.
Musings-विचार

तीन सफरचंदांची कथा


आधुनिक मानवाच्या जडणघडणीत तीन सफरचंदांचा महत्वाचा वाटा आहे असे विधान जर मी केले तर बरीच मंडळी माझी गणना वेड्यात करतील अशी बरीच शक्यता आहे. मला मात्र असे ठामपणे वाटते आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे ही तिन्ही सफरचंदे पूर्णपणे काल्पनिक आहेत. बाजारात मिळणार्‍या व तोंडाला पाणी आणणार्‍या वॉशिंग्टन डिलाइट किंवा फुजी या सारख्या सफरचंदांच्या व्हरायटींशी या काल्पनिक सफरचंदांचा काडीचाही संबंध नाही. तरीही आधुनिक मानवाची विचार करण्याची पद्धत, त्याने केलेली शास्त्रीय प्रगती व आधुनिक जीवन यावर ही सफरचंदे अजूनही कमालीचा प्रभाव टाकत आहेत ही गोष्ट मोठी आश्चर्यजनकच म्हणावी लागेल.

जगात ज्या प्रमुख धर्मांचे पालन केले जाते त्यापैकी ख्रिस्ती धर्म हा सर्वात जास्त अनुयायी असलेला धर्म आहे. जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतियांशापेक्षा जास्त किंवा 220 कोटी लोक या धर्माचे अनुयायी आहेत. अमेरिका व युरोप या दोन्ही खंडात तर या धर्माचे अनुयायी बहुसंख्येने आहेत. तर या प्रमुख धर्माचा धर्मग्रंथ असलेल्या बायबल मध्ये, जेनेसिस हे नाव असलेला एक ओवीसंग्रह आहे. या जेनेसिस ओवीसंग्रहात, एक कथा दिलेली आहे. या कथेतील वर्णनाप्रमाणे, परमेश्वराने गार्डन ऑफ ईडन या नावाची एक अतिशय नयनरम्य बाग तयार करून त्यात दुष्ट व सुष्ट विचार, सारासार विचार व विज्ञान या सर्वांचे ज्ञान देऊ शकणारा एक विशाल वृक्ष लावला होता. परमेश्वराने प्रथम ऍडम किंवा आदमबाबा या पहिल्या मानवाची निर्मिती केली होती. या पहिल्या मानवाला परमेश्वराने या ज्ञान वृक्षाची फळे कोणत्याही परिस्थितीत न खाण्याची कडक ताकीद (कां व कशासाठी ते माहीत नाही.) देऊन ठेवलेली होती. यानंतर परमेश्वराने ईव्ह या स्त्रीची निर्मिती केली. आदमबाबा व ईव्ह हे या बागेत सुखाने कालक्रमणा करत होते. (म्हणजे काय करत होते? तेही अज्ञानातच आहे.) ईव्हला या ज्ञान वृक्षाची फळे न खाण्याची आज्ञा माहितच नसल्याने, (आदमबाबाने ही ताकीद तिला का बरे सांगितली नाही?) त्या बागेत वास्तव्यास असलेल्या एका सर्पाने, ईव्हला या झाडाचे फळ खाण्यासाठी मोहात पाडले. हे फळ खाल्ल्यावर ईव्ह एकदम ज्ञानी होईल असे या सर्पाचे तर्कशास्त्र होते. ईव्हने आपल्याबरोबर आदमबाबालाही हे फळ खाण्याच्या मोहात पाडले. (आदमबाबाला परमेश्वराची ताकीद माहित होती तरीही ईव्हच्या नादाने तो फसला.) आता हे फळ खाल्ल्याबरोब्बर आदमबाबा व ईव्ह यांना पहिले ज्ञान कसले झाले तर स्वत:च्या नग्नतेचे!. परमेश्वराला आपल्या कायद्याचा या मंडळींनी भंग केला आहे हे कळल्याने तो साहजिकच अतिशय रागावला. आदमबाबा, ईव्ह व तो सर्प या सर्वांची हकालपट्टी त्याने त्या बागेतून करून टाकली व त्यामुळे या सर्वांचे अमरत्वही गेले. आणखी शिक्षा म्हणून परमेश्वराने ऍडमला शेती करून पोट भरावे लागेल, ईव्हला भयंकर प्रसृतीवेदनांना तोंड द्यावे लागेल आणि ऍडमच्या आज्ञेतच तिला जन्मभर रहावे लागेल वगैरे वगैरे शाप दिले. सर्प मात्र शापांच्यातून सुटला. या गोष्टीतला हा ज्ञान वृक्ष सफरचंदाचा असल्याने आपल्या कथेतल्या तीन सफरचंदांच्यापैकी पहिले सफरचंद या गोष्टीत सापडते.

काही मंडळी असे म्हणतात की ऍडम व ईव्ह यांनी हे सफरचंद खाल्ले हे चांगलेच केले. नाहीतर नग्नतेची जाणीवच नसल्याने निरनिराळे कपडे, फॅशन हे सगळे मानवाला कधी करताच आले नसते. काही मंडळींचे तर विचार आहेत की सफरचंद खाण्याआधी ऍडम व ईव्ह यांची जी लाईफस्टाईल होती ती बघता, अमरत्व मिळूनही हे दोघे कशासाठी जगत होते तेच कळत नाही. तेंव्हा त्यांनी सफरचंद खाल्ले हे आपले नशीबच. थोडक्यात म्हणजे आधुनिक मानवाची फॅशन, राहणी हे सगळे या एका सफरचंदामुळे मानवाला मिळाले आहे. आणि स्त्रीपुरुष आकर्षणच नाही? म्हणजे कथा, कादंबर्‍या, सिनेमे, नाटके व टीव्ही सिरियल्स संपल्याच की! 1975 साली इंदिराबाईंनी जेंव्हा देशात आणीबाणी जाहीर केली होती त्या वेळेचे दूरदर्शन वरचे कार्यक्रम सुद्धा या मानाने मनोरंजक म्हणता येतील इतके नीरस कार्यक्रम हे सफरचंद या ऍड्मईव्हनी खाल्ले नसते, तर आपल्याला बघत बसावे लागले असते.

आपल्या कथेतील दुसरे सफरचंद आहे सतराव्या शतकातल्या इंग्लंडमधल्या एका झाडावरचे. ऍडमईव्ह यांनी खालेल्या सफरचंदासारखे विशेष काही असे हे सफरचंद नव्हते तर अगदी साधे सुधे नेहमी सफरचंदाच्या झाडाला लागतात तसलेच हे फळ होते. या सफरचंदाची विशेषता एवढीच होती की पिकल्यावर ते जे खाली गळून पडले ते झाडाखाली बसलेल्या एका मनुष्याच्या डोक्यावर. बरं हा माणूस कोणीसाधासुधा पांथस्थ नव्हता किंवा ऍडमईव्ह सारखा बागेत फिरणाराही नव्हता. अत्यंत विख्यात आणि सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाणारा आयझॅक न्यूटनच त्या झाडाखाली बसलेला होता. हे सफरचंद डोक्यावर पडल्यावर न्यूटनचे विचार चक्र जे सुरू झाले ते त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधून काढल्यावरच थांबले. गुरुत्वाकर्षणाबरोबरच त्याने वस्तूंच्या चलनासंबंधीचे नियम व केपलच्या नियमांचा सैद्धांतिक पुरावाही सादर केला. या नंतर इंग्लंडमध्ये जी शास्त्रीय व औद्योगिक क्रांती घडून आली त्याचे पुष्कळसे श्रेय या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आणि पर्यायाने आपल्या या दुसर्‍या सफरचंदाला देता येते.

आपल्या गोष्टीतले तिसरे सफरचंद मात्र तसे नवीन आणि आधुनिक कालातले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातल्या स्टीव्हन जॉब्स या एका 21 वर्षाच्या तरूणाला, वैयक्तिक उपयोगाचा संगणक या नवीन कल्पनेने पूर्णपणे भारून टाकले होते. कॉलेज शिक्षण घेत असलेला जॉब्स या कल्पनेने इतका पछाडला होता की आपले कॉलेज शिक्षण सोडून देऊन त्याने अटारी या इलेक्ट्रॉनिक गेम्स बनवणार्‍या कंपनीत नोकरी सुरू केली. याच वेळेला तो हेवलिट पॅकार्ड कंपनीने आयोजित केलेल्या व्याख्यानांना आपली नियमित उपस्थिती लावत असे. या ठिकाणी त्याला स्टीफन वॉझनिआक हा त्याच्याहून 3 वर्षांनी लहान असलेला तरूण भेटला. जॉब्सने वैयक्तिक उपयोगाच्या संगणकाची आपली कल्पना या वॉझनिआकच्या गळ्यात उतरवली. दोघांनी स्वत:चे वाहन व एक कॅल्क्युलेटर विकून 1300 डॉलर्स जमा केले व जॉब्स कुटुंबाच्या गराज मध्ये 1976 साली आपली कंपनी चालू केली. या कंपनीला त्यांनी नाव दिले ऍपल कॉम्प्यूटर्स व आपल्या गोष्टीतले तिसरे सफरचंद आकाराला आले. याच वर्षी या दुक्कलीने आपण बनवलेले व एकाच सर्किट बोर्डावर असलेले 50 संगणक माऊंटन व्ह्यू मधील बाईट शॉपया डीलरला प्रत्येकी 666 डोलर्स या किंमतीला विकले व ऍपल कंपनीची दैदिप्यमान कारकीर्द सुरू झाली.

1977 मधल्या ऍपल 2 या संगणकामुळे वैयक्तिक संगणकाची शक्ती ग्राहकांच्या चांगलीच लक्षात आली. हा संगणक अतिशय प्रसिद्ध झाला व आयबीएम सारख्या कंपनीच्या उत्पादनांना अतिशय यशस्वी असा एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला. या नंतर कोणत्याही धंद्यात होतात तसे चढ उतार ऍपल कंपनीलाही बघावे लागले. परंतु गेल्या 34 वर्षात या कंपनीने उत्पादनांची जी अद्वितीय मालिका जगभरच्या ग्राहकांसमोर आणली त्याला खरोखरच तोड नाही. 1984 मधला मॅकिन्टॉश‘, 1998 मधला आयमॅकहे कंपनीने ग्राहकांना सादर केलेले अजोड वैयक्तिक संगणक होते तर 2001 मधल्या आयपॉडमुळे सोनीच्या वॉकमन व डिस्कमन या कधीही व कोठेही संगीत ऐकवू शकणार्‍या गॅजेट्सना एक अतिशय लहान आकारातला जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण झाला. 2007 मध्ये ऍपल कंपनी मोबाईल फोनच्या क्षेत्रात आयफोनद्वारे उतरली व अतिशय निराळ्या डिझाईनमुळे एक नवीन क्रांतीच या क्षेत्रात आणली गेली. या पाठोपाठ मागच्या वर्षी परत एकदा संगणक क्षेत्रात आयपॅडहा टॅबलेट संगणक आणून, ऍपल कंपनीने ग्राहकांच्या मनावर आपले संपूर्ण राज्य असल्याचे सिद्ध करून दिले आहे.

ऍपल कंपनीचा प्रणेता स्टीव्ह जॉब्स हा कर्करोगाने बरीच वर्षे आजारी होता. तरी सुद्धा त्याच्या नेतृत्वाखाली ऍपल कंपनी नवीन नवीन उत्पादने बाजारात आणतच गेली. काही दिवसांपूर्वी स्टीव्ह जॉब्स या आजाराला शेवटी बळी पडला. मात्र त्याने कल्पिलेले व साकारलेले हे तिसरे सफरचंद, आपला प्रभाव जगभर पुढे सुद्धा गाजवतच राहील असे ऍपल प्रेमींना मनापासून वाटते आहे.

या तीन काल्पनिक सफरचंदांनी, आधुनिक मानवाच्या आयुष्यावर व जडण घडणीवर एवढा मोठा परिणाम केला आहे की या तीन सफरचंदाना विसरणे कोणालाही शक्य होणार नाही.

12 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “तीन सफरचंदांची कथा

  1. now i came tp know why a is for apple

    Posted by ashok patwardhan | ऑक्टोबर 12, 2011, 4:04 pm
  2. sunder and prawahi lekhan , finished in one stroke

    Posted by anil | ऑक्टोबर 12, 2011, 5:25 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: