.
Travel-पर्यटन

दक्षिण सह्याद्री मधील भटकंती – भाग 1


भारतीय उपखंडात असणार्‍या पर्वत मालिकांमध्ये, सह्याद्री पर्वतराजी ही एक प्रमुख मानली जाते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून सरासरी साठ ते सत्तर किलोमीटर (काही झाले तरी शंभर किलोमीटर अंतराच्या आतच) अंतरावर असलेली ही पर्वत राजी उत्तरदक्षिण दिशांना अंदाजे 1600 किलोमीटर लांबवर पसरलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक पासून सुरूवात करून भारतीय उपखंडाच्या पार दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी पर्यंतचा भाग या पर्वतराजीने व्यापलेला आहे. या पर्वतराजीच्या घाटमाथ्यावर आणि दोन्ही बाजूंच्या उतारांवर अतिशय घनदाट अशी विषुववृत्तीय पावसाळी जंगले (tropical rain forests) पसरलेली आहेत. काही ठिकाणी तर ही जंगले पार समुद्र किनार्‍यापर्यंत पोचलेली आढळतात.गोवा व केरळ या दोन ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागा वगळल्या तर ही पर्वत राजी अगदी सलग रित्या उत्तर दक्षिण पसरलेली आहे.

सह्याद्री पर्वतराजीच्या दक्षिण भागातील जंगलांकडे जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. यापैकी पहिला रस्ता, जो नकाशावर पाहिले असता अगदी थेट, जवळचा आणि सुलभ वाटतो तो म्हणजे पनवेल मार्गे असलेला मुंबईगोवा महामार्ग! गोव्याच्या पुढे हाच रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 म्हणून ओळखला जातो. या मार्गाने सरळ अंकोला या गावापर्यंत गेल्यावर, डावीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 आपल्याला डाव्या बाजूला दिसतो. या महामार्गावर वळून थेट येल्लापूर गावापर्यंत जायचे. हे येल्लापूर गाव या जंगल विभागाच्या केंद्रस्थानी आहे असे म्हटले तरी चालेल. प्रत्यक्षात मात्र हा रस्ता म्हणजे एक वैताग वाडी आहे. रस्त्याची देखभाल योग्य होत नाही. या रस्त्याला महामार्ग नाव असले तरी बहुतेक ठिकाणी तो जेमतेम दोन गाड्या जाऊ शकतील एवढाच रूंद आहे व या रस्त्यावरून मालवाहतुक प्रचंड प्रमाणात चालत असल्याने या रस्त्याचा पर्याय नाकारणे हाच शहाणपणा ठरतो.

येल्लापूर पर्यंत पोचायला दुसरा मार्ग मात्र थोडा लांबचा असला तरी उत्तम आहे. मुंबईपुणे एक्स्प्रेसवे वरून पुण्याला यायचे. मग अतिशय सुस्थितीत असलेला चौपदरी पुणेबंगळुरू महामार्ग ( क्रमांक 4) पकडायचा. या रस्त्यावरून हुबळीला डावीकडे राष्ट्रीय महामार्ग 63 लागतो. त्यावरून येल्लापूर गाठायचे. रस्त्याचा हा दुसरा पर्याय मात्र कमीतकमी त्रासदायक आहे यात शंकाच नाही.

याच रस्त्यावरून मी आता हुबळीवरून येल्लापूरकडे चाललो आहे. हुबळी शहराच्या जवळपास असलेली शहरी वाहतुक, नियंत्रक दिवे आणि गर्दी ही सर्व आता मागे पडत चालली आहे. रस्ता प्रथम ग्रामीण भागातील सुपीक अशा शेत जमिनींच्या मधून जाताना दिसतो आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतांत कापणीला आलेली ज्वारीची व इतर उभी पिके दिसत आहेत. मात्र आणखी दहा पंधरा किलोमीटर पुढे गेल्यावर हे चित्र बदलू लागले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेत जमिनी अजूनही दिसत आहेत व त्यात उभी पिकेही आहेत. मात्र आता मला सगळीकडे फक्त भात शेती दिसू लागली आहे. काही ठिकाणी भाताची रोपे अजुनही लुसलुशीत हिरवी दिसत आहेत तर काही ठिकाणी ती कापणीला योग्य झालेली अशी सोनेरी पिवळी दिसत आहेत. येल्लापूरच्या मी जसजसा जवळ जातो आहे तसतशी ही भाताची शेते आता सलग न दिसता मधून मधूनच दिसत आहेत. या शेत जमिनींच्या मधे मधे, सुंदर दिसणारे निळ्याशार रंगाचे जलाशय आता नजरेसमोर येत आहेत तर मधून मधून ऊंचऊंच झाडांचे घोळकेही नजरेसमोरून जात आहेत.

हिरवी पिवळी भात शेती.

हळूहळू या बाकीच्या सर्व गोष्टी कोठे अदृष्यच होत आहेत व चहूबाजूंचा ताबा आता फक्त ऊंचऊंच व सरळसोट झाडांनी तेवढा घेतलेला दिसतो आहे. रस्त्याच्या आजूबाजूला आता बघण्यासारखे काही उरलेलेच नाही. दिसत आहेत ती फक्त ऊंचऊंच झाडे. मोठ्या पानांची, छोट्या पानांची, पांढरट पानांची किंवा काळसर हिरव्या रंगाच्या पानांची! मी आता एका घनदाट व विषुववृत्तीय पावसाळी जंगलामध्ये पोचलो आहे. झाडांच्या बुंध्यांजवळ, नानाविध प्रकारची झुडपे व गवत विपुल प्रमाणात उगवलेले दिसते आहे. या हिरव्यात मधूनच डोळ्यांना खुपणारे वाळक्या झाडांचे बुंधे आडवे पडलेले दिसत आहेत. हे बुंधे व ओंडके, शेवाळी आणि अनेक प्रकारच्या वेली यांनी संपूर्णपणे आच्छादून गेलेले आहेत.

दक्षिण सह्याद्री वरची घनदाट जंगले

मी आता येल्लापूर गावाला पोचलो आहे. भारतातील सर्व साधारण खेडेगावे दिसतात तसेच काहीसे हे गाव दिसते आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या व त्यातल्या त्यात बर्‍या दिसणार्‍या एका हॉटेलात मी चहाची ऑर्डर देतो. हॉटेल मात्र झकपक आहे. मालक चेहर्‍यावरून चांगला सुशिक्षित वाटतो आहे. कर्नाटकच्या या भागातील लोक मात्र एकूण दिसायला सुस्वरूप वाटतात हे खरे! मी हॉटेलच्या मालकाशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करून बघतो. परंतु हॉटेलच्या मालकाला माझ्याशी बोलण्यात काहीच रस नाहीये हे जाणवल्याने माझा प्रयत्न सोडून मी चहा शांतपणे पिऊन टाकतो व माझ्या मार्गाला लागतो. येल्लापूर गावाच्या पुढे असलेल्या एका फाट्यावर, शिरसी गावाकडे जाणार्‍या रस्त्याला मी आता लागलो आहे. हा रस्ता खूपच अरूंद व खड्यांनी भरलेला आहे. मात्र दोन्ही बाजूंना असलेली घनदाट झाडी मात्र तशीच आहे.

या रस्त्यावर पुढे असलेल्या एका जंगल रिसॉर्ट मधे राहण्यासाठी मी आरक्षण करून ठेवले आहे. थोडे अंतर पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक अगदी अरूंद, लाल मातीने माखलेला रस्ता मला दिसतो आहे. हा रस्ता अर्थातच मातीचा आहे व दोन्ही बाजूंनी वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांच्या फांद्यांनी पुढे जाता येईल की नाही या बाबत मनात संदेह निर्माण होतो आहे. मात्र आमची गाडी पुढे जाते व जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका पटांगणाजवळ येऊन थांबते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जंगलाच्या मध्यभागी असलेल्या या पटांगणात शंभराच्या वर तरी नारळाची व सुपारीची झाडे मला दिसत आहेत. समोर दोन रांगांच्या मध्ये कौलारू व टुमदार दिसणारी निवास स्थाने बांधलेली आहेत. एका बाजूला एक मोठी इमारत दिसते आहे. त्या इमारतीत बहुदा भोजन गृह असावे असे मला वाटते. या रिसॉर्टच्या दाव्याप्रमाणे वीज पुरवठा, गरम पाणी व केबल टीव्ही सारख्या सर्व आधुनिक सुखसोयी या रिसॉर्टमध्ये उपलब्ध आहेत.

पुढच्या दोन तीन तासातच माझ्या हे लक्षात येते आहे की या सर्व सुखसोयी शिरसी गावाकडून येणार्‍या काही विद्युत तारांच्या सुस्थितीवर अवलंबून असल्याने निसर्गाने जरा जरी प्रतिकूलता दर्शवली तरी त्या क्षणार्धात अदृष्य होऊ शकतात. गंमतीची गोष्ट म्हणजे सुखसोयींच्या उपलब्धतेच्या या अनिश्चिततेचा, माझ्यावर काहीच परिणाम होत नाहीये. त्याचे कारण माझ्या लक्षात येते आहे. या ठिकाणी इतके शांत व आरामदायी वातावरण आहे की वीज प्रवाह चालू आहे किंवा नाही याचा कोणावर फारसा फरकच पडत नाहीये. या आधुनिक सुखसोयी प्रत्यक्षात किती शुल्लक व किरकोळ महत्वाच्या आहेत हे येथे आल्यावर माझ्या मनाला पटते आहे.

दुपारचे जेवण जरा उशीरानेच मिळाले असले तरी या रिसॉर्ट मध्ये जी एक अद्भुत शांतता आहे त्यामुळे नंतर माझे डोळे कधी मिटतात ते मला कळतच नाहीये. कंटाळवाण्या लांबच्या प्रवासानंतर शरीराला आलेला शीण जाऊन पूर्णपणे ताजेतवाने झाल्यावरच मला जाग येते आहे. घड्याळात पाहिले तर 4 वाजून गेले आहेत. आजूबाजूला असलेल्या ऊंचऊंच वृक्षांनी, आसमंतात आपल्या काळसर छाया पसरायला सुरूवात केलेली असल्याने, सूर्यास्त अजून काही तासांवर असला तरी, एक प्रकारची काळोखी आतापासूनच जाणवू लागली आहे. गरमागरम चहाचा एक कप प्यायल्यानंतर आता संध्याकाळी जवळच असलेला एक तिबेटी बौध्द मठ बघायला जायचा बेत ठरतो आहे. कर्नाटक मध्ये दोन अतिशय मोठे असे तिबेटी बौद्ध मठ आहेत. त्यातला एक कूर्ग जिल्ह्यातील कुशल नगर येथे तर दुसरा जवळच्याच मुंडगोड गावाजवळ आहे. कुशल नगरच्या मठाला मी साधारण दीड वर्षापूर्वीच भेट दिली आहे व काही महिन्यापूर्वीच लडाखमधील अनेक बौद्ध मठांना भेट दिली असल्याने मला खरे म्हणजे आणखी एका या बौद्ध मठाला भेट देण्यात तितकेसे स्वारस्य नाही. परंतु कॅम्पवर बसून तरी काय करणार? या विचाराने मी बाहेर जायला तयार होतो आहे.

चीनने 1955 मध्ये तिबेटचा भाग गिळंकृत केल्यानंतर, चिनी कम्युनिस्ट राजवटीच्या तावडीत सापडू नये म्हणून दलाई लामांसह अनेक तिबेटी नागरिक भारतात आश्रयासाठी आले. त्यापैकी काही तिबेटी निर्वासितांचे पुनर्वसन, कर्नाटकमध्ये दोन ठिकाणी करण्यात आले होते. यासाठी त्यांना जागा वगैरे मोफत देण्यात आली होती. मुंडगोड गावाजवळ पुनर्वसन झालेल्या तिबेटी बौद्धपंथीयांनी तेथेच Gaden Jangtse Thoesam Norling Monastery” या नावाचा हा बौद्ध मठ उभारलेला आहे.

मुंडगोड मठाची भव्य इमारत

मठाची इमारत अतिशय भव्य आहे. एका बाजूला असलेला गोल आकाराचा जिना चढून मी मुख्य प्रार्थना कक्ष किंवा दुखांग मध्ये प्रवेश करतो. या विशाल कक्षाच्या एका टोकाला एक स्टेज बांधलेले आहे. या स्टेजच्या मागच्या बाजूस असलेल्या भिंतीलगत एका काचेच्या शो केसमध्ये बौद्ध धर्मियांना आदरणीय असलेल्या भव्य अशा मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या पैकी मैत्रेय बुद्ध व तारा यांच्या मूर्ती मी लगेच ओळखू शकतो आहे. या शिवाय चारी दिशांचे संरक्षण करणार्‍या दिक्‍पालांची भव्य चित्रे असणारे बॅनर्स या मूर्तींच्या मधल्या भागात व बाजूच्या भिंतींच्यावर टांगलेले दिसत आहेत. कक्षाला भेट देऊन परत असताना अतिशय संथ सूरातला पण मोठा आवाज असलेला घंटानाद माझ्या कानावर पडतो. त्या सुरांबरोबर लाल व केशरी रंगाचे अंगरखे परिधान केलेल्या अनेक भिख्खूंची त्या कक्षात प्रवेश करण्यासाठी मोठी धावपळ उडताना दिसते आहे. या प्रार्थना कक्षाच्या लांबीला समांतर ओळींत हे बौद्ध भिख्खू आसनस्थ होताना दिसत आहेत. मोठ्या गंभीर सुरातील पण नादरम्य अशी त्यांची प्रार्थना सुरू होत असतानाच मी तेथून काढता पाय घेतो आहे.

मैत्रेय बुद्ध

तारा

दिक्पालाचे चित्र रंगवलेले बॅनर

मी रिसॉर्टला परततो तेंव्हा मिट्ट काळोख पसरलेलाच आहे. दोन्ही रांगामधील निवासस्थानांमधले दिवे सोडले तर बाकी सगळीकडे संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य आहे. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या त्या अंधारात त्या निवासस्थानांमधील दिवे हीच काय ती जीवनाची खूण आहे असे मला वाटत राहते.

रात्रीचे भोजन भोजन कक्षात दिले जाते. रात्री झोपताना मी अंथरूणावर आडवा पडतो व खोलीतील दिवे बंद करतो. एक अत्यंत गडद व मिट्ट अंधार मला गिळून टाकतो. हा अंधार एवढा गडद आहे की वर उचललेला माझा स्वत:चा हात सुद्धा मला दिसू शकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किरकिरे रातकिडे किंवा क्रिकेट्स यासारख्या कोणत्याही कीटकाचा आवाज सुद्धा मला ऐकू येत नाहीये. जंगलामध्ये इतकी नीरव शांतता रात्री असू शकते हे मला अनुभवण्यास मिळते आहे. हा गडद अंधार व नीरव शांतता मला अवकाशातील एखाद्या निर्वात पोकळी सारखी भासते आहे. काही क्षणातच मला गाढ झोप लागते.

(क्रमश🙂

4 नोव्हेंबर 2011

 

 

 

 

 

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “दक्षिण सह्याद्री मधील भटकंती – भाग 1

 1. मस्त आहे लेख , अजून पुढचा लेख लवकर येउ द्या ! भारतातच फिरून प्रवासवर्णन लिहायला कितीतरी वाव आहे . मला तर वाटतं की आपल्याला अजून ही ग्रामीण भारताचं सौंदर्य , संस्कृती , कला व निसर्ग ह्यांची
  म्हणावी तशी दखल प्रवासवर्णन लेखक घेत नाहीत . आपण ती घेतात ह्याबद्दल कौतुक वाटते . मी एक गोष्ट तुमच्या बाबतीत बघितली की तुम्ही सहज म्हणा कींवा इतर काही कारणाने म्हणा त्या त्या स्थळांच प्रवासवर्णन सहज करतात . हे बरं वाटतं , आजकाल प्रवासवर्णनं लिहणं हा व्यवसाय झाला आहे . काही लोक खास प्रसाववर्णनं लिहिण्यासाठी परदेशी फिरायला जातात असं त्यांच्या पुस्तकांवरून वाटतं अन तेथिल स्थळांच रसभरीत वर्णन करून जे परदेशप्रसासाला जाऊ शकत नाही त्यांना खिजवतात असं वाटतं

  तुमच काम मात्र सहज सोप्प! आहे , आणि तसा काही हेतू नाहीए . हे बरं वाटतं

  संदीप

  Posted by संदीप देवकर | नोव्हेंबर 4, 2011, 4:01 pm
  • संदीप देवकर
   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझ्या प्रवासवर्णनांमागे कोणताही हेतू नाही. ज्या प्रेक्षणीय गोष्टी आपण बघितल्या त्याची माहिती चार लोकांना करून द्यावी याच उद्देशाने मी प्रवास वर्णने लिहितो हे आपण जाणल्याचे वाचून बरे वाटले.

   Posted by chandrashekhara | नोव्हेंबर 5, 2011, 7:40 सकाळी
 2. dear sir,
  I really expect such type of article from you, we will get more information of sahyadri range and its forts, good work sir keep it up, best wishes

  Posted by anil | नोव्हेंबर 4, 2011, 7:40 pm
 3. आपले हे आणखी एक रोचक प्रवास वर्णन वाचत आहे. कंटाळा न येता ते वाचतो हे विशेष.छायाचित्रे अप्रतिम आहेत. पुनः पुन्हा सांगावेसे वाटे, राग मानू नये, की तुमची ही सारी प्रवास वर्णने इ-स्वरूपात न राहाता, मुद्रित पुस्तके व्हावीत. त्यासाठी कोणीही प्रकाशक पुढे आला नाही, तरी आपण सारे मिळून एकेक पुस्तक प्रसिद्ध करू, असे आवर्जून सुचवावेसे वाटते. आता सारे मिळून हा शब्द प्रयोग थोडा काय अधिकच गोंधळात टाकणारा असेल, तर सहकारी रूपाने आपण कशी निवास व्यवस्था करतो, तसा हा प्रकल्प केला जावा.

  मंगेश नाबर.

  Posted by Mangesh Nabar | नोव्हेंबर 8, 2011, 7:06 pm
  • मंगेश नाबर –

   आपल्या भावना मी समजू शकतो. परंतु पुस्तक प्रकाशन हा एक व्यवसाय आहे व प्रकाशक हा व्यवसाय द्रव्यप्राप्तीसाठी करतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मला करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे ई-पुस्तक. ते मी वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध केलेच आहे. या पुस्तकाची सीडी प्रत ही मी देऊ शकतो. तसेच कोणाला या पुस्तकाची प्रिंटरवर छापलेली प्रत हवीच असली तरी ती मला देता ये ईल. त्यासाठी माझ्या ई-मेल वर संपर्क साधावा

   Posted by chandrashekhara | नोव्हेंबर 9, 2011, 7:34 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: