.
अनुभव Experiences

शरद पोर्णिमा


मनासारखा भरपूर पाऊस एकदा पावसाळ्यात पडून गेला की त्या नंतर येणारा शरद ऋतू मला अतिशय आवडतो. एखाद्या नववधू तरूणीच्या चेहर्‍यावर दिसणारे तेज तो आसमंतात भरतो. अजून झाडांची पानगळ सुरू झालेली नसते किंवा पानांचा हिरवा रंगही लुप्त झालेला नसतो. निळेशार आकाश, हिरवीगार वनराई आणि खाली सचैल न्हालेली धरती यामुळे शरद ऋतुमधील आसमंत अतिशय लोभसवाणे दिसत राहते. खरे तर अनंत चतुर्दशीला, गणपतींना पोचवल्यापासूनच, शरद ऋतूची चाहूल लागते. पण या नंतरचा पंधरवडा आपल्याकडे अशुभ मानला जातो. पितरांना जेवायला घालण्याची एक अजब रूढी आपल्याकडे याच दिवसात पाळली जाते.
सिंगापूरला राहिल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की साधारण याच दिवसात, चिनी लोकही याच प्रकारची एक रूढी पाळतात. मात्र पंधरवड्याऐवजी ते ही रुढी महिनाभर पाळतात. त्यांनी तर या महिन्याला ‘भुतांचा महिना’ (Month of the Ghosts) असेच नाव देऊन टाकलेले आहे. मात्र भटजीच्या मार्फत पितरांना जेवू घालण्याची रूढी त्यांच्यात नाही. पितरांना, खास चविष्ट पदार्थ, पैसे, मोटर गाड्या, दास-दासी या सारख्या ज्या ज्या गोष्टी हव्या असतील असे त्यांना वाटते, त्या त्या गोष्टींची चित्रे छापलेले कागद ते आणतात व एका घमेल्यात विस्तव पेटवून त्या अग्नीत हे छापलेले कागद टाकून अग्निदेवामार्फत या गोष्टी ते पितरांना पोचवतात. अगदी ‘नरकाच्या बॅंकेची’ (Bank of Hell) क्रेडिट कार्डे सुद्धा ते पितरांना या पद्धतीने पोचवत असतात.
अर्थात निसर्गाला या सगळयाशी काही देणे-घेणे नसते. तो शुभ अशुभ वगैरे काही मानत नाही. व यामुळेच या दिवसातील हवा मोठी शुभद आणि सुखद असते. मधूनच पडणारे ऊन आणि अधून मधून पडणारी पावसाची एखादी सर यामुळे वातावरण आल्हादकारक बनते. पण नंतर एखाद्या दिवशी एकदम उकडू व गदमदू लागते. दुपारी दक्षिणेकडून काळीकुट्ट झाकोळ येते व बघता बघता तुफान पाऊस सुरू होतो. हत्तीच्या पावलासारखा पडणारा हा पाऊस हस्त नक्षत्राच्या आगमनाचे शिंग वाजवतो. हस्त भरपूर पडले की पुढच्या पावसाळयापर्यंत पाऊस पडला नाही तरी चालते. एकदा का हस्ताचा पाऊस सुरू झाला की पुढच्या आठ पंधरा दिवसांची निश्चिंती असते. दिवसभर उकडहंडी आणि संध्याकाळी बदाबदा पाऊस या चक्रातून सुटका कधी होणार असे वाटू लागते. मग एकदम एके दिवशी सकाळी उठले की बाहेर सगळे धुरकट दिसू लागते. सगळा आसमंत धुक्याच्या दुलईत गुरफुटुन गेलेला असतो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झाल्याची ती खूणगाठ असते. आकाश दोन तीन दिवसात परत निरभ्र होते व दिवसा जरी थोडेसे गरम वाटले तरी रात्री मोठया आल्हादकारक होतात. नुकताच पावसाळा संपल्याने हवेतील धुळीचे प्रमाण खूपच कमी असते. व यामुळे हे निरभ्र आकाश दिवसभर मोठे निळेशार व छान दिसते.

या दिवसात शरद पोर्णिमा किंवा कोजागिरी येते. या पोर्णिमेला दिसणारे चंद्राचे तेज परत काही वर्षभर दिसत नाही. याचे एक प्रमुख कारण या दिवसात हवेमधे धूळ अतिशय कमी असते हेच असावे असे मला वाटते. हवा शीतल असली तरी बोचणारी थंडी निदान पूर्व रात्री तरी कधी भासत नाही. या अशा सुंदर हवेत कोठेतरी मोकळ्या हवेत मित्र मैत्रिणींबरोबर जाऊन दोन चार तास गप्पा गोष्टी करण्याचा रिवाज आपल्याकडे आहे. अतिशय सुखद असा तो अनुभव असतो. याच वेळी चटकदार भेळ व मसालेदार दूध संगतीला असले तर या रात्रीची मजाही काही औरच वाटते.
शरद ऋतूमधील पोर्णिमेचा चंद्र आणि चांदणे प्रसिध्दच आहे पण याच दिवसात येणार्‍या कृष्ण पक्षांतील रात्री मला जास्त देखण्या वाटतात. काही वर्षांपूर्वी मी कामानिमित्त एकदा नाशिकला गेलो होतो. परत येताना रात्र झाली. सिन्नरच्या पुढे चंदनापुरी नावाचा एक घाट लागतो तो पार करून आम्ही घाटमाथ्यावर आलो होतो. चौफेर काळोखाचे साम्राज्य होते. नजर पोहोचेल तोपर्यंत कुठेही मिणमिणता दिवा सुध्दा दिसत नव्हता. अशा वेळी, सहज माझे लक्ष आकाशाकडे गेले. आकाश तेजाने नुसते लखलखत होते. गाडी थांबवून मी खाली उतरलो. आभाळात लक्ष लक्ष दीप पेटविले आहेत की काय असे भासत होते. इतके तेजोमय आकाश मी या पूर्वी कधीच बघितलेले नाही असे मला वाटत राहिले. अशा आभाळाचे वर्णन पी.सावळाराम या कवींनी आपल्या एका गीतात ‘ नक्षत्रांचा निळा चांदवा ‘ असे मोठे समर्पकपणे केले आहे. त्या रात्री आकाशाकडे बघत असताना गीतातील ती ओळ माझ्या डोक्यात इतकी भिनली होती की घरी परत येईपर्यंत तेच गीत मी गुणगुणत होतो.
तुम्ही पुण्यामधे रहात असलात तर या दिवसात पहाटे वेताळ टेकडीवर नक्की फिरायला जा. धुक्यात गुरफटलेली हिरवीगार वनराई व ओलसर जमिनीवर अजून हिरवे असलेले तृणांकूर यामधे अधून मधून डोकावणार्‍या खडकांवर बसून सूर्योदय बघणे म्हणजे एक पर्वणीच असते. निसर्गाची हीच तर गंमत आहे. तो न चुकता, ठरल्या वेळी अनंत करांनी सौंदर्याची उधळण करत राहतो. शरदातील रात्रींचा तेजोत्सव म्हणजे तर या नैसर्गिक सौंदर्याचा परमोच्च अविष्कार मला भासतो. शरद ऋतू म्हणजे वर्षातील सर्वोत्तम काल हे भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगून टाकले आहे.
अलीकडे एक दोन वेळा मी या अशाच कोजागिरी गप्पांना मी गेलो होतो. आपल्याकडे काही अनिष्ट चालीरिती रूढ होऊ पहात आहेत त्यातलीच एक रूढी सोशल ड्रिंकिंग ही आहे. त्या दिवशी कोजागिरीच्या गप्पांना मद्यार्काची साथ बघून मला त्या गप्पांचे संयोजन करणार्‍यांची कीव कराविशी वाटली. तुम्हाला ड्रिंक्स घेऊन सोशल गेटटूगेदर्स साजरी करायला बाकी वर्ष असतेच. या एका दिवशी तरी फक्त निसर्गाकडून तेजाची होणारी बरसात अंगावर घेऊन धुंद व्हावे असे मला वाटते.
अर्थात सौंदर्याची बरसात करणार्‍या निसर्गाला याचे काहीच सोयर-सुतक नसते. तो ही उधळण करतच राहतो. या सौंदर्याच्या बरसातीचा आस्वाद घ्यायचा की करंटेपणाने बाजूला उभे रहायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते.
11 ऑक्टोबर 2011.

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

10 thoughts on “शरद पोर्णिमा

 1. bhasha shaili uttam ani warnan suddha chan ahe.

  Posted by anil | ऑक्टोबर 11, 2011, 10:22 सकाळी
 2. > शरद ऋतू म्हणजे वर्षातील सर्वोत्तम काल हे भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगून टाकले आहे.
  >
  असा उल्लेख गीतेत कुठे आहे? दहाव्या अध्यायात कृष्ण म्हणतो: मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर: – तेव्हा हेमन्तातला मार्गशीर्ष मास आणि ऋतूंत त्याला वसन्त (कुसुमाकर) जास्त आवडीचा आहे.

  Posted by anonymous | ऑक्टोबर 11, 2011, 11:40 सकाळी
  • डी एन –

   हा प्रश्न तुम्ही विचाराल हे मला अपेक्षितच होते. तुम्ही उल्लेख केल्या प्रमाणे मी अर्थातच मार्गशीर्ष महिन्यातील कालालाच वर्षातला सर्वोत्तम काल असे म्हणतो आहे. आणि सध्याच्या पंचांगाप्रमाणे हा मास हेमंत ऋतू मध्ये येतो आहे हे ही खरे आहे. पण मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे सरळ उत्तर न देता तुमच्या पुढे दोन तीन मुद्दे मांडतो आहे. पहा तुम्हाला हे लक्षात येते का की मी मार्गशीर्ष महिन्याचा शरद ऋतूशी का सबंध जोडला आहे?
   * भारतीय पंचांगातील महिन्यांची नावे त्या महिन्यात जे नक्षत्र आकाशात दिसते त्यावरून योजलेली आहेत.
   * ऋतू हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या चलनामुळे निर्माण होतात.
   * वसंत संपात किंवा शरद संपात बिंदू हे दर 26000 वर्षात सर्व नक्षत्रांसमोरून एक फेरी मारताना दिसतात.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 11, 2011, 1:39 pm
 3. त्या काळी मार्गशीर्षात कुठला ऋतु येत असे, याबद्‌दल मी काहीच सांगू शकणार नाही. पण दहाव्या अध्यायतला हा भाग मला विनोदी वाटतो. ‘श्वापदांत मी असे सिंह?’ डायनॉसार का नाही? त्याची कृष्णाला माहिती तरी होती का? सिंह नष्ट झाला तर पुढे काय? मात्र डायनॉसार ‘श्वापद’ गटात येतो का हे मला माहीत नाही. ‘समासात मी द्‌वंद्‌व’? म्हणजे नक्की काय? की त्या छन्दात बसणारा समास तिथे बळेच वापरला? कृष्णाला आवडणारा काळ नक्की कोणता? शरदाचा की वसन्ताचा? तुम्ही म्हणाल शरद तर मी म्हणतो वसन्त, आणि तुम्ही म्हटलं वसन्त तर मी म्हणतो शरद. त्यातही ‘मुनीनामप्यहं व्यास:’ ठोकून दिलं आहे. न्यूटन वेगळं नांव घेऊन ‘न्यूटनसारखा शास्त्रज्ञ नाही’ लिहायचा तसा हा प्रकार आहे. व्यासानी कृष्णाच्या तोंडी आपली स्तुती घुसडून टाकली. शिवाय वैष्णव म्हणतात ‘देवांत देव तो विष्णु’ आणि शैव म्हणतात शंकर विष्णुचा बॉस आहे. तेव्हा धार्मिक वाङ्‌मयात असे उलटसुलट, परस्परविरोधी सन्दर्भ मोठ्या प्रमाणात आढळतात.

  त्या काळी ऋतु ही भानगड होती हे तर स्पष्टच आहे. तेव्हा महाभारत-कालात मार्गशीर्षाचा शरदाशी नि:संदिग्ध संबंध ज़ोडणारे तेव्हाच्या साहित्यातले वेचे उपलब्ध आहेत का?

  (ज़ाता ज़ाता: ऋग्वेदातल्या काही ऋचा दीर्घतमस्‌ नांवाच्या ऋषीनी लिहिल्याची माहिती आज़ अचानक मिळाली. हे थंडीचं/रात्रीचं कौतुक की धोंडू-दगडू ही नांव ठेवत त्यातला प्रकार, इया शंका. वृषाकपि इन्द्राचा मुलगा होता, असाही एक दावा वाचला. इन्द्राणी त्याची जन्मदात्री की सावत्र ही एक शंका.)

  – डी एन

  Posted by anonymous | ऑक्टोबर 11, 2011, 2:47 pm
  • डी एन –

   आता तुम्ही विषय काढलाच आहे तर माझे एक रोचक निरिक्षण येथे सांगण्याचा मोह आवरत नाही. मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर या ओळीतला जो मास किंवा महिना शब्द आहे त्याला आपण महिन्याची सध्याची व्याख्या लावतो (महिन्याचे नाव त्या महिन्यात कोणते नक्षत्र आकाशात दिसते यावरून आलेली) म्हणून कालानुसार त्या वेळचाऋतू शरद किंवा हेमंत असावा असे म्हणतो. पण समजा महिन्याची व्याख्या करताना सूर्य ज्या नक्षत्रासमोर आहे ते त्या महिन्याचे नाव अशी व्याख्या केली तर दोन पाच हजार वर्षांपूर्वी मार्गशीर्ष हा महिना वसंत ऋतूत आला असता. मग या ओळीत भासणारा विरोधाभास दिसलाच नसता.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 13, 2011, 7:18 सकाळी
 4. अमुक महिने म्हणजे तमुक ऋतु, वगैरे सांगड कधी घातली गेली, याची मला काहीच कल्पना नाही. ज़र दोन ते पाच हज़ार वर्षांपूर्वी (म्हणजे सलग ३,००० वर्षांच्या कालात) मार्गशीर्ष वसन्तात येत असेल तर तो नन्तर ३००० वर्षांत हेमन्तापर्यंत कसा घसरला हे ही मला माहीत नाही. पण मुळात एका वर्षातले दोन भिन्न कालखंड आवडणं, यात मला विरोध वाटत नाही. आणि कृष्णाला मार्गशीर्ष आवडतो, प्लेयराणां सुनीलोऽस्मि, वेदांत सामवेद (ऋग्वेद वा अथर्व का नाही?), गोडांत कृष्ण चिरोटा, नदींत तो गंगा हे ऐकून भीष्माशी न लढू पाहणारा अर्जुन अचानक कसा धनुष्य उचलेल, हे व्यासच ज़ाणे. मी गीता वाचलेली नाही, पण मला तिच्यां काही भागांत खूप फेकाफेकी वाटते. महाभारतातही वाटते. काही लोक म्हणतात कृष्णानी जयद्रथ मारायला सूर्यग्रहणाचा योग साधला. ग्रहणाची कल्पना त्याला एकट्यालाच असण्याइतकी कौरव-पार्टी (भीष्म-द्रोण-वगैरे) बावळट होती की काय? अर्थात यावर एक उत्तर म्हणजे व्यासाचा तसा रोख नव्हताच. नसेलही. पण तसा दावा लोकांच्या तोंडावर फेकण्यात मात्र येतो.

  मला सध्या असलेल्या एका शंकेत वाचकांनाही रस वाटेल या अन्दाज़ानी मी ती (ई-मेल न पाठवता) इथे माण्डतो. चन्द्राची अमुक कला जगभर (वा निदान उत्तर गोलार्धात) एकाच वेळेला असते का? http://www.timeanddate.com/worldclock/astronomy.html?n=224&month=10&year=2011&obj=moon&afl=-11&day=1
  इथे ‘first quarter’, ‘full moon’ यांच्याशी एक क्षण निगडित आहे. तो क्षण त्या दिवसाची सुरवात की उत्कर्ष, हे माहीत नाही. पण ११-ऑक्टोबर रात्रौ ७:०६ ला कॅलिफोर्नियात पूर्ण-चन्द्र आहे, आणि नेमक्या त्याच क्षणी (दुसरा दिवस, सकाळचे ७:३६) मुम्बईला पूर्ण-चन्द्र आहे. यामागे काय शास्त्र आहे?

  – डी एन

  Posted by anonymous | ऑक्टोबर 13, 2011, 8:03 सकाळी
  • डीएन-

   कै. गो.रा.परांजपे यांच्या आकाश दर्शन ऍटलास या पुस्तकातील एका पृष्ठाचा स्कॅन खाली देत आहे. तुमच्या शंकेचे बहुदा निरसन व्हावे.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 13, 2011, 1:26 pm
 5. ‘आकाश-दर्शन अ‍ॅटलस’मधल्या माहितीसाठी आभारी आहे. पण माझी ही शंका आहे की सूर्य-चन्द्र-पृथ्वी यांची पौर्णिमा वा इतर कुठल्याही कलेसाठी लागणारी परस्परसंबंधाची स्थान-स्थिती ही लंडन, पुणे आणि दक्षिण गोलार्धात साओ पावलो या सर्व ठिकाणी एकाच वेळी कशी येते. मी असा (उगीचच) अन्दाज़ केला असता की दर गांवी पौर्णिमा वेगवेगळ्या वेळी यावी. माझ्या आठवणीनुसार चतुर्थीच्या चन्द्रोदयाचीही वेळ विदर्भात आणि पुण्याकडे किंचित फरकानी असते, आणि कालनिर्णयात तशी नोन्द असते. सूर्य-ग्रहण चन्द्रग्रहणाच्या तुलनेत कमी टापूत दिसतं. पण तिथेही अमेरिकाभर दिसणारं ग्रहण न्यू यॉर्क आणि सिअ‍ॅटल यां ठिकाणीं एकाच वेळी सुरू होतं, की काही फरकानी?

  Posted by anonymous | ऑक्टोबर 14, 2011, 12:19 सकाळी
 6. लेखन आवडले. प्रतिक्रिया ही माहितीपूर्ण आहेत.

  Posted by मीनल गद्रे | नोव्हेंबर 5, 2011, 6:57 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: