.
History इतिहास

वृषाकपि आणि मृग नक्षत्र


काही दिवसांपूर्वी श्वान दिन या नावाचे एक ब्लॉगपोस्ट मी प्रसिद्ध केले होते. त्यावेळेस कॅनिस मेजर तारका समूह व मृगशीर्ष नक्षत्र या संबंधी थोडी चर्चा झाली होती. त्या चर्चेत, मी ऋग्वेदात यासंबंधी एक ऋचा असल्याचे म्हटले होते. ही ऋचा 23 श्लोकांची आहे व समजण्यास अतिशय दुर्बोध आहे. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोकांचा विचार न करता त्याचा अनुवाद फक्त आपण बघूया. या ऋचेत इंद्र, त्याची पत्नी इंद्राणी, वृषाकपि नावाचे माकड व या वृषाकपिची पत्नी यांच्यातील संभाषणाचे वर्णन केलेले आहे. अगदी सरळ सरळ अर्थ घ्यायचा ठरवला तर हे संभाषण ग्राम्यतेकडे किंवा अश्लीलतेकडे झुकलेले आहे असे वाटेल. परंतु या संभाषणातून खरा अर्थ काय निघतो व लोकमान्य टिळकांनी यावरून काय निष्कर्ष काढले आहेत हे नंतर बघूया.

ऋग्वेद 10.86

1. इंद्राणी– (लोकांनी) सोमरस गाळणे बंद केले आहे व इंद्राला देव मानणेही त्यानी बंद केले आहे.

2. इंद्रा तुला प्राशन करण्यासाठी सोमरस कोठेही मिळणार नाही. तू या वृषाकपिचे नियमबाह्य वागणे कसे चालवून घेतो आहेस?

3. इंद्रवृषाकपि या यकश्चित प्राण्याने तुझे असे काय वाकडे केले आहे की त्यामुळे तू त्याचा मत्सर करते आहेस व माझा शत्रू व त्याचा भक्त असलेल्यांनी दिलेले हविर्भाग तो उपभोगतो आहे याचाही तुला हेवा वाटतो आहे?

4. इंद्राणीरानडुकराचा पाठलाग करून धापा टाकणार्‍या कुत्र्याने तू संरक्षण देत असलेल्या व तुझा लाडका असलेल्या या वृषाकपिचे कान चावावे.( असे मला वाटते आहे.)

5. या माकडाने मला अर्पण केल्या गेलेल्या सुबद्ध व मौल्यवान गोष्टी अपवित्र केल्या आहेत. मी त्याचा शिरच्छेद करून त्याला शिक्षा करणार आहे.

6. पुरुषांना सुख देऊ शकणारी व त्यासाठी आवश्यक अशी शरीरयष्टी असणारी माझ्यापेक्षा अधिक उत्तम अशी स्त्री नाही.

7. वृषाकपि – (उपरोधाने म्हणतो आहेमाते!) तुझ्या शरीराकडे बघून मी उद्दीपित होतो आहे.

8. इंद्रतुझे बाहू व हस्त इतके सुंदर आहेत. तुझे केस इतके लांब आहेत व तुझे शरीर इतके सुडौल आहे. तू एका सर्वश्रेष्ठ योध्याची पत्नी आहेस. तू या वृषाकपिवर का टीका करते आहेस.?

9. इंद्राणीहा सोंगाड्या मला कोणी पती नसल्याप्रमाणे, माझ्या मागे लागला आहे. परंतु हे सत्य आहे की माझा पती हा खराखुरा पुरुष आहे. मी इंद्राची पत्नी आहे व मरुत माझे सहकारी आहेत.

10. वृषाकपि- याच्या आधी या स्त्रीची, ती कोणत्याही उत्सव प्रसंगी व सार्वजनिक स्थळी गेली की ती इंद्राची पत्नी असल्यामुळे सर्व गोष्टी सुरळीत घडवून आणेल असे सांगून लोक तिची स्तुती करत असत.

11. वृषाकपि पत्नीइंद्राणी ही सर्वात नशीबवान स्त्री आहे. मी असे ऐकले आहे की तिचा पती वृद्धत्वाने कधीच मरणार नाही.

12. इंद्रवृषाकपि सहवासात असल्याशिवाय मी कधीच आनंदी असू शकत नाही कारण त्याच्या कडून मिळणारे अर्ध्य थेट देवांपर्यत पोचते व ते सुखी पावतात.

13. वृषाकपि पत्नीतू धनवान आहेस तुला पुत्ररत्ने व स्नुषा आहेत. इंद्र त्याला हविर्भाग म्हणून दिलेले बैल खाऊ शकतो व अत्यंत शक्तीमान आणि आनंदमय असे अर्ध्यही स्वीकारू शकतो.

14. इंद्रतू माझ्यासाठी 20 बैलांचे मांस शिजवले आहेस; ते व चरबी खाल्याने माझ्या पोटाचे दोन्ही भाग भरून मी तृप्त झालो आहे.

15. वृषाकपि पत्नीअनेक गाईंच्या कळपातील व अणकुचीदार शिंगे असलेल्या एकुलत्या एक बैला प्रमाणे इंद्रा तू आहेस. या मिश्रणामुळे तुला सौख्य प्राप्त होईल व तू ताजातवाना होशील.

16. श्लोक फारच अश्लील व मुद्याला सोडून आहे.

17. श्लोक फारच अश्लील व मुद्याला सोडून आहे.

18. इंद्रया वृषाकपिला एक वध केलेले रान डुक्कर, तलवार, टोपली, एक पात्र व जळाऊ लाकडाने भरलेली एक हातगाडी सापडली आहे.

19. इंद्र मी आता पुढे येऊन शोध घेतो आहे की ही व्यक्ती आदरणीय सहकारी आहे का शत्रूचा गुलाम आहे. कारण मला एका तज्ञाची गरज आहे. या व्यक्तीने बनवलेले एक साधे पेय मी घेतो आहे.

20. वाळवंट व सुपीक जमीन यात किती अंतर आहे हे मला सांगशील का? हे वृषाकपि तू माझ्या गृहाच्या जवळ ये.

21. इंद्राणीनिद्रानाश करणार्‍या वृषाकपि, तू घराच्या मार्गावर परत ये. म्हणजे आपल्यातील कलह संपेल.

22. कवीवृषाकपि तू उत्तरेला असलेल्या तुझ्या घरी गेलास तेंव्हा अनेक पापे रिचवलेला तो महाभयानक हिंस्त्र पशू कोठे गेला? लोकांचे नेतृत्व करणारा तो इंद्र कोठे गेला?

23. मुद्याला सोडून श्लोक आहे.

या ऋचेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणत्याही व्यक्तीचे डोके हे करताना गरगरू लागेल असे मला वाटते इतकी ती विचित्र आहे. परंतु विद्वानांनी या ऋचेचे अनेक अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी अगदी तळागाळातील अर्थ व लोकमान्य टिळकांनी लावलेला अर्थ हेच फक्त आपण पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वृषाकपि हे शरद ऋतू कालीन सूर्याचे नाव आहे व तो इंद्राचा मित्र आहे.

अगदी तळागाळाच्या पातळीवर जर या ऋचेचा अर्थ लावला तर तो असा सांगता येतो. ही ऋचा म्हणजे चार व्यक्तींमधील व ग्राम्य भाषेतील वर्णन असलेला हा एक कलह आहे. प्रथम इंद्राणी आपल्या पतीचे लाडके असणार्‍या, वृषाकपि या माकडाने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करते आहे. या नंतर इंद्र तिची स्तुती करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे. या नंतर वृषाकपि पत्नी तिची स्तुती करते आहे व अतिशय ग्राम्य अशा भाषेत ती व तिचा पती यांचे संबंध कसे आहेत या संबंधी सांगते आहे. ती इंद्राणीला खात्री देते आहे की वृषाकपि तिच्याकडे कधीच वाकड्या नजरेने बघणार नाही व या पूर्वी जर त्याने असा काही प्रयत्न केला असला तरी याच्या पुढे तो कधीच करणार नाही.. शेवटी इंद्राणी आपला राग सोडून देते व वृषाकपि व त्याची पत्नी यांना मार्गक्रमण करण्याची परवानगी देते.

लोकमान्यांनी या ऋचेचा अर्थ सांगताना यातील काही दुर्बोध अशा गोष्टींची तारका समूहांशी सांगड घातली आहे. कॅनिस मेजर तारका समुहाचा उल्लेख या ऋचेत कुत्रा असा आला आहे तर मृग नक्षत्राला रान डुक्कर, हिंस्त्र पशू असे म्हटलेले आहे. या ऋचेत अशीही कल्पना आहे की शरद कालीन सूर्य हा मृग नक्षत्राचे रूप घेऊन आला आहे. लोकमान्यांनी सांगितलेला या ऋचेचा अर्थ असा आहे.

इंद्राचे घर उत्तरेला असताना हा वृषाकपि खाली (दक्षिणेला) नाहीसा झाला आहे व त्याने मृगाचे रूप धारण केले आहे. सूर्य दक्षिणेला गेल्याने आर्यांनी इंद्राला हविर्भाग देणे व सोमरस गाळणे बंद केले आहे. त्यामुळे इंद्राणी संतप्त होऊन तिने मृग बनलेल्या वृषाकपिचे डोके उडवून, कुत्र्याने त्याचे कान खावे म्हणून त्याला सोडले आहे. इंद्र आपल्या मित्राला इंद्राणीने अशी वागणूक देऊ नये म्हणून विनवतो व तिची स्तुती करतो. इंद्राणी ते मान्य करते. इंद्र व इंद्राणी, सूर्याची त्याने परत उत्तरेला यावे म्हणून विनवणी करतात.”

लोकमान्यांच्या मताने या ऋचेत काही अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

1.सूर्य विषुव वृत्ताच्या दक्षिणेला गेल्याने आर्यांचे बंद झालेले हविर्भाग.

2. शरद काली रात्री आकाशात मृग नक्षत्र दिसते आहे. म्हणजेच त्याच्या सहा महिने, आधी वसंत संपाताच्यावेळी, सूर्य मृगनक्षत्रासमोर आहे.

3. व्याध तार्‍याला व्याध न म्हणता इंद्राणी कुत्रा म्हणते आहे. या नक्षत्राचे युरोपियन नाव कुत्रा हेच ( Canine Major) आहे.

4. सूर्य परत विषुव वृत्ताच्या उत्तरेला आल्यावर, आर्यांचे सुरू होणारे हविर्भाग.

ऋग्वेद हा समजण्यास अत्यंत दुर्बोध असा ग्रंथ आहे असे का म्हणतात हे या उदाहरणावरून चांगलेच लक्षात येते. मात्र लोकमान्यांनी ज्या पद्धतीने या ऋचेचा अर्थ लावला आहे त्यावरून त्यांचा व्यासंग किती दांडगा होता याचीही चांगलीच कल्पना येऊ शकते.

6 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

28 thoughts on “वृषाकपि आणि मृग नक्षत्र

 1. आपला आजचा लेख वेगळ्या प्रांतातील असला तरी वाचनीय आहे. लोकमान्य टिळक यांना गणिताबरोबर इतर अनेक विषयात किती रुची होती, हे पुनः एकदा समजले. या संदर्भात, मला Andrew Robinson या लेखकाच्या Thomas Young या ब्रिटीश विद्वानावरील “The last Man who knew Everything” या पुस्तकाची आठवण आली. लेखकाच्या म्हणण्यानुसार हा विद्वान, पदार्थविज्ञान, अभियांत्रिकी, physiology, Egyptology इत्यादी अनेक विषयात रुची घेऊन त्यात आपला असा काही ठसा उमटवणारा होता. आश्चर्य म्हणजे लेखकाने प्रस्तावनेत अशा प्रकारे बहुविध विषयात रुची घेणा-या भारतातील रवींद्रनाथ टागोर व सत्यजित रे यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

  मंगेश नाबर

  Posted by Mangesh Nabar | ऑक्टोबर 6, 2011, 5:55 pm
  • मंगेश नाबर –

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण म्हणता ते पुस्तक माझ्या वाचनात आलेले नाही. मिळवून ते वाचण्याचा मी जरूर प्रयत्न करीन.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 9:25 सकाळी
 2. > वृक्षकपि हे शरद ऋतू कालीन सूर्याचे नाव आहे व तो इंद्राचा मित्र आहे.
  >

  माझ्याज़वळच्या ऋग्वेद-संहितेत १०.८६ हा वेचा तीन व्यक्तींमधला संवाद आहे. इन्द्र, इन्द्राणी, आणि वृषाकपि (वृक्षकपि नाही). वृषाकपि या व्यक्तीच्या लिंगाबद्दल मला माहिती नाही, पण तो/ती एका इन्द्र नामक व्यक्तीची सन्तती आहे. पहिला श्लोक लिहिणारा इन्द्र वृषाकपिचा बाप आहे, की तो बाप-इन्द्र दुसराच कुणी आहे, याची मला कल्पना नाही, आणि त्याबद्‌दल मी अज्ञानापायी काही निष्कर्ष काढू शकत नाही. अकरावा श्लोक इन्द्राच्या नांवावर आहे, कुठल्याच ‘पत्नी’च्या तोंडी नाही. चौथी व्यक्तीच या संवादात बोललेली दिसत नाही.

  मुख्य म्हणजे सूर्याचा उल्लेख ‘श्लोकाची (मुख्य) देवता’ म्हणून नाही. ती देवता ‘इन्द्र’ आहे. एखाद्‌या श्रीकृष्ण देशपांडेनी भगवान-कृष्णाची स्तुती करावी, तसा श्लोक-कर्ता इन्द्र देवता-इन्द्राबद्दल बोलला असावा. म्हणजे या वेच्याशी दोन किंवा तीन वेगवेगळ्या इन्द्र नामक व्यक्ती/देवता यांचा संबंध असावा.

  – नानिवडेकर

  Posted by anonymous | ऑक्टोबर 6, 2011, 10:10 pm
  • नानिवडेकर –

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी इंग्रजी पुस्तके संदर्भ म्हणून वापरलेली असल्याने वृक्षकपि असे चुकीचे भाषांतर बहुदा केले आहे. परंतु आपण म्हणता तसे वृषाकपि हे नावच बरोबर आहे. मी माझ्या लेखात आवश्यक ते बदल केले आहेत. माझ्या जवळच्या भाषांतरात अकरावा , पंधरावा व सतरावा हे श्लोक वृषाकपिच्या पत्नीच्या नावावर दिलेले आहेत तसेच बावीसावा श्लोक कवीच्या नावावर आहे म्हणजे ऋचेत एकूण 5 पात्रे आलेली आहेत.लोकमान्य सुद्धा वृषाकपि हे सूर्याचेच नाव असल्याचे सांगतात.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 7:50 सकाळी
 3. इंद्र ही मन, मनाचे संकल्प करणे कार्य व त्या कार्याचा परिणाम यात सुसंगती राखणारी देवता आहे हे लक्षात घेतल्यास या मंत्रसमूहाचा अधिक संगतवार अर्थ लागणे शक्य आहे.

  Posted by मनोहर | ऑक्टोबर 6, 2011, 10:26 pm
  • मनोहर
   या ऋचेचे अनेक अर्थ लावले गेलेले आहेत. मला या लेखात फक्त लोकमान्यांनी लावलेला अर्थ पुढे आणायचा असल्याने मी तेवढाच दिला आहे.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 8:04 सकाळी
 4. One doubt regards the ascription of a section to Indra when it is allegedly about the Sun. Quite a few tracts in Rigveda are devoted to Soorya, so if 10.86 were also devoted to him, I guess Indra would not have been called its devataa.

  Secondly, are any verses in Rigveda attributed to animals? ‘vrushhaakapiH aindraH’ means Indra’s ‘something’ Vrushaakapi. I take that ‘something’ to mean ‘Indra’s progeny’, but might it mean ‘Indra’s monkey’? Out of the 23 verses, 3 are attributed to वृषाकपिः ऐन्द्रः .

  – dn

  Posted by anonymous | ऑक्टोबर 7, 2011, 12:25 सकाळी
  • dn-
   This particular Hymn has been certainly dedicated to Indra and not to Soorya. As deciphered by Lokamanya Tilak, it just tries to explain the southward passage of Sun between Autumnal and spring equinoxes. The animals that appear in the Hymn are just constellations seen by the poets.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 9:21 सकाळी
 5. माझ्या वरच्या प्रतिसादात ‘ascription’ ऐवजी ‘dedication’ वाचावे, पण प्रतिक्रिया देताना dedication-शब्द आठवलाच नाही.
  माझी शंका ही: इन्द्र नांवाची (इन्द्र-देवतेपासून भिन्न असलेली) व्यक्ती ज़र रूपकाद्‌वारे सूर्यस्तुति करते आहे, तर या भागाची देवता ‘सूर्य’ हवा. या देवता मूळ ऋषिंनी नोन्दवल्या आहेत की त्याबाबतही मतभेद आहेत, याची कल्पना नाही. पण सूर्याचे महत्त्व सांगणारा भाग इन्द्र-देवतेला का अर्पिला आहे? वेदांचा अभ्यास केलेले लोक यावर आपली टिप्पणी देऊ शकतील. माझ्याज़वळच्या पाठांत वृषाकपिच्या पत्नीच्या तोंडी श्लोक का नाहीत, हा मुद्‌दाही आहेच.

  http://www.manushi-india.org/pdfs_issues/PDF%20file%20114/6.%20Like%20Mother,%20Like%20Son.pdf — This URL says that Vaidic students variously find evidence of 3 or 4 or even 5 speakers in the dialogue in 10.86.

  एक-दोनदा ते माकड इन्द्राणीला ‘अम्ब’ (आई) म्हणूनही संबोधतं, ‘although we may feel that this adds incest to injury’. ‘अम्बा’ या शब्दाचं एकवचनी सम्बोधन ‘अम्बे’ न होता ‘अम्ब’ असं होतं. ‘अम्ब त्वामनुसंदधामि’ हे गीतास्तुतितले शब्द अनेक वाचकांच्या माहितीचे असतील. अर्थात मराठीत ‘अम्बे तुज़वाचून कोण पुरविल्‌-आशा’ हे परिचयातलंच संबोधन आहे.

  सॉमरसेट मॉमच्या एका कथेत गोर्‍या युरोपियन लोकांनी मलाय बेटात माकडाच्या-ज़वळ असलेल्या मादींशी संग करून अर्ध-मानव, अर्ध-कपि अशी सन्तती निर्माण केल्याचा उल्लेख आहे. तो वस्तुस्थितीवर आधारित आहे की कल्पनेचा प्रकार हे मला माहीत नाही. इथे चौथ्या श्लोकात वृषाकपिला चाबकानी फोडण्याऐवजी कान चावण्याची लाडीक शिक्षा करण्याचा उल्लेख इन्द्राणीनी केला आहे. आधीच वाह्यातपणा करणार्‍या मर्कटाशी ही शारिरिक ज़वळीक कशाला? साहजिकच तो कपि अधिकच चेकाळला. तेव्हा या अंबेकडून भलतीच आशा करणार्‍या श्रुतीला लुई रेनू (Louis Renou) ‘the strangest poem in the Rigveda’ म्हणाला यांत नवल नाही.

  – डी एन

  Posted by Anonymous | ऑक्टोबर 7, 2011, 10:35 सकाळी
  • डीएन
   इंद्राणी कान चावत नसून कॅनिस मेजर मधील कुत्र्याने या मृगाचे रूप घेतलेल्या वृषाकपिचे कान चावावे अशी तिची इच्छा आहे. या ऋचेत मुळातच इतका वाह्यातपणा आहे की इंद्राणीने लाडिक शिक्षा करून तो वाढवण्याची अजिबातच आवश्यकता दिसत नाहीये.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 3:07 pm
 6. हा सगळाच संवाद एका अनाम कवीनी लिहिला असेल. ते पाहता या संवादात भाग घेणारा इन्द्र आणि देवता-इन्द्र हे एकच असू शकतील. आज़पर्यंत माझी कल्पना होती की ऋग्वेदांतल्या प्रत्येक श्लोकाचा रचनाकार नांवानी माहीत आहे.

  थोडक्यात वेद ज़ाणणार्‍या व्यक्तीला विचाराव्यात अशा अनेक शंका या श्लोकांविषयी निर्माण झाल्या आहेत.

  – डी एन

  Posted by Anonymous | ऑक्टोबर 7, 2011, 10:45 सकाळी
  • डीएन

   माझ्याकडील ऋग्वेदाच्या संहितेत या ऋचेचा रचनाकार ऋषी येथे, चक्क इंद्र, इंद्राणी व वृषाकपि एंद्र अशी नावे आहेत. त्यामुळे या ऋचेचा रचनाकार ऋषी कोण यासंबंधीचा गोंधळ आणखीनच वाढतो आहे.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 3:05 pm
 7. इन्द्र वस्तुतः खरा कोण होता हा खूप मतभिन्नतेचा विषय आहे. त्यातील दोन मते संभाव्य मानली जात असावीत. इन्द्र म्हणजे गर्जना आणि वादळ. वीज, आकाश, वर्षा, सूर्य आणि अग्नि असे सर्वसाधारणपणे म्हटले आहे. मात्र इन्द्र = अग्नि असे जेव्हा समोर येते तेव्हा तो अग्नि विजेतलाच असतो, पार्थिव वा पारंपारिक अग्नि नव्हे. इन्द्र हा वस्तुतः सूर्य किंवा सविता आहे. ही रुपके ऋग्वेदात असाधारण नाहीत, त्यामुळे इन्द्र म्हणजेच सूर्य हे मतही त्याज्य मानण्याचा पंडितांमध्ये प्रघात आहे.

  आता वरील लेखातील वृषाकपिचा उल्लेख आणि त्याच्याबरोबरचे इन्द्राचे संबंध वाचताना मनी येत आहे की एकट्या ऋग्वेदातच मग इन्द्राची किती रुपे दिली आहेत ?

  Posted by अशोक पाटील | ऑक्टोबर 7, 2011, 2:10 pm
  • अशोक पाटील
   ऋग्वेदात इन्द्राची किती रूपे दिली आहेत हा प्रश्न समुद्रात पाण्याचे किती थेंब आहेत? असे विचारण्यासारखाच मला वाटतो आहे. हाहाहा!

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 3:10 pm
 8. Exactly. And somehow I knew you would react in this way only while responding to my statement. Actually I feel we need a new emphasis, a larger view regarding the subject itself, not only various ‘Roopas of Indra’. You would agree with me if I say written and hallowed texts on such topics are not the only kinds of sources for accurate information or interpretation in a culture like ours. Oral traditions of every kind still perform cultural elegance of every kind, whether they are plays, rituals, or games, contain texts, written or oral. In a sense, every cultural thru verbal exchange is a text in itself.

  I said so, because when I was touring (with friends of course) far eastern part of our country, especially Meghalaya and Arunachala Pradesh, I had couple of opportunities to listen to such kinds of stories about Indra and alike deities from sages over there. But, naturally, they had no written proof whatsoever.

  Ashok Patil

  Posted by अशोक पाटील | ऑक्टोबर 7, 2011, 5:40 pm
  • Ashok Patil –
   You are absolutely right in saying that scriptures cannot be considered as the only source of information and the traditional folk songs and stories are also an equally reliable source of information. For example the story of Ramayana could not have been written by Walmiki any time before 500 BC, yet origins of the story are at least another 5000 years old and must have been handed down the generations through folklore. You might see my article about the scriptures in my e-book ‘Shanka-Kushana’.
   My previous comments just highlight the fact that Rigveda is such a vast storehouse that it would be impossible to count things in it.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 8, 2011, 8:05 सकाळी
 9. आकाशात दिसणारा तो तारकासमूह म्हणजे “अष्टक” आहे…
  तुम्ही ऋचा क्रमांक १६ आणि १७ ची माहिती लिहीली तर नक्की काय लिहिले आहे ते कळू शकेल..
  आमच्या मते ह्या “दौग्धा गोपलानंदनः” च्या गीतेतील श्लोकाशी काहितरी संबंध आहे…

  Posted by अष्टक | ऑक्टोबर 9, 2011, 6:30 सकाळी
  • धनुर्धारी-

   अष्टक हा तारका समूह 75 अंश दक्षिण या स्थानी दिसत असल्याने भारतातून दिसू शकत नाही.
   आपले वास्तव्याचे स्थान दक्षिणेकडे असले तर कदाचित आपल्याला तो दिसू शकेल. मी ऋचा क्रमांक 16 व 17 यांचा अनुवाद येथे दिला तर माझ्या ब्लॉगवर कायदेशीर कारवाई होण्याची मला भिती असल्याने मी तो देऊ शकत नाही. आपल्याला रुची असल्यास कृपया ऋग्वेदाची संस्कृत प्रत किंवा इंग्रजीतील अनुवाद यातून तो वाचावा. आपण संदर्भ दिलेला गीतेतील श्लोक मी वाचलेला नसल्याने त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 9, 2011, 8:01 सकाळी
 10. टिळकांनी या ऋचांचा संबंध खगोलशास्त्राशी कुठल्या आधारावर लावला, याची मला उत्सुकता आहे. पुढे शेकडो वर्षं पाळलेला अश्लीलतेला साहित्यापासून दूर ठेवायचा संकेत इथे नक्की का धुडकावला? ऋग्वेदात या भागाच्या आसपास तारकासमूहाबद्‌दल चर्चा आहे का? वगैरे. इतर अनेक भाष्यकारांनी या ऋचांचा अगदी दिसतो तसा अर्थ देऊन त्यातल्या रूपकाच्या असण्या-नसण्या-बद्‌दल टिप्पणी केलेली नाही, असं दिसतंय.

  सर्वोपनिषदो गावो, दोग्धा गोपालनन्दन: — हा श्लोक गीतेत नाही, तो गीतास्तुतीत आहे, आणि त्याचा या ऋचांशी काही संबंध नाही.

  – डी एन

  Posted by Anonymous | ऑक्टोबर 9, 2011, 8:17 सकाळी
  • डी एन –

   टिळकांनी या ऋचांचा संबंध खगोलशास्त्राशी कसा लावला आहे हे जाणून घेण्यासाठी ओरायन हा त्यांचा ग्रंथ मुळातून वाचण्याची गरज आहे. तुमचे पूर्ण शंका निरसन होऊ शकेल असे वाटते.
   श्लीलता किंवा अश्लिलता ही एका विशिष्ट कालातील सामाजिक संकेतांवर अवलंबून असते. नंतरच्या कालातील संकेतांनुसार त्या आधी रचल्या गेलेल्या ऋग्वेदात अश्लीलता आहे हे म्हणणे यामुळेच अयोग्य आहे. ऋग्वेद कालातील सामाजिक संकेतानुसार तो ग्रंथ रचला गेला आहे. या ऋचेच्या शिवाय अनेक ठिकाणी असलेले संदर्भ (उदा. यम-यमी यंच्यातील संभाषण , पहाटेच्या उषेचे वर्णन) सध्याच्या कालात अश्लील वाटण्याची शक्यता आहे. अश्वमेध या यज्ञातील एक विधी तर सध्याच्या सामाजिक संकेतांना पूर्णपणे धुडकवताना दिसतो. म्हणूनच ऋग्वेद सध्याच्या संकेतांच्या चौकटीत बसवला जाऊ नये असे मला वाटते.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 9, 2011, 10:32 सकाळी
 11. सामाजिक संकेत बदलत असतात; पण कुठल्या काळात कुठले संकेत होते हा त्या काळाचं मूल्यमापन करण्याचा एक निकष असतो. ‘रघुवंशा’त सभ्यता पाळणारा कालिदास जेव्हा कुमारसंभवम्‌ लिहिताना पार्वतीविषयी विनाकारण उत्तान मज़कूर लिहितो, तेव्हा त्या काळच्या संकेतांपेक्षाही कालिदासाच्या मनोवृत्तीशी त्याचा संबंध असू शकतो. शिवाय द्रष्टे साहित्यिक हे संकेत ठरवण्यालाही हातभार लावत असतात. तेव्हा ऋग्वेदाला अमुकच एका काळच्या संकेतांनुसार पाहण्याचा माझा हेतू नाही. एक विशिष्ट साहित्यिक उंची गाठलेल्या लेखकाकडून काही विवेकाची अपेक्षा असते.

  अज़ून एक शंका म्हणजे आर्य लोक ३-४ महिने काय अंधार-अंधार करत उदासच असत का? ‘याच्यातही एक मजा आहे’ म्हणणारे उतारे त्या काळच्या साहित्यात आहेत का? चौकशी करावी लागेल.

  – डी एन

  Posted by Anonymous | ऑक्टोबर 9, 2011, 11:47 सकाळी
  • डी एन-

   आर्य संस्कृती आर्टिक प्रदेशातून आली असावी हा टिळकांचा एक हायपॉथिसिस आहे. सध्याच्या ह्युमन मायग्रेश न्स मधील संशोधनानुसार असे एक मायग्रेशन झाले होते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मात्र ऋग्वेदकालीन आर्य आर्टिक प्रदेशात रहात होते असे म्हणणे धाडसाचे ठरावे. ऋग्वेदातील वर्णंनाप्रमाणे मध्य एशिया किंवा थोडे दक्षिणेकडे म्हणजे सिरिया, उत्तर पर्शिया येथे त्यांचे वास्तव्य असण्याची शक्यता जास्त वाटते. त्यामुळे 3/4 महिने दर वर्षी ते अंधारात बसत असतील काय? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 10, 2011, 7:30 सकाळी
 12. आर्य (किंवा आज़चे युरोपियन) ३-४ महिने पूर्ण अंधारात नसतीलही. पण ते एप्रिलचा खूप उदो-उदो करतात, आणि हेमन्त ऋतुबद्दल चांगलं बोलत नाहीत. ‘कॅनडातली थंडी परवडली पण भारत वा फिनिक्स-अ‍ॅरिझोनाचा उन्हाळा नको’ म्हणणारे लोक काही प्रमाणात तरी दिसतात, पण या थंडी-वादी लोकांनी ऋग्वेदासाठी काही लिहिलेलं असल्यास ते वाचायला आवडेल. उदाहरणार्थ कुसुमाग्रजांनी ‘येईल सौंदर्या जागृती’ असं सूर्योदयाचं वर्णनही केलं आहे, आणि दुसर्‍या कवितेत ‘उजेडात दिसू वेडे’ म्हणून सूर्याला शिव्याही हासडल्या आहेत.

  – डी एन

  Posted by Anonymous | ऑक्टोबर 10, 2011, 9:12 सकाळी
 13. Sir आपल्याकड शरद पौर्णिमेला इंद्राची पूजा करण्याचा प्रघात आहे, त्यामुळे दिलेल्या सुक्ताची देवता इंद्रच असावी.

  Posted by Abhijit | ऑक्टोबर 11, 2011, 12:58 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक अष्टादशपुराणेषु… » GuऋviSion - ऑक्टोबर 11, 2011

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: