

सह्याद्री पर्वतराजी ही साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी उद्रेक पावलेल्या एका ज्वालामुखीमधून बाहेर पडलेला लाव्हारसाचे घनीकरण झाल्याने तयार झालेली आहे. त्यामुळे सह्याद्रीतील बहुतांशी खडक हे बॅसॅल्ट प्रकारचे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यान मधील दोन्ही पाषाण पर्वत हे, स्फटिकावस्थेतील लाईमस्टोन या प्रकारच्या दगडाचे बनलेले आहेत. लाईमस्टोन दगड साधारण जलचर प्राण्यांचे नष्ट होणे किंवा पाण्यात विरघळलेल्या कॅल्शियम क्षारांचे स्फटिकीकरण या सारख्या कारणांनी तयार होतात. जगभरात अनेक ठिकाणी गुहांमध्ये ठिबकणार्‍या जलामुळे असे लाईमस्टोन पाषाण तयार झालेले दिसतात. परंतु जमिनीच्या वर तयार झालेले लाईमस्टोन दगडांचे हे पर्वत व ते सुद्धा काळ्या रंगाचे असणे हे एक नैसर्गिक आश्चर्यच म्हणावे लागेल.

यान पाषाण; आणखी एक देखावा

मी ज्या सपाट जमिनीवर उभा आहे ती जागा या पाषाण पर्वतापर्यंत जेथे पोहोचते तेथे एक नैसर्गिक गुहा निर्माण झाली आहे.या गुहेमधे शिवलिंग असलेले एक शिव मंदिर आहे. बरेच भाविक दर्शनासाठी येताना दिसत् आहेत.मी दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे रहाण्याच्या वगैरे फंदात न पडता, लांबूनच दर्शन घेतो व बाहेर येऊन भैरव शिखराचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. भैरव शिखराचे निरिक्षण करताना माझ्या असे लक्षात येते की या पाषाणाच्या डाव्या बाजूने एक रस्ता काढलेला आहे व वर जाण्यासाठी पायर्‍या काढलेल्या आहेत. चौकशी केल्यावर असे समजते की पाषाणाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी केलेला तो मार्ग आहे. प्रत्यक्षात माझ्या असे लक्षात येते की भैरव शिखर पाषाणाची दोन उभी शकले झालेली आहेत. या दोन शकलांच्यामध्ये असलेल्या घळीमधून एक अरूंद असलेला हा मार्ग आहे. मी प्रदक्षिणेला जाण्याचे ठरवतो.

प्रदक्षिणा मार्गाजवळील भिंतीवरच्या उभ्या घळी

प्रदक्षिणा मार्ग गुंफेचे छत

भैरव शिखर हे एक पवित्र स्थान समजले जात असल्याने त्याला प्रदक्षिणा घालताना पादत्राणे काढूनच ती घालावी लागते. प्रदक्षिणेचा मार्ग बराच खडबडीत आहे व त्यावर भरपूर प्रमाणात जळवांचे साम्राज्य आहे अशी धोक्याची सूचना मला मिळते. परंतु एवढ्या लांबून येथे आल्यावर आणि या पाषाणामधल्या घळीतून चक्कर मारण्याची संधी मिळत असता, ती दवडण्याचा वेडेपणा करणे मला शक्य होत नाही व मी पादत्राणे काढून ठेवतो व पायर्‍या चढून पाषाणापाशी पोचतो. पंधरावीस पायर्‍या चढल्यावर या घळीच्या तोंडाशी मी पोचतो. ही घळ म्हणजे एक गुहा असल्यासारखी आहे. भैरव शिखराच्या टोकापासून निदान निम्म्या उंचीपर्यंत तरी ही अरूंद घळ पोचलेली आहे व मी आता या घळीच्या तळावर उभा आहे. मी घळीमधे प्रवेश केल्यावर लक्षात येते की घळीतून संपूर्णपणे आकाश दिसत नाही. काही ठिकाणी घळीचा वरचा भाग पूर्ण उघडा आहे तर काही ठिकाणी या घळीच्या दोन्ही बाजूंचे खडक एकमेकाला टेकलेले असल्याने एक नैसर्गिक छप्पर तयार झालेले आहे. त्यामुळे याला घळ म्हणावे की गुहा या बद्दल मनात संदेह वाटतो आहे. काही ठिकाणी या नैसर्गिक छपरात मोठ्या फटी निर्माण झाल्या आहेत व त्यातून प्रखर अशा सूर्यप्रकाशाचे किरण आत प्रवेश करू शकत आहेत. परंतु छपरातील या फटी एवढ्या उंचीवर आहेत की गुहेतील वातावरण कुंद व वाशेळे राहते आहे. गुहेच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींना उभ्या घळी आहेत व त्याच्या बाजूंचे खडक धारदार आणि एखाद्या तलवारीच्या पात्यासारखे दिसत आहेत. या उभ्या घळींच्यात अनेक ठिकाणी तयार झालेल्या सपाट जागांच्यामुळेच मी ज्या मार्गाने जाऊ शकतो आहे तो मार्ग तयार झालेला आहे. वर असलेल्या अशाच सपाट जागांवर मधमाशांची पोळी लटकलेली दिसत आहेत. तांबूस करड्या रंगाची काही पाखरे माझ्या डोक्यावरून एकदम विचित्र चिवचिवाट करत गुहेच्या प्रवेशाकडे उडत जातात. मात्र ती वटवाघळे आहेत की कबुतरे हे सांगणे मला शक्य नाही. आणखी थोडी वळणे पुढे गेल्यावर मार्ग इतका अरूंद होतो आहे की जेमतेम एका माणसाला त्यातून जाणे शक्य व्हावे. पुढे मार्ग फारच अवघड झाल्यासारखा वाटतो आहे व मी 80% तरी प्रदक्षिणा पूर्ण केलेली असल्याने ती पूर्ण करण्याचा नाद सोडून देतो व आल्या मार्गाने परत फिरतो. तरी सुद्धा येताना एका ठिकाणी उभ्या दगडांवर उमललेली सुंदर पांढरी फुले माझे लक्ष वेधून घेतातच. भारतातल्या सर्व प्रेक्षणीय स्थळांप्रमाणेच यान पाषाणांना जोडलेली एक पौराणिक कथा आहेच. या शिखरांपैकी लहान शिखराला मोहिनी शिखर हे नाव देण्यामागे पौराणिक कथाच असणार, नाहीतर वेड्यावाकड्य़ा स्वरूपातला, अणकुचीदार टोके असलेला हा पाषाण, काही मोजके भूगर्भशास्त्रज्ञ व रॉक क्लाइंबर्स वगळले तर बाकी कोणाला मोहित करू शकणार आहे? परंतु मी माझे विचार माझ्याजवळच ठेवतो व रिसॉर्टवर दुपारच्या भोजनासाठी परत जाण्यासाठी म्हणून आमच्या गाडीकडे वळतो.

प्रदक्षिणा मार्ग गुंफेचे छत; आणखी एक देखावा

प्रदक्षिणा मार्गातील अरूंद घळ

भोजन झाल्यानंतर आणखी अशीच एक आश्चर्यजनक जागा बघण्यासाठी मी निघालो आहे. मात्र ही जागा निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे. परत एकदा आम्ही सिरसीयेल्लापूर रस्ता पकडला आहे. सिरसीपासून साधारण 17 किलोमीटर अंतरावर एक छोटेखानी रस्ता हुळगोळ गावाकडे जातो. त्या रस्त्याने आम्ही पुढे निघालो आहोत. साधारण 2 किलोमीटर अंतरावर समोर एक सुबक असा वाहनतळ दिसतो आहे. वाहनतळाच्या सर्व बाजूंनी गर्द झाडी आहे व बाजूला एक थंड पेये व खाद्य पदार्थ विकणारे एक दुकानही दिसते आहे. या सर्व स्वरूपावरून हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे हे उघड आहे. आमची गाडी तिथे थांबते व मी खाली उतरतो. समोरच एके ठिकाणी कडेच्या गर्द झाडीतून समोर जाण्यासाठी पायर्‍या दिसत आहेत. तेथे जाऊन बघितल्यावर या पायर्‍या एका मोठ्या उतारावरून खाली जाण्यासाठी बनवल्या आहेत हे लक्षात येते. पायर्‍या उतरायला सुरूवात केल्यावर आपण एका नदीकाठावर आहोत व नदी पात्राकडे जाण्यासाठी खाली उतरतो आहोत हे लक्षात येते. बर्‍याच पायर्‍या उतरल्यावर मी नदी पात्रापर्यंत पोचतो. पात्रात तसे फारसे पाणी दिसत नाही आणि संपूर्ण पात्राचा परिसर निरनिराळ्या उघड्यानागड्या खडकांनी व पाषाणांनी खचाखच भरलेला दिसतो आहे.

पात्रात कोरलेली शिवलिंगे

मात्र प्रथम नुसत्या डोळ्यांनी लक्षपूर्वक व नंतर बायनॉक्यूलर्स मधून बघितल्यावर एक आश्चर्यजनक बारकावा लक्षात येतो आहे. समोर दिसणार्‍या जवळ जवळ प्रत्येक खडकावर शिवलिंगे व त्याच्या समोरचे नंदी कोरून काढलेले आहेत. या शिवलिंगामुळेच शाल्मला नदीच्या पात्रातील या स्थानाला सहस्त्रलिंगम असे नाव पडले आहे. ही नदी धारवाड शहराजवळ उगम पावते व पश्चिमेकडे वहात जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही जागा मोठी प्रेक्षणीय आहे यात शंकाच नाही. मात्र हा कोरीवकामाचा उद्योग कोणी व कशासाठी केला आहे याची काहीच नक्की माहिती मिळत नाही.

नदी पात्रातील कोरलेले नंदी

सहस्त्रलिंग या ठिकाणाच्या जवळ सोंदे या नावाचे एक गाव आहे. हे सोंदे गाव एका प्राचीन राज्याची राजधानी होते. या गावाजवळ असलेल्या एका किल्याचे भग्नावशेष एवढीच काय ती या प्राचीन राज्याची खूण आता उरली आहे. या सोंदे राज्याच्या एका राजाने, गोकर्ण महाबळेश्वर येथील एक धर्मगुरूंना आपल्या राज्यात येऊन राहण्याचे निमंत्रण दिले होते. काशी मधील आद्य शंकराचार्य यांनी विश्वानंद सरस्वती या पंडितांना गोकर्ण महाबळेश्वर येथील हाविग ब्राम्हणांचे गुरू म्हणून नियुक्त केले होते. प्रस्तुत धर्मगुरू या विश्वानंद सरस्वतींचे 29वे वारसदार समजले जात. सोंदे येथील राजाने या धर्मगुरूंसाठी एक मठ शाल्मला नदीकाठी बांधून दिला होता व मोठी जमीन मठाच्या खर्चासाठी इनाम करून दिली होती. हे 29वे वारसदार धर्मगुरू व त्यांचे पुढचे 4 वारसदार यांनी या मठात शांततेने कालक्रमण केले होते. त्या काळापासूनच शाल्मला नदी पात्रातील ही जागा तेथे असलेल्या खडकांच्या विशिष्ट आकारांमुळे सहस्त्रलिंग या नावाने ओळखली जात होती. या मठातील मंडळींनी कारागिरांना बोलावून पात्रातील खडकांवर शिवलिंगे व नंदी कोरले असावेत अशी शक्यता वाटते.

हा सर्व इतिहास खरा की खोटा हे जाणून घेण्याचे कोणतेही साधन आपल्याजवळ नाही. मात्र ही जागा अतिशय नयनरम्य आहे यात शंका नाही. या सहस्त्रलिंग स्थानापासून थोडे पुढे एक झुलता पूल शाल्मला नदीवर बांधलेला आहे. तेथून नदीपात्राचा मोठा छान देखावा दिसतो आहे.

शाल्मला नदीवरचा झुलता पूल

एवढे सगळे भमण एकाच दिवसात झाल्याने मला थोडी थकावट आल्यासारखी जरूर वाटते आहे. मी थोडा चहा घेण्याचे ठरवतो. चहा अर्थातच स्ट्रॉग, गोड मिट्ट आणि भारतीय परंपरेप्रमाणे अगदी दुधाळ आहे. या गरम हवेत सुद्धा हा चहा प्यायल्यावर माझ्या अंगात परत तरतरी येते व मी आजच्या ठरलेल्या बेताप्रमाणे पुढच्या ठिकाणाला जायला निघतो.

(क्रमश🙂

8 नोव्हेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “दक्षिण सह्याद्री मधील भटकंती- भाग 2

  1. sunder warnan, antishay nayan ramya dekhawa wachkasathi uplabdha karun dila ahe, ase khadak ani shivling bhartat ahe yawar sahasa koni vishwas thevnar nahi, good work keep it up sir

    Posted by anil | नोव्हेंबर 9, 2011, 11:45 सकाळी
  2. fascinating must make trip to the place.

    Posted by Ashok Patwardhan | नोव्हेंबर 9, 2011, 2:24 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: