.
ताज्या घडामोडी Current Affairs

संथ वाहते इरावती माई!


काही काही गाणी अशी काही जमून येतात की कितीही वर्षे लोटली तरी त्या गाण्यांची आठवण मनात अगदी ताजी राहते. ‘ संथ वाहते कृष्णा माई हे असेच एक गाणे आहे. राजा परांजपे यांच्या चित्रपटासाठी, गदिमांनी लिहिलेले व सुधीर फडके यांनी गायलेले! संगीत होते दत्ता डावजेकर यांचे!. या गाण्याची दुसरी ओळ तर मला नेहमीच खूप भावते. ती ओळ अशी आहे तीरावरच्या सुख दु:खांची जाणीव तिजला नाही नदी वाहतेच आहे, काठावर घडत असलेल्या व मानवांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या घटना, नदी किंवा एकूणच निसर्गाच्या दृष्टीने दखल घेण्यासारख्या सुद्धा नसतात हे सत्य या काव्यात गदिमांनी मोठे सुंदर रित्या सांगितले आहे.

आज या गाण्याची आठवण मला होते आहे ती ब्रम्हदेशातल्या इरावती नदी संबंधातली एक बातमी वाचनात आल्यामुळे! आपण सर्वांनी शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात या इरावती नदी बद्दल वाचलेले असतेच. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती येथे करत बसत नाही. पण या नदीच्या कुशीत पिढ्यानपिढ्या राहणार्‍या लोकांच्यावर एक मोठा बाका प्रसंग येऊ घातला होता. त्यामुळे हे सर्व लोक गेली काही वर्षे मोठ्या संकटाच्या व सबंध जीवनाचीच उलथापालथ होईल अशा घटना क्रमातून जात होते. यापैकी काही जणांची पिढीजात असलेली शेतजमीन, त्यांच्याकडून काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर काही लोकांसाठी तो एक अटळ भविष्यकाल दिसत होता. सुदैवाने या सगळ्या प्रकरणाची अखेर सुखद होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ब्रम्हदेशातील सैनिकी सरकार 2003 सालापासून या इरावती नदीवर एक महाविशाल धरण बांधण्याच्या प्रकल्पाच्या विचारात होते. या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ 21 डिसेंबर 2009 ला उत्तर ब्रम्हदेशातील कचिन या राज्यातील म्यिटकायना‘ (Myitkyina) या गावाजवळ करण्यात येऊन हा प्रकल्पाचा प्रारंभ अधिकृत रित्या करण्यात आला होता. या गावापासून सुमारे 43 मैलावर, माली व एनमाई या दोन नद्यांचा संगम आहे. संगम झालेल्या या दोन नद्यांच्या पुढे वाहणार्‍या प्रवाहालाच इरावती असे नाव आहे. या संगमापासून 3 किलोमीटर अंतरावर, हे धरण इरावती नदीवर बांधण्यात येणार होते. माली व एनमाई नद्यांच्या संगमाजवळचा हा भाग जैविक विविधतने अतिशय नटलेला म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात ब्रम्हदेशाच्या इतिहासाशी निगडित अशी अनेक प्रसिद्ध स्थाने असल्याने अनेक ब्रम्ही अभ्यासक या प्रदेशाला ब्रम्हदेशाची सांस्कृतिक जन्मभूमी म्हणून ओळखतात. हा सर्वच भाग भूकंप प्रवण म्हणूनही ओळखला जातो.

इरावती नदीवरचे हे धरण 2019 साली पूर्ण होणार होते व या धरणासाठी 3.6 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित होता. हे धरण ब्रह्मदेशातील विद्युत शक्ती मंत्रालय, ‘एशिया वर्ल्ड कंपनीया नावाची एक खाजगी ब्रम्ही कंपनी आणि चिनी सरकारी कंपनी चायना पॉवर इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन मिळून बांधणार होते. या धरणामुळे तयार होणारा जलाशय 766 वर्ग किलोमीटर किंवा सिंगापूरच्या क्षेत्रफळाहूनही मोठा असणार होता. या धरणापासून तयार होणार्‍या 6000 मेगॅवॅट विजेपैकी 90% वीज चीन मधील ग्राहकांच्याकडे जाणार होती. या धरणाच्या प्रकल्पात भांडवल गुंतवणार्‍या चायना पॉवर इनव्हेस्टसमेंट कॉर्पोरेशन या चिनी सरकारच्या मालकीच्या कंपनीला या धरणाच्या प्रकल्पातून होणार्‍या फायद्यापैकी 70% फायदा मिळणार होता.

हा धरणाचा प्रकल्प सुरू होण्याआधी पासूनच या धरणाला ब्रम्हदेशात कमालीचा विरोध होत होता. कचिन या राज्यात सर्वात जास्त विरोध स्वाभाविकपणे होत होता. कचिन हे राज्य गेली अनेक दशके अशांत आहे. ‘ कचिन स्वातंत्र संघटना या नावाची एक चळवळ येथे असून त्यांची स्वत:ची शस्त्रधारी सेना व ब्रह्मदेशचे सैन्यदल यांच्यात नेहमीच चकमकी घडत असतात. कचिन राज्यातील ब्रह्मी लोकांना हे धरण स्थानिक कचिन नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी बांधले जाते आहे असे वाटते आहे. त्याचप्रमाणे या धरणामुळे या भागातील पर्यावरणाचा नाजुक समतोल ढळेल असेही मत येथे आहे. गेल्या दोन वर्षात या धरणामुळे काही हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे व पुढच्या काही वर्षात स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी भिती या संघटनेला वाटते आहे. ब्रह्मदेशाच्या सैनिकी सरकारने लोकांना विश्वासात घेण्यासाठी कोणतीच पावले न उचलल्याने या प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध आणखीनच तीव्र झाला आहे. ब्रह्मदेशाचे सैनिक व कचिन येथील गरिला सैनिक यांच्यात गेले वर्षभर चकमकी घडत असून या भागात स्थायिक झालेल्या अनेक चिनी नागरिकांना परत सरहद्द ओलांडून चीनमध्ये आश्रयास जावे लागले आहे. गेले काही महिने या भागातील लढाया आणखीनच वाढत चालल्या आहेत.

गेल्या काही वर्षात हजारो चिनी व्यापारी आणि कामगार कचिन राज्यात चीनहून स्थलांतरित झाले आहेत. या भागातला सर्व व्यापार आता या चिनी व्यापार्‍यांच्या हातात आहे व स्थानिक कचिन जनतेला ही गोष्ट अतिशय खुपते आहे. या धरणामुळे निर्माण होणारी बहुतांशी वीज चीनला निर्यात करण्यात येणार आहे हे समजल्यावर स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला होणारा विरोध अधिकच तीव्र झाला. ब्रह्मी लोकांची अशी भावना आहे की इरावती नदी ही ब्रह्मी संस्कृती आणि वारसा याचे चिन्ह आहे व ती त्यांची जीवनदायिनी आहे. या अशा नदीचा चीनला उपयोग करू देण्यास स्थायिकांचा तर विरोध आहेच पण देशाबाहेर असलेले व पर्यावरण आणि मानवाधिकार यांच्या साठी लढणारे ब्रह्मी नागरिक यांनीही या प्रकल्पाच्या विरोधी मत दिले आहे. यंगून आणि मंडाले येथील रहिवाशीही या प्रकल्पाला श्रीमती स्यू की यांनी विरोध दर्शविल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात गेले आहेत. चीन ब्रह्मदेशात करत असलेली गुंतवणूक अनेक ब्रह्मी नागरिकांना पसंत नाही त्यामुळे सुद्धा या प्रकल्पाला होणारा विरोध आणखीनच तीव्र झाला आहे. श्रीमती स्यू की यांनी स्पष्टपणेच असे सांगून टाकले आहे की चीन मधली विद्युत शक्तीची मागणी पुरवून तेथील अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणारे ब्रह्मदेशातील प्रकल्प त्वरेने भंगारात टाकून देण्यात यावेत.

काही महिन्यांपूर्वी ब्रह्मदेशात सैनिकी देखरेखीखाली निवडणूका झाल्या होत्या. या निवडणूका स्वतंत्रपणे झाल्या नाहीत असे अनेक देश म्हणत आहेत. तरीही सध्याचे ब्रह्मी सरकार निवडून आलेले असल्याने हा प्रकल्प ही त्यांच्यापुढची एक चाचणी बनली आहे. या सर्व दबावामुळे मागच्या आठवड्यात ब्रह्मी सरकारच्या प्रवक्त्याने घोषणा केली की ब्रह्मदेशचे प्रधान मंत्री श्री. थेइन सीन यांनी या प्रकल्पाला त्यांचा अधिकार काल संपेर्यंत (5 वर्षे) स्थगिती दिली आहे. माहिती मंत्रालयाच्या पब्लिक रिलेशन विभागाचे मुख्य संचालक श्री. यी हुट यांनी ही माहिती दिली होती. त्यांच्या मते श्री. थेइन सीन यांना लोकांनी निवडून दिलेले असल्याने, लोकभावनांचा आदर करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. ब्रह्मदेशात काहीतरी बदल होत आहेत याचीच एक चुणूक या स्थगन आदेशामुळे मिळाली आहे.

श्री. थांटमिंटयू या एका ब्रह्मी लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात ते म्हणतात की ब्रह्मदेशात लोकांना असे वाटते की ब्रह्मदेशातील राजकीय परिस्थितीचा चीनने आपल्या फायद्यासाठी गेली अनेक दशके उपयोग करून घेतला आहे. चिनी व्यापार व गुंतवणूक याचा ब्रह्मदेशला जरूर फायदा होईल. मात्र या साठी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचा आयुष्यावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही याची काळजी घेणारे आणि पूर्ण पारदर्शी असलेले प्रकल्प चिनी मदतीने उभारणे आवश्यक आहे नाहीतर अशा प्रकल्पांवरचा ब्रह्मी लोकांचा रोष आणखीनच वाढेल. ” पर्यावरण तज्ञांच्या मताने, ब्रम्हदेशाच्या पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी कोणतेही जल विद्युत प्रकल्प ब्रह्मदेशात उभारले जाऊ नयेत व आधी काम चालू असलेले इरावतीवरचे व इतर ठिकाणांवरचे प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावेत. असे सांगण्यात आले आहे.

या चिनी मदतीच्या प्रकल्पाचे काम अचानकपणे थांबवण्यात आल्याने चिनी वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकक्षोभासाठी प्रकल्प बंद करणे ही संकल्पनाच चिनी सरकारला नाही. सध्या तरी चीनने, ब्रह्मी शासनाने, चिनी कंपन्यांचे आर्थिक किंवा कायदेशीर या प्रकारचे कोणतेही नुकसान होणार नाही अशी पावले उचलावी एवढेच वक्तव्य केले आहे. या महिन्यात श्री. थेइन सीन भारत भेटीसाठी येणार आहेत. या नंतर ते चीनला भेट देणार आहेत. चिनी भेटीचे अधिकृत कारण कोणतेही दिले गेलेले असले तरी आपल्या धरणाचे काम थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठीच ते बिजिंगला जाणार आहेत हे एखादा लहान मुलगाही सांगू शकेल.

सध्या तरी ब्रह्मी सरकार आपले शासन कसे लोकाभिमुख व लोकशाही आहे हे या धरणाचे काम थांबवण्याच्या आपल्या निर्णयावरून दिसून येते असे प्रौढीने सांगत आहे. परंतु त्यांचा हा निर्णय का व कोणत्या कारणांनी घेतला गेला आहे याची खरी कारणे कालच सांगू शकेल.

इरावती मात्र परत एकदा, निदान सध्यातरी, संथपणे वाहू लागली आहे. तीरावरची सगळी सुखदु:खे, खळबळ मागे टाकून!

10 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “संथ वाहते इरावती माई!

 1. informative article

  Posted by anil | ऑक्टोबर 10, 2011, 5:27 pm
 2. काचिन ही नागा जमातीची उपजमात असून ती धर्माने ख्रिच्श्रन आहे तर ब्रह्मदेशीय बौद्ध आहेत.

  Posted by मनोहर | ऑक्टोबर 10, 2011, 10:23 pm
 3. हा सर्वच भाग भूकंप प्रवीण म्हणूनही ओळखला जातो. — भूकंप-प्रवण

  तीरावरल्या सुखदुःखांची ज़ाणीव नदीनी न ठेवल्याचा बदला म्हणून तीरावरचे लोक बरेचदा नदीच्या सुखाचे भान न ठेवता वागताना दिसतात.

  – डी एन

  Posted by anonymous | ऑक्टोबर 16, 2011, 8:00 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: