.
ताज्या घडामोडी Current Affairs

बहि:शाल शिक्षण


पुणे विद्यापीठाचा पूर्वी एक अभ्यासक्रम असे. याला बहि:शाल अभ्यासक्रम म्हणत असत. या मागची कल्पना अशी होती की ज्या विद्यार्थ्यांना, अर्थार्जनासाठी नोकरी धंदा करावा लागत असल्याने कॉलेजात जाणे शक्य होत नाही पण शिक्षणाची तर इच्छा आहे, अशांना घरी अभ्यास करून हा शिक्षणक्रम पूर्ण करता येत असे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाची बहि:शाल पदवी सुद्धा देण्यात येत असे. आता शिक्षणक्रमाची ही पद्धती अजून प्रचलित आहे किंवा नाही याची मला माहिती नाही परंतु आपल्या महाराष्ट्रात याच शिक्षणक्रमावरून स्फुर्ती घेऊन अनेक उत्साही मंडळींनी असे बहि:शाल शिक्षणक्रम शालेय काय अगदी प्राथमिक शाळेच्या पातळीवर राबवल्याचे समजल्यामुळे मला आज अगदी गहिवरून आले आहे. खरोखरच धन्य तो महाराष्ट्र व धन्य ते महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी राब राबणारे उत्साही शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते.

या अशा अज्ञात कार्यकर्त्यांची जनतेला माहिती व्हावी, त्यांच्या महान कार्याबद्दल लोकांच्यात जागरुकता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी निरनिराळ्या जिल्हाधिकार्‍यांमार्फत अशा अंधारातील हिर्‍यांचा शोध लावण्याचे कार्य पार पाडले आहे. या महिन्याच्या 3,4 आणि 5 तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यांमधे असलेल्या सर्व शाळांची व या शाळांच्यात पटावर असलेल्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्यात आली. या पडताळणीत असे अनेक हिरे, माणके व पाचू उघडकीस आल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात साहजिकच परम संतोषाचे वातावरण पसरले आहे.

सबंध राज्यात मिळून, शाळेत न जाता घरीच बसून अभ्यास करणारे 12 लाख विद्यार्थी सापडले आहेत. जिल्हानिहाय असे बहि:शाल विद्यार्थी किती आहेत याची स्फुर्तीदायक माहिती खालील तक्त्यावरून समजू शकेल.

 

जिल्हा

लाखातील विद्यार्थी संख्या

पुणे

1.26

रत्नागिरी

0.11

कोल्हापूर

0.40

नाशिक

1.25

जालना

0.50

बीड

0.66728

परभणी

0.4

हिंगोली

0.30055

अकोला

0.37441

बुलढाणा

0.32

वाशीम

0.17839

अमरावती

0.51778

यवतमाळ

0.72700

चंद्रपूर

0.34

वर्धा

0.19

गडचिरोली

0.22622

गोंदिया

0.18504

भंडारा

0.24

नागपूर

1.07

सोलापूर

1.12527

 

पुणे,नाशिक, नागपूर व सोलापूर हे जिल्हे अशा बहि:शाल विद्यार्थ्यांच्या बाबतीत अत्यंत पुढारलेले आहेत हे वरील तक्त्यावरून लगेच ध्यानात येते. या बहि:शाल विद्यार्थ्यांबरोबर एक नवीनच संकल्पनाही आपल्या महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञांनी राबविली असल्याचा शोध लागला आहे. बहि:शाल विद्यार्थ्यांबरोबर आता बहि:शाल शाळा सुद्धा महाराष्ट्रात निघाल्या आहेत. अशा हजारो शाळा या पटपडताळणीत आढळल्या आहेत. शाळाच काय तर अनेक शिक्षक सुद्धा बहि:शालच आहेत असे समजले आहे.

आता अशा बहि:शाल विद्यार्थी, शाळा व शिक्षण यांना व यांच्यामार्फत शिक्षण द्यायचे म्हणजे खर्च हा येणारच. त्यामुळे सरकारकडून मिळणारी ग्रॅन्ट वेळेवर यावी, दुष्ट मनोवृत्तीच्या लेखापरीक्षकांनी त्यात काड्या घालू नयेत म्हणून फक्त, ही सगळी बहि:शाल मंडळी अंतर्गत आहेत एवढेच हे शिक्षणक्षेत्रातील मान्यवर आजपर्यंत दाखवत होते. विनाकारण या एका किरकोळ ऍडजस्टमेंटचा मोठा बाऊ आता या पटपडताळणीनंतर केला जातो आहे. आता शाळा बहि:शाल असल्या तरी कागदपत्रे अंतर्गतच असतात ना? त्यामुळे अशा शाळा, हजेरीपत्रके कागदोपत्री दाखवली तर ती बनावट आहेत अशी आरडा ओरड मात्र काही नतद्रष्ट मंडळी करत आहेत.

सर्वांसाठी शिक्षणही सरकारी मोहीम, या बहि:शाल शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांच्या द्वारे शंभर टक्के यशस्वी जर होणार असली तर त्यासाठी अशा किरकोळ ऍडजस्ट्मेंटना नावे ठेवणे हे सर्वथा गैरच मानावे लागेल.

जय महाराष्ट्र! जय शिक्षण क्षेत्र मान्यवर!

8 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “बहि:शाल शिक्षण

 1. इतकी प्रभावशाली माहिती वाचून मी थक्क झालो आहे आणि आता असे तीव्रतेने वाटू लागले आहे की नोबेल प्राईझ कमिटी अजून कामकाजात मग्न आहे तो आतापर्यंत त्यांच्या पटलावर नसलेल्या ‘शिक्षण’ गटासाठी खास तरतूद करावी आणि त्याचे पहिलेवहिले नोबेल सांप्रत महाराष्ट्र राज्यातील त्या ‘शिक्षणमहर्षीं’ ना [एकापेक्षा जास्त असेल तर विभागूनसुद्धा] देण्यात यावे.

  इतपत बहि:शाल शिक्षण क्षेत्रातील महानतेचे कार्य आहेच या मंडळीचे हे वरील आकडेवारी सांगते आहेच.

  Posted by अशोक पाटील | ऑक्टोबर 8, 2011, 10:27 pm
  • अशोक पाटील –

   एक नवीन गट निर्माण करून त्यातील नोबल पारितोषिकासाठी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञांची शिफारस करावी या आपल्या सूचनेला माझा दुजोरा आहे.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 9, 2011, 7:48 सकाळी
 2. मार्मीक लेखन! शिक्षण क्षेत्रातील अशी कारागिरी, वाढती महागाई बघता महाराष्ट्रात बहि:शाल शिक्षण उर्फ ‘होम स्कूलिंग’ मोठ्या प्रमाणावर खरच सुरू होणार असे दिसते. आपण आपल्या मुलांना जर दहावी पर्यंत स्वता शिकवू शकत नसू तर मुळातच हे शिक्षण किती कुचकामी आहे इथेच सिद्ध होते.

  Posted by Sahaj | ऑक्टोबर 9, 2011, 7:57 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: