.
Musings-विचार

अकस्मात !


आज पहाटे जाग आल्यावर लक्षात आले की बाहेर हवा एकदम गार झाली आहे. खिडकी लावून घ्यावीशी वाटते आहे. चार दिवसांपूर्वी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला होता. दिवसभर चांगलेच उकडत होते. त्या नंतरचे दोन दिवस पाऊस जरी पडला नसला तरी हवा गरमच होती. मग आज पहाटे नाटकाचा पडदा उघडून एकदम नवा प्रवेश सुरू व्हावा त्याच पद्धतीने थंडीचे आगमन झाले होते. आपल्याला म्हणजे आपल्या शरिराला व मनाला सुद्धा, खरे तर असे एकदम झालेले बदल हे रुचतच नाहीत. हा असा ऋतू बदल झाला की बहुतेक लोकांचे शरीर कुरकूरू लागते. सर्दी, खोकला, ताप या स्वरूपात हे कुरकुरणे लगेच दृष्य स्वरूपात हजर होते. मात्र मनाचे तसे नसते. त्याला हा बदल एकदम मान्यच होत नाही. आधीचाच ऋतू मनाला हवा हवासा वाटत राहतो. थंडी संपून उन्हाळा सुरू झाला की थंडी कशी छान होती हे वाटत रहाते तर आषाढातील मेघमाला एकदा बरसू लागल्या की उन्हाळ्यातल्या स्वच्छ चांदण्या रात्रींची आठवण आपल्याला येत राहते. त्याच पद्धतीने पावसाळ्यातील ओला गारवा सुद्धा ही कोरडी थंडी पडू लागल्यावर मनातून लवकर जात नाही.

तसे बघायला गेले तर आयुष्यात बहुतेक गोष्टी एकदम अचानकच घडतात. मग त्यात हवी हवीशी वाटणारी सुखे असतात किंवा स्वप्नात सुद्धा ज्यांचे आपण चिंतन करू शकत नाही अशा अघटित दुर्घटना असतात. आपण उगीचच मोठमोठे बेत आखत असतो. पण केंव्हा कशा व कोणत्या घटनेने आयुष्याला एकदम कलाटणी मिळून जाईल हे सांगणे सुद्धा शक्य नसते. पण मी अशा अपघात, मृत्यू वगैरे सारख्या गोष्टींबद्दल बोलतच नाहीये. मी सांगतो आहे आयुष्यातल्या अगदी साध्या सुध्या घटनांबद्दल! या साध्या साध्या घटनांबाबत सुद्धा काही वेळा खरोखरच अंदाज बांधता येत नाहीत.

खूप वर्षांपूर्वीची एक घटना आहे. आम्ही (मी, पत्नी, मुले) एकदा पॉंडिचेरीला जाण्यासाठी म्हणून चेन्नईला पोचलो होतो. मी चेन्नईला जाणार असल्याने एक औपचारिकता म्हणून माझ्या त्या भागातल्या महत्वाच्या ग्राहकांना मी माझ्या वैयक्तिक कामासाठी अमुक दिवशी चेन्नईमध्ये असणार आहे म्हणून कळवले होते. कोणीही ग्राहक माझ्याशी संपर्क साधेल अशी माझी अपेक्षा नव्हती. चेन्नई मधला आमचा दोन दिवसांचा कार्यक्रम उत्तम पार पडला. रात्री आवराआवर करून आम्ही झोपायला गेलो. सकाळी लवकर उठून पॉंडिचेरीची बस पकडायची होती. रात्री 12 च्या सुमारास माझा फोन वाजला. मी साहजिकच काय त्रास आहे अशा आविर्भावात तो फोन घेतला. चेन्नई मधील माझा एक महत्वाचा ग्राहक माझ्याशी बोलू इच्छित होता. मी पुरवठा केलेला एका मशीनला काहीतरी प्रॉब्लेम फक्त रात्रीच्या वेळेसच येत होता व म्हणून मला त्याच्या फॅक्टरीवर नेण्यासाठी तो खाली हॉटेल लॉबी मध्ये माझी वाट बघत होता. नाईलाजाने मी खाली गेलो व त्याच्याबरोबर त्याच्या फॅक्टरीवर गेलो. त्याची अडचण दूर करेपर्यंत पहाटेचे 3 वाजले होते. चेन्नईला परत येईपर्यंत पहाटेचे चार वाजले. मग काय मी माझे आवरले व बस पकडायला बस स्टॅन्डवर आम्ही रवाना झालो. आधीचे संपूर्ण दोन दिवस कोणत्याही ग्राहकाला माझ्याशी संपर्क सुद्धा साधावा असे वाटले नाही, पण रात्री 12 वाजता मला उठून जावे लागले ही गोष्ट मला नेहमीच कमालीची गंमतीदार वाटते.

याहूनही साधी अशी एक हकिगत आहे. मी तयार केलेले एक यंत्र, मुंबईच्या एका मिलमध्ये बसवले होते. ते चालू करण्याचे कार्य कधीतरी करावे लागणार आहे हे मला माहीत होते व मी त्यासाठी ग्राहकाच्या संदेशाची अनेक दिवस वाट पहात होतो. बरेच दिवस त्या ग्राहकाकडून काही कळलेच नाही. एक दिवस ऑफिसची जागा बदलण्याचे ठरल्याने ऑफिसमधील सर्वांनी एक गेटटूगेदर आयोजित केले होते. तेथे गप्पा गोष्टी करत असताना मला कोणीतरी भेटायला आले आहे असा संदेश मिळाला. बाहेर येऊन बघतो तर या मिलचे लोक मला नेण्यासाठी आले होते. मग तो कार्यक्रम तसाच अर्धवट सोडून मी त्या मिलवर गेलो. तेथून सुटका होईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती.

एकदा मोठ्या प्रवासाला निघालेलो असताना माझा चष्माच फुटला. मला त्या प्रवासाच्या सुरवातीच्या काही दिवसात इतका मनस्ताप व त्रास झाला की विचारू नका. हे तर काहीच नाही. एका महत्वाच्या कामावर गेलेलो असताना मी (मला चाळिशीचा चष्मा लागल्यानंतरची गोष्ट आहे.) वाचण्याचा चश्मा न्यायला विसरलो. मग त्या गावाला पोचल्यावर पहिले काय केले असते तर चष्मा खरेदी. परदेशाहून परत आल्यावर विमानतळावर न्यायला कोणीच आलेले नसणे या सारख्या परिस्थिती नेहमीच उद्भवत असतात. अलीकडे मोबाईलच्या सोईमुळे तर हे प्रश्न जास्तीच त्रासदायक झाले आहेत. दुसर्‍या गावाला असताना फॅक्टरीतील प्रश्न सोडवायला लागणे या सारखा क्लेशदायक अनुभव दुसरा नसेल.

आता या असल्या फालतू गोष्टींमुळे आयुष्याला कलाटणी वगैरे कशी मिळू शकेल असा प्रश्न कोणीही विचारेल. बहुतेक वेळा याचे उत्तर नाही मिळणार असेच येते. परंतु काही वेळा अशी कलाटणी मिळू शकते. बस, ट्रेन किंवा विमानाला उशीर झाल्याने, अडकून पडावे लागल्याने, एखाद्या मोठ्या अपघातातून बचावणे किंवा या अशा अडकलेल्या सहप्रवाशांतून, आयुष्याचा सहचर किंवा सहचारिणी मिळणे अशा गोष्टीही घडू शकतात पण त्या विरळाच.

माझा तर ठाम विश्वास आहे की घटना या कधीच अपेक्षित वेळेला घडत नाहीत. त्या अकस्मातच घडतात. व या अशा अकस्मात घटनांप्रमाणे आपले आयुष्य बदलत राहते.

23 ऑक्टोबर 2011.

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “अकस्मात !

  1. एक सुंदर ललित लेख वाचायला मिळाला. आपण इंजिनीअर आणि यंत्रांचे निर्माते असून ‘अचानक’ असे काही उत्स्फूर्त लिहिता की त्यावर विचार करावा असे असते. छान. आपल्याला यंदाच्या दिवाळीच्या शुभेच्छा.

    मंगेश नाबर.

    Posted by Mangesh Nabar | ऑक्टोबर 23, 2011, 5:41 pm
  2. nice sir lekh………………………….

    Posted by geeta | ऑक्टोबर 30, 2011, 4:18 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: